आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेजारच्या शाळेतील मुख्याध्यापकांना तिने विचारले, ‘वस्तीतील मुलामुलींसाठी सुटीतील शिबिर घेण्यासाठी शाळेचे दोन वर्ग मिळतील का?’ तिची, तिच्या कामाची चौकशी करून त्यांनी आपुलकीने परवानगी दिली. शिबिरात वेगवेगळ्या सधन व्यक्तींना बोलावले होते.
‘एक था बंदर|
घुस गया अंदर|
बोला मुझ को भूख लगी है|
खानो को दो जो कुछ भी है|
‘अनिता’ने बंदर को देखा|
और वही से किया इशारा|

या कवितेच्या ओळीत स्वतःचे नाव जोडता यायचे. शिबिरात आलेल्या नवीन बाईंची युक्ती मुलामुलींना खूप आवडली. बोटात घालता येण्यासारख्या कागदी बाहुल्या, प्राणी, पक्षी यांच्या अंगठ्या तयार करून गोष्ट सांगायला मुलंमुली पुढाकार घेत होती. कावळा-चिमणी, ससा-कासव, दोन बाहुल्या यांच्या गोष्टी रंगत गेल्या. प्रसिद्ध कळसूत्री बाहुल्यानिर्मातीने आपला वेळ मुलामुलींसाठी आनंदाने दिला होता.

दुसर्‍या नवीन बाई म्हणाल्या, “मी तुम्हाला ‘अंगुलीमाल आणि बुद्ध’ ही गोष्ट सांगते. मगध देशातील जनता जंगलात दडलेल्या दरोडेखोराच्या दहशतीने भयभीत झाली होती. तो जंगलातून जाणार्‍या प्रवाशांवर हल्ला करून त्यांना लुटत असे आणि ठार करत असे. नंतर प्रवाशाचे बोट गळ्यातील माळेत बांधत असे. म्हणून लोकांनी त्याचे नाव अंगुलीमाल ठेवले होते. एकदा बुद्ध त्या जंगलातून जाणार असतात. लोक त्यांना अडवतात. धोका सांगतात. बुध्द शांतपणे वाटेवर चालू लागतात. अंगुलीमाल त्यांना पाहतो. धमकी देतो. बुद्ध म्हणतात, ‘जा, समोरच्या झाडाची दहा पाने तोडून आण.’ ‘हे काय शौर्याचे काम नव्हे. पाहिजे तर वृक्ष आणतो.’ असे म्हणत तो दहा पाने आणतो. ‘आता ही पाने जोडून ये. बघ तेवढे जमेल काय ते.’ अंगुलीमाल बुद्धाच्या शांत चेहर्‍याकडे पाहत राहतो. त्याला त्याची चूक कळते. बुद्ध म्हणतात, ‘जी गोष्ट आपण जोडू शकत नाही ती तोडायचा आपल्याला हक्क नाही. तू माणूस जिवंत करू शकत नाहीस. त्यामुळे तुला माणसाला मारण्याचा हक्क नाही.’ अंगुलीमाल क्षमा मागतो. बुद्धाचा तो सर्वांत चांगला शिष्य बनतो.” ‘या गोष्टीवर तुम्ही नाटक करून दाखवा,’ असे त्या बाई म्हणाल्या. बुद्ध – अंगुलीमाल, भयभीत झालेले नागरिक, यांचे संवाद मुलामुलींनी छान वठवले.

स्वतःचे चित्र काढून आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही, हे लिहायला मुलामुलींना सांगितले. स्वतःचा शोध घेत घेत त्यांनी आजूबाजूचे जग समजावून घ्यावे, असा विचार त्या पाठीमागे होता. त्यांच्या काही नोंदी अशा होत्या : ‘मला फुले आवडतात. ती बोलतात. कोणी तोडले तरी रागवत नाहीत. आपण असे बनू शकतो. किती भांडणे कमी झाली असती.’ ‘मला टायर चालवायला, इंग्रजी वाचायला, बोलायला, गायला, पतंग उडवायला आवडते.’ ‘पुस्तके वाचताना लेखक उदा. ग. दि. माडगुळकर, अण्णाभाऊ साठे आपल्याशी बोलताहेत असे वाटते.’ ‘मला माया केलेली खूप आवडते.’ आवडत नाही याच्या नोंदी अनेक होत्या. उदाहरणार्थ : ‘मला दारूवाला’, ‘कुठल्या देशात भूकंप झाला की नाही आवडत’, ‘अभ्यासात त्रास दिला’, ‘ज्यात लोकांचा मृत्यू होतो अशा मारामार्‍या करणं’, ‘गोंगाट’ आवडत नाही. ‘मला मुंबई शहर, मांस-मच्छी आवडत नाही’, ‘शाळेतल्या परीक्षांसाठी पाठांतर करावे लागते हे आवडत नाही.’ स्वतःबद्दल लिहिताना हळुवार भावना मोकळेपणाने लिहिल्या होत्या. जसे, ‘माझे गाल मऊ आहेत. मी जरा लाजरा आहे. जशी नवरी लग्नात लाजते तसे मी लाजतो,’ ‘मी हसल्यावर माझ्या गालाला खड्डा पडतो,’ आणि ‘माझ्या कानाला सुई टोचलेली आहे.’

‘माझा देव’ या विषयावर चित्र काढून पत्र, कविता, गद्य लिहायला सांगितले होते. नेहमी आंबेडकरांना आपले देव मानणार्‍या मुलामुलींनी त्यांची भावना व्यक्त केली नव्हती. कदाचित जाहीरपणे हे मान्य करण्यात त्याना संकोच वाटला असेल. बहुतेक चित्रांत गणपती, देवी, जोतिबा आणि साईबाबा अशी चित्रं होती. एकात मक्केचा काबा चितारला होता. एका मुलाने ‘माझ्या नजरेत मी डॉक्टरांना देव मानतो. ते आपणास जीवनदान देतात. ते आजार बरा करतात,’ असे लिहून रुग्णाला तपासणार्‍या डॉक्टरचे चित्र काढले होते. ‘आपण जाती, धर्मात देवाची वाटणी केली आहे. अस्पृश्य म्हणून देवळात जाता येत नाही. मी विचारते, देवा हा भेदभाव का? तुला याचे काही तरी करावे लागेल. हा भेदभाव तू काढला नाहीस तर आपल्या देशाची जगात नाचक्की होईल. तू आम्हाला नाराज करू नकोस,’ असे पत्र लिहिले होते. एकाने विचारले होते, ‘देवा, तू आमच्यासमोर का येत नाहीस? तू राहतोस कोठे, खातोस काय, तोंडाऐवजी तुला सोंड का आली, वगैरे.’ बालसुलभ प्रश्न मुलामुलींनी नोंदविले होते.

प्रत्येक मुलामुलीला शिबिरात सहभाग घेतल्याचे वेगळे प्रमाणपत्र दिले. त्यामध्ये त्यांच्या जमेच्या बाजू मांडत कोणत्या बाबतीत त्यांनी अधिक काम करणे गरजेचे आहे याच्या नोंदी होत्या. उदा. ‘मी स्वतः’ या सत्रातील चित्र तसेच कथालेखन उत्तम जमले आहे. तुझे हस्ताक्षर सुधारायला पाहिजे. त्यामुळे तुझे चांगले विचार वाचले जातील. तू चांगला मुलगा आहेस आणि आम्हाला खूप आवडतोस. शिबिराबद्दल आपले मत मांडताना मुलंमुली म्हणतात : ‘शिबिरात नाटक शिकविले त्या बाई खूप आवडल्या,’ ‘बाहुल्या करणे, खेळ, गाणी, गप्पा, कथा लिहिणे आवडले,’ ‘शांत असल्याने छान वाटते,’ ‘मुलांच्या हक्कासंबंधी घोषणा लिहिणे आवडले,’ आणि ‘चार दिवसांत एक महिन्याचे काम झाले असे वाटले.’

अरुणा बुरटे | सोलापूर
aruna.burte@gmail.com