आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवमासा आणि इतवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा देवमाशाने गिळली बोट;
डोंगराएवढे झाले पोट.
देवमासा गेला डॉक्टरच्या घरी,
आणि म्हणाला पोटात ढाराढुरी
डॉक्टरने कापले त्याचे पोट
आणि काढली बाहेर बोट.
मग डॉक्टर हसला मिशीत;
देवमासासुद्धा आला खुशीत,
आणि म्हणाला घालीत कोट
फीसाठी ठेवा बोट
अद्भुतरम्य जगात नेणार्‍या कवितेतून विंदा करंदीकरांची कवितांची पुस्तके मुलामुलींना खूप आवडायला लागली. त्यांच्यासाठी गोष्टी, कविता, चित्रकला, नाटक आणि गाणी यांची पुस्तके ती जमा करत होती.

मुलामुलींना विचारले, काय खाऊ खायचा, तर लगेच शिकवलेले उत्तर द्यायची, शेंगा-गूळ आणि चुरमुरे-चणे. तिला माहीत होते अनेक मुलंमुली पेप्सी, कुरकुरे असलेच काही तरी खात असायची. जवळच्या टपरीवर गरिबांसाठी अत्यंत स्वस्तात आणि म्हणूनच निकृष्ट पोषणदर्जा असलेल्या गोष्टी विकायला असायच्या. टीव्हीवरील जाहिरातीतून सर्व आर्थिक स्तरांतील मुलामुलींचे खाऊ बाजारपेठेने बदलून टाकले होते. तिने एकदा विंदांची ही कविता शिकवली.
ट ला ट; धी ला धी
मी खातो भाकर साधी.
ट ला ट; डू ला डू
तुम्ही खा सगळे लाडू.
ट ला ट; जी ला जी
मी खातो पालेभाजी.
ट ला ट; री ला री
तुम्ही खा श्रीखंडपुरी.
ट ला ट; ठी ला ठी
या आता कुस्तीसाठी!
मोठ्या मुलामुलींना त्यातील अर्थ कळत होता. मग छोट्यांना खाऊ कोणता घ्यायचा हे मोठी सांगायला लागली. त्यांच्यात चांगले-वाईट याची समज तयार होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करताना बदलाच्या प्रक्रियेतील अडचणी तीही शिकत गेली.

बापूजींच्या गोड गोष्टी, सुमती-अमोल-विक्रम; बुद्ध, आंबेडकर यांच्यावरील पुस्तके ठरावीक काही मुलामुली निवडायची. मुलामुलींची गावे, प्रदेश, घरातील परिस्थिती याचे संबंध त्यांच्या निवडीत तिला दिसायचे. इंग्रजी पुस्तके घेण्याची उत्सुकता सर्वांना वाटायची. अनेकदा वाचता यायचे नाही. चित्र पाहून अर्थ समजून घ्यायची. सर्व मुलामुलींनी सर्व प्रकारची पुस्तके हाताळावीत असा तिचा प्रयत्न असायचा. मुलामुलींची निवड एकसाची होत नाही ना याकडे लक्ष ठेवायची.
महाश्वेतादेवींच्या ‘इतवा मुंडाने लढाई जिंकली’ या पुस्तकातील इतवाचे चित्र दाखवीत ती म्हणाली, ‘तुमच्या वयाचा हा आदिवासी मुलगा रविवारी जन्मला म्हणून याचे नाव इतवा. तो खूप लहान असताना त्याचे आईवडील मरण पावतात.
त्याचा सांभाळ त्याचे आजोबा मंगलआबा करतात.

पश्चिम बंगालमधील कोलकात्यापासूनच्या दूरवर जंगलात हाथीघर भागात राहणारे हे आदिवासी. इतवा आपल्या आजोबांशी बोलून आपली जमात कधी, कशी आणि केव्हा हाथीघर या भागात राहायला लागली याबद्दल माहिती घ्यायचा. त्यातून इतवाला जमातीतील अनेक शूर लोकांच्या गोष्टी समजल्या. त्यांच्या गावात आदिवासी शिक्षक येतात. सर्व मुलामुलींनी शाळेत यावे यासाठी घरोघर जातात. आजोबा इतवाला शाळेत घालतात. आपल्या जमातीसाठी इंग्रजांशी लढणार्‍या शूर बिरसा मुंडाची गोष्ट गुरुजी इतवाला सांगतात. इतवला वाटायला लागते, आपणही जमातीसाठी काहीतरी करायला पाहिजे. पण कसे, हे त्याला समजायचे नाही. इतवाला पोटासाठी मालकाकडे शेळ्या पाळायला जावे लागायचे. शाळेपेक्षा त्याला बाहेरचे मोकळे रान, आकाश आणि नदीचे पाणी जास्त आवडायचे. पण बिरसाची गोष्ट ऐकल्यापासून आपण शाळेत जाऊन मोठे व्हायला पाहिजे हे त्याला समजायला लागले.

आजोबाही तेच सांगत असत. एकदा तो आपल्या मालकाला म्हणाला, ‘मला रोज शाळेत जायचे आहे. त्यामुळे मी शेळ्या पाळायला येऊ शकणार नाही.’ यावर मालक खूप चिडतात. ते इतवाच्या आजोबांना बोलावून घेतात. पण आजोबा सांगतात, ‘आता इतवा रोज शाळेत जाईल.’ मालकाला समजून चुकते, की इतवा आता त्याच्या घरी काम करायला येणार नाही. इतवालाही आपण कोणीतरी मोठे आहोत असे वाटायला लागलेले असते. तो रोज बिरसासारख्यांच्या गोष्टी वाचायला लागतो. शाळेचा अभ्यास करताना इतवा नदीकाठी झोपून आकाशाशी बोलायचा. मोठे झाल्यावर काय करायचे ते मनात ठरवायचा.’ ती म्हणाली, ‘ही गोष्ट लिहिणार्‍या महाश्वेतादेवी खूप मोठ्या लेखिका आहेत. त्यांनी आदिवासींच्या जमिनीच्या, शिक्षणाच्या हक्कासाठी खूप काम केले आहे. महाश्वेतादेवी यांना वाटते, शाळेत जाण्याचे ठरवून इतवाने मोठी लढाई जिंकली आहे.’

हे ऐकताना अनेक डोळे आणि कान इतवाचे चित्र पाहात होते. नदीकाठी उताणा झोपलेल्या इतवाचे चित्र दाखवत अमोल विचारतो, ‘बाई, आकाशाशी बोलणारा इतवा मनात काय ठरवितो आहे? मोठा झाल्यावर मनातल्या गोष्टी तो करू शकतो का?’ सुमती म्हणते, ‘इतवाचे फोटो दिले आहेत म्हणजे ही खरी गोष्ट आहे. महाश्वेतादेवींना इतवा आणि त्याचे आबा माहीत असणार. हो ना?’ त्याच वेळी दूर कोपर्‍यात बसलेला छोटा बबलू म्हणतो, ‘पण, मला बोट गिळणारा देवमासा पाहायचा आहे.’
(क्रमश:)
aruna.burte@gmail.com