आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aruna Burte Article About Teaching, Divya Marathi

ठकी आणि गाडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मला एक छान थर्माकोलचा गोल रोडवरच्या कचराकुंडीत दिसला. बाहुलीचे डोके बनवता येईल असे वाटल्याने मी तो उचलत होते; तेवढ्यात आपल्या रविवारच्या बाई येताना दिसल्या. मी वस्तू लपवत त्यांना नमस्ते केले,’ गल्लीतील मित्रमैत्रिणींना पायल सांगत होती. जितू म्हणाला, ‘मीही बाटलीच्या बुचातील पांढर्‍या चकत्या नेहमीप्रमाणे शोधत होतो. कचर्‍यातून वस्तू गोळा करताना त्यांनी आपल्याला पाहिल्याने रागावतील असे वाटले. तर, त्यांनी कचर्‍यातून बनवलेल्या आपल्या खेळण्यांची गोष्ट लिहा आणि रविवारी सांगा असे म्हटले. काय मज्जा आहे ना आपल्या रविवारच्या शाळेची!’ ‘आम्ही पहिल्यांदा बाहुलीबद्दल बोलणार,’ पायलच्या गटाने जाहीर केले. तेवढ्यात जितू र्ह ऽऽऽ र ऽऽऽ असा तोंडाने आवाज करत म्हणाला, ‘बाजू व्हा. माझा गाडा आला आहे. तोच आपली माहिती सांगेल.’ त्याच्या मदतनीसांचा गट उत्साहात होता.

नेहमीप्रमाणे रांगेत उभे राहून एकमेकांना ‘नमस्ते’ केल्यावर मुलामुलींकडे कौतुकाने पाहत ती म्हणाली, ‘आज आपण वेगळ्याच गोष्टी ऐकणार आहोत.’

‘ही आमची ठकी. मी एकदा रस्त्यावर बसली होती. थर्माकोलचा गोल मिळाला. त्याचे ठकीचे डोके केले. काही दिवसांनी थर्माकोलचा मोठा तुकडा मिळाला. तो बाटलीच्या आकाराचा कापून त्याचे अंग तयार केले. हातासाठी दोन काड्या आणि पायासाठी जरा जाड काठ्या लावल्या. रंगीत कागद गोळा करून चिकटवून फ्रॉक केला. डोळ्यासाठी बिया लावल्या. कावळ्याच्या पिसांचे केस झाले. गळ्यात लाल बिया माळल्या. अशी ही ठकी आमची खूप लाडकी आहे.’ पायलबरोबर तिच्या गटातील इतर सर्व ठकीची ओळख करून देत होते. त्यांच्या मदतीने ठकीनेही नमस्ते केले. सर्वांनी टाळ्या वाजवल्या.

जितूने नेहमीसारखा आवाज करत, ‘आला, आला, ऐटदार गाडा आला’ अशी हाळी दिली. ‘हे पाहा मी कसा ऐटीत पळतो. गाड्याच्या पुढील भागात एका तपकिरी प्लास्टिकच्या छोट्या नळीच्या दोन्ही टोकांना बाटलीच्या बुचात असलेल्या पांढर्‍या चकत्यांची दोन चाके आहेत. मधला लांबसडक दांडा खराट्याच्या काड्यांना दोर्‍याने बांधून वरून रंगीत स्ट्रॉ असल्याने ऐटदार दिसतो. या दांड्याच्या एका टोकाला पुन्हा दोन चकत्या बसवून त्या चाकवाल्या दांड्यात अडकवल्या. दांड्याच्या दुसर्‍या टोकावरील रबरी चकती तुमच्या हातात आहे. याला धरून ढकलल्यावर पुढील चाके गती घेतात आणि मी ऐटीत पळू लागतो. तुम्हीही मागे पळता. असे...’ जितूच्या गटाने असे म्हणत एक चक्कर मारली. सर्वांनी पाळीपाळीने ऐटदार गाडा पळवून आणि ठकीचे हात जुळवून नमस्ते करून पाहिले.

‘ठकी आणि ऐटदार गाडा या दोघांची गोष्ट सर्वांनी लिहून आणायची. चालेल? समजा तुम्ही वेगळी काही खेळणी केली असतील तर त्यांच्या गोष्टी लिहा. त्या गोष्टी वाचायला, ऐकायला मजा येईल,’ हे ऐकताच मुलामुलींचे डोळे चमकले.

‘हे पाहा माझे जादूचे बूट. त्याला पंख आहेत. हे बूट घातले की आपल्याला पक्ष्यासारखे उडता येते,’ असे सांगत समीना पुढे म्हणाली, ‘बाई, तुम्ही आम्हाला पंखवाल्या बुटांची गोष्ट सांगितली होती.’ तिने पाहिले, कचर्‍यात टाकलेले बूट समीनाने जादूभरे करून टाकले होते! काही जण त्यात पाय घालून खरोखर उडता येते का याचा अंदाज घेत होते. मुलामुलींनी लिहून आणलेल्या गोष्टींचे कागद पायलने गोळा करून दिले. त्यावर नजर टाकत, लिखाण दुरुस्त करत ती इतर खेळण्यांच्या गमतीजमतीचा चिवचिवाट ऐकत होती.

‘ही माझी चिंध्यांची बाहुली. हिचे नाव चिंध्यादेवी. एकदा तुमच्या लहानपणची गोष्ट आम्हाला सांगितली होती. तुम्ही चिंध्यांशी खेळत असल्याने तुमची आई तुम्हाला चिंध्यादेवी म्हणायची,’ धीट अनिता जोरात सांगत होती. दिवसभराचे काम संपवून रात्री कंदिलाच्या उजेडात गि-हाइकाचे शिवण शिवणारी आई तिच्या डोळ्यासमोर आली. अनिताची चिंध्यादेवी हातात घेतल्यावर तिला वाटले, सांगितलेली प्रत्येक गोष्ट मुलं-मुली किती लक्षात ठेवतात. सोडावॉटरच्या बुचाची वाजणारी माळ, सिगारेटच्या पाकिटाचे जादूचे पत्ते, रिकाम्या काडेपेट्यांची गाडी आणि अशी कितीतरी खेळणी स्वत:ची गोष्ट हिंदीमराठी मधून सांगायला लागली.

मुलामुलींना गोलात बसवून दुरुस्त केलेल्या गोष्टी वहीत लिहायला सांगितल्यावर त्यांच्या लिखाणाबरोबर तिचे विचारचक्रही चालू झाले. मुंबईसारख्या शहरातच नव्हे, जगभरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न बिकट आहे. श्रीमंत देश, तसेच समाजातील स्तर जास्त कचरा निर्माण करतात. तिच्या मुलामुलींच्या काही पालकांना पोटासाठी कचरा वेचण्याचे बिकट काम करण्याला पर्याय नाही! त्याच कचर्‍यातील वस्तू गोळा करून मुलंमुली खेळणी बनवत होती. त्यांच्या सर्जनशीलतेला फुलवण्यासाठी अरविंद गुप्ता या आगळ्यावेगळ्या खेळियाने लिहिलेल्या
अनेक पुस्तकांची तिला मदत झाली. त्यांचे ‘टाकाऊतून शिकाऊ’ हे पुस्तक तिने मुलामुलींना दाखवले. पुस्तक पाहत त्यांनी विचारले, ‘बाई, किती छान पुस्तक आहे हे. यांना लहानपणी कोणी शिकविले असेल बरे? आपल्याला अरविंद गुप्ता यांना भेटता येईल?’
(क्रमश:)