आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aruna Burte Article About Teaching Learning Experience

विचारसरणींचा भडिमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही आठवड्यांत तिला मुलामुलींकडे जायला जमलेले नव्हते. नेहमीच्या उत्साहाने ती सर्व जण गोळा झाली. काय काय झाले हे सांगण्याची त्यांच्यात जणू चढाओढ लागली. ‘आमच्याकडे दुसरे ताई आणि दादा येत होते. आम्ही बालवाडीत जमत होतो,’ पायलने सुरुवात केली. ‘त्यांनी आम्हाला या घोषणा आणि गाणी शिकवली,’ अनिताने सांगितले. अमोल म्हणाला, ‘ते म्हणायचे, दादरमध्ये एक मोठी सभा होणार आहे. तेथे गाणी म्हणायची आहेत.’ तिला हे सारे नवीन वाटले. ‘पण आम्ही दादरमधे गेलो नाही. कारण ते आम्हाला एकट्याने या म्हणाले. त्यांच्यापैकी कोणी सोबत नाही आले.’ तिने विचारले, ‘कोण होते हे ताई-दादा? त्यांची नावे काय होती?’ याचे उत्तर त्यांना कोणाला माहीत नव्हते. ‘थांबा, त्यांनी आम्हाला एक पोस्टर दिले होते. ते बालवाडीत आहे. मी घेऊन येतो,’ असे म्हणत सुमित पळत गेला.
‘आम्ही त्यांनी शिकवलेली गाणी म्हणून दाखवतो,’ असे म्हणत गाण्याला सुरुवात झाली. मुलंमुली गाणी सुरा-तालात अॅक्शनसह छान म्हणत होती. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांतून गाणी शिकवली होती. तिने पोस्टर पाहिले, ‘शहीद दिवस – छबिलदास स्कूल’. त्यावरून तिला समजले अति-डाव्या विचारसरणीच्या कला मंचाचे ते निमंत्रण होते. त्या मंचातर्फे गाणी, पथनाट्य, भाषणे आणि घोषणा असा कार्यक्रम बहुतेक असणार. हे सर्व पाहून तिची सहकारी शेजारीण अस्वस्थ झाली होती.
तिने मुलामुलींना विचारले, ‘तुम्हाला या गाण्यांचा अर्थ माहीत आहे?’ सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या. तिने सर्व गाण्यांचा अर्थ त्यांना समजेल अशा शब्दांत सांगण्याचा प्रयत्न केला. ‘मालक नोकरांना, मजुरांना योग्य मजुरी देत नाहीत. शोषण करतात. अन्याय करतात. त्यासाठी एकजूट करायला पाहिजे. हल्ला बोल करायला पाहिजे...’ त्यानंतर ती म्हणाली, ‘याचा अर्थ नीट समजण्यासाठी तुम्ही खूप शिकून मोठे व्हायला पाहिजे. ही गाणी ताई-दादांसारख्या मोठ्या मुलामुलींसाठी आहेत. तुम्हाला अजून खूप मोठे व्हायचे आहे.’ त्यांच्या चेह-यावरील त्यांना बरे वाटल्याचे भाव तिने वाचले. तिची शेजारीण मात्र वेगळा विचार करत आहे असे तिला जाणवले.
नेहमीप्रमाणे मुलामुलींबरोबर काम झाल्यावर त्यांचे पुस्तकवाचन सुरू झाले. तिच्या विचारांची चक्रे फिरू लागली. मुंबईमहानगरात पोटापाण्यासाठी आलेली कुटुंबं वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आसरा घेतात. किती तरी वस्त्या ३०-४० वर्षांच्या जुन्या आहेत. काही नव्या वस्त्या बघता बघता दोन-तीन वर्षांत उगवतात. खाडीमध्ये भर टाकून चार बांबू, तट्ट्या, पत्रे असे त्यांमधील लोकांच्या घरांचे स्वरूप असते. हळूहळू त्यांना सिमेंट, विटा, भिंती येऊन आधार देतात. या वस्तीचा जन्मही १०-१२ वर्षांपूर्वी असाच झाला होता. वस्तीच्या प्रत्येक गल्लीचे खास वेगळेपण असायचे. कधी भाषा, प्रदेश, गाव, जात, धर्म यांचे धागे असायचे. प्रत्येकाला निवा-यासाठी ठेकेदाराला शरण जावे लागायचे. गुन्हेगारी स्वरूपाचे व्यवहार सर्रास चालायचे. याचा अर्थ तेथे राहणारा प्रत्येक जण गुन्हेगार आहे, असा होत नाही. या कुटुंबांना केवळ तग धरून जगण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय प्रतिनिधींचाही आसरा शोधावा लागायचा. वस्तीमधील मुलंमुली म्हणजे विविध राजकीय विचारसरणींच्या सहज उपलब्ध असणा-या प्रचाराच्या शाळा व्हायच्या. ‘catch them young’ हे तत्त्व प्रत्येक जात, धर्म, राजकीय विचारसरणी, राजकीय पक्ष यांनी अमलात आणले होते. डाव्या विचारसरणीचादेखील अपवाद नव्हता. कुटुंबातदेखील ‘संस्कार’ या कल्पनेपायी हेच तंत्र वापरले जाते.
केवळ मुलामुलींचे कुतूहल जागवत, सर्जनशीलता फुलवत त्यांची विचारचक्रे सुरू करून देणा-या व्यक्ती, संस्था कमी आहेत असे तिला वाटायचे. ती नेहमी अशा व्यक्ती आणि संस्थांच्या शोधात असायची. यामध्ये मध्य प्रदेशातील एकलव्य, अरविंद गुप्ता, नॅशनल बुक ट्रस्ट, नेहरू पुस्तकालय, कोल्हापूरमधील सृजनानंदच्या लीलाताई पाटील आणि अशा इतर किती तरी जणांनी केलेल्या कामाची तिला मदत व्हायची. पुस्तकवाचन संपल्यावर मुलंमुली रांगेत उभे राहून ‘नमस्ते’ म्हणाली तेव्हा तिची तंद्री तुटली.
घरी परत जाताना तिची शेजारीण म्हणाली, ‘तू आपल्या सोसायटीच्या पदाधिका-यांना पत्र लिही. आपल्याला मागची मोकळी जागा रविवारी दोन तासांसाठी हवी आहे म्हणून. तसेच हा नक्षल गट कोणता आहे हे वेळीच शोधून त्यांना थांबवले पाहिजे. आपण शिकवतो आहोत त्या मुलांचे उपद्रवमूल्य वाढता कामा नये. नाही तर आपण करत असलेल्या कामाचा काय उपयोग?’ तिने शेजारणीचे शांतपणे ऐकून घेतले. त्यांच्या सोसायटीतील मागची मोकळी जागा मागण्याबद्दल नेहमी शेजारीण सांगत राहायची. तरी रस्त्यावरील पिंपळाच्या सावलीतील ठिकाण तिला जास्त चांगले वाटत होते. त्यामुळे मुलामुलींचा डेरा तेथेच जमत राहिला होता.
तिला वाटले, या मुलामुलींचा कसला आलाय उपद्रव? याच मुलामुलींचा मोठ्यांच्या उपद्रवापासून बचाव केला पाहिजे. कमीत कमी मुलामुलींनी स्वतःचा बचाव कसा करावा, याची काही युक्ती तरी सांगायला हवी होती. तिला खलील जिब्रान आठवला, ‘मुलामुलींना फक्त प्रेम द्या. तुमचे विचार देऊ नका. मुलंमुली जगाचा काय आणि कसा अर्थ लावतात ते फक्त समजून घ्या.’ मोठ्यांची अशी मानसिकता होण्याला किती युगं लागतील कोण जाणे. तोपर्यंत मुलामुलींचा अवकाश जपण्याचा प्रयत्न करणे तिच्या हातात होते.