आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aruna Burte Article About Teaching The Underprivileged

तळ्यात - मळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झोपडपट्टीतल्या मुलांच्या विश्वात डोकावण्यासाठी गेलेल्या लेखिकेला पहिल्याच दिवशी छान अनुभव
येतो. वेगवेगळे खेळ, गप्पा आणि गाण्यांमधून या मुलांचा उत्साह, त्यांच्या शिकण्याच्या-जाणून घेण्याच्या उत्सुकतेने लेखिकेचा उत्साह कसा वाढवला ते वाचूयात या भागात....
ठरल्याप्रमाणे तिने शेजारणीबरोबर रविवारी सकाळी त्यांच्या घराजवळच्या वस्तीत प्रवेश केला. गल्लीच्या तोंडाशी असलेली बालवाडी आज बंद होती. गल्लीच्या दुसर्‍या टोकाला मोकळ्या जागेत मुलंमुली खेळत होती. त्या दोघींना पाहिल्यावर काही जणांना आश्चर्य वाटले. काहींनी आपला खेळ चालू ठेवला. त्या सर्वांना एकत्र आणण्यासाठी तिने एका काठीने मातीत रेषा आखली. उत्सुक असणार्‍या मुलामुलींना त्या रेषेवर उभे राहायला सांगितले. ती सारी तीन ते 12-13 वर्षे या वयोगटातील होती.
‘नमस्ते,’ त्या दोघी हात जोडत म्हणाल्या.
‘नमस्ते टीचर, बाई, मॅडम...’ असा चिवचिवाट झाला.
शेजारीण वयाने ज्येष्ठ असल्याने तिला कोणीतरी एक खुर्ची आणून दिली.
‘माझे नाव... यांचे नाव... आम्ही जवळच्या सोसायटीत राहतो,’ ओळख करून देत ती म्हणाली. ‘आता प्रत्येकाने स्वत:ची ओळख करून द्या.’ तिला अंदाज आला. मराठी, हिंदी अशा दोन्ही भाषांतून बोलावे लागेल.
ती म्हणाली, ‘रेषेच्या एका बाजूला तळे आणि दुसर्‍या बाजूला मळा समजायचे. तळ्यात म्हटले की रेषेच्या एका बाजूला आणि मळ्यात म्हटले की त्याच्या दुसर्‍या बाजूला उडी मारायची.’ मजेत मुले-मुली उड्या मारत, चुकली की आऊट झाल्याने बाहेर जात होती. ‘तळ्यात कसे गार गार पाणी आहे ना? येते का तुम्हाला पोहायला?’ असे विचारल्यावर काहींनी पोहल्यासारखे हात हलवले. ‘आणि मळ्यात काय काय असते?’ गवत, झाडे, पेरू, बोरे, कैरी... स्स असे सांगत काहींनी तोंडाला पाणी सुटल्याचा आवाज केला. तळ्यात-मळ्यात खेळातून मुलंमुली कल्पनेच्या जगात जात, शब्द, कृती यामधील मेळ तत्परतेने घालण्याचे कसब कमावत होती.
डायरीत मुलामुलींची नावे लिहिण्याचे काम अनेक जणांना करायचे होते. दर रविवारी हे काम एकाला मिळेल असे सांगत अनेकांच्या चेहर्‍यावरील निराशा तिने दूर केली. साधारण मुलामुलींचा कल समजण्यासाठी प्रत्येकाला आवडणारे गाणे म्हणायला सांगितले. काहींना गाणी उत्कृष्ट म्हणता आली. ही मुले हिंदी, मराठी माध्यमाच्या नगरपालिकेच्या आणि खासगी शाळेत जाणारी होती. काही जणांच्या कडेवर धाकटी भावंडे होती. नंतर तिने स्वत: सामील होत सर्वांना गोलात बसविले. गोल आकाराच्या वस्तूंचे शब्द सांगा, असे म्हटल्यावर उत्साहाने हिंदी, मराठी आणि इंग्रजी शब्द वाढत गेले : भाकरी, चपाती, बांगडी, कान की बाली, बास्केट, घडी, बिंदी, तवा, वाटी, सूरज, चंद्र, संत्र, मोसंबी, सेब, चाक, बटण, मणी, बॉल... त्या प्रत्येक शब्दाचा प्रयोग करून वाक्य बनवत एकमेकांशी बोलायला सांगितले.
तिने आणलेल्या पिशवीतील पुस्तकांबद्दल मुलामुलींना उत्सुकता होती. प्रत्येक दोघातिघांमधे एक पुस्तक वाचायला दिले. भरपूर चित्रे, मोठी अक्षरे, छोटी गाणी आणि गोष्टी असलेली अशी हिंदी, मराठी आणि इंग्रजी पुस्तके तिने निवडली होती. त्यामधे कमला भसीनचे ‘धम्मक धम्म’, शफदर हाश्मीचे ‘पेड’, भोपाळमधील एकलव्य या संघटनेची अनेक पुस्तके, विंदा करंदीकर यांचे कवितासंग्रह, वृत्तपत्रांच्या मुलांसाठीच्या पुरवण्या असे बरेच काही होते. काही मुले फक्त चित्रे बघत होती. काही चित्रांना हात लावून बघत होती. काही जोरात वाचत होती. काही मनात वाचत होती. काही दुसर्‍याचे ऐकत होती. कंटाळा आला की पुस्तक परत करायला सांगितले होते. काही जण पुस्तक वाचण्यापेक्षा बदलून दुसरे घेण्यात जास्त रस घेत होती. तिने सांगितले, ‘ही पिशवी आणि त्यातील साहित्य आपल्या सर्वांचे आहे. ते आपण नीट ठेवायचे.’ त्यातील जवळ असलेली मुलगी म्हणाली, ‘म्हणजे हे आपल्या रविवारच्या शाळेचे दप्तर. सर्वांचे मिळून. हो ना?’ पुस्तके परत करताना, पिशवीतून बाहेर काढताना, वाचताना, चित्र बघताना ती प्रेमाने कशी हाताळायची हे सांगत सांगत त्यांची पुस्तकांशी मैत्री वाढविली. पुस्तके दुमडणे हे सहज केले जाते. त्या वेळी, ‘आपले हात, पाय कोणी असे दुमडले तर आपल्याला आवडेल का?’ असे विचारले. त्यामुळे पुस्तकांनाही इजा होते. ती तुटतात, फाटतात. हे ऐकताना समोरील मुलामुलींच्या हातावरून पाठीवरून तिने प्रेमाने हात फिरविला. पुन्हा रेषेवर उभे राहून सर्वांनी एकमेकांना नमस्ते केले.
वस्तीतील त्यांच्या ओळखीची मोठी माणसे म्हणाली, ‘बालवाडीत व्यायामशाळाही चालते. ती जागा वापरायला काहीच हरकत नाही. मुलांची शिकवणी का घेत नाही? त्याचा जास्त उपयोग होईल.’ तिला वाटले मुलामुलींना तळ्यात-मळ्यात खेळताना रेषेकडे लक्ष द्यावे लागते. उडी इच्छित ठिकाणी पडेलच असे नाही. कधी-कधी चूक होते. तसेच मोठ्यांच्या जगातही चाललेले असते. तिची मध्यमवर्गीय विचारसरणीची एक रेघ होती. आता तिने वस्तीतील मुलामुलींच्या मळ्यात उडी मारली होती. तिने मनोमन ठरविले, कितीही दबाव आला तरी शालेय अभ्यासाची जबाबदारी घ्यायची नाही. मोकळ्या गप्पागोष्टींमधून मुलंमुली कदाचित अभ्यासाला लागतील, यावर तिचा विश्वास होता.
(क्रमश:)
aruna.burte@gmail.com