आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aruna Burte Article About The Fascinating World Of The Youth

शोध जगाच्या अद्भुततेचा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत: बनविलेले पुस्तक कोजागिरी मधूनमधून पाहायची. त्यात प्रत्येक पानावर कापलेल्या चौकोनातून पुढच्या पानावरचा पतंग दिसायचा. एक छोटी मुलगी पतंग शोधत प्रत्येक पानावर चितारलेल्या वेगळ्या जगात जात राहाते. शेवटी पतंग तिला एका अद्भुत जगात नेतो!
‘मुलांचे विचारचक्र सुरू करून देणे, त्यांचे कुतूहल जागे करणे, वैज्ञानिक तत्त्व समजवण्यासाठी ही खेळणी आम्ही बनवतो. नेहमीच्या दुकानात त्याची विक्री करण्यासाठी याचे पॅकेजिंग आणि माहितीपत्र दोन्ही बनवायचे आहे. हे काम तू नक्की चांगले करशील,’ असे म्हणत एका प्रथितयश विज्ञानशिक्षणतज्ज्ञाने कोजागिरीवर विश्वास दाखवला होता. कोजागिरीने प्रसिद्ध चित्रकार इशरच्या टेसिलेशन या पद्धतीचा वापर करून रेखाटने तयार केली. टेसिलेशनमध्ये विज्ञान, कुतूहल आणि स्वतंत्र विचार याचे एकत्रीकरण सहज साधल्याने तिला कौतुकाची थाप मिळाली होती.
सुटीत विद्यार्थी प्रकल्प करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील कार्यालयाने कोजागिरीचा अर्ज स्वीकारला. नगर व्यवस्थापनाचे सचित्र मॅन्युअल ‘नागरी समिती’ या स्वयंसेवी संस्थेसाठी बनवायचे आहे. शहरातील पायाभूत सोयी-सुविधा सुरळीत करणे, प्रशासनास व्यवहार्य पर्याय देणे, नागरिकांचा सहभाग वाढवणे हा त्यांचा उद्देश आहे. विद्यार्थी प्रकल्पांतर्गत दोन महिन्यांत पहिली प्रत तयार करायची आहे. संस्थेतील व्यवस्थापक सिमरन माहिती देत होत्या. कोजागिरीला काम आव्हानात्मक वाटले. कार्यालयातील कामाची धाटणी, नागरी समितीच्या सदस्यांबरोबर चर्चा, पायाभूत सुविधांसंदर्भातील सरकारी डॉक्युमेंट्स वाचणे, अधिका-यांना भेटणे, स्थानिक सांस्कृतिक प्रतिमा-प्रतीके यांचा धांडोळा घेणे आणि यांसारख्या अनेक अंगांनी कोजागिरीने कामाला सुरुवात केली. माहिती, नियम या गोष्टी नीरस न होता वाचनीय होण्यासाठी दृश्य प्रतिमांचा कल्पक वापर करायचे ठरवत कोजागिरीचे विचारचक्र चालू झाले. कामाबद्दलचे सिमरनचे पत्र कोजागिरीच्या फॅकल्टीने वाचले. त्यातील ‘नेमके, नेटके आणि कलात्मक काम’ हे शब्द जोरात वाचून त्यांनी कोजागिरीकडे प्रेमळ आश्वासक नजरेने पाहिले. पाहता पाहता शिक्षणाची चार वर्षे पूर्ण झालीसुद्धा!
काही दिवसांपूर्वी इतिहासतज्ज्ञांचे पुस्तक फॅकल्टीच्या हातात कार्यालयाने दिले. पान उलटल्यावर त्यांनी वाचले, ‘कव्हर बाय कोजागिरी, कला शिक्षण संस्थेची विद्यार्थिनी’. कोजागिरीला बोलावून घेतले. ‘हे काम तू कधी केलेस? या लेखकाची तुझी ओळख कधी झाली?’ त्यांना उत्तर देत कोजागिरी म्हणाली, ‘हिमाचल प्रदेशमधील सिमरनचे ते पार्टनर आहेत. त्यांचे पुस्तक त्यांनी मला वाचायला दिले. मला ते आवडले आणि हे काम झाले. एवढ्या लवकर ते प्रसिद्ध होईल, असे वाटले नव्हते.’ कोजागिरीला लेखकांबरोबर झालेल्या चर्चा आठवल्या आणि पुस्तकाचा नवाकोरा गंध मुखपृष्ठावरील चित्रात दिसला.
शेवटच्या वर्षी पदवीपूर्व प्रकल्पासाठी कोजागिरीने अर्ज करताना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विज्ञानशिक्षण संस्थेची निवड केली. इयत्ता तिसरीसाठी विज्ञान विषयाची ओळख करून देणारे पाठ्यपुस्तक तयार करावयाचे होते. या विभागात चारपाच जणांची टीम होती. या विषयाच्या इतर पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणे, वेगवेगळे पाठ तयार करणे, ते निवडलेल्या शाळांमधे शिकवणे, प्रतिसादाच्या नोंदी घेणे ही आणि अशा प्रकारची अनेक कामे होती. तयार झालेले पाठ चित्रप्रतिमांमधून वाचनीय बनविण्याची जबाबदारी कोजागिरीची होती. लिखित पाठ अंतिम टप्प्यावर येण्यातील ब-याच अडचणी तिच्या लक्षात यायला लागल्या. तिने काही धडे लिहिण्याची तयारी दाखवली. त्याचे स्वागत झाले. प्रेमळ खट्याळ आजोबा आपल्या नातवंडांना प्रश्न विचारत कुतूहल वाढवत गोष्ट सांगत आहेत अशी कल्पना करून पाठाची रचना केली. बागेतल्या शिंपिणीच्या घरट्याने सुरुवात केली. एकापाठोपाठ धमाल कल्पना मग सुचत गेल्या. तयार केलेली रेखाटने कोजागिरीने मुलामुलींना दाखवली. त्यांचे प्रतिसाद नोंदवले. त्याप्रमाणे बदल करत प्रत्येक पानावरील रेखाटने पूर्ण करत एक डमी कॉपी तयार केली. हे काम हातावेगळे होता होता संचालकांनी म्हटले, ‘स्वानुभवातून संकल्पनेकडे - या मार्गाने शिकवायचे असेल, तर शिक्षकांसाठी हस्तपुस्तिका तयार करायला हवी.’ प्रकल्पकाळ थोडासा वाढवून हे कामही कोजागिरीने पूर्ण केले. सलग 15-16 महिने एकत्र काम केल्याने तिची सहका-यांबरोबर मैत्री झाली होती. अखेर निरोपाची वेळ आली. तिच्या खास मैत्रिणींनी दिलेल्या रूमीच्या कवितासंग्रहात ठेवलेले संचालकांचे पत्र एक खास आठवणीचे मोरपीस झाले!
तिने केलेल्या पाच वर्षांच्या कामाचे सादरीकरण ज्युरीसमोर झाल्यावर कला शिक्षण संस्थेची पदवी कोजागिरीला समारंभपूर्वक 1998 मध्ये मिळाली. समारंभात पाहुण्यांच्या दालनात पहिल्या रांगेत बसलेले तिचे आईबाबा कोजागिरीचे कौतुक मनभर पाहत होते. विरंगुळा म्हणून बनवलेल्या पुस्तकांतील पतंगाचा शोध घेणारी छोटी मुलगी लहानपणची आपणच होतो, असे कोजागिरीला वाटायचे. त्याच मुलीचे बोट धरून आजही तिचा जगाच्या अद्भुततेचा शोध चालू आहे!