वस्तीतील मुलामुलींच्या शालेय प्रगतीसाठी तिच्या कामाला पूरक काम करावे असे शेजारील सतीशला ब-याच दिवसांपासून वाटायचे. त्याने पुढाकार घेऊन समविचारी ७-८ जणांचा गट तयार केला. पहिल्याच मीटिंगमधे उद्दिष्ट मांडताना सतीश म्हणाला, ‘
आपल्या शेजारणीने केलेल्या कामामुळे वस्तीत विश्वासाचे सबंध तयार झालेले आहेत. त्याआधारे पूल बांधायचे आहेत. शालेय अभ्यासाचा दर्जा उंचावण्यासाठी रोज २ तास याप्रमाणे आठवड्याचे ६ दिवस नियमित वेळ द्यायचा. शालाबाह्य मुलामुलींसाठी वेगळे वर्ग असतील. त्यापुढे व्यावसायिक कौशल्य मिळविण्यासाठी मदत करायची. ६ ते १८ वर्षं वयाच्या ५० मुलामुलींच्या सोबत सुरुवातीला हे काम आपण करूया.’ यावर सहमत होऊन सर्वजण कामाला लागले.
निधी गोळा करून बालवाडीत फळा, पुस्तके, शालोपयोगी साहित्य जमा केले. साधारण शाळेच्या इयत्ता, वय आणि मुलामुलींची समज लक्षात घेत त्यांचे चार गट केले. वेगळ्या पद्धतीने अभ्यासक्रम तयार करणे, असलेल्या पाठ्यपुस्तकांचा वापर करणे, मुलांशी सन्मानाने आणि प्रेमाने बोलणे, सकारात्मक स्व-ओळख तयार करणे, असे अनेक विचार पक्के झाले होते. प्राथमिक पातळीवर अनौपचारिक शिक्षण आणि त्यानंतर त्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी शिक्षण असा विचार करून नियमित वर्ग घेण्याचे काम सुरू झाले.
आढावा सभेत सदस्य आपली निरीक्षणे मांडत होते. ‘बालवाडीच्या जागेत शांतता नसते. ती जागा वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी दिली जाते.’ ‘आपले पाठ इतके रोचक नसतात. मुलांना इंग्रजी शिकायचे असते. मराठी आणि हिंदी भाषकांसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून शिकविणे कठीण जाते.’ ‘काही मुलामुलींना बरीच माहिती असते, असे माझ्या वर्गात मला जाणवले. त्यामुळे ती कंटाळतात.’ ‘मी भाषा शिकविते. माझा मुलांबरोबर चांगला संवाद आहे.’ सदस्य बोलत होते. ‘मुलंमुली भाषेच्या वर्गाला येवोत अथवा न येवोत, गणिताच्या वर्गाला त्यांना यावेसे वाटते.’ ‘या वेळी, काही मोठ्या मुलांनी गणपती आणि नवरात्रीमध्ये बालवाडीचा ताबा घेतला. ते छोट्यांवर दादागिरी करतात. त्यांच्या तोंडाला दारूचा वास येतो. शिंगे फुटलेल्या मुलांचा अनेक गोष्टीत त्रास होतो.’
मुलामुलींचे वय, इयत्ता, समज, माध्यम भाषा, याची जोड घालत त्यांचे गट करून आठवड्यातील सहा दिवस रोज दोन तास याप्रमाणे साधारण ८ महिने अभ्यासवर्ग घेतले. झालेल्या कामाचा आढावा घेताना असे लक्षात आले, की मुलामुलींच्या गरजा ओळखून कामाचे नियोजन होत नाही. कामाची पुनर्बांधणी करण्यासाठी थोड्या काळासाठी काम थांबविण्याचा निर्णय घ्यायचा होता. तिचे विचारचक्र चालू राहिले. इयत्ता पहिली ते दहावी रीतसर फी आकारून वस्तीत शिकवणीवर्ग चालवणा-या जोडप्याशी बोलून त्यांच्या कामाची माहिती तिने करून घेतली. त्यांची मदत करण्याची तयारी होती. या मदतीचा समन्वय साधता येईल. वस्तीतील आई सांगत होत्या, ‘माझ्या मुलाला अभ्यासात मागे पडल्याने शाळेतून काढून टाकले आहे. त्याला पुन्हा प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत करा.’ तिच्या लक्षात आले, पालक आणि मुलामुलींच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत.
‘कोठे आहेत सतीश सर? आणि ते दुसरे सर आणि मॅडम?’ मुलंमुली तिला विचारत होती. ‘आम्हाला सतीश सर खूप आवडतात.’ त्यांच्या निरागसतेकडे पाहत असताना तिला वाटले, ‘अभ्यासाचा दर्जा उंचावण्यासाठी नियमित वर्ग घेणे, मुलामुलींच्या दृष्टिकोनातून अभ्यास अर्थपूर्ण आणि आनंददायी करणे या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत. उच्चशिक्षित ७-८ जणांच्या गटाला अनुभव नव्हता. गटातील सदस्यांची सदिच्छा वादातीत होती. परंतु प्रत्यक्ष मदतीसाठी ती कदाचित अपुरी पडली असेल.’
‘माझ्या पुढाकाराने सुरू केलेले काम थांबवल्याने मला अपराधी वाटते. तुझ्या मर्यादा लक्षात घेत तू इतकी वर्षे हे काम करतेस याचे खूप कौतुकही वाटते,’ असे म्हणणा-या सतीशकडे पाहताना तिने विचार केला : दर रविवारी मुलामुलींबरोबरच्या तिच्या कामाचे स्वरूप लवचीक होते. अभ्यासक्रम पूर्ण करणे, पास होणे, मार्क यांचे अडसर तिने जाणीवपूर्वक टाळले होते. मोकळेपणाने परस्पर सहज संवाद होईल असा एक अवकाश तयार करत गेल्या काही वर्षात मुलामुलींबरोबर विश्वासाचे नाते तयार झाले होते. अभ्यासातील किंवा इतर कोणत्याही अडचणी त्यांनी सांगितल्यावर त्या एकमेकांच्या मदतीने सोडवण्यास ती मदत करीत असे. ती सतीशला म्हणाली, ‘पहिल्या सभेत उद्दिष्ट मांडत असताना तू म्हटलेले एक वाक्य मला आठवते : मुलामुलींसाठी असे भविष्य तयार करायचे आहे जेथे संवाद, एकात्मता, संपन्नता, समता आणि स्वातंत्र्य असेल. मुलंमुली मला विचारतात, ‘कोठे आहेत सतीश सर? ते आम्हाला खूप आवडतात.’ ती पुढे म्हणाली, ‘नियमित वर्गाचे काम सर्वानुमते तूर्तास काही काळासाठी थांबवले. कोणास ठाऊक, आपण ठरविले तर मुलामुलींवरील प्रेमामुळे दुसरे काही मोलाचे काम सुरू होईल कदाचित!’ शेजारणीच्या डोळ्यातील आशावाद टिपत सतीश अंतर्मुख झाला. सतीशला वाटले, ‘मुलामुलींना शिकवण्यासाठी आम्हा मोठ्या माणसांना अजून खूप काही शिकायला पाहिजे. शेजारीण म्हणते त्याप्रमाणे दुसरे काही सुरू करायचे असेल तर नव्याने विचार करावा लागेल.’