आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aruna Burte Article About Helping Street Children

पारो आणि अवि

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उच्चवर्गीयांच्या गाड्या रविवार असल्याने वस्तीजवळ असलेल्या गॅरेजमधे जायच्या. एक गाडी थांबली. खिडकीतून हात बाहेर काढत गाडीच्या मालकिणीने एक पिशवी देत म्हटले, ‘बच्चों के लिये समोसे और जलेबी हैं. दे देना बेचारों को.’ त्यांचे नाव, त्या कोठे राहतात हे विचारत ती म्हणाली, ‘आमची मुलंमुली बिचारी नाहीत. त्यांच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावेसे वाटल्याने तुम्ही खाऊ दिलात. त्याबद्दल धन्यवाद. त्यांच्याशी मैत्री करा, त्यांना गोष्टी सांगा, गाणी शिकवा. मला आणि त्यांना खूप आनंद होईल. गैरसमज करून घेऊ नका. अशाने आमच्या कामात अडथळा येतो.’ एवढे बोलेपर्यंत गाडीच्या मालकिणीच्या चेहर्‍यावर खोळंबा झाल्याचे आणि नाराजीचे भाव होते. हे संभाषण मुलंमुली लक्ष देऊन ऐकत होती. अर्थात, समोशाच्या वासाने त्यांच्या तोंडाला पाणी सुटले होते. ‘बाई, आम्ही दोघे हे सर्वांना नीट वाटू का?’ आजचे आपले काम झाल्यावर वाटा असे म्हणण्यासाठी तिची जीभ रेटली नाही. मुलंमुली मजेत खात होती. तेलकट, चिकट झालेले हात चाटून टाकत ते त्यांनी कपड्यांना पुसले. नंतर त्यांचे लक्ष पुस्तकं, वाचन यावरून उडाले. काही वेळात लहान मुलंमुली खेळायला विखुरली. ती कोणत्याच गोष्टीची सक्ती करत नसे. मोठी मुलं मागे रेंगाळली. त्यांना तिच्याशी काहीतरी बोलायचे होते. अवघडत एकाने म्हटले, ‘बाई, तुम्ही जे म्हणालात ते त्या गाडीतल्या बार्इंना आवडले नाही. आम्हाला बिचारे म्हणणे बरोबर नाही. एकीकडे आम्हाला खाऊ खायचा होता. दुसरीकडे तुमचे विचार बरोबर वाटत होते.’ मुलामुलींच्या प्रांजळपणाचे तिला कौतुक वाटले.

‘मॅडम, त्यांनी आमचे घर तोडले,’ असे सांगत तीन-चार मुलंमुली रविवारी घरी आली. तिने म्हटले, ‘आपली वेळ झाली आहे. चला, मला दाखवा तुमचे घर कोठे होते ते.’ त्यांच्या वसाहतीत वापरात नसलेल्या बिल्डिंगची पडवी होती. कधी पाऊस आला तर मुलामुलींना घेऊन ती या पडवीत बसायची. आज पावसाळी मोसम असल्याने तेथे मुलंमुली खेळत, रेंगाळत होती. जवळच्या झाडाच्या बुंध्याशी त्यांनी काटक्या, गवत, पुठ्ठे, थर्माकोल, टाइल्स यांनी घर रचले होते. फुलापानांनी सजविले होते. आता ते मोडून पडले होते. ‘तो पाहा बिल्डिंगमधे राहणारा मुलगा. आमच्या बालवाडीतल्या व्यायामशाळेत येतो. तेथील मोठी मुले याचे ऐकतात. त्याची दादागिरी चालते.’ तो शेजारच्या बिल्डिंगमधील अविनाश होता. ‘वाया गेलेला’ अशी त्याची ख्याती होती. मित्रांबरोबर उभ्या असलेल्या त्याला तिने हाक मारली, ‘मुलामुलींनी केलेले घर तुला आवडले नाही का?’ हे तिचे बोलणे पूर्ण व्हायच्या आत कमरेवर हात ठेवून आक्रमक पद्धतीने तो म्हणाला, ‘तुम्हाला कळत नाही. झोपडपट्टीत राहणारी ही मुलं आपल्या सोसायटीची नाहीत. त्यांनी कशाला येथे खेळायला पाहिजे?’ अविबरोबर संवाद शक्य नाही हे लक्षात आल्याने ती एवढेच म्हणाली, ‘आपल्या परिसरातील आहेत ही. आपल्या वसाहतीच्या आवारात असलेली ही पडवी कोणीही वापरू शकते. यांच्या खेळण्याने तुझे आणि आपले काहीच बिनसत नाही. त्यामुळे त्यांना त्रास देणे बरोबर आहे का याचा विचार कर.’ तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तो आणि त्याचे मित्र गुर्मीत निघून गेले. तिने मुलामुलींना पुन्हा घर करायला सांगितले.
गाडीची मालकीण आणि अवि यामध्ये तिला अस्वस्थ करणारे साम्य वाटले. त्यांच्या सोसायटीच्या मीटिंगमधे अविचे वडील कसे बोलायचे हे तिला आठवले. घरात भौतिक श्रीमंती असूनही अविचे बालपण ‘वंचित’ राहिले. अविसारख्या मुलांपर्यंत पोहोचणे गरजेचे होते. पण तो खूप दूर निघून गेला होता, याचे तिला वैषम्य वाटायचे. तिच्या कामाकडे उत्सुकतेने पाहणारी पारो वेगळी वाटायची.
दर रविवारी सकाळी रस्त्यालगत असणार्‍या झाडाखाली जवळच्या वस्तीतील मुलंमुली आणि त्यांचे गाणी, गोष्टी, वाचन, खेळ घेणार्‍या ‘त्या बाई’ यांचे अभ्यासाच्या खोलीच्या खिडकीतून निरीक्षण करण्याचा पारोचा आवडता छंद होता. पारोला वाटायचे, आपणही या मुलांसाठी काहीतरी करावे. तिची परीक्षा झाल्यावर या सुटीत त्यांना विचारायचे असे तिने मनोमन ठरविले होते. कधी कधी काही वेगळे घडायचे. पारो दुरून त्याचा कानोसा घेत असे. हे सर्व वरून खिडकीतून पाहणारी पारो विचार करत राहायची : वस्तीतील मुलंमुली बिचारी का नसतात हे विचारायला पाहिजे.

मुलामुलींनी केलेले घर अविने का तोडले बरे?
परीक्षा झाल्यानंतरच्या रविवारी पारो खाली गेली आणि म्हणाली, ‘काकू, मला तुमच्याबरोबर मुलामुलींसाठी काम करायचे आहे. मी अ‍ॅस्ट्रोफिजिक्स घेऊन एमएस करणार आहे. मुलामुलींना आकाशातील ग्रहतार्‍यांची मजा सांगायची आहे.’ तिच्याकडील रशियन लेखकाच्या पुस्तकाच्या मदतीने पारोने मुलामुलींना ग्रहतार्‍यांच्या अद्भुत सफरीवर नेले. ती पाहत राहिली. तिला वाटले, पारोसारखे बालपण अविला मिळाले तर आपण सारेच किती समृद्ध आणि प्रगल्भ होऊ!
(क्रमश:)
aruna.burte@gmail.com