आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुट्टीचा दरवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विहिरीच्या काठावर छत्री घेऊन बसलेले आजोबा मला आठवतात. ते वरून आम्हाला पोहायला शिकवायचे. माझ्या पाठीला साधा दोर आणि ज्वारीच्या धाटांचा बिंडा बांधलेला असायचा. बरोबर पोहायला येणारी भावंडे असायची. त्यांना तर नवशिक्यांना घाबरवण्यात हुरूप असायचा. आजोबांचे त्या खोड्यांवरही लक्ष असायचे! पोहून आल्यावर भुकेजलेल्या आम्हाला केवढे तरी खायला लागायचे. ते सर्व आजी, आत्या, काकू मिळून तयार ठेवायच्या. माझे काका आम्हाला धाटांच्या विविध वस्तू करायला शिकवायचे. आजोबा म्हणायचे, ‘कोणताही हट्ट करू नका. फक्त ‘आंबे-आंबे’ म्हणा.’ पैज लावून आंबे खायला घालायचे. गावाबाहेर असलेल्या ओढ्यावर गाई-गुरांना गडी अंघोळीला न्यायचे. त्यांच्याबरोबर आमचीही वरात जायची. ओढ्याच्या कडेने असलेल्या केवड्याचा सुगंध अजूनही मनात दरवळतो.
आमच्या पिढीत आम्ही दोघे छोट्या गावातून शहरात नोकरी आणि लग्नामुळे स्थलांतरित झालो. आमची मुलगी लहान असल्याने आणि दोघे नोकरी करत असल्याने रजा पुरवून वापरायला लागायची. मुलगी शाळेत जाऊ लागल्यावर उन्हाळी सुट्ट्या म्हणजे दोन महिन्यांचे काय करायचे असा प्रश्न तयार व्हायचा. बहिणी, नणंदा, मैत्रिणी यांनी मिळून सर्व मुलांना आळीपाळीने एकत्र आणले आणि मजा करण्यासाठी पूर्ण मोकळीक दिली तर ‘सुट्टीच्या’ खास आठवणींचा दरवळ त्यांच्या मोठेपणी उमलेल ही कल्पना सर्वांना आवडली. ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पहिल्यांदा पुढाकार घेताना झालेली तारांबळ आणि मिळालेला आनंद दोन्ही आठवतात.
पहिल्याच दिवशी घरकामाच्या मदतनीस बाईने तिला या आठवड्यात येणे जमणार नाही, असा निरोप पाठवला. सहासात जणांचे हे सर्व काम एकट्याने करणे जिकिरीचे होणार हे नक्की. सर्व मुलामुलींना एकत्र बसवून काही गोष्टी ठरवल्या. ‘आपले कपडे आपण धुवायचे आणि वाळत घालायचे, वस्तू आवरून ठेवायच्या, ताट-वाटी धुवायची,’ असे सांगितल्यावर काही जण म्हणाले, ‘आम्ही कपडे कधी धुतले नाहीत, वाळत घालणे माहीत नाही.’ त्यांची शिकायची तयारी होती. त्यामुळे लहान घरातील पॅसेजमध्ये नदीसारखे पाणी झाले. ते पुसून घेताना त्यांना मजा आली. उसळ-चपाती, कोशिंबीर, दही, फळे, उसळीत शेव असा चविष्ट, पौष्टिक आणि पटकन होणारा मेनू मुलामुलींना सहभागी करून ठरविला.
ही नेहमीची कामे उरकून फिरायला जाणे, खेळणे, मारामारी आणि कसरती करणे हे असायचे. आपल्याला येणाऱ्या भाषेतील आवडणाऱ्या परिच्छेदाच्या वाचनाबरोबर शिवणकाम, कातरकाम, रंगकाम यांचाही कारखाना उघडला जायचा. सर्वांनी मिळून एक जोकर तयार केला. जोकरचे हात-पाय-पोट-मान-डोके-टोपी-बूट असे सर्व अवयव कापून सर्वांना शिवायला दिले. त्यात जुन्या चिंध्या भरल्या. मुलांपैकी काही जणांनी प्रथमच टाके मारले होते. आपल्या हातांनी सुंदर सुंदर वस्तू आपण सर्वजण तयार करू शकतो, याचाच केवढा आनंद सगळ्यांना झाला होता.
वर्षं सरली तशी आम्ही दोघे, नणंदा, बहिणी, मैत्रिणी आजी-आजोबाच्या वयात पोहोचलो. गेली सहा वर्षे होणाऱ्या आमच्या नातवंडांच्या अशाच एका शिबिराच्या तयारीत असताना, माझा भाचा फोनवर म्हणाला, ‘माझी मुलगी तर उड्या मारत येईलच गं. पण मामी, माझ्या लहानपणीच्या शिबिरात आपण केलेला तो जोकर मी अजून जपून ठेवला आहे. तुला दाखवीन केव्हा तरी.’ वाटले, सुट्टीचा दरवळ उमलतो तर!
नातवंडाची शिबिरे घेताना आमच्या मुलामुलींचा त्यांचे व्यवसाय, नोकऱ्या सांभाळून जमेल तसा सहभाग असतो. त्यांच्याकडे अनेक प्रकारची कौशल्यं आहेत. त्यामुळे गाणी, नृत्य, नाटक, ओरिगामी, चित्रं, कॅलिग्राफी, पोस्टर, सिम्बॉल, मोजमाप, डिझाइन, टाकाऊतून खेळणी बनविणे, पॅचवर्क, शिवण, क्विल्ट, वाचन, फिल्म्स, अरविंद गुप्तांना “आयुका‘त भेटणे, माहीम नेचर पार्क भेट, विज्ञान प्रयोग, अशा अनेक गोष्टी करता येतात. मोठी नातवंडे ‘जादूचे प्रयोग’सारखे स्वतःचे खास कार्यक्रम सादर करतात. शिबिराच्या शेवटी सर्व पालकांच्या उपस्थितीत मुले-मुली कार्यक्रम सादर करतात. कार्व्हरच्या चरित्रावरील आणि रवींद्रनाथ टागोर याचे ‘The last right’ यासारखी नाटके सादर करणे, स्वतःला येणारे वाद्य वाजविणे, नृत्य करणे, गाणे म्हणणे असा कार्यक्रमाचा नूर असतो. त्यावेळी प्रत्येकाला त्याचे विशेष नमूद केलेले प्रशस्तीपत्र सुरुवातीला पणजीआजीकडून आणि तिच्यानंतर सर्वात ज्येष्ठ आजी-आजोबांकडून मिळते. नातवंडांच्या भावविश्वात डोकावताना अनेक बदल लक्षात येतात. आपल्या नावाबरोबर निसर्गातील आवडणाऱ्या एका गोष्टीची निवड करून जोडशब्द तयार करायचा; तो गाऊन दाखवायचा आणि त्याचे चित्रही काढायचे, असे सांगितल्यावर मुलग्यांनी टोर्नाडो, त्सुनामी, लाईटनिंग, बिग बँग असे शब्द निवडले. मुलींनी स्टार, मँॅगो, बटरफ्लाय असे शब्द स्वतःच्या नावाशी जोडले. “अद्भुत जगातील शाळा‘ हे नाटक मुलींच्या पुढाकाराने आकारत होते. त्यामध्ये मारामारी नाही म्हणून काही थ्रिल नाही, असा सूर मुलग्यांनी लावला होता. किशोरवयीन मोबाइलचा वापर मोकळ्या वेळात थांबवू शकत नव्हते. त्यांच्या डोक्यातील ताल, सूर आणि गीत हनीसिंगमय झाले होते. यावर थोडासा विचार केल्यावर जाणवते मॉल, मोबाइल, हेड-फोन्स, आयपॅड, टॅब्लेट, लॅपटॉप, पीएस2, हिंसा-पाठलाग यावर आधारित कॉम्प्युटर गेम्स, बार्बी, मेकअप, दागिने, 24/7 टीव्हीवरील सिरियल्स, रॅप-पॉप-रॉक-हेप म्युझिक या आणि अशासारख्या इतर अनेक गोष्टी सामाजिक आणि कुटुंबातील वातावरणाचा भाग झाले आहेत. या वातावरणात जीवनव्यवहारात हिंसा सहज गृहीत धरली जाते, सगळ्या गोष्टी फक्त बटणे दाबून हात जोडून पुढ्यात येत असल्याने मुली-मुले हातांनी काम करणे विसरू लागतात. आपण काय खावे, प्यावे, ल्यावे, बोलावे, खेळावे, करावे हे बाजारपेठ ठरवायला लागते.
हे नक्की की, प्रत्येक पिढी जगण्याचा सूर स्वतः शोधत असते. वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मूल शब्दांपलीकडील संवाद साधू पाहत असते. पालकांनी सजगतेने त्याची नोंद घेत प्रतिसाद दिला तर त्यांचे पाल्याबरोबर विश्वासाचे नाते तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठे होताना बाजारपेठीय जाहिराती, चैन, वस्तू यांची निवड करताना पालकांच्या मदतीने योग्यायोग्यतेचे आडाखे बांधणे मुलामुलींना सोपे होईल. त्यांच्याकडे चिकित्सक दृष्टी तयार होईल. इंटरनेट, यूट्यूबमधून बदाबदा आदळणारी करमणूक चांगली की सुमार, याची त्यांना निवड करता येईल. तसेच कोणत्या गोष्टीत मूल मनापासून काम करते, तिचा/त्याचा कल कोठे आहे, याचा कानोसा घेत त्यात कौशल्य कसे वाढेल यासाठी पालकांना जाणीवपूर्वक प्रयत्न करता येतील.
उगवत्या पिढीमध्ये अनेक सर्जनशील शक्यता दडलेल्या आहेत. त्याचे कल्पकतेने वेळीच संगोपन करण्यासाठी आई-बाबा, आजी-आजोबा म्हणून आपल्याला मुलामुलींच्या भावविश्वात डोकावायला पाहिजे. सुट्टीत एकत्र राहण्यातून, हाताने विविध वस्तू बनविण्यातून, वाचन-लेखन-नाट्य-नृत्य-गायन-गप्पा, चर्चा, चिकित्सा, खेळ यातून अशी शक्यता तयार होते. कोणास ठाऊक, यातून नातवंडांसाठी त्यांच्या मोठेपणी ‘सुट्टीचा दरवळ’ नकळत उमलेलसुद्धा!

aruna.burte@gmail.com
बातम्या आणखी आहेत...