आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशाची वाट पाहते आहेस?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहिणी भाटे यांचा नृत्याचा कार्यक्रम उशिरा सुरू झाल्याने कार्यक्रम संपायला रात्रीचे 11.30 वाजणार होते. मध्यंतरात भेटलेल्या बोरकरांशी बोलून जाताना सोबतीने जाण्याचे शांताने ठरवून टाकले होते. ती त्यांची वाट पाहत होती. कार्यक्रम झाल्यावर कलाकाराला भेटणे, त्यावर बोलणे असे काही न करता आई कोणाला शोधते आहे, हे कोजागिरीला समजेना. कोजागिरीने विचारले, कशाची वाट पाहते आहेस? ‘मी बोरकर काकांची वाट पाहते आहे. ते आले की आपण रिक्षा करून निघू’, शांताची नजर बोरकरांना शोधण्यात गुंतली होती. कोजागिरीच्या चेह-यावर पूर्ण नाराजी आणि थोडासा रागही दिसत होता.


दुस-या दिवशी शाळेतून आल्यावर कोजागिरीने विचारले होते, ‘काल आपण दोघी असूनही तुला एकटे वाटले ना?’ शांताने लगेच ‘हो’ म्हटले. ‘आई, तू स्त्रीमुक्ती वगैरे म्हणतेस. मी एवढी मोठी मुलगी तुझ्या बरोबर असताना आपण एकटे आहोत, असे समजतेस. काही तरी गडबड आहे असे तुला नाही वाटत? कशाची भीती वाटते, नेमके सांगू शकशील?’ कोजागिरी ज्या मोकळेपणाने बोलत होती ते पाहून शांताला तिचे कौतुक वाटले.


अंधार व्हायच्या आत घरी परत यायला पाहिजे, असा तिच्या लहानपणाचा नियम शांताला आठवला. काही मर्यादा नकळत अंगवळणी पडल्या होत्या. शांताचा विचार चालू राहिला, ‘खरंच, नेमकी कोणती भीती आपल्याला वाटत असते? कोजागिरी अंगापिंडाने सुदृढ आहे. वाईट प्रसंग येऊ नये, म्हणजे नेमके काय?’ या ‘वाईट प्रसंगातून’ आपला बचाव करायला हवा या खोल दडलेल्या भीतीला सोबत घेऊन शांता मोठी झाली. बलात्कार होण्याच्या शक्यतेची भीती! त्याबद्दल आईसमोर किंवा कोणासमोरही स्पष्ट बोलायचे नाही, हेही तिला समजत गेले होते. आता मात्र शांताची धीट मुलगी ‘ही भीती नेमकी कोणती? असे विचारत होती.


शांताला 1980 च्या दशकामधील बलात्कारविरोधी आंदोलनातील एक पोस्टर आठवले. पुरुषाचे उचलेलेले पाऊल आणि त्याची मोठी सावली. शब्द होते, ‘प्रत्येकीवर बलात्कार होतोच असे नाही; पण प्रत्येक जण बलात्कार होण्याच्या शक्यतेच्या भीतीच्या सावटाखाली असते.’ वेढून टाकणारी ही बलात्कार होण्याची शक्यता बायकांच्या जगण्याचा भाग होऊन जाते. त्यामुळे बाईने आपले सर्व काम, कार्यक्रम, आवडी-निवडी बाजूला ठेवून मर्यादित चौकटीत स्वत:ला कोंबून बसवायचे. यालाच स्वातंत्र्य म्हणायचे. अशा मर्यादित स्वातंत्र्यात आपण सर्व स्त्री-पुरुष समाज घटक आकसले जात आहोत याची आपल्याला जाणीवही होत नाही.


उत्तर देण्यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत शांता म्हणाली, ‘बेटा, ही भीती आपल्यावर कधीही बलात्कार होऊ शकतो, याची असते. असे प्रसंग नेहमीच येतात असे नव्हे. पण त्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून कमीत कमी धोका पत्करायचा.’


शांताला मधे तोडत कोजागिरी म्हणाली, ‘बलात्कार हा शब्द मी खूप वेळा ऐकला आहे. त्याचा नेमका अर्थ काय, त्यात आपल्याला धोका काय आहे?’ थोडासा विचार करून शांता म्हणाली, ‘आपल्या मनाविरुद्ध पुरुषाने शारीरिक बळजबरी करणे. त्याने आपल्याला मानसिक धक्का बसतो आणि शारीरिक इजा होते.’ कोजागिरीला सर्व कळले असे शांताला वाटले नव्हते. ‘बोरकर काका आपल्याबरोबर असल्याने बलात्काराच्या धोक्यापासून कसे बरे संरक्षण होते? तसा प्रसंग आलाच असता तर त्यांनी आपल्याला मदत केली असती का? त्यांची आणि आपली तेवढी मैत्री आहे का?’ कोजागिरीच्या प्रश्नांना अंत नव्हता.


‘खरं सांगू का कोजागिरी, त्या वेळी माझी एखादी मैत्रीण जरी भेटली असती, तरी मला चालले असते. उशीर होणार असेल तर एकट्यापेक्षा दोघीचौघींनी मिळून जावे हे निश्चित. सर्व पुरुष माणुसकीने वागण्याची खात्री निर्माण होईपर्यंत आपल्या किती पिढ्या जातील कोण जाणे.’ शांता स्वत:शी बोलल्यासारखी जोरात बोलत होती.
‘आई, ते पिढ्या वगैरे सोड. यापुढे मी तुझ्याबरोबर असताना तू कोणाची सोबत मागणार नाहीस. मी कराटे वगैरे उगाच शिकले असे तुला वाटते का. तूच मला नेहमी सांगतेस, घाबरायचे काही कारण नाही,’ असे म्हणत मैत्रिणीची हाक आल्याने कोजागिरी खेळायला निघून गेली.


‘रात्री उशिरा परत येताना एकट्यापेक्षा सोबतीला कोणीतरी असलेले नेहमी चांगले, यालाही मर्यादा आहेतच. आणि घरात नाहीत बलात्कार होत? अशाने घरात राहणेही बाहेर राहाण्याइतकेच धोक्याचे ठरते. कराटे किंवा आणखी काही हा क्षणिक उपाय असू शकतो. समाजातील सर्व पुरुष माणसांसारखे वागणे आवश्यक मानतील तेव्हाच ही भीती मुळापासून जाईल. कोजागिरीचीच नव्हे, तर तिच्याही पुढील पिढ्या बलात्कार होण्याच्या भीतीपासून मुक्त होण्याची वाट आपण सर्व जण पाहत आहोत!’ शांताचे विचारचक्र वेगाने फिरतच राहिले.