आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पा आले आमच्या घरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाप्पा आले आमच्या घरी
रागातच बसले आसनावरी
पाहत मोदक, फुले, फळे, दूर्वा
म्हणाले, तुम्हाला मुळीच नाही माझी पर्वा
हा रसायनाचा गोळा की आहे माझी मूर्ती
याने अशुद्ध होते माझे पाणी नि धरती
दहा दिवस नुसता गोंगाट गोंगाट
अश्लील गाण्यांनी माझ्या कानांची लागते वाट
मद्य पिऊन धिंगाणा नि वाद
लोप पावला धर्माचा श्रद्धेचा संवाद
सर्वांना देखाव्याचं आकर्षण
माझं मांडलं दहा दिवस प्रदर्शन
मला बसवण्याची घेता तुम्ही वर्गणी
की मारून ठोकून वसूल करता खंडणी
त्या घातक गुलालाची धूळ
माझ्या नि तुमच्या डोळ्यांचा घेते सूड
सोन्या-चांदीच्या मुकुटमण्यांचं ओझं
मान-डोकं मोडेल रे माझं
हिरेजडित मोदक न् मोती घातलेला प्रसाद
हा मला लाच देण्याचा का उपोषणाला बसवण्याचा विचार
माझ्या विसर्जनात स्पीकरवर घाणेरड्या गाण्यांचा आवाज
पळायचं म्हटलं तर हात पाय बांधून केला माझा साज
दुपारपासून रात्रभर नि सकाळपर्यंत उपाशी बांधले मला
अरे बाबा! विसर्जन करून लवकर मोकळं करा मला
वरून गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या...चा नारा
येथून गेल्या माझे कान डोकं, डोळे, अंग दुखून तापाचा चढतो पारा
मग सांगा बरं कसं येणार मी पृथ्वीवर मुक्कामाला?
जिथे श्रद्धेचा नाही फक्त दिखाऊगिरीचाच बोलबाला
ऐकून घेत बाप्पाचं आम्ही सारं
चूक कबूल करत बापाला वचन आम्ही दिलं
मायेचा, दयेचा, विद्येचा, श्रद्धेचा वाहील झरझर झरा
असा टिळकांचा आदर्श ठेवत, करू गणेश उत्सव साजरा