आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिजात संगीत हे एक शास्त्रच!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म. प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘पं. कुमार गंधर्व राष्ट्रीय पुरस्कार’ गायिका मंजिरी अासनारे केळकर हिला परवाच्या शनिवारी देवासमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. मंजिरीच्या या प्रवासाविषयी...
 
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी मंजिरीने कोल्हापुरात गोविंदराव गुणे अमृतमहोत्सव शास्त्रीय गायन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावून पं. कुमार गंधर्व यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक स्वीकारलं होतं. त्या निमित्त आयोजित कार्यक्रमात कुमार गंधर्व यांच्या समोर आपल्या गायनाचं उत्तम सादरीकरण करून त्यांची शाबासकी मिळवली होती. आता म. प्र. सरकारचा २०१३चा पुरस्कार तिला मिळाला आहे. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची ती मानकरी होणं, हा एक सुवर्णयोगच म्हटला पाहिजे. संस्कृती प्रतिष्ठानचा ‘संस्कृती पुरस्कार’, रझा पुरस्कार, संगीत नाटक अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या पं. बिस्मिल्ला खान युवा पुरस्काराची पहिली मानकरी, असे अनेक पुरस्कार तिच्या संगीतातल्या यशस्वी वाटचालीची साक्ष देतात. 

पं. मधुसूदन कानेटकर यांच्यासारखे अत्यंत विद्वान असे गुरू, अगदी लहान असल्यापासून वडील पं. आनंद आसनारे यांचं सतत प्रोत्साहन आणि अभिजात संगीत अवगत करण्यासाठी मंजिरीने केलेली अथक मेहनत या सर्वांच्या संयोगामुळे मंजिरीचे कलागुण बहरत गेले. 

पं. मधुसूदन कानेटकर माझेही गुरू असल्यामुळे माझ्या या गुरुभगिनीचा आजपर्यंतचा संगीतप्रवास अगदी जवळून पाहता आला. तो आपण जाणून घेऊ या.मंजिरी, तुला संगीताचा कानच नाही तर ‘गळा’देखील आहे, हे आईवडिलांना कधी जाणवलं? आणि त्या दृष्टीने शिक्षण कधी सुरू झालं? त्यासाठी आईवडिलांचं मिळालेलं पाठबळ याबद्दल सांग.

माझे वडील, ज्यांना मी पपा म्हणायचे, उत्कृष्ट तबलावादक होते. ते राष्ट्रपती पदकाचे मानकरी होते. मी अगदी लहान असताना मला मांडीवर घेऊन ते तासन‌्तास रियाज करायचे. त्यांच्याबरोबर मी सांगलीतल्या संगीतसभांना जात असे. त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे शाळेत मी संगीत स्पर्धांतही भाग घेत असे. पाचवी-सहावीत असताना मी चिंतुबुवा म्हैसकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. पाच-सहा वर्षं त्यांच्याकडे शिस्तबद्ध शिक्षण घेतल्यामुळे माझा शास्त्रीय संगीताचा पाया भक्कम झाला. तसेच पपांच्या रियाजाच्या वेळी ते मलाच लहेरा धरायला बसवत, त्यामुळे लय आणि ताल पक्के व्हायला मदत झाली. रेडिओवरचे शास्त्रीय कार्यक्रम ऐकून, तसंच उत्तमोत्तम गायकांचं गाणं ऐकल्यामुळे मला शास्त्रीय संगीत मनापासून आवडायला लागलं.

तू कथ्थकचं शास्त्रोक्त शिक्षण घेतलं आहेस. नृत्याकडून संगीताकडे पावलं कशी वळली? 
शास्त्रीय संगीताबरोबरच शनिवार-रविवारी माझं कथ्थकचं शिक्षण चालूच होतं. नृत्याची आवड मला शाळेत असताना होतीच. नृत्याबरोबर येणाऱ्या इतर गोष्टी, म्हणजे आकर्षक कपडे, दागिने, रंगरंगोटी याचंदेखील एक बालसुलभ आकर्षण होतं; पण हळूहळू शास्त्रीय संगीताच्या अभ्यासावर मी पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं. माझं तालाचं अंग पक्कं होण्यास मला नृत्याची खूप मदत झाली. 

गुरुवर्य पं. मधुसूदन कानेटकर उर्फ आप्पा तुला गुरू म्हणून लाभले. हा योग कसा आला?
रेडिओवरचे राष्ट्रीय कार्यक्रम, संगीत जलसे यांमधून प्रतिभावंत कलाकारांना ऐकून मनन चिंतन करणं, त्यातलं चांगलं वेचून ते आत्मसात करणं हे जमायला लागलं होतं. संगीतस्पर्धांसाठी आपली गायनकला २० मिनिटांत कशी मांडायची, याचं गणित पपा आणि म्हैसकरबुवा यांच्या मार्गदर्शनामुळे चांगलं बसलं होतं. पण या पलीकडे जाऊन शास्त्रीय संगीतावर प्रभुत्व मिळवलं पाहिजे, असं वाटत होतं. जयपूर घराण्याचे भुर्जी खाँ यांचे गंडाबद्ध शिष्य आणि ज्ञानसंपन्न गायक म्हणून पपांनी आप्पांबद्दल ऐकलं होतंच. आप्पांनी मला शिकवावं, अशी त्यांची फार इच्छा होती. पं. गजाननबुवा जोशी आणि आप्पांना माझं गाणं ऐकायला पपांनी एकदा बोलावलं होतं. अाप्पांकडे आपल्या मनातली इच्छा त्यांनी बोलून दाखवली. आप्पांनीही ‘प्रथम तीन महिने शिकवतो आणि मंजिरीची प्रगती बघून पुढचं ठरवू’ या अटीवर १९८९च्या अक्षय्य तृतीयेला शिकवायला सुरुवात केली. नऊ वर्षं सलग हे शिक्षण चालू राहिलं. 

सकाळी उठून सहा वाजता अप्पांनी सांगितलेल्या पद्धतीने स्वराभ्यास करून मी कॉलेजला जायचे. परत साडेदहा वाजता गुरुजींसमोर बसायचं ते एक वाजेपर्यंत. आणि दुपारी साडेतीन ते साडेआठ, नऊ असं शिक्षण चालू असे. सकाळी बंदिश शिकवायची आणि संध्याकाळी ती तालात म्हणून घ्यायची. मुखडा बांधायचं काम तीनचार तास चालायचं. मुखड्याला येण्याची क्रिया सहज, ओघाने आली पाहिजे आणि ती तशी येईपर्यंत आप्पा न रागावता, न कंटाळता गाऊन दाखवत असत. आप्पा आवाजाच्या लगावावर फार कटाक्षाने लक्ष देत. बंदिश गाताना करायचे आवाजाचे चढउतार, एखाद्या संवादाप्रमाणे स्वर आणि शब्दांच्या उच्चारणामध्ये भाव दिसले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह असे. त्यासाठी इतर घराण्यातल्या अनुकरणीय गोष्टी आपण आपल्या गाण्यात आणल्या पाहिजेत, असेही ते म्हणत.

गेली दोनअडीच वर्षं तू गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याकडे शिक्षण घेत होतीस. याबद्दल काय सांगशील?
किशोरीताई आपल्यात नाहीयेत, यावर अजून विश्वास बसत नाहीये. ताईंनी अभिजात संगीताकडे बघण्याची नवी दृष्टीच दिली. घराण्याच्या भक्कम पायावर उभं राहून अमूर्ताकडे बघायला शीक, असं ताई कायम सांगत. राग हाच भाव आहे आणि सूर हा जिवंत आहे असं समजून त्याकडे बघितलं तर तो प्रकट होतो, असं त्या सांगत. 

संगीताचा हा प्रवास आनंदमय व्हावा यासाठी तरुण विद्यार्थी, अभ्यासकांना तू काय सांगशील?
अभिजात संगीताचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी हे एक शास्त्र आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याचा एक शास्त्रोक्त विषय म्हणून सखोल अभ्यास केला पाहिजे. ते सहजसाध्य समजून कमी मेहनतीतच ते साध्य करून घेण्याची अपेक्षा अभ्यासकांनी ठेवू नये.
 
- अरूंधती भेडसगांवकर
बातम्या आणखी आहेत...