आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Gokhale About Malayshia Airoplane Attack On Ukrein, Divya Marathi

जग ही युद्धशाळा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मलेशिया एअरलाइन्सचे एमएच-17 हे प्रवासी विमान 17 जुलै रोजी (युक्रेनच्या स्वायत्ततेची घोषणा 16 जुलै 1990 रोजी युक्रेनच्या पार्लमेंटने केली आणि सोव्हिएत घटनेपासून फारकत घेतली.) युक्रेनमध्ये पाडण्यात आले, ही गेल्या काही वर्षांतली एकमेव घटना नव्हे. युक्रेनमध्ये गेल्या महिन्यापासून पाडण्यात आलेले ते चौथे विमान होते. फरक एवढाच की, आधीच्या विमानांमध्ये युक्रेनच्या हवाई दलाचे एक मालवाहतूक विमान होते आणि त्यात असलेले 49 सैनिक ठार झाले होते. दुसरे विमान हे टेहळणीच्या कामगिरीवर होते, तर अन्य युक्रेनचेच लढाऊ विमान होते. ही तिन्ही विमाने युक्रेनचीच असल्याने त्या संदर्भात फार आरडाओरडा झाला नाही. मात्र विमाने पाडण्याच्या या अनुभवावरून निष्कर्ष काढण्यात आला, की मलेशियाच्या या विमानालाही युक्रेनच्या रशियन बंडखोरांनीच पाडले असले पाहिजे. युक्रेनमध्ये युक्रेनी लोकसंख्या 77 टक्क्यांच्या घरात आहे, तर रशियन 17 टक्क्यांच्या आसपास आहे. ज्या परिसरात विमान पाडण्यात आले, तिथे रशियन बंडखोरांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणावर आहेत आणि तिथपर्यंत जाण्याचे धाडस अगदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या निरीक्षकांनाही करता येत नाही. रशियाने मात्र या विषयावर प्रथम मौन स्वीकारले आणि नंतर हा सारा बनाव युक्रेनच्या सत्ताधार्‍यांचाच असला पाहिजे, असे जाहीर केले.
युक्रेन आणि रशिया यांच्यातला संघर्ष जगजाहीर आहे. युक्रेन हा जगातला तिसर्‍या क्रमांकाचा धान्य निर्यातदार देश आहे. त्याच्या साधनसंपत्तीवर आधीपासूनच रशियाचा डोळा आहे. कम्युनिस्ट सोव्हिएत युनियन असताना त्या देशाचे नेतृत्व युक्रेनच्या नेत्यांकडे होते. त्यात लिओनिद ब्रेझनेव्ह आणि निकिता ख्रुश्चेव्ह यांचा समावेश होतो. आता संपूर्ण युक्रेन नाही पण आपल्या सरहद्दीला लागून असलेला काही भाग तरी आपल्याकडे असायला हवा, ही रशियाची तीव्र इच्छा आहे. मलेशियाचे विमान कुणी पाडले, याविषयी शंकेला जागा नाही. कारण बंडखोरांनी डागलेले क्षेपणास्त्र रशियन बनावटीचे होते. युद्धात लढाऊ विमाने पाडली जातात, पण ते युद्ध असते. गेल्या काही वर्षांमध्ये केवळ संशयावरून प्रवासी विमानेही पाडली गेली आहेत. मलेशियाच्या प्रवासी विमानाच्या परिसरात एक युक्रेनी हवाई दलाचे लढाऊ विमान घिरट्या घालत होते, याचा पुरावाही रशियाने सादर केला. मलेशिया एअरलाइन्सच्या विमानावर ‘बक एसए-11’ या क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. त्यात विमानातले 298 जण मृत्युमुखी पडले. एका बाजूला हे सर्व घडत असतानाच इस्रायलने गाझा पट्टीत हमासवर हल्ला सुरू केला. वेस्ट बँक भागात तीन इस्रायली मुलांना पळवून नेण्यात आल्यानंतर त्यांचे मृतदेहच एकदम सापडले.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हा प्रकार पॅलेस्टिनियन दहशतवाद्यांनीच घडवल्याचे सांगून याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असे जाहीर करून टाकल्याने लगेचच गाझा पट्टीत इस्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनियन्स यांच्यात युद्ध सुरू झाले. गाझा पट्टी पेटण्याआधी इराकमध्ये बगदादच्या दिशेने सुन्नी दहशतवाद्यांची फौज कूच करत होती. आपण या नव्या खिलाफतीचे प्रमुख आहोत, असे ‘इस्लामी स्टेट आॅफ इराक अँड सीरिया’ या संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी याने जाहीर केले. आपले आदेश जगभरातल्या मुस्लिमांनी ऐकलेच पाहिजेत, असे सुनावले. अन्य देशातल्या इस्लामी जनतेला आकर्षित करण्यासाठी त्याने आपल्याला शरिया पाळणार्‍या ‘खुरासन’ची स्थापना करायची असल्याचे जाहीर केले. सीरियातून अबू बगदादीला इराकमध्ये पाचारण केले गेले.ज्या इराककडे संहारक शस्त्रास्त्रे असल्याचा सार्‍या जगाचा समज करवून देण्यात आला आणि त्यावर आक्रमण करून अमेरिकेने इराकचे अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना ठार केले, त्या इराकला आता कोणीही त्राता उरलेला नाही. तेथे क्रौर्याचे, मानवाधिकारभंगाचे असंख्य प्रकार घडत असूनही अमेरिकेला त्याची दखल घ्यायची इच्छा नाही. सीरियामध्येही सैन्य पाठवायची भाषा करणार्‍या अमेरिकेला तिथे सैन्य पाठवता आलेले नाही. त्यातूनच इराक आणि सीरिया या दोन्ही ठिकाणी दहशतवादाने उन्माद माजवला आहे. दोन्ही ठिकाणी शियांचा बळी जात आहे. त्यातून स्त्रिया, लहान मुले यांनाही वगळण्यात आलेले नाही. या दोन्ही ठिकाणी मृत्युमुखी पडणार्‍या शियांना पाहून इराणच्या सत्ताधार्‍यांचा संताप अनावर होत आहे. सौदी अरेबियासारख्या सुन्नी वर्चस्व असलेल्या देशाला न दुखावण्यासाठी अमेरिका काहीही भाष्य करायला तयार नाही. भारतातही दोन्ही पंथांना मानणार्‍यांपैकी काहींनी आपल्यालाच हे आव्हान असल्याचे मानून तरुणांची माथी भडकवायचे उद्योग आरंभले आहेत. त्यातूनच काही भागातून या मंडळींना फौजफाटा पुरवला जाऊ लागला असेल, तर त्यात आश्चर्य वाटायचे कारण नाही. इराणने इराकमध्ये काही कारवाई केली तर आपण त्यात हस्तक्षेप करणार नाही, असे अमेरिकेला दाखवायचे असले तरी प्रत्यक्षात अमेरिकेचा कोणत्याच बाबतीत भरवसा देता येत नसल्याने इराणने मध्ये पडायचे टाळले आहे.

इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेकडून इस्राएलचा वापर केला जाणार आहे. त्या संबंधातली योजना ‘यूएसस्ट्रॅटकॉम’ म्हणून ओळखली जाते. ती 2006 मध्येच तयार करण्यात आलेली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदी जॉर्ज बुश (धाकटे) असताना त्यांचे उपाध्यक्ष डिक चेनी यांनी ‘आमच्या शत्रूंच्या यादीत सर्वात वरच्या क्रमांकावर इराण आहे आणि त्यावर जरूर तेव्हा बॉम्ब टाकण्याची जबाबदारी आम्ही इस्राएलकडे सोपवलेली आहे,’ असे स्पष्ट केले होते. अध्यक्ष बराक ओबामा यांनी तर ‘इराणविरुद्ध अण्वस्त्र वापरायचा अधिकार इस्राएलला देण्यात आला आहे,’ अशी धमकीच दिली होती. अमेरिका आपल्याला संपवण्यासाठीच टपलेली आहे, अशी इराणची भावना झाली असेल, तर नवल नाही.

अमेरिकेच्या दृष्टीने इराण हा सध्याचा शत्रू क्रमांक एक आहे. इराणसाठी अमेरिकेने जो छुपा कार्यक्रम आखलेला आहे, त्याचे नाव आहे ‘टायरंट’. ‘थिएटर इराण निअर टर्म’ या सांकेतिक शब्दातली अक्षरे घेऊन हा कार्यक्रम बनवलेला आहे. विल्यम अर्किनने त्याविषयी ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये लिहिलेले होते. या योजनेनुसार अमेरिकेला इराणबरोबर दीर्घकालीन वा अल्पकालीन लढाई तपासून पाहायची होती आणि इराणजवळची सर्व संहारक अस्त्रे नष्ट करायची होती. अमेरिकेवर आणखी एखादा हल्ला झालाच तर (किंवा तसा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याच्या संशयावरूनही) इराणला जेरीस आणायचे आणि त्याकडील सर्व जनसंहारक अस्त्रे नेस्तनाबूत करायची, अशी ही योजना आहे. इराणमधील साडेचारशेवर संवेदनशील ठिकाणे आणि त्यांचे नकाशे अमेरिकेच्या संग्रही आहेत. त्यासाठी अर्थातच इस्राएलची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी पारंपरिक आणि जरूर तर अण्वस्त्रांचाही वापर केला जाणार आहे. अमेरिकेकडे असलेली डावपेचात्मक अस्त्रे इराणच्या दिशेने वळवण्यात आलेली आहेत. आपल्याला या प्रकारात सर्वतोपरी गुंतवायचे प्रयत्न असल्याचे इराणला माहीत असल्याने तो सध्या तरी गप्प बसलेला आहे. इराणविरोधात अमेरिका युद्धात उतरली तर सर्वाधिक आनंद सौदी अरेबियाला होणार आहे.
अमेरिका-रशिया संबंध हे शीतयुद्धाप्रमाणे टोकाचे नसले, तरी रशियाचे स्वत:च्या पायावर उभे राहणे अमेरिकेला डाचते आहे. गेल्या दहा वर्षांत व्लादिमीर पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशिया जोमाने पावले टाकत असल्याचा त्रास अमेरिकेला होतो आहे. त्यातूनच मलेशियाच्या विमानाला पाडण्यात आल्याच्या प्रकरणाला रशियालाच अमेरिकेने जबाबदार धरले आहे. रशियाने आपल्या बंडखोरांना धोकादायक शस्त्रे पुरवायला नको होती, असे सांगणार्‍या अमेरिकेचा इतिहास कम्युनिस्ट सोव्हिएत युनियनविरुद्ध लढणारे अफगाण-पाकिस्तानी मुजाहिदीन ते काँट्रा बंडखोर अशा सर्वांना मदत देणारा आहे. तो तपासायला हवा. जिथे आपल्याला नको असणारी सरकारे आहेत, ती लोकशाहीवादी असली तरी त्यांच्या विरोधात असलेल्या दहशतवाद्यांना मदत देण्यात अमेरिकेचा हात आखडता नसतो. इजिप्तची ‘मुस्लिम ब्रदरहूड’ही त्यात आलीच. तालिबानी आणि पाकिस्तानी दहशतवाद हेही त्याचेच फळ आहे. त्या सगळ्याचा परिपाक म्हणूनच या घटकेला हे जग युद्धशाळा बनले आहे. नायजेरिया ते फिलिपाइन्स आणि म्यानमार ते इस्राएल-पॅलेस्टाइन अशी युद्धशाळा विस्तारत चालली आहे. त्यातूनच जगाचा तिसर्‍या महायुद्धाकडे हा प्रवास चालला आहे का, असा प्रश्न उभा राहत आहे.
(arvindgokhale@gmail.com)