आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आझाद काश्मीरची बंदिस्त कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून जे भाषण केले, त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. आजवर कोणत्याही पंतप्रधानांनी ज्या मुद्द्यांना कधी स्पर्श केला नव्हता, ते मोदींनी आपल्या भाषणात उच्चारले. पाकिस्तानमधल्या गिलगिट-बाल्टिस्तान या भागांचा त्यांनी उल्लेख केला, पाकिस्तानव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान या भागाकडे आपले लक्ष असल्याचे त्यांनी सूचित केले. पाकिस्तानबरोबर भारताला शांतता हवी वगैरे कोणतेही गैरलागू विचार त्यांनी मांडले नाहीत. जे घडणारच नाही ते बोला तरी कशाला, असा त्यांचा हेतू असावा. त्यांनी काश्मीरमधल्या परिस्थितीचाही उल्लेख केला नाही. पाकिस्तानी राज्यकर्त्यांपर्यंत सांगायचा मुद्दा पोहोचला आणि त्यांची चीडचीड लगेचच सुरू झाली. मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईद याच्यावर असलेल्या दूरचित्रवाणी बंदीला हटवून पाकिस्तानने मोदींना उत्तर दिले. हाफिज सईद जणू या संधीचीच वाट पाहात असल्याप्रमाणे बोलला आणि त्याने भारतात पाकिस्तानने सैन्य घुसवावे आणि त्यास चांगली ‘अद्दल’ घडवावी, असे म्हटले. आपल्याला जे बोलता येत नाही किंवा ज्यामुळे आपली अडचण होते, ते हाफिज सईदकडून वदवून घ्यायचा हा पाकिस्तानी उद्योग आहे. पाकिस्तानात बालिश बहु बडबडले, असे ज्यांच्याबद्दल सांगता येईल असे भारताप्रमाणेच अनेक जण आहेत, त्यापैकीच एक हा हाफिज सईद. त्याच्या लक्षात येणार नाही, पण १९४७प्रमाणे काश्मीरमध्ये सैन्य घुसवायचा कोणताही प्रयत्न आता हाणून तर पाडला जाईलच, पण आता संघर्ष झालाच तर पाकिस्तानला फार मोठा फटका बसेल. असे कोणतेही युद्ध दोन्ही देशांना परवडणारे नसेल आणि ते कोणत्या टोकाला जाऊन थांबेल, ते सांगता येणे अवघड आहे.

काश्मीरमधल्या सार्वमताविषयी आजवर अनेकदा पाकिस्तान्यांनी आग्रह धरला, पण तो प्रत्यक्षात आणणे त्यांनाच कसे न जमणारे आहे, ते त्यांनी सांगितलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावाप्रमाणे जर काश्मीरमध्ये सार्वमत घ्यायचे झाले तर पाकिस्तानला व्यापलेला काश्मीरचा सर्व प्रदेश सर्वप्रथम भारताच्या हवाली करावा लागेल. त्या भागाचे सर्व संरक्षण भारताकडे सोपवावे लागेल. इतकेच नव्हे तर जो भाग चीनला आंदण देण्यात आला आहे, तोही भारताला परत करावा लागेल. तेव्हाच्या काळात होते त्यापेक्षाही हे काम आता अधिकच अवघड आहे. पाकिस्तानची निर्मिती झाल्याबरोबर लगेचच पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले आणि त्या भागाचा लचका तोडला. हे आक्रमण झाले तेव्हा काश्मीरचे भारतात विलिनीकरण झालेले नव्हते. काश्मीरशिवाय पाकिस्तान ही अपुरी निर्मिती आहे, असे पाकिस्तानचे निर्माते आणि तेव्हाचे गव्हर्नर जनरल महमद अली जिना यांच्या मनात पक्के होते. पाकिस्तानला काश्मीर का हवे तर जिनांच्या द्विराष्ट्रवादाच्या मुद्द्यात तो वरच्या क्रमांकावर होता. काहीही करून काश्मीर बळकवायचेच, हे स्वप्न जिनांनी प्रत्यक्ष फाळणी होण्यापूर्वीच पाहिलेले होते.

त्यासाठी त्यांनी काही व्यक्तींना हेरूनही ठेवलेले होते, त्यापैकीच एक म्हणजे जम्मू आणि काश्मीर मुस्लिम कॉन्फरन्सचे अध्यक्ष चौधरी गुलाम अब्बास. महाराजा हरिसिंह यांच्या सरकारने त्यांना अटकेत टाकले होते, पण शेख अब्दुल्ला यांनी नंतर त्यांना सोडून दिले. इतकेच नाही तर त्यांना युद्धबंदी रेषा ओलांडून पाकिस्तानव्याप्त प्रदेशात जाऊही दिले. जिनांचे सल्लागार त्या काळात ब्रिटिशच होते. फाळणी झाल्यावर लगेचच त्यांनी हे काम मेजर जनरल अकबर खान याच्यावर सोपवले. अकबर खान याने आपल्यासमवेत कोण कोण असतील, त्याची यादीही केली. त्याने आपल्या तुकडीत पठाण टोळीवाले असतील, असे सांगितले; पण प्रत्यक्षात या टोळीवाल्यांसमवेतच पाकिस्तानी सैनिकांना त्यांचा वेष धारण करून बरोबर घेतले. नव्याने जन्मास आलेल्या पाकिस्तानने आपल्या सैन्याचे मुख्यालय रावळपिंडी आणि हजारामध्ये अबोटाबाद या दोन ठिकाणी स्थापन केले. फाळणीपूर्व काळात या सर्व भागात ब्रिटिश प्रशासनाच्या हस्तकांनी जातीय दंगे घडवून आणले आणि तिथे असलेल्या मुस्लिमेतरांना पळ काढावा लागला. लाहोरमध्येही दंगे उसळले. हे सर्व अगदी जाणतेपणी घडवले जात होते. फाळणीनंतर काय झाले, ते आपण सर्व जाणतोच.

अकबर खानकडे श्रीनगरच्या लाल चौकात पाकिस्तानी झेंडा फडकवायची जबाबदारी देण्यात आली होती. आपण काम फत्ते करूनच येऊ, असे त्याने जिनांना सांगितले होते. हे काम तो कसे करणार, त्याला किती फौजा लागतील किंवा समजा श्रीनगर जिंकलेच तर त्यानंतर काय करायचे, त्याविषयी जिना पूर्ण अनभिज्ञ होते, असा निष्कर्ष तेव्हाच्या कागदपत्रांवरून काढण्यात येतो. पत्रकार इआन स्टिफन्स यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सरकारने आपल्या नियमित फौजेला श्रीनगरकडे रवाना व्हायचा आदेश दिला होता. जिनांनी तो २७ ऑक्टोबर १९४७ रोजी लाहोरमध्ये काढला. आपला आदेश कोणीच थोपवू शकत नाही, या भ्रमात असलेल्या जिनांना पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी जनरल मेस्सर्वीच्या अनुपस्थितीत काम पाहणाऱ्या जनरल ग्रेसीने त्या आदेशाला स्थगिती दिल्याचे दुसऱ्या दिवसापर्यंत माहीत नव्हते. ग्रेसीने आपण या विषयावर दिल्लीत असलेले त्यावेळपर्यंतच्या संयुक्त फौजेचे प्रमुख जनरल सर जॉन क्लॉड अचिनलेक यांच्याशी बोलायला हवे असल्याचे वाटले. या दोघांनी जिनांची लाहोरमध्ये भेट घेतली आणि त्यांना आपला आदेश रद्द करण्यास सांगण्यात आले.

लाहोरमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ ऑक्टोबरला लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याशी जिनांची चर्चा झाली. प्रत्यक्षात २२ ऑक्टोबरला झेलम नदीचा पूल ओलांडून पाकिस्तानी टोळीवाले आणि त्यांच्या वेषात सर्व शस्त्रास्त्रांनिशी आलेले सैन्य काश्मीरमध्ये घुसले होते. जिनांचे नाटक किती बेमालूम होते, हे त्या बैठकीपूर्वीच उघड झाले होते. ते खोटेपणानेच वागले होते. पाकिस्तानचे तेव्हाचे अर्थ सचिव चौधरी मुहम्मद अली यांनी सांगितले की, ‘काश्मीरमधून आलेल्या निर्वासितांनी आणि पूँछमधल्या माजी सैनिकांनी लाहोरमध्ये शस्त्रास्त्रखरेदी केली आणि त्यांनी पठाणांच्या फौजेत आपले नाव दाखल केले. ते आता कोणत्याही क्षणी श्रीनगरमध्ये पोहोचतील. पूर्व पंजाबमध्ये झालेल्या कत्तलींचाही त्यांना बदला घ्यायचा आहे.’ हे काहीच नाही. पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अलींनी २१ ऑक्टोबरलाच काहीही छापायचे नाही, या अटीवर टोळीवाल्या सैनिकांची तुकडी श्रीनगरच्या वाटेवर असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. जेव्हा त्यांना ‘तुम्ही हे जिनांना कळवलेत का’ असे विचारले, तेव्हा त्यांनी ‘अजून नाही’ असे उत्तर दिले. यावरून एक तर दोघेही परस्परांपासून ही गोष्ट लपवून ठेवत असावेत, किंवा दोघेही तद्दन खोटे बोलत असावेत, असा समज करून घेण्यात आला.

या संदर्भात काश्मीरचे तेव्हाचे पंतप्रधान शेख महमद अब्दुल्ला यांनी १० नोव्हेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिनांनाच या सर्व अत्याचारांबद्दल दोष दिला आणि म्हटले की, ‘लुटारू आले, त्यांनी आमच्या महिलांवर, मुलींवर बलात्कार केले आणि असंख्य निरपराधांना ठार केले. आमच्या धार्मिक स्थळांना त्यांनी वेश्यागृहांचे स्वरूप दिले होते. या पाकिस्तान्यांनी आमच्या हृदयांना शतश: विदीर्ण केले आहे. मी या संदर्भात सर्व देशांच्या विशेषत: मुस्लिम देशांच्या प्रतिनिधींना काश्मीरमध्ये येऊन या लुटारूंनी कोणता हिंस्र धिंगाणा घातला आहे, त्याची प्रत्यक्ष माहिती घ्यायचे आवाहन करत आहे.’ शेख अब्दुल्लांचे हे आवाहन अर्थातच व्यर्थ गेले. त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला, जो आजवर फार चर्चिला गेलेला नाही. ते म्हणाले, ‘१९४४मध्ये जिनांनी मला पाकिस्ताननिर्मितीनंतर पाकिस्तानात येण्याचे निमंत्रण दिले आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याचीही तयारी दाखवली होती.’ शेख अब्दुल्लांनी त्यास सपशेल नकार दिला आणि आपला स्वत:चा जिनांच्या द्विराष्ट्र सिद्धांतावर अजिबात विश्वास नसल्याचे त्यांना सुनावले.

२६ ऑक्टोबरला पाकिस्तानी टोळीवाल्यांची धाड श्रीनगरच्या जवळ पोहोचली होती. टोळीवाल्यांचे तथाकथित ‘लष्कर’ जर शिस्तशीर वागले असते तर त्यांनी श्रीनगर २६ तारखेलाच बळकावले असते, पण ते असंख्य लोकांचे खून करण्यात, लुटालुटीत, बलात्कारात आणि जाळपोळीत दंग राहिले आणि त्यामुळे जम्मू आणि काश्मीरचे महाराज हरिसिंह यांना खडबडून जागे व्हावे लागले. हरिसिंहांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना तारा करून आपल्याला वाचवा, असा टाहो फोडला. त्यानंतर काय झाले, ते आपण जाणतोच. आपले सैन्य श्रीनगरच्या विमानतळावर उतरले आणि शत्रूला त्यांनी मागे ढकलत नेले. जिथवर त्यांनी पाकिस्तान्यांना मागे नेले आणि संयुक्त राष्ट्रसंघाने युद्धबंदी जाहीर केली, तिथून पुढला भाग पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जात आहे. त्यालाच पाकिस्तानकडून ‘आझाद काश्मीर’ असे म्हटले जाते. त्याचे स्वरूप आता पूर्ण बदलले आहे. जे तेव्हाचे काश्मिरी होते, त्यापैकी बरेचसे युरोपात आणि विशेषत: इंग्लंडमध्ये गेले. या पाकिस्तानव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद ही आहे आणि तिथे लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे.

हरिसिंह यांनी सर्वात मोठी घोडचूक कोणती केली असेल तर ती ही की, त्यांनी ब्रिटिशांना १९३५मध्ये गिलगिटचा प्रदेश लीजवर दिला. गिलगिटचाच प्रदेश नाही तर त्यांनी हुंझा, नगर, यासिन आणि इश्कोमन हा सर्व डोंगराळ प्रदेश त्यांना लीजवर दिला. तो करार साठ वर्षांचा होता. फाळणीच्या वेळी दि. १ ऑगस्टला तो प्रदेश महाराजांच्या हाती देण्यात आला, पण गिलगिटचे संरक्षण करण्यासाठी जे स्काऊट नेमलेले होते, त्यांनी महाराजांच्या विरोधात बंड पुकारून तो सर्व प्रदेश १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानला जोडून घेत असल्याचे जाहीर केले. हा सर्व भाग आता ‘नॉर्दर्न रीजन’ म्हणून ओळखला जातो. गिलगिटची कहाणी इथे संपली असली तरी इतिहास आणखी बरेच काही सांगतो. गिलगिटमध्ये १८१०च्या सुमारास राजा त्राखनच्या निधनानंतर त्राखन राजवट संपुष्टात आली. तेव्हा हुंजा आणि नगरच्या राजांनीही आपण त्राखन घराण्याचेच असल्याचे जाहीर केले.

इराणचा राजपुत्र अझर जमशिद किंवा समशेर याने राजा बादत याच्या कन्येशी गुप्तपणे विवाह केला. तिने आपल्या वडलांची राजवट उलथून टाकायचे कारस्थान रचले. त्या बादतला काही जण हिंदू मानतात तर काही बौद्ध. राजा बादतला उलथवून टाकण्यात राजपुत्र अझर जमशेदला यश आले. हा बादत आदमखोर म्हणजेच नरभक्षक मानला जात होता. आपल्या जनतेकडून तो रोज एका बालकाची मागणी करत असे. गिलगिट-बाल्टिस्तानला १९७०मध्ये स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणेचा दर्जा देण्यात आला. २००९मध्ये त्यास पूर्ण स्वायत्तता जाहीर करण्यात आली, पण तिथला गव्हर्नर हा पाकिस्तानचा बाहुला बनूनच काम पाहात असतो. ज्या बाल्टिस्तानचा उल्लेख आज तिथल्या सुप्त संघर्षाच्या संदर्भात केला जातो, ते उत्तर भागातले हे शहर आधीच्या काळात बाल्टियुल म्हणून म्हणजेच छोटे तिबेट म्हणून ओळखले गेले. ते गिलगिटला लागून आहे आणि वरच्या उत्तरेच्या बाजूस ते चीनच्या सिंझियांग अथवा सिंकियांगला लागून आहे. चीनमध्ये असलेल्या जिहादी बंडखोरांना येथूनच सर्व तऱ्हेची रसद पुरवण्यात येत असते. कारगिलचे युद्ध आणि सियाचीनचे युद्ध पाकिस्तानने येथूनच लढले होते. के-२, नंगा पर्वत, फेअरी मिडवेज, खुनयांग चिश, साल्तोरो कांगरीसारखी हिमशिखरे याच भागात आहेत. वीस हजार फुटांवरची वीस शिखरे याच एका भागात आहेत.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधले मीरपूर हे असे एक शहर की जिथले रहिवासी आपल्याला जगाच्या कोनाकोपऱ्यात आढळतील. मी मीरपुरी आहे, असे सांगण्यात त्यांना खूपच सन्मान वाटतो; पण आपण मीरपूरला का सोडले, ते त्यांना सांगावेसे वाटत नाही. आज पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधले ते एकमेव औद्योगिक केंद्र, अशी ओळख टिकवून आहे.

हे झाले पाकिस्तानव्याप्त प्रदेशाचे वर्णन. पण या एकाच भागात म्हणजे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अमेरिकेच्या दडपणाखाली कपात करण्यात आली. हा आकडा ४२ वरून आज १७ इतका खाली आला असल्याचे सांगितले जाते; पण हे भारतकेंद्रित अड्डे व्याप्त काश्मीरपलीकडे लाहोर, फैसलाबाद, पेशावर, क्वेट्टा यांसारख्या ठिकाणी आहेत. त्यांचे काय केले जाणार, हा प्रश्नच आहे.
गिलगिट-बाल्टिस्तानमधील वास्तव
गिलगिट-बाल्टिस्तान हा आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेला प्रदेश. पण इतकीच त्या प्रदेशाची ओळख नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीने अत्यंत समृद्ध असलेल्या या भागाच्या ललाटी मात्र गेल्या काही दशकांपासून दुर्दैवाचे भोग आलेले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान भागातील जनतेला स्वतंत्र देश म्हणून राहण्याची आकांक्षा असून तिच्यावरच नेमका वरवंटा फिरवून या नागरिकांना पािकस्तानी राज्यकर्त्यांनी गुलामांसारखी वागणूक दिली आहे. गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निसर्गसंपदा समृद्ध असली तरी तेथील बहुतांश लोक दारिद्र्याचे चटके सहन करीत आहेत. त्यांच्या एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली जगत आहेत. १० टक्के लोक बेघर अवस्थेत जगत आहेत. धार्मिक कट्टरता वगैरे गोष्टींपेक्षा या प्रदेशात गरिबी हाच एक मोठा मुद्दा आहे व तो मुद्दाच असंतोषाचा जनकही आहे. पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी या भागातील नागरिकांच्या भल्यासाठी इतक्या वर्षांत काहीही भरीव कार्य केलेले नाही. गिलगिट-बाल्टिस्तानमधील नागरिकांना पाकिस्तानशी कधीही जवळीक वाटली नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पाकिस्तानने लष्करी बळाचा वापर करून या प्रदेशातील स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांच्या ऊर्मी दडपून टाकल्या. मानवी हक्कभंगाची काळी परंपरा असलेल्या या प्रदेशाचा प्रश्न निकालात निघाला नाही तर भविष्यात आशियातील शांततेला धोकाही निर्माण होऊ शकतो...

arvindgokhale@gmail.com
बातम्या आणखी आहेत...