गेली काही वर्षं खूप फिरणं चालू आहे. गेल्या एक दीड वर्षात तर हे फिरणं वेगवेगळ्या भागांत, वेगवेगळ्या कारणांसाठी सुरू आहे. ‘नाम’ संघटनेच्या सुरुवातीला वेगवेगळ्या गावांत, मग ‘चला हवा येऊ द्या’च्या निमित्ताने महाराष्ट्र दौरा. मग, ऑस्ट्रेलिया दौरा. खेड्यात, शहरात, परदेशात. खूप अफलातून माणसं भेटली, या काळात. अमरावतीजवळ एका गावात मतीन भोसले राहतो. तिथे झोपड्या उभ्या करून पारधी मुलांसाठी शाळा सुरू केलीय त्याने. कोलकाता, झारखंड कुठून-कुठून मुलं गोळा केलीत पारधी समाजाची. कुणाचे आई बाप भीक मागतात. कुणाचा बाप जेलमध्ये आहे. मतीन भोसले आणि त्याचे मित्र या मुलांसाठी वेळप्रसंगी भिक्षा मागून पैसे गोळा करतात. खरं तर पारधी समाज आज या अवस्थेत आहे, ते देश म्हणून
आपलं पाप आहे. पण प्रायश्चित्त कोण घेतोय? मतीन भोसले. त्याच्या शाळेचं नाव आहे, ‘प्रश्नचिन्ह’! हे प्रश्नचिन्ह आपल्यासमोर का नाही?
अशी खूप माणसं आणि गावं आहेत भोवती. जी डावीकडे झुकलेली नाहीत आणि उजवीकडेही झुकलेली नाहीत. कारण सगळ्या बाजूंनी फक्त संघर्षच आहे, त्यांच्या नशिबात. झुकणार कुठे? जगात देव आहे का नाही? हा प्रश्नसुद्धा पडत नाही त्यांना. कारण रोजच्या जेवणाची मारामार आहे. देव असला काय आणि नसला काय, तो थोडाच जेवू घालणार आहे. मागे लातूरला रेल्वेत जाताना डब्याचं दार बंद होत नव्हतं. मित्र म्हणाला, आपण तक्रार केली की, रेल्वे मंत्री स्वतः झटकन दखल घेतील. मी विचार केला, असं देशाचा कृषीमंत्री का करत नाही? शेतकऱ्याच्या तक्रारीची तत्काळ दखल घ्यावी, असं का वाटत नाही कुणाला? शेतकऱ्याने जीव दिल्यावर कारणांची चौकशी न करता, लाख रुपये देतो, असं थाटात सांगत होते एकनाथ खडसे विधानसभेत. पण खडसे साहेब, तुम्ही कारणांची चौकशी करावी, हीच मूळ अपेक्षा आहे शेतकऱ्याची. या वर्षात आत्महत्या एवढ्या का वाढल्या, याची कारणं कळायला नको का? मुख्यमंत्री लातूरला जायकवाडीचं पाणी देऊ म्हणाले. पण कसं? मुळात, जायकवाडीला कुठून पाणी देणार? आधी लातूरला रेल्वेने पाणी देऊ, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. यातलं अजून काहीच घडलं नाही. मुंबईतलं मीरा रोड. अबीद सुरती नावाचे राष्ट्रीय पारितोषिक विजेते लेखक. दर रविवारी सकाळीच प्लम्बरला घेऊन बाहेर पडतात. नव्या सोसायटीत जाऊन धडकतात. काम काय? घराघरात नळ लिकेज आहेत का, हे चेक करतात. एवढ्या वर्षांत लाखो लिटर पाणी वाचवायला कारण ठरलाय हा माणूस. एकटा माणूस हे करू शकतो.
स्थळ रायगड. सरकार महोत्सव घेतं. कचरा उचलायची जबाबदारी घेत नाही. दोन-चार तरुण एकत्र येतात आणि सगळा कचरा गोळा करतात. केवळ महाराजांच्या प्रेमापोटी. महाराजांच्या नावाने मतं मागणारे, हा विचार का करू शकत नाहीत?
्थळ भंडारदरा. टुरिस्ट प्लेस. रात्री थोडा उशीर झाला, की जेवण शोधत फिरावं लागतं. तिथे आदिवासी एकापेक्षा एक भारी नृत्य सादर करतात. पण त्यांना त्यातून रोजगार मिळेल, अशी एक योजना नाही. बीडमधला एक तांडा. बंजारा समाजातले लोक. सरपंच आम्हाला त्या तांड्यावर घेऊन गेला. बातमी अशी होती की, तिथल्या मुलींनी हुंडा देऊन लग्न करायला नकार दिला. सगळ्या मुलींनी आपलं लग्न पुढं ढकललं. एवढ्या कमी वयात हुंडा देऊन लग्न करायचं नाही, हे शहाणपण त्यांना आहे. त्या तांड्यावर मुलींचे हे बंडखोर विचार ऐकून पहिल्यांदा एवढे सरकारी अधिकारी गेले. हे पहिलं यश आहे.
आता ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियात एक रँडम चेकिंग होतं, एअरपोर्टवर. आपल्याकडे काही बॉम्ब वगैरे तर नाही, बघण्यासाठी. त्यात माझा नंबर लागला. मला चेक करणारा माणूस भारतीय वाटला म्हणून त्याला विचारलं, तर तो पाकिस्तानी निघाला. मी मनात विचार केला की, भारतीय माणसाकडे बॉम्ब आहे की नाही, हे पाकिस्तानी माणूस चेक करणार. पण मी इंग्रजीत बोलत होतो, तर तो म्हणाला, ‘हिंदी में बोलिये. अच्छा लगता है’. मी विरघळून गेलो. गोऱ्यांच्या देशात पाकिस्तानी किंवा बांगलादेशी माणसं खूप जवळची वाटतात. आणि तशी वागतातही. ऑस्ट्रेलियात सिडनीत आम्ही फिरलो. चायनीज आणि कोरियन लोकांची खूप गर्दी आहे. ‘चायना टाऊन’ असा स्वतंत्र परिसर आहे. तिथे काही भिकारी दिसले. पण तेसुद्धा फोटो काढू देत नाहीत. मी काढले बळजबरी. मात्र, मला पदोपदी जाणवत होतं, हा देश खूप पुढे गेलाय. आपल्यासारखाच इंग्रजांचं राज्य असलेला हा देश. इंग्रजांनी एकेकाळी गुन्हेगार पाठवले होते, ऑस्ट्रेलियात. शिक्षा म्हणून. पण आज एवढे स्वच्छ, शिस्तीत राहतात ते. केवढा अभिमान आहे, त्यांना देशाच्या स्वच्छतेचा. शिस्तीचा. एकेकाळी गुन्हेगार असलेल्या लोकांच्या देशात फिरताना आपल्यालाच गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. आपल्याकडे एवढी देशभक्ती उफाळून आलेली असताना साधी ‘स्वच्छ भारत योजना’ यशस्वी का होत नाही? कारण सोपं आहे. श्री श्री रविशंकर दंड भरणार नाही, असं सांगू शकतात. ओवेसी वाटेल ते बोलू शकतात. आणि बीजेपीचे नेते विरोधी पक्षात असल्यासारखे आरडाओरडा करतात. अरे तुमची सत्ता आहे, कारवाई करण्याची हिंमत दाखवा. कन्हैयाकुमारला एक न्याय आणि ओवेसीला एक न्याय, हा भ्याडपणा आहे. अशा प्रश्नांवर पंतप्रधान सोयीस्कर मौन बाळगतात, सावळा गोंधळ वाढतच राहतो. मोदी यांच्यासारखा मार्केटिंगची उत्तम कला असलेला माणूस पंतप्रधान आहे आज. पण देवळाचा ताबा भक्ताकडे गेला की, देवाचं पण काही चालत नाही. तसं काही झालंय देशात. एक गाणं होतं, ‘देव देश अन् धर्मासाठी प्राण घेतलं हाती.’ आता आपण नेमके उलट वागतोय. या तिन्ही गोष्टींमुळे प्राण घेतले जातात. वाचवले जात नाहीत. देवाच्या नावाने दररोज कोट्यवधी रुपये खर्च होतात, या देशात. पण माणसं एक एक रुपयासाठी जनावरांसारखे राबत असतात. देशाचं भवितव्य ठरवणारी संसद सोनिया आणि राहुलच्या केससाठी काँग्रेसवाले निर्लज्जपणे ठप्प करतात. जेएनयुमध्ये देशाच्या विरोधात कोण घोषणा देत होतं? हे अजून कळत नाही. बाकी तिथे किती कंडोम वापरले जातात, असे खरकटे संशोधन मात्र रोज चालू असते. गावोगाव फिरताना असं वाटतं की, आता शेतकऱ्यांनी पण लक्ष वेधून घ्यायला देशद्रोही वक्तव्य करायची का? दबल्या आवाजात किंवा सोशल मीडियावर शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी चूक आहे, असं बोलणारे दीडशहाणे खूप आहेत. त्यांना एकच सांगतो. तुमच्याकडे शहरात वीज आहे, चोवीस तास. आणि ती तुम्ही फालतू गॉसिप पसरवायला वापरता. स्मृती इराणी, कन्हैया कुमार, ओवेसी यांच्यासारख्यांची ड्रामेबाज भाषणं तुम्ही चवीने ऐकता-पाहता. पण शेतकऱ्यांनी मरता मरता सांगितलेली एकही गोष्ट तुम्हाला महत्त्वाची वाटत नाही. अनधिकृत बांधकाम एका फटक्यात अधिकृत होत असेल, तर कर्जमाफीला काय अडचण आहे? देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टी मानवाच्या कल्याणासाठी असल्या तर आणि तर लोकच त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. पण आपल्याकडे या तिन्ही गोष्टींवर कधी नव्हे एवढी जोरदार चर्चा चालू आहे. का? आपण सगळ्यांनीच काहीतरी मुळापासून चुकतंय, याची दखल घेण्याची ही शेवटची घटका आहे.
आपल्या देव देश अन् धर्मासाठी...
(लेखक प्रसिद्ध पटकथाकार-गीतकार आहेत.)