प्रिय दीपिकाताई, बर्याच दिवसांपासून तुम्हाला पत्र पाठवावं म्हणीत होतो. पन टाइम भेटत नव्हता. गावाकडं पुरुषाला यक ताप आसतो का? जे काही करायचं, ते लयी इचार करून करावं लागतं. कोणत्या पुरुषासोबत संबंध ठेवायचे, याचा चॉइस तुम्हाला हाये. आम्हाला आमच्या घरातल्याच बायकोसोबत किती बोलायचं, कसं बोलायचं, याला लिमिटेशन आसतय. आहो खरंच. लयी बायकुच्या पुढं पुढं केलं त गावातल्या बायकाच बायल्या म्हणत्यात आन् हसत्यात फिदी फिदी. कापूस येचता येचता बायका काय बोलत्यात, अशा पुरुषाबद्दल हे ऐकलं तं त्यो पुरुष कापसापेक्षा जास्त पांढरा पडंल. तरीबी आई-बापाचे, ‘बायकोला जास्त डोक्यावर घेऊ नाही’ आसं सांगणार्या महान संस्कृतीचे पालन करीत, आम्ही बायकोवर प्रेम करीत आसतो. महिन्यातून वीस-पंचवीस दिवस लाईट नसल्यामुळं भायेर उघड्यावरच झोपाव लागतं. चार पत्र्यात जीव गुदमरतो. अशा टायमाला बायकोला जीव लावता येत नाही. त्याबद्दल माफी असावी.
तरीबी म्हातार्या-कोतार्यांचा घोरण्याचा आवाज ऐकून निम्म्या राती बायकोचा हात हातात घेतो, कधी मधी. पर आमच्या गावात पहाटंच बायकांना परसाकडला जावं लागत आसल्यानी, त्या निम्म्या रातीच्या टाइमचा चॉइस एक्सेप्ट करीत नाहीत. [परसाकडला म्हणजी, toiletला. फराह खानच्या जगावेगळ्या सिनेमाची सवय असल्या कारणानी तुम्हाला आमचे साधे शब्द माहीत नसतेन.] आता तुम्ही म्हणतान, घरात शौचालय नाही का? विद्या बालन एवढी घसा फोडून सांगती. पन तुम्हाला आन विद्या बालनला खास करून सांगतो की, बायका चॉइस म्हणून उघड्यावर परसाकडला जात नाहीत. पाणी नसल्यामुळं जावं लागतं. तरीपण तुमच्याच पावलावर पाऊल टाकून आमचा संघर्ष चालूय, ताई. हुरळून जाऊ नका, पन खरंच मनापासून कौतुक वाटतं आम्हाला तुमचं. आता हिवाळ्यात शेतात निस्ती चक्कर टाकायची म्हणलं, तरी आम्ही तोंडाला आन कानाला मफलर गुंडाळून जाणारी माणसं. पर तुम्ही चोवीस तास एसीच्या हिवाळ्यात राहता, आन एवढ्या छोट्या छोट्या चड्ड्या घालता. तुमची मेहनत काय कमीय का? कधी कधी आमचीच आम्हाला लाज वाटती. आंगभर कापड आसून, आम्ही तक्रारी करतो. आन तुम्ही अंगाला झाकायला कापडं नसतानी जो जगाचं मनोरंजन करायचा विडा उचलीलाय, त्यो काही खाली ठिवित नाही. कितीबी संकट येऊन मानलं तुम्हाला.
ताई, कपड्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. आमच्याकडं गरिबीमुळं, जातीच्या बंधनामुळं काही बायका कमी कपडे घालत्यात. गावात बायकांना ‘चॉइस’ नाही. पन तुम्ही चॉइस आसून कमी कपडे घालता, हे आम्हाला महात्मा गांधीजी एवढं मोठं काम वाटतं. मागं, तुम्ही क्लिवेज का काय म्हणतेत, त्याच्यावरूनबी एका पेपरवाल्याशी भांडला. तुमचं पटलं, मला. क्लिवेज ही राष्ट्रीय समस्याय. तिच्या खोलात जाणं, हे राष्ट्रीय कर्तव्यय. ते दिलं सोडून आन् पेपरवाले बसतेत, रिकाम्या चर्चा करीत. मंग कुणाचा बी जीव चिडन ना. पन ताई मला तुमच्याबद्दल जास्त
आपुलकी त्यो ‘ए आय बी’ का काय शो केला ना, तुम्ही त्याच्यामुळंय. काय स्त्रीची प्रतिमा उंचावली, त्या शोमुळं! तुमच्याएवढं सामाजिक कार्य आम्हाला जमणार नाही, ताई.
दीपिका ताई, सावित्रीबाई फुले तुम्हाला माहीत नसत्यान. फराह खान हीच तुमच्या आयुष्यातली एकमेव असामान्य स्त्री आसंल, आसा आम्हाला डाउटंय. आसो. ‘शेतकर्याचा आसूड’ लिहिणार्या जोतिबा फुले आणि सावित्रीबाईमुळं मुली शिकल्या. आन् आज दुर्दैव आसंय की, हे शिक्षण शेतकर्याच्या शोकांतिकेचं कारण झालंय. पोरींना शेतकरी नवरा नको. त्या शहरात राहणार्या नवर्याचं स्वप्न पाहत्यात. आता त्यो शहरात राहणारा टाटा, अंबानी नाही त विजय मल्ल्याचा नौकर. [मल्ल्यासाठी तुम्हीबी काय कमी वणवण केली ताई?] त नौकरीवाले पोरं हुंडा जास्त मागतेत. मंग शेतकरी कर्ज काढतो, पोरीच्या लग्नासाठी. पोरीचं लग्न तिच्या चॉइस प्रमाणी करून दिल्यावर शेतकर्यापुढं काय चॉइस राहतो ताई? घेतो लटकून बिचारा कोणच्या तरी झाडाला.
ताई तुम्ही ऑब्झर्व करा, फार कमी शेतकरी fanला लटकून जीव देतेत. कारण fan म्हणजी, आमच्याकडं न चालणारी, कवा बी दगा देणारी वस्तू. त्याच्यामुळं जीव देण्यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नात शेतकरी कधी fanवर भरोसा ठिवीत नाही. पन तुम्ही मात्र fanसाठी काय नाही करीत? fanसाठी तुम्ही पदराचंसुद्धा भान नाही ठिवीत. आन आमच्या बाया बघा. लेकरू कितीबी रडत आसल, तरी चारचौघात त्याला पाजायलाबी काचकूच करत्यात. कुठं तरी आडोसा हुडकीत बसत्यात. आता त्यानलास मार्गदर्शन कराव वाटतं, ताई मला. पर लेकराला पाजायच्या चॉइसच्या बार्यात तुम्ही काहीच बोलला नाही.
गावातल्या पोरीला घरातून भायेर पडायला भेटत नाही, ती घरी उशिरा येण्याच्या चॉइसचं काय बोलणार? ताई, गावातल्या पोरीची गणती, तुम्ही स्त्रीमधी करता का नाही? त्यांच्या चॉइसचा कवा तरी इचार करा, एवढीच हात जोडून विनंती. शेतात खुरपणी करणार्या, डोक्यावर घागर आन् हातात हंडा घेऊन पाणी भरणार्या, चार-चार किलोमीटर पायी शाळेत जाणार्या लेकी बाळी म्हणत्यात, आम्हाला काही चॉइस हाय का नाही? तुम्ही ज्या परदेशी मासिकासाठी ‘माय चॉइस’ नावाचा व्हिडिओ बनविला ना ताई, त्याचा इतिहास वाचा. बायकांची कवडीची किंमत नाही, त्या लोकाला. जाऊ द्या. जाता जाता मुनव्वर राना यांचा एक शेर तुमच्या माहितीसाठी ...गावाकडच्या पोरींची वेदना आहे ही.
ये बच्ची चाहती है और कुछ दिन मां को खुश रखना
ये कपडों की मदद से, अपनी लम्बाई छुपाती है।
कळाला तर बरंय. नाहीतर सुपरहिट हायेच तुमचं... ‘बलम पिचकारी जो तुने मुझे मारी.’ दीपिकाताई, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यात पाणी येतं तुमचं हे संवेदनशील गाणं ऐकून.
तुमचा
धोंडीराम.
jarvindas30@gmail.com