आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Jagtap Article On Water Problem Issue In Aurangabad

आता पेटेल सारे रान...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठवाडा ही संतांची भूमी आहे, असं वाक्य मी लहानपणापासून ऐकत आलो आहे. आता ते जास्त पटायला लागलंय. संत साहित्याचा अभ्यास वगैरे करून नाही; मराठवाड्यातल्या लोकांना बघून.
कोट्यवधी रुपयांची समांतर वाहिनी येणार येणार म्हणून शांतपणे वाट पाहणारे औरंगाबादकर संत नाही तर कोण आहेत? लातूर, बीड, जालना, उस्मानाबादसारखे जिल्हे दरवर्षी तेवढ्याच सोशिकपणे पाणीटंचाईला सामोरे जातात, हे थोर आहे. हे सामान्य माणसाचं काम नाही. याला संतत्वच पाहिजे. आपले नेते दर वेळी आपल्याला फसवतात, तरी कित्येक वर्षं तीच घराणी प्रत्येक जिल्ह्यात राज्य करताना दिसतात. राजकारणात पडण्याची इच्छा न होणे ही खरं तर मोहमायेपासून दूर गेल्याची खूण आहे. पण खरंच आपण एक दिवस ज्ञानेश्वरांसारखे समाधी घेणार आहोत का? तुकारामांच्या बाबतीत बोलतात, तसं सो कॉल्ड विमान आपल्याला न्यायला येणार आहे का? असं नाही होणार.सरकारी पैशात पाऊस पडायला विमान आलं नाही.
बाकी सोडा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मागच्या वर्षीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त वाढल्यात, तरी नेतृत्व झोपलेलं आहे का? आणि आपल्यासारखी सामान्य माणसं? आपलं काही देणं-घेणं नाही का? या प्रश्नावर अजूनही म्हणावा तसा आवाज का नसावा? ही नेमकी कोणती विरक्ती आहे? शेतकऱ्यांच्या जीवनावर आपल्याकडे काँग्रेस गवतापेक्षा जास्त वेगाने लिखाण होत असतं. पण त्याने परिस्थितीत कसलाही फरक पडू नये, एवढं ते वांझोटं आहे का? आपल्यात कशानेच फरक का पडत नाही?

सध्या सरकारला ‘स्मार्ट सिटी’चा ध्यास लागला आहे. ती नेमकी कशी करणार, हे अजून कुणाला ठाऊक असेल असं वाटत नाही. पण स्मार्ट सिटी ही आपली महत्त्वाची गरज आहे का? आपली गरज आहे, ‘स्मार्ट व्हिलेज’ची. तरच शहराकडे होणारं स्थलांतर थांबेल. शहरी लोक या बाहेरून येणाऱ्या लोकांना सूज म्हणतात. ही त्यांच्या दृष्टीने असलेली सूज कमी झाली की शहरं आपोआप स्मार्ट दिसतील. पण गावांचं काय? त्यांना स्मार्ट नाही, पण निदान जिवंत तरी ठेवायला पाहिजे की नाही? ग्रामीण भागातले बहुतेक नेते राजकारण गावाचं करतात, आणि राहतात शहरात. यासारखा नालायकपणा सहन करण्याची ताकद गावातल्या लोकांमध्ये कुठून येते?

मराठवाड्यातल्या गावांमध्ये फिरताना अस्वस्थ व्हायला होतं. दुपारच्या वेळी गावात स्मशानशांतता असते. आत्महत्या करण्यात पुरुष आघाडीवर आहेत आणि शेतात राबण्यात स्त्रिया. कुठल्याही शेतात बायकाच राबताना दिसतात. कुठून एवढा आशावाद आहे, या मायमाउल्यांमध्ये? त्यांना पोरगं शिकून ऑफिसर होईल, असं वाटतं. त्यांना भरपूर पीक येईल, असं वाटतं. त्यांना इंदिरा गांधींमुळे गरिबी एका झटक्यात दूर होईल, असं वाटायचं. आज मोदी नक्की काहीतरी चमत्कार करणार, असं वाटतं. या बायकांच्या दोन टक्के तरी आशावाद पुरुषांमध्ये असला पाहिजे, असं सारखं वाटतं. रात्री ढाब्यावरची, दारूच्या गुत्त्यावरची गर्दी तरी कमी होईल.

गावोगावच नव्हे, बीडसारख्या शहरातही पाण्याच्या प्रश्नामुळे लोकांना पाहुणे येऊ नयेत, असं वाटतं. घरातली माणसंसुद्धा आलो चक्कर टाकून, म्हणून बाहेरच जातात लघवी करायला. पाणीच नाही. पूर्वी माणूस घरी आला की घागरभर पाणी ठेवायचे त्याच्यासाठी हातपाय धुवायला. आज ही लक्झरी नशिबात नाही. फार तर ग्लासात पाणी मिळेल. त्यात चूळ भरा, नाहीतर तोंड धुवा, नाहीतर प्या.
मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी गुळण-गुळणी नावाचा प्रकार होता लग्नात. म्हणजे नवरदेव-नवरीसमोर पाणी भरून ठेवलेलं असायचं आणि नवरा-नवरी दोघं एकमेकांच्या अंगावर गुळण्या करायचे. आता नवरा-नवरीला गुळणीचा मूक अभिनय करावा लागेल. पाणी नसल्यामुळे अशा बऱ्याच प्रथांना फाटा मिळतोय. ऐकून धक्का बसेल, पण आता बहुतेक गावांत पाऊस येण्यासाठी नंदीबैलाची मिरवणूक काढत नाहीत. बेडकीचं लग्न लावत नाहीत. ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणून ओरडत नाहीत. लोकांना वाटतं, माणसं शिकली-सवरली म्हणून या प्रथा बंद झाल्या. पण त्यापेक्षा मोठं कारण आहे, लोकांचा विश्वास उडालाय; आभाळावरचा, सरकारवरचा, नशिबावरचा.
मुंबईत सिद्धिविनायकाच्या देवळात उंदराच्या कानात बोलायला अमिताभला प्रॉब्लेम नसतो. कारण त्याने ज्याला-ज्याला आणि जे जे मागितलंय ते बहुतेक वेळा मिळालंय. काँग्रेसकडून नाही तर समाजवादी पक्षाकडून. पण शेतकऱ्याला मात्र कुणाकडे काही मागितलं तरी नकारघंटाच आहे. त्याचा कुठून राहील विश्वास? कशी राहील श्रद्धा? गावात साजरे होणारे धार्मिक उत्सव, यात्रा या स्थानिक नेतेमंडळींचं शक्तिप्रदर्शन आणि त्यांच्या चमच्यांसाठी पैसे काढण्याची सोय यामुळे चालू आहेत. त्यात आता शेतकरी, गावकरी पहिल्यासारखे रमत नाहीत.
तुम्ही बघा, आता नवस फारसे बोलले जात नाहीत. उपास-तापास कमी होत चाललेत. लोकांना हा विज्ञानाचा विजय वाटत असेल; पण हा वाढत चाललेला अविश्वास आहे, गावातल्या लोकांमध्ये. शेतकरी अजूनही पांडुरंगाच्या भरवशावर पेरणी करून वारीला निघतो. येईपर्यंत शेतात चमत्कार झालेला असेल, असं गृहीत धरून. पण विठ्ठला, तू आजकाल असा तलाठ्यासारखा का वागायला लागला रे बाबा? सगळ्या चकरा फुकट घालवशील तर शेतकरी तरी किती वर्षं पायपीट करणार? त्याच्यात त्राण नको का राहायला? गेली कित्येक वर्षं तुझ्याकडून घोर निराशा पदरी पडूनही गावातल्या लोकांच्या तोंडी आजही उठता बसता ‘पांडुरंग पांडुरंग’ हेच नाव असतं. मला हे लोकच आजकाल संत वाटतात. सरकारने एवढी थट्टा मांडलेली असताना, व्यापाऱ्यांनी एवढं फसवलेलं असताना आणि निसर्गराजा उन्हाळ्यात पाऊस पाडत असतानासुद्धा शेतकरी अजून ‘पांडुरंग पांडुरंग’ म्हणतोय. अजून त्याला कमरेवर हात ठेवून उभ्या पांडुरंगावर तरी विश्वास आहे. तो राहायला पाहिजे. शेतकऱ्याला आज जगायला तेवढाच एक आधार आहे!

jarvindas30@gmail.com
(लेखक मराठी सिने-नाट्यसृष्टीतील प्रथितयश
कथा-पटकथाकार तसेच गीतकार आहेत.)