आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचा काय अर्थ बरे ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंप्या गंगीला रोज फेसबुकच्या मेसेज बॉक्समध्ये ‘मी तुझ्या प्रेमात पडलो आहे,’ असा मेसेज टाकायचा. १५ दिवस झाले होते. गंगी कंटाळली. सांगून सांगून दमली. तुला ब्लॉक करेन, असे धमकावूनही झाले. परंतु एवढ्या एका मेसेजच्या पलीकडे गंप्याचा काहीही त्रास नसल्याने तिला गंप्याला अन्फ्रेंड किंवा ब्लॉक करायची इच्छा होत नव्हती. महिना उलटला. गंप्याचा मेसेज न चुकता रोज तिच्या मेसेज बॉक्समध्ये धडकायचा! एक दिवस तिने तिच्या वॉलवर गंप्याचे नाव घेऊन पोस्ट केली... ‘हिंमत असेल तर मला रोज करतो तो मेसेज माझ्या वॉलवर पोस्ट कर. मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार करेन आणि दोन दिवसात तुझ्याशी लग्नही करेन.’
दोन दिवस उलटले. गंप्याचे उत्तर न आलेले पाहून गंगीच्या मैत्रिणींनी गंप्याची उघडउघड खिल्ली उडवायला सुरुवात केली. गंगीच्या पोस्टवरील कॉमेंट्सच्या आकड्याने तीन शतके पार केली. गंप्याचा पत्ता नव्हता. गंगीचा मेसेज बॉक्सही शांत होता! हे पाहून आतापर्यंत शांत असलेली गंगीही गंप्याला उभेआडवे टोमणे मारू लागली. एका मजनूला वठणीवर आणले म्हणून गंगीने दाखवलेल्या बोल्डनेससाठी तिच्या मैत्रिणींनी गंगीला विशेष पुरस्कार देण्याचीही तयारी सुरू केली.
दोन दिवसांनी मात्र गंप्याने तिच्या पोस्टखाली पुन्हा तीच कॉमेंट केली व लिहिले, लग्नाची तयारी करण्यात दोन दिवस बिझी होतो म्हणून कॉमेंटला उशीर झाला. पत्रिका वाटल्या आहेत. दोन दिवसांनी लग्नासाठी तयार राहा.’ त्याने पत्रिकेची स्कॅन कॉपीही कॉमेंटमध्ये पोस्ट केली.
गंगीने उत्तर दिले, ‘खूप आनंद वाटला ऐकून. मी आणि माझ्या घरची मंडळी वाटच पाहत होतो. सगळी तयारी तूच केलीस हे आणखीनच बरं झालं. मला तर तू केव्हाच पसंत होतास रे, परंतु मेसेज बॉक्समध्येच हो म्हटलं असतं तर पारंपरिक पद्धतीने घरच्यांची बोलणी झाली असती. तुझ्या घरच्यांनी कदाचित मला पसंत केलं असतं किंवा नसतंही. तुला मी आवडत असूनही आईवडिलांच्या इच्छेविरुद्ध तू लग्न केलं असतं किंवा नसतंही! तुझ्यासारख्या हुशार आणि होतकरू मुलाला गमवायची रिस्क मला घ्यायची नव्हती! म्हणून जरासं नाटक केलं. भेटू उद्या... मंगल कार्यालयात!”
गंगी रॉक्स... गंप्या शॉक्स!
तात्पर्य : मुलीची जात ही स्वभावतःच चतुर असते. तिच्या बोलण्याचा मथितार्थ सागरापेक्षाही गूढ व खोल असतो! तिच्या रागाचा, रुसण्याचा, प्रेमाचा अर्थ तुम्ही घ्याल तसा असेलच, असे नाही!