आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पकोडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंडू नेहमीप्रमाणेच ऑफिसमधून थकून भागून घरी आला. यमीनेही हातात गरमागरम चहा देऊन सुहास्य वदनाने त्याचे स्वागत केले. चहाचे घुटके घेत बंडूला यमीबद्दल प्रेम आणि आदर दाटून आला. किती कष्ट करते यमी दिवसभर!

‘अहो, सांगा बरं जेवणात काय विशेष करू?’ यमीने विचारले तसे बंडूच्या घशात चहाचा घोट अडकल्यासारखा झाला. यमीबद्दल प्रेम वाटून घेण्यात आपण घाई तर नाही केली? त्याने संशयाने यमीकडे पाहिले. ८-१० दिवसांपासून सातत्याने यमी बंडूला रोज हाच प्रश्न विचारत होती. जेवणात मात्र बंडूने सांगितलेला पदार्थ काही ना काही कारणाने अदृश्य असायचा आणि टीव्हीवरील रेसिपीचे कार्यक्रम पाहून केलेला कुठला तरी भयंकर पदार्थ गिनिपिगसारखा बंडूला प्रेमभरे खाऊ घातला जायचा! अतिशय कष्टाने, परंतु चेहऱ्यावर वरवर आनंद दर्शवत बंडूला तो पदार्थ घशाखाली ढकलावा लागत असे. सौजन्य सप्ताह असतो तसा पती-मस्करी पंधरवडा सुरू आहे की आहे अशी शंका बंडूला येऊ लागली होती. तसे त्याने एकदा यमीला विचारलेही.
‘छे! तसं कसं असेल हो. पण तुम्ही नं काहीही बनवायला सांगता!’

‘असं म्हणून तू मला बनवतेस!’
‘काय हो तुम्ही पण!’ यमीने लाडिकपणे मानेला झटका दिला होता. त्या आठवणीने बंडूच्या चेहऱ्यावर नकळत हास्य पसरलं.
‘मग सांगा नं काय करू जेवणात?’ यमीच्या प्रश्नाने तो पुन्हा भानावर आला. ‘तुला जे वाटेल ते कर,’ बंडूने नकळत म्हटले खरे, पण लगेचच त्याला त्याचा पश्चात्ताप वाटू लागला.
‘बघा बरं..’
‘हं.’
‘थांबा. आलेच.’ यमी वळताच बंडूला येणाऱ्या संकटाची जाणीव झाली. यमीने नक्कीच नेहमीप्रमाणेच काही तरी भयानक बनवले असणार!
‘सांगायला विसरलोच. आज दुपारी ऑफिसमध्ये खूप पोट दुखत होतं,’ यमीची चाहूल लागताच बंडू किंचित कण्हत बोलला.
‘अगं बाई! मग! आता कसं आहे?’ हातातले भांडे टेबलवर ठेवून यमीने काळजीने विचारले.
‘अजूनही अधूनमधून कळा येत आहेतच,’ बंडूने पोटावर हात ठेवला.
‘डॉक्टरकडे जायचं का?’ यमीने पटकन मोबाइल हातात घेतला.
‘नको. होईल ठीक. आज फक्त साधं वरणभात भाजी-पोळी खावं म्हणतो. थोडं ताक असेल तर देशील.’
‘मग हे कोण खाईल?’ यमीने भांड्याकडे इशारा करत म्हटले. ‘तू संपव प्लीज. मला नाही जाणार!’
‘बघा बरं, मग म्हणाल...’
‘नाही. काहीच म्हणणार नाही.’
ठरल्याप्रमाणे बंडूने साधं जेवण घेतलं आणि यमीने त्याच्याच समोर एक एक करून भांड्यातील सर्व पकोडे व्यवस्थित संपवले!
हुश्श! टळली आजची बला. बंडूने सुटकेचा नि:श्वास टाकला तितक्यात समोरून यमी फोनवर बोलत आली.
‘काय टेस्टी बनवलेस गं पकोडे. सगळे मीच खाल्ले. यांचं पोट दुखत होतं नं. नाही गं. मी कित्ती म्हटलं त्यांना एक तरी टेस्ट करा; पण नाही केलं. जाऊ दे. माझी चंगळ झाली त्यामुळे. थँक्स हं गंगे. बाय. गुड नाइट!’ गंगे म्हणताना यमीने बंडूकडे कुटील कटाक्ष टाकला. बंडू रागाने तिच्याकडेच पाहत होता.
‘तू सांगितलं नाहीस पकोडे गंगीने पाठवले आहेत. मला वाटलं...’
‘काय वाटलं? मी केले? म्हणून पोट दुखायचं नाटक केलंत?’ यमी खळखळून हसली.
बिचारा बंडू. होही म्हणता येईना, नाही बोलता येईना!
‘दिसला गं बाई दिसला, मला बघून गालात हसला...’ यमी सहजच गुणगुणू लागली. बंडूला मात्र ‘फसला गं बाई फसला, त्याच्या जाळ्यात तोच फसला...’ असे काहीसे ऐकू आले.
यमी पुन्हा रॉक्ड. बंडू नेहमीप्रमाणेच शॉक्ड!
asawari.in@gmail.com