आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेष्टेचे बुमरँग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंडू व यमीचे नुकतेच लग्न झाले होते. बंडूला यमीची गंमत करायची हुक्की आली. रविवारचा दिवस होता. मूडही चांगला होता. सहजच म्हटल्यासारखे दाखवून तो यमीला म्हणाला, ‘आज फिरायला कुठे जायचे प्रिया? ...सॉरी यमी. प्रियाचे नाव काही तोंडातून जात नाही.’ शेवटचे वाक्य तो हळू परंतु यमीला ऐकू जाईल इतके स्पष्ट बोलला आणि यमीची प्रतिक्रिया पाहू लागला. अपेक्षेप्रमाणेच यमीने त्याच्याकडे रागाने पहिले आणि काही न बोलता तिने बॅग भरायला सुरुवात केली. बॅग भरून झाल्यावर बंडूकडे पाहत ती म्हणाली, “१-२ दिवसात वकील येईल कागदपत्र घेऊन.” आणि तिने बॅग उचलली. तसं बंडूला परिस्थितीचं गांभीर्य कळलं. त्याने यमीला अडवलं आणि आपण गंमत केली असल्याचं तो गयावया करून सांगू लागला. यमी काहीच बोलेना हे पाहून त्याने तिला आमिष दाखवणे सुरू केले. अनेक आमिषं दाखवल्यावर शेवटी तो म्हणाला, “यमे प्लीज, नाराज होऊ नको. बरं चल. तुला सोन्याचा नेकलेस घेऊन देतो.” यमीने नाइलाज झाल्यासारखे दाखवत बॅग खाली ठेवली. दोघे बाहेर गेले, शॉपिंग झाले, नेकलेस घेऊन झाल्यावर बंडू यमीला म्हणाला, “आता तरी राग गेला नं? मी खरंच गंमत केली होती!”

यमी हसून म्हणाली, “मला कुठे राग आला होता?”
“म्हणजे? तुला राग नव्हता आला?
“नाही.”
“मग तू जी बॅग भरायला घेतली होतीस ते?”
“बॅगमध्ये मी माझ्या किमती साड्या अन् ड्रेसेस भरले. खूप दिवसाचे पेंडिंग काम होते ते पूर्ण केले!”
“पण तू तर बाहेर निघाली होतीस?” बंडूने गोंधळून विचारले.
“मी कुठे बाहेर निघाले होते? अहो, भरलेली बॅग जागेवर नाही ठेवणार का?” यमीला हसू आवरेना.
“आणि तो वकील?”
“तो नाही ती वकील. अहो, आपल्या लग्नाचे प्रमाणपत्र नाही बनवायचे का? माझ्या एका वकील मैत्रिणीला सांगितले आहे फॉर्म आणायला. तिच्याबद्दल बोलले.”
“पण तू हे पहिले का नाही सांगितलंस?” बंडूने रागाने विचारले. “फुकट खर्चात पाडलंस.”
“मला खूप मजा आली, विशेषकरून तुम्ही जेव्हा एकावर एक वरचढ बोली लावायला लागलात. म्हटलं चला, या निमित्ताने नेकलेस मिळतोय तर घेऊन टाका. उगाच तुम्हाला कशाला नाराज करा!”
पुन्हा यमी रॉक्स... बंडू शॉक्स!
तात्पर्य : स्त्रिया मुळातच स्मार्ट असतात. त्यांची गंमत करताना दहादा विचार करावा! गंमत उलटू शकते!
आसावरी इंगळे, जामनगर
asawari.in@gmail.com