आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हम बडी धूम से बस शोक मना लेते हैं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कव्वाली हा गायन प्रकार सूफी संगीतातून आला आणि सूफी हा एक अध्यात्मिक पंथ आहे, ज्याला निश्चित अशी वैचारिक बैठक आहे. याच गायन परंपरेची गेल्या कैक दशकांपासून सेवा करणाऱ्या साबरी ब्रदर्स घराण्यातील अमजद साबरी या महान गायकाची गेल्या आठवड्यात कराचीमध्ये कट्टर विचारधारेच्या संस्कृतीरक्षकांकडून हत्या झाली. कव्वालीतून अध्यात्मिक संदेश देणाऱ्या अमजद साबरी यांच्या हत्येमुळे संगीत क्षेत्राचे झालेले नुकसान कधीच भरून निघणारे नाही.

‘कव्वाली' या कलाप्रकाराबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. एक तर ती ‘त्यांची' पद्धत, इथपासून ‘पाकिस्तानी कला' इथपर्यंत! परंतु आजचे भारतीय शास्त्रीय संगीत- अर्थात ख्याल-जेव्हा मध्ययुगीन काळात आकार घेत होते, तेव्हा या प्रक्रियेत ‘कव्वाली'चा महत्त्वाचा वाटा होता.

२२ जून रोजी एक दुर्दैवी घटना घडली. पाकिस्तानमध्ये लोकप्रिय असलेले ‘कव्वाली’ कलाकार अमजद साबरी यांची कराची येथे गोळी मारून हत्या करण्यात आली. एखाद्या कलाकाराची जेव्हा हत्या होते, तेव्हा खरं तर साऱ्या जगाची मान शरमेने खाली जायला हवी! कारण कलाकार हा समाजातील जागरूक संवेदनशीलतेचे प्रतीक असतो. अशी कृत्य केवळ क्रूरताच नाही तर समाजाची अरसिकतादेखील सूचित करतात. साबरी यांच्यावर धार्मिक कट्टरवाद्यांचा राग होता, हे उघडकीस आले आहे. आणि याचे कारण ‘blasphemy’ अर्थात ईश्वराविषयी निंदात्मक बोलणे...

‘कव्वाली’ हा सुफी भक्तिपर संगीताचा एक प्रकार आहे आणि त्याचा इतिहास हा साधारण ६०० ते ७०० वर्षांएवढा जुना आहे. साधारण १३व्या शतकात या प्रदेशात पर्शियन, तुर्की आणि अरबी संगीत परंपरा पोहोचल्या. या सर्व परंपरा इथे असलेल्या परंपरांमध्ये मिश्रित होऊन ‘कव्वाली’ हा कलाप्रकार जन्माला आला, असे मानले जाते. या ‘कव्वाली’चे संघटित स्वरूप निर्माण करण्याचे श्रेय आमिर खुसरो या सुफी संगीतकाराला जाते. आज हा कलाप्रकार जगभर लोकप्रिय होतो आहे आणि त्याचे श्रेय सगळीकडे प्रचार होत असलेल्या सुफी परंपरेला आणि ही कला सादर करणाऱ्या अनेक कलाकारांना जाते आणि म्हणूनच घडलेली ही घटना आपल्याला सुन्न करते, अस्वस्थ करते आणि एकंदर प्रभावित करते.

ज्या पाकिस्तानी कलाकारांनी कव्वालीला एक जागतिक व्यासपीठ मिळवून दिले, त्यात ‘साबरी ब्रदर्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घुलाम फरीद साबरी आणि मकबूल अहमद साबरी यांचे नाव अगदी वरच्या क्रमांकात घेतले जाते. ज्याची हत्या झाली तो अमजद फरीद साबरी हा घुलाम फरीद साबरी यांचा मुलगा. त्याचा ‘गुन्हा’ इतकाच की, एका टीव्ही चॅनेलवरील कव्वालीच्या कार्यक्रमात त्याने जे काही गायलं, त्यामुळे इस्लाम धर्माचा अपमान झाला म्हणे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तानात एकंदर कट्टर विचारधारेचा इस्लाम आपलं डोकं वर काढू लागलाय. या इस्लामला सुफी परंपरा मान्य नाही. सुफी परंपरेतील पुरोगामी विचार त्यांना आवडत नाहीत. काहींना तर कव्वाली हा प्रकार इस्लामच्या विरुद्ध जाणारा वाटतो. अशा या परिस्थितीत सुफी संगीतातून मिळणाऱ्या आनंदाचा कोण विचार करणार? धर्म या संकल्पनेला बाजूला ठेवून या परंपरेतील वैश्विक भावनांचा कोण विचार करणार?

आपल्याकडे कव्वाली म्हटलं तर नुसरत फतेह अली खां हा महान कलाकार सर्वांना परिचित आहे. बॉलीवूडमध्ये गायलेली काही गाणीदेखील त्याला जबाबदार आहेत. परंतु त्यांच्या अनेक कव्वाली इंटरनेटवर ऐकायला आणि पाहायला मिळतात. त्यातले शब्द ऐकले तर धर्माच्या पलीकडे जाऊन एक वैश्विक भावनेचा अंदाज येतो. ‘कोई बोले राम, कोई खुदा’ ही त्यांची प्रसिद्ध कव्वाली होती. अनेकदा ‘सब हैं जब आशिक़ तुम्हारे नाम के, क्यों ये झगडे रहीम और राम के?’ या ओळी असायच्या. असा वैश्विक भाव हा कट्टर विचारधारेच्या लोकांना कसा पटणार? कला ही कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करत नाही आणि त्यामुळे कट्टर विचारधारेचे आणि तिचे कधीच सख्य होऊ शकत नाही. पाकिस्तानात कट्टर इस्लामी विचारधारेचे लोक नेहमीच सुफी विचारधारेच्या लोकांचा द्वेष करीत आले आहेत. ज्या देशाच्या घटनेत धर्माची तरतूद असेल आणि त्याचा आधार घेऊन तो देश उभा असेल, तर अख्ख्या देशावर एक विचारधारा मांडायचा प्रयत्न होणारच.

कोणताही कलाप्रकार हा अनेक प्रवाहांचा आधार घेऊन आपले अस्तित्व धारण करतो. परंतु ‘कव्वाली’ या कलाप्रकाराबद्दल आपल्याकडे अनेक गैरसमज आहेत. एक तर ती ‘त्यांची’ पद्धत, इथपासून ‘पाकिस्तानी कला’ इथपर्यंत! परंतु आजचे भारतीय शास्त्रीय संगीत-अर्थात ख्याल-जेव्हा मध्ययुगीन काळात आकार घेत होते, तेव्हा या प्रक्रियेत ‘कव्वाली’चा महत्त्वाचा वाटा होता. मध्य-आशिया, तुर्कस्थान आणि इराण या देशांमधून जे सांस्कृतिक प्रभाव भारतात आले, त्यांनी ‘कव्वाली’चे संघटित रूप धारण केले. त्या वेळेस इथे ‘प्रबंध गायकी’ अस्तित्वात होती. या दोन प्रकारांची देवाणघेवाण झाली आणि त्यातून जी शैली निर्माण झाली ती म्हणजे ‘ख्याल’. आजदेखील भारतातील काही कलाकार आणि एकंदर पाकिस्तानी शास्त्रीय गायक ज्याप्रकारे गायन करतात, त्यात ‘कव्वाली’चा प्रभाव अगदी विशेष दिसून येतो. भारतीय उपखंडातील सांगीतिक विकासात ‘कव्वाली’चे हे एवढे महत्त्व पाहता आपल्या सर्वांना या दुःखद घटनेत पाकिस्तानी जनतेच्या दुःखात सहभागी व्हायला हवे.

विशेष म्हणजे, ‘साबरी ब्रदर्स’ हे स्वतःची सांगीतिक वंशावळ थेट ‘मियाँ तानसेन’पासून आहे, असे सांगायचे. भारतात अनेक शास्त्रीय संगीत गाणारे आणि वाजविणारे आपल्या घराण्याचे मूळदेखील तानसेनपासून आहे, असे सांगतात आणि त्यामुळे हा समान धागा इथे अधोरेखित होतो.

आता या सगळ्याला नाकारायचे म्हणजे काय? म्हणजे असं की, आपला धर्म हा श्रेष्ठ असून इतर परंपरा त्याला दूषित करत आहेत आणि त्यामुळे त्या आपल्याला मान्य नाहीत, असा विचार करणे. पुढे अशा प्रकारचे विचार बळावतात आणि मग सुरू होते प्रक्रिया, हे इतर प्रवाह संपवायची! त्यातून पुढे धर्म ही जीवनपद्धती म्हणून न मानता त्याला कोणत्या तरी ग्रंथाचा आधार द्यायचा आणि नियमांच्या चौकटीत त्याला बसवायचे, असे प्रयत्न सुरू होतात. कट्टरता वाढते आणि समाज असहिष्णू बनू लागतो. पाकिस्तानात ही प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होत आहे. अशा वेळेस प्रश्न विचारण्याची संधीदेखील तो समाज गमावून बसतो.

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. कलबुर्गी या तीन विचारवंतांची हत्या झाली. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सूर सतत हा असे की, ते हिंदू धर्माच्या विरोधात बोलतात. अशी उदाहरणं आपल्याच देशात आता घडताना दिसतायत आणि आपला पाकिस्तान होऊ लागला आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. साबरी यांना श्रद्धांजली वाहताना या भारतीय उपखंडातील अनेकांगी प्रवाहांचे आपण स्मरण केले पाहिजे. कारण त्यानेच इथली अखंडता टिकून राहील. आणि तोच कोणत्याही समृद्ध जीवनशैलीचा पाया असतो.
gune.aashay@gmail.com
बातम्या आणखी आहेत...