आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियाचे पाईक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात एक विशिष्ट तरुण वर्ग आहे, जो स्वत: निर्माण केलेल्या दुनियेत राहतो. या स्वनिर्मित दुनियेत जे काही चालले आहे ‘तेच’ सा-या जगात सुरू आहे, असा (गैर)समज या वर्गाचा असतो. याचे कारण या वर्गाने ‘बाहेरचे’ जग पाहिलेले नसते. ‘बाहेरचे’ म्हणजे देशाच्या बाहेरचे नव्हे. कारण हा वर्ग देशाबाहेरदेखील आहे. परंतु तिथेदेखील तो आपली ‘दुनिया’ राखून आहे. या वर्गाप्रमाणे विचार केला तर पत्राची जागा ‘इ-मेल’ ने घेतलीय, र्लनिंगची जागा ‘ई-र्लनिंग’ ने घेतलीय, आणि पुस्तकांची जागा ‘इ-बुक्स’ ने घेतलीय. या तथाकथित तंत्रज्ञान प्रेमी वर्गाच्या यादीत अजून एका गोष्टीने भर घातली आहे. ती म्हणजे ‘वर्तमानपत्राची जागा सोशल मीडियाने घेतली आहे’ हा समज!
हा तरुण वर्ग बहुतांश मुंबई आणि पुणे या शहरातील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये आढळतो. आता ही कॉलेज या वर्गामुळे प्रतिष्ठित होतात की कॉलेजमुळे, हा वेगळा मुद्दा झाला! यांची एक विशिष्ट भाषा आहे. इंग्रजी शब्दांनी बरबटलेली वाक्ये आहेत. आपण खूप ‘कूल’ आहोत, याची या वर्गाला पदोपदी जाणीव होत असते. कॉलेजमध्ये लेक्चर खूप ‘बोरिंग’ असतं. कुणी काही बोललं आणि ते पटलं नाही, तर ‘प्लीज’च असं म्हटलं जातं. शिव्यांमध्ये ‘फ’ची बाराखडी उच्चारून या वर्गाने देशी शिव्यांची ‘असभ्यता’ केव्हाच नाहीशी केली आहे. शिवाय यांची ही विशिष्ट भाषा काही वर्तमानपत्रदेखील उचलून धरू लागली आहेत. एका ब-यापैकी प्रतिष्ठित वर्तमानपत्राने त्यांची एक पुरवणी खास या वर्गासाठी आणि या भाषेसाठी समर्पित केली आहे! कुणी त्यांना ‘युथ’ म्हणो किंवा पार ‘यंगिस्तान’ ही उपाधी बहाल करो, पण या वर्गाने आपली एक विशिष्ट वाट धरली आहे.
साधारण दहा- बारा वर्षांपूर्वी ही वाट सुरू झालेली आहे. तेव्हा या वर्गातील मुलं जी शाळेत होती किंवा नुकतीच कॉलेजला जाऊ लागली होती, त्यांच्या हातात दुचाकी वाहनं येऊ लागली होती. काहींनी सायकल हे शाळेत असताना चालवले जाणारे वाहन आहे, अशीदेखील समजूत करून घेतली होती. कॉलेजला कुणाकडे कुठली गाडी आहे, याची चर्चा रंगू लागली होती. मोबाइल हा सर्वांच्या हाती लागला नव्हता. परंतु त्याने वर्गात शिरकाव करायला सुरुवात केली होती. एखाद्या कंपनीच्या मोबाइल असल्यापासून ते बाजारात ब-याच कंपन्यांनी शिरकाव केल्याची ही वाट आहे. या मोबाइलमध्ये नंतर स्मार्टफोन येऊ लागले आणि त्याचा ग्राहक प्रामुख्याने हाच वर्ग ठरला. (सध्या त्याच्या किमती उतरल्या त्या आधीची गोष्ट आहे ही) शिवाय कॉलेजच्या आसपास कॉफी पिण्याच्या नावाने अनेक ‘चकाचक’ दुकाने उघडली जात होती. केक, पेस्ट्री या ‘शॉप्स’मध्ये ब-याच रंगीबेरंगी वातावरणात अनेक पदार्थ विक्रीला ठेवले जाऊ लागले. एकेकाळी ‘बर्गर’ खाणे हे क्वचित आईबाबांबरोबर जाण्याचे ठिकाण होते. परंतु या कालावधीत पिझ्झा वगैरे सारख्या पदार्थांनी ‘आउटलेट्स’मध्ये हजेरी लावली. आणि ही ठिकाणं या तरुण वर्गासाठी ‘हँग-आउट’ ( हादेखील त्यांचा शब्द) म्हणून उदयास आली. खांद्यावर दप्तर, हातात स्मार्टफोन, ‘सी. सी. डी.’मध्ये कॉफी पीत आणि दुचाकी चालवत हा तरुण वर्ग आपले आयुष्य बदलताना पाहात आला आहे. अगदी दहा-बारा वर्षांपूर्वी झालेला हा बदल आहे. पुढे या वर्गाने एक ‘आईट’ मनाशी बाळगून आणि लठ्ठ पगाराची अपेक्षा ठेवून ‘आय. टी.’ क्षेत्रात प्रवेश केला आणि बहुतांश जणांनी शिकायला किंवा नोकरी करायला पार परदेश गाठला. परंतु कालमापन करायचे ठरवले तर लक्षणीय बदल हा गेल्या दहा-बारा वर्षांतच घडला आहे आणि याच काळात प्रथम ‘ओर्कुट’ आणि आता ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’ यांनी भारतात प्रवेश केला. याचेदेखील ग्राहक प्रथम या वर्गाचे प्रतिनिधीच ठरले!
परंतु एका गोष्टीचे आश्चर्य असे वाटते, की या सर्व ‘संतोषजनक’ वाटणा-या गोष्टी घडताना आणि त्या अनुभवता येत असताना या वर्गाचा ‘सोशल मीडिया’वरती इतका नकारार्थी आणि असंतोष दर्शवणारा सूर का असतो? नेमकी कुठली गोष्ट या वर्गाला खुपते? गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत ऐहिक सुखाचा विचार केला तर या वर्गाचा ग्राफ नक्कीच वर चढणारा असेल! परंतु इकडे तर सरकारच्या नावावर शिव्या सोडून दुसरे काहीच दिसत नाही. इतकेच नव्हे तर स्वातंत्र्याच्या काळातील काँग्रेसचे नेते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्व नेत्यांनी (या नेत्यांमध्ये फक्त नेहरू-गांधी घराणे येते) या देशाची वाट लावली, हीच भावना या वर्गातील लोकांमध्ये दिसून येते. आपल्या देशात गेल्या साठ वर्षांत काहीच प्रगती झाली नाही, हीदेखील त्यातली एक भावना असते. अर्थात ही गोष्ट उघड आहे, की हे लोक नरेंद्र मोदी समर्थक आहेत. जस-जसं आपण फेसबुक किंवा ट्विटरमध्ये बुडत जातो, तेवढ्यात जास्त संभ्रमात आपण पडू लागतो. क्युबा, पाकिस्तान किंवा बांगलादेश या देशातील पेट्रोलचे भाव आपल्या देशातल्या भावांशी तोलले जातात आणि आपण कसे भ्रष्ट आहोत (त्या देशात न झालेली प्रगती आणि स्थापन होऊ न शकलेली लोकशाही डोळ्यासमोर न ठेवता) हे ठसवले जाते. ही आणि अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यामुळे आपला देश कसा मागास आहे, याबद्दल लिहिले जाते. परंतु सर्वात जास्त चिंताजनक आणि आश्चर्य वाटणारं काही असेल तर या वर्गाने प्रस्तुत केलेली असोशिकता. असलेल्या मतप्रवाहाच्या विरोधात जर कुणी काही बोलले तर त्यांना देशद्रोही, गद्दार अशा उपाध्या देण्यापासून थेट शिवीगाळ करेपर्यंत ही मंडळी जाऊन पोहोचतात. मग ती व्यक्ती अनुभवाने आणि ज्ञानाने कितीही मोठ्या पातळीवरची असली तरीही तिच्यावर अपशब्दांचा मारा करण्यापर्यंत या मंडळींची मजल जाते. याचे सर्वात उत्तम उदाहरण पाहायला मिळाले ते म्हणजे, डॉ. अमर्त्य सेन यांच्याबद्दलचे! या वर्गातील लोकांना न पटणारे विधान त्यांच्या तोंडून निघाले आणि ते ‘सोशल मीडिया’वर बदनाम ठरले. इतके, की ब-याच तरुणांनी त्यांना देशद्रोही ठरविण्यापासून त्यांचे ‘भारतरत्न’ काढून घ्या, या मागणीपर्यंत अगदी असभ्य भाषेत प्रतिक्रिया दिल्या! त्यानंतर आपल्याला पाहायला मिळाली ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कन्नड लेखक अनंतमूर्ती यांच्याबद्दलची ‘सोशल मीडिया’वर अपशब्दांनी सजवलेली वर्णनं! त्यांनी आपले एक मत व्यक्त केले (ज्यामध्ये थोडी अतिशयोक्ती असेलदेखील); परंतु इंटरनेटवरची तरुणाई आपली असोशिकता दाखवून बसली. या वर्गातील लोकांच्या डोळ्यासमोर ‘नरेंद्र मोदी’ नामक नायक विकासाचा महामेरू म्हणून उभा आहे. परंतु जर उद्या मोदी सत्तेवर आले तर या लोकांना कसा विकास अपेक्षित आहे, हे मात्र कुणीच इथे बोलत नाही. आपल्याला गेल्या दहा-बारा वर्षांत जे सुख अनुभवायला मिळाले, ते आता समाजाच्या इतर लोकांपर्यंत- विशिष्ट तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावे, हीदेखील भावना इथे वाचायला मिळत नाही.
बरं, या तरुण मुलांना रेशनसाठी रांगा लावायची कधी जरूर भासली नाही, ना ते कधी कुठल्या दुष्काळी परिस्थितीतून गेलेत. सिलेंडरसाठीदेखील यांच्यापैकी कुणीही रांग लावली नाही. पण एवढे सारे असताना ही अस्वीकृतपणाची भावना आणि त्यातून निर्माण होणारी असोशिकता याची गंगोत्री कुठे आहे? कदाचित याचे उत्तर त्यांच्या राहणीमानात आणि एकंदर देशात स्थापन होऊ पाहणा-या भांडवलशाही पद्धतीत सापडू शकेल! आणि याला अंकुश घालणे एवढे सोपे नाही.