आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोकादायक 'समाजप्रबोधन'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियाने हल्ली सर्वांचा एक फायदा करून दिलेला आहे. कोणताही संदेश पाठवायचा असेल तर लगेच फेसबुक, ट्विटर किंवा हल्ली ‘व्हॉट्सअ‍ॅप’ करता येतं. इतकेच काय, तर एकाच वेळेस अनेक लोकांना सहभागीही करून घेत येतं. संदेश पसरवण्यासाठी, एवढे तत्पर आणि तेदेखील अनेक लोकांपर्यंत पोहोचणारे असे साधन दुसरे कोणतेही नाही.
परंतु याच तत्परतेचा आणि सर्वांना एकदम सामावून घेण्याच्या या क्षमतेचा वापर हल्ली ‘समाजप्रबोधन’ करण्यासाठी होतो आहे. त्याचं काय आहे, इतकी वर्षे आपली दिशाभूल केली गेली, याची जाणीव गेल्या एक-दोन वर्षांत लोकांना होऊ लागली आहे. आपण शाळा-कॉलेजमध्ये शिकलो जरी असलो, तरीही ते सारे सत्याला धरून नव्हते, असे साक्षात्कार होऊ लागले आहेत. त्यामुळे सध्या या माध्यमांचा उपयोग इतिहास- अर्थात ‘खरा इतिहास’- शिकविण्यासाठी सुरू होऊ लागला आहे. आता हेच बघा ना, अलीकडेच ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून माझ्याकडे संदेश आला. हा संदेश ज्या ग्रुपवरून आला, त्या ग्रुपमध्ये माझे शाळकरी मित्र आहेत; अर्थातच माझ्यासोबत इतिहास शिकलेले. भारतीय राष्‍ट्रीय काँग्रेस या पक्षाचा जन्म 132 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये झाला आणि हा पक्ष स्थापन करण्यात गाजी खान नावाचा एक गृहस्थ आणि ब्रिटिश या दोघांची हातमिळवणी होती, हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? आपण तर शाळेत हेच शिकलो होतो, की काँग्रेस पक्षाचा जन्म हा मुंबईत झाला. परंतु आपले डोळे उघडणारा हा इतिहास शिकवला जातो आहे या सोशल मीडियावर! पुढे त्या गाजी खानच्या एका मुलाने हिंदू धर्म स्वीकारून ते मोतीलाल नेहरू झाले, असे पुढे शिकवण्यात आले आहे. याच मोतीलाल नेहरू यांच्या मुलाने अर्थात जवाहरलाल नेहरू यांनी जिना यांच्याशी स्वातंत्र्यप्राप्तीआधीच करार केला, की ब्रिटिश गेल्यावर एका देशाचा पंतप्रधान तू हो आणि दुस-याचा मी होतो, असे सोशल मीडियावरील इतिहासकार सांगतो. आता या दोन नेत्यांना ब्रिटिश कधी जातील याचा पत्ता कसा लागला, याचे उत्तर अद्याप या इतिहासकाराकडे नाही. परंतु लवकरच ते मिळेल, अशी अपेक्षा आहे.
प्रातिनिधिक म्हणायला हे अत्यंत तथ्यहीन, अर्थहीन उदाहरण पुरेसे नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील, जी पसरविण्यामागे एक विकृत मनोवृत्ती दडलेली आहे. या असल्या संदेशांमध्ये इंदिरा गांधी यांचे वयाच्या लहान वयात कुणाशी तरी ‘अफेअर’ होते किंवा जवाहरलाल नेहरू यांचे ब-याच स्त्रियांशी कसे संबंध होते किंवा राजीव गांधी यांना विमान उडवता येत नसताना त्यांना पायलट कसं केलं, इथपासून सोनिया गांधी या एकेकाळी इटलीमध्ये ‘बार टेंडर’ होत्या आणि आता सा-या देशावर राज्य करत आहेत, इथपर्यंत मौलिक माहिती असते. मात्र या माहितीचा स्रोत काय, हे कधीही लिहिलेलं नसतं! म्हणजे इतिहास समजावणारे, मूळ इतिहास लिहिण्याच्या पद्धतीतच गडबड करतात. मात्र या सर्व उदाहरणांकडे पाहिले की, सध्याच्या तरुणाईबद्दलचे एक चिंताजनक आणि कटू सत्य समोर येत आहे. सोशल मीडिया वापरणारी आणि हे असे संदेश पसरवणारी पिढी ही बहुतांश 18 ते 30 या वयोगटातील आहे. याव्यतिरिक्त 30 ते 45 या वयोगटात येणारे काही मध्यमवयीन लोकदेखील यात सामील आहेत. परंतु सर्वात जास्त टक्केवारी ही तरुण वर्गाची आहे. नुसते तरुण नाही, तर पुढील काही दशकं जी मुलं-मुली या देशाची सेवा करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलणार आहेत, त्या अर्थाने एक ‘जबाबदार तरुण’ वर्ग यांचा या पवित्र कार्यात सहभाग आहे. जबाबदार तरुण अशा अर्थाने; कारण देशात पुढे जे निर्णय घेतले जातील, जगात पुढे ज्या काही घडामोडी होतील, त्या सा-या या तरुण वर्गाला पचवायच्या आहेत. त्यावर विचार करायचा आहे. चर्चा करायची आहे. मत मांडायचे आहे. देशातील पुढील धोरणांचा सर्व नागरिकांना कसा उपयोग होईल, यावरदेखील विचार करायचा आहे. साहजिकच, अशा या तरुण वर्गाकडून व्यापक विचारांची अपेक्षा आहे. इतिहासाकडून प्रेरणा घेऊन, ऐतिहासिक धोरणांवर विचार करून (काही वेळेस संशोधन करून), वर्तमान स्थितीवर चिंतन करून उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारे निर्णय या पिढीकडून अपेक्षित आहेत.
परंतु सत्य परिस्थिती जाणून न घेता, प्रत्यक्ष इतिहास न वाचता आणि काय घडले होते याचे सत्य शोधून काढायची मानसिकता न बाळगता, हे असे संदेश पसरवण्यात ही पिढी धन्यता मानताना दिसते. या पिढीतील मुलांना ऐतिहासिक पुरुषांच्या खासगी जीवनात डोकावून (तेदेखील खरे आहेच का, हे माहीत नसताना) त्यांच्या त्या जीवनाबद्दल मिटक्या मारत चर्चा करावीशी वाटते. यामुळे आपल्या हातून चारित्र्यहनन होते आहे, याची जरासुद्धा जाणीव येथे बघायला मिळत नाही. मुळात एका जबाबदार पिढीकडून अपेक्षा असते, ती समोर असलेल्या विचारांना पचवायची. समोरच्यांचे विचार ऐकून घ्यायची आणि मग आपले मत योग्य मार्गाने व्यक्त करायची. परंतु इथे तर याबाबत असमर्थता दिसून येते. उदा. नेहरू यांच्या कारकीर्दीत भारतात काय बदल घडले, त्यांचे पंतप्रधान म्हणून धोरण काय होते, त्यांच्याकडून आपण चांगलं काय घेऊ शकतो, याची जरासुद्धा जाणीव मनात न ठेवता त्यांचे ‘लेडी माउंटबॅटन’ यांच्याशी ‘लफडे’ कसे होते, याबाबत ब-याच उत्साहाने बोलले जाते.
एकूण काय, तर कोणत्याही व्यक्तीबद्दल एक ठरावीक मत बनवून, त्या व्यक्तीचे विचार अभ्यासणे टाळले जाते. घटना-प्रसंगांची मोडतोड करून स्वत:च्या सोयीचा इतिहास सांगितला जातो. मुख्य म्हणजे, विद्वेषाचे विष पसरवले जाते. ही प्रवृत्ती असहिष्णुता निर्माण करते आणि अशा प्रकारे एक जबाबदार तरुण वर्ग स्थापन होण्याऐवजी निर्माण होतो, एक असहिष्णू नि हिंसक प्रवृत्तीचा समाज! याचीच प्रचिती हल्ली सोशल मीडियावर येऊ लागली आहे. आपण या लोकांना काही प्रश्न विचारायला गेलो, तर त्याचे उत्तर थेट शिव्यांच्या स्वरूपात आपल्याला ऐकायला मिळते. दुस-यांचे मुद्दे ऐकून घ्यायला वेळ नाही, आणि त्यावर नीट विचार मांडून सकारात्मक चर्चा करण्यास त्याहून नाही!
गेल्या काही महिन्यांत राजकारणाच्या राष्‍ट्रीय व्यासपीठावर नरेंद्र मोदी यांचा उदय आणि त्यांच्या नावाने सोशल मीडियावरील ‘ग्रुप’ अथवा ‘पेज’ यावर अशा प्रकारचे मजकूर आढळणे, याला योगायोग मानायला नको. राजकीय मतभेद विचारांनी व्यक्त न करता या अशा मार्गाने व्यक्त करणे, भावी ‘जबाबदार तरुण’ पिढीला रास्त वाटत असेल, तर सहिष्णू भारत इतिहासजमा होण्यास वेळ लागणार नाही!