आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाऊल... क्रीडा दहशतवादाचा! (रसिक, आशिष पेंडसे)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रान्स विरुद्ध जर्मनी या बलाढ्य संघांमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये खेळविण्यात आलेल्या सामन्याकडे संपूर्ण फुटबॉलविश्वाचे लक्ष होते. युरो कप स्पर्धेतील संभाव्य अंतिम सामना म्हणून त्याकडे पाहिले जात होते. आक्रमण-प्रतिआक्रमणांच्या शैलीदार खेळादरम्यान विसाव्या मिनिटाला एक मोठा आवाज झाला. दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने आणि जल्लोशात होते. त्यामुळेच, त्या आवाजाकडे फारसे कोणाचे लक्ष गेले नाही. पण, काही मिनिटांनीच तो जबरदस्त बॉम्बस्फोट असल्याचे निदर्शनास आले आणि एकच गहजब झाला. सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण मैदानावर प्रेक्षकांना पाचारण करून स्टेडियमची कसून तपासणी केली केली. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्सपासून सुरू झालेली ती बॉम्बस्फोटांची मालिका होती.

फुटबॉल हा काही मवाळ खेळ नाही, किंवा जन्टलमेन्स गेम म्हणूनही शेखी मिरवत नाही. किंबहुना, संघर्षपूर्ण लढत झाली नाही, तरच फुटबॉलप्रेमींना चुकल्याचुकल्यासारखे वाटते. स्टेडियमपेक्षाही देशोदेशीच्या समर्थकांनी पब-स्पोर्ट‌्स बारमध्ये झालेली गर्दी आणि आपल्या संघाला हिरिरीने प्रोत्साहन देताना एकमेकांवर केली जाणारी कुरघोडी, ही सामन्याइतकीच प्रेक्षणीय असते. १९९४च्या वर्ल्डकपमध्ये कोलंबियाच्या थॉमस एस्कोबार याने सेल्फगोल केला. त्यानंतर काही महिन्यांनी तो कोलंबियामध्येच एका बारमध्ये आपल्या मित्रांसमवेत होता. त्या वेळी एका टोकाच्या समर्थकाने तूच ना तो सेल्फ गोल करणारा, असे म्हणत त्याच्यावर चक्क गोळ्या झाडल्या. त्यामध्ये एस्कोबार ठार झाला.

‘डर्बी’ सामन्यांसाठी युद्धछावणीच...
सांगायचे तात्पर्य हे, की फुटबॉलच्या सामन्यामुळे टोकाच्या भावनांचे प्रदर्शन होणे स्वाभाविकच मानले जाते. मग ते कट्टर प्रतिस्पर्धांमधील सामने असतील, ज्याला ‘डर्बी’ असे संबोधले जाते, त्या वेळी तर मग संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त असतो. आपल्याकडे जमावबंदीचे कागदोपत्री कलम जारी केले जाते, तसा नव्हे! तर खरोखरीच स्टेडियमला पोलिसांना घेरा पडतो, शहरभर घोडेस्वार पोलिस तैनात असतात, समर्थकांच्या अड्ड्यांवर विशेष नजर असते, इतकेच नव्हे तर हेलिकॉप्टरमधूनदेखील हवाई देखरेख ठेवली जाते.
आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या वेळेस तर हा संघर्ष टोकाचा होते. २००२च्या वर्ल्डकपमध्ये अमेरिका विरुद्ध इराक या सामन्याच्या वेळी संपूर्ण शहरात जणू अघोषित संचारबंदी होती, एवढा बंदोबस्त होता. तसेच, जागतिक स्तरावरील भूराजकीय वर्तुळात तो सामना अतिशय ‘सावध’पणे पाहिला गेला. फॉकलंड बेटांवरून इंग्लंड आणि अर्जेंटिना यांच्यातील संघर्ष जगजाहीर आहे. म्हणूनच, या दोन्ही संघांच्या फुटबॉल सामन्याच्या वेळी राजनैतिक स्तरावरदेखील तणावाचे वातावरण निर्माण होते. आपल्याकडे भारत-पाकिस्तान क्रिकेट लढतीच्या वेळी असलेल्या टेन्शनच्या कित्येक पटीने तणाव अशा संघर्षपूर्ण फुटबॉल सामन्यांच्या वेळी असतो.

संघटित, प्रशिक्षित ‘गुंडगिरी’...
आता आपण हौशी किंवा खेळावर प्रेम करणारे प्रेक्षक, या भावनेतून या संघर्षाचा विचार केला. पण, फुटबॉल सामन्याच्या वेळी जाणीवपूर्वक गोंधळ माजविण्यासाठी चक्क प्रशिक्षित ‘गुंडगिरी’ केली जाते. त्याला ‘हूलिगन्स’ असे संबोधले जाते. आपल्या संघाला समर्थन देण्यासाठीच्या घोषणा (चॅटिंग), ढोल-वाद्ये वाजविण्याचे प्रशिक्षण हौशी क्रीडासमर्थक देतात. पण, ही क्रीडा गुंडगिरी सामन्याला गालबोट लावण्यासाठीच जणू जोपासली जाते.

सामन्यापूर्वी वा सामन्यानंतर संबंधित शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण करणे, प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांना धरून चोपून काढणे, सार्वजनिक ठिकाणी आपल्या संघाची दहशत निर्माण होईल असे वातावरण पसरविणे, अशा पद्धतीने हे ‘हूलिगन्स’ मैदानाबाहेर आपल्या संघासाठी कार्यरत असतात. कधी भूमिगत राहून, तर कधी खुले आम ते अशा गुंडगिरीच्या कारवाया करत असतात. सध्या सुरू असलेल्या युरो कप दरम्यान इंग्लंड, क्रोएशिया, रशिया, वेल्स आदींच्या सामन्यांनंतर झालेल्या गुंडगिरीमुळे या गुंडगिरीची डोकेदुखी संयोजकांना सतावत आहे.

अर्थात, हे ‘हूलिगन्स’ रीतसर शिबिरे घेऊन प्रशिक्षित केले जातात. प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांचे मनोधैर्य कसे खच्ची करायचे, त्यांच्यावर कधी आक्रमण करून निःपात करायचा, सामन्याच्या आदल्या दिवशी कोणती धोरणे स्वीकारायची आणि सामन्याच्या दिवशी काय पवित्रा घ्यायचा, अशा नियोजनबद्ध गुंडगिरीचे कट या शिबिरांमधून शिजतात. समर्थकांच्या विविध घटकांकडून त्यासाठी आवश्यक ती आर्थिक रसददेखील पुरवली जाते. इंग्लिश प्रीमियर लीगशी संबंधित एका जाणकाराने सांगितलेला किस्सा बोलका आहे.

सामन्याच्या आदल्या दिवसापासून काही ‘हूलिगन्स’ प्रतिस्पर्धी संघाचा वेष धारण करून शहरभर सोडले जातात. ते प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांशी मैत्री प्रस्थापित करतात. संधी साधून त्यापैकी अनेक जण हात धुऊन घेतात. इतकेच नव्हे, तर सामन्याला जाण्यासाठी लिफ्ट देतो, अशी बतावणी करून वाटेतच प्रतिस्पर्धी संघाच्या समर्थकांना मारहाण करून सोडून देतात. आणि मग आपल्या संघाची जर्सी परिधान करून मोठ्या ऐटीत स्टेडियममध्ये स्थानापन्न होतात.

या डर्बी सामन्यांपूर्वी संघाच्या समर्थकांच्या बैठका अगदी गुप्तपणे घेतल्या जातात. त्यांच्यातही वर्गवारी असते. अगदी कोअर कमिटीमध्ये खास विश्वासू व अनुभवी समर्थक असतात. त्यानंतर आपल्याकडील निवडणुकीच्या बूथ प्रमुखासारखी प्रत्येक परगण्याची जबाबदारी एका प्रमुखावर देण्यात आलेली असते. अनेकदा, कोअर कमिटीच्या बैठकांवर थेट गुप्तचर यंत्रणांकडूनदेखील बारकाईने लक्ष ठेवले जाते. तसेच, त्यांच्यात आपले खबरे सोडून डर्बी सामन्याच्या वेळेस कोणत्या प्रकारची डोकेदुखी उद‌्भवू शकते, याचा अंदाज सुरक्षा यंत्रणा घेत असतात. अर्थातच, असा सेल्फगोल करत कुणी खबरी सापडलाच, तरी त्याची काही खैर नसते, हे वेगळे सांगण्याची गरजच नाही!
या समर्थकांच्या संघटनांमधील अनेक जण हे संबंधित क्लबचे पगारी नोकर असतात. क्लबच्या बड्या अधिकारीवर्गापेक्षादेखील या समर्थकांच्या नेतेमंडळींना मागणी अधिक असते.

आता आव्हान ‘क्रीडा दहशतवादाचे’
मघाशी म्हटल्याप्रमाणे, भावनिक समर्थक आणि ‘हूलिगन्स’ यांच्याही पलीकडे जात आता आव्हान उभे ठाकले आहे, ते ‘क्रीडा दहशतवादाचे’. कराचीमध्ये न्यूझीलंडच्या कसोटी मालिकेदरम्यान झालेला हल्ला असो, की ऑलिम्पिक दरम्यान खेळाडूंची झालेली अपहरणे असो; येन केन प्रकारेन क्रीडा सामन्यांच्या वेळी दहशत माजवून आपला मुद्दा जगासमोर आणण्याचा डाव या दहशतवादी संघटनांचा असतो. त्यासाठी क्रीडा स्पर्धा हे सॉफ्ट टार्गेट असतात. त्यामध्ये आर्थिक उलाढालीबरोबरच भावनिक गुंतवणूक खूप असते. त्यामुळेच, आपला मुद्दा पुढे रेटण्यासाठी क्रीडा स्पर्धा या दहशतवाद्यांना आता ‘खुणावू’ लागल्या आहेत. स्टेड डी फ्रान्सला गेल्या वर्षी झालेला बॉम्बस्फोट हे त्याचेच प्रतीक होते. केवळ राजनैतिक वा भूराजकीय घटकांपुरता हा क्रीडा दशहतवाद मर्यादित न राहता, आता तो थेट क्रीडाप्रेमींच्या काळजाचा ठाव घेतो आहे.

पाश्चिमात्य देशांत तर या क्रीडा दहशतवादाने अगदी अल्पावधीतच टोक गाठले आहे. रशियासारख्या एकेकाळच्या सुपरपॉवरचे राष्ट्रप्रमुख आणि इतरही देशांचे प्रमुख या क्रीडा स्पर्धांमधील घटनांवरून आक्रमण झाल्यानंतर, त्याविषयी टोकाची वक्तव्ये करू लागल्यानंतर या क्रीडा दहशतवाद्यांचे आयतेच फावते. तापलेल्या या तव्यावर मग ते आपली पोळी भाजून घेतात.

युरो कप स्पर्धेतील रशियन क्रीडा दहशतवाद्यांवर कारवाई करण्यात आली. ते केवळ फुटबॉलप्रेमी वा आपल्या संघाचे समर्थक नसून सराईत किलर आहेत, अशी धक्कादायक माहिती तपासादरम्यान पुढे येत आहे. तसेच, जगभरातील क्रीडा स्पर्धा हेरून त्या ठिकाणी एखाद्या दशहतवादी संघटनेने अतिरेकी घुसवावेत, अशा प्रकारे हे क्रीडा दहशतवादी घुसविण्याचे कामदेखील अशा संघटनांकडून केले जात असल्याचे उघड झाले आहे. तसेच, त्यांना मायदेशांमधील अशा क्रीडा दहशतवादाचे रीतसर प्रशिक्षण दिले जात असल्याचेही उघड झाले आहे. आता लवकरच, अतिरेकी संघटनांच्या प्रशिक्षण केंद्रांप्रमाणेच वर्ल्डकप वा ऑलिम्पिकपूर्वी अशा क्रीडा दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रांवर कारवाया करण्याची काळजी सुरक्षा यंत्रणांना घ्यावी लागणार, असे दिसते! यंदाच्या युरो कप स्पर्धेत अशा क्रीडा दहशतवादाचा आजपर्यंतचा सर्वाधिक धोका दिसून आला आहे. युरोपमधील आर्थिक संकटांबरोबरच जगभरातील भूराजकीय अस्थिरतेच्या वातावरणामुळे ही वेळ ओढवली आहे.

या पार्श्वभूमीवर सध्या फ्रान्समध्ये शेकडोंच्या संख्येने या तथाकथित क्रीडा समर्थकांना मायदेशी पाठविण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तरीही, काही जणांनी गनिमी कावा करून काही स्टेडियममध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला. पण, आता सावध झालेल्या सुरक्षा यंत्रणांनी त्यांना शोधून त्वरित ताब्यात घेतल्याने हानी टळू शकली आहे. आता रिओ ऑलिम्पिकपूर्वी ब्राझीलमधील सुरक्षा यंत्रणांना झिका व्हायरसबरोबरच या क्रीडा दहशतवादाच्या विळख्याचादेखील मुकाबला करावा लागणार आहे.

अमेरिकेत शस्त्रपरवान्यांना मोकळीक असल्याने गोळीबाराच्या घटना डोकेदुखी ठरते आहे. त्याचप्रमाणे, युरोपीय देशांमधील हा क्रीडा दशहतवाद हा आता संपूर्ण क्रीडाविश्वासाठी चिंतेची बाब ठरतो आहे. त्यातच, या क्रीडा दहशतवाद्यांचे लागेबांधे संबंधित देशाच्या भूराजकीय घटकांशी आणि प्रसंगी काही फुटीरतावादी घटकांशीदेखील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या दिशेनेदेखील आता तपासयंत्रणांची पावले उचलली जात आहेत.
पुढे वाचा, भारत... सुदैवाने एक पाऊल मागे....

आशिष पेंडसे
लेखक व्हिवा फुटबॉल मासिकामध्ये कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत.
ashpen6@gmail.com
बातम्या आणखी आहेत...