आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भ्रमणध्वनीचे गारूड की, भूत?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भ्रमणध्वनी हे अतिशय प्रभावी संपर्क माध्यम आहे आणि आजच्या गतिमान युगात तर ती गरजेची बाब आहे, याविषयी कुणाचेही दुमत होणार नाही. मात्र आजकाल युवा पिढी याचा उपयोग करमणुकीचे उपयुक्त साधन वा वेळ घालविण्याचे साधन म्हणून करत असल्याचे दिसते. घरात असताना तर हे कर्णपिशाच्च सतत कानाशी हितगुज करीत असतेच पण, घरातून बाहेर पडले तरी रस्त्यावरून चालताना, बसमध्ये, बसस्टॉपवर यांचा भ्रमणध्वनी कानाची मिठी सोडायला तयार नसतो. संभाषणाव्यतिरिक्त यात संग्रहित केलेली गाणी मान डोलावून ऐकणे हा अनेकांचा छंद असतो. बऱ्याच वेळा यांच्या संगीतप्रेमाचा त्रास आसपासच्या लोकांना होतो, पण यांची समाधी लागली असल्यामुळे ते याची पर्वा करीत नाहीत. भ्रमणध्वनी करणारे कंटाळत नाहीत आणि ऐकणारेही. मात्र याचा त्रास होतो आसपासच्या मंडळींना. या संदर्भातील मी अनुभवलेला एक प्रसंग इथे सांगावासा वाटतो.

आजकाल तरुण पिढीत देवभक्ती, अध्यात्माविषयी प्रेम खूपच वाढले आहे. सोमवारी शंकराला, गुरुवारी दत्ताला आणि शनिवारी मारुतीला नियमाने जाणारे अनेक युवक आहेत. मंदिरामध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांग असते. असाच मी शनिवारी मारुती मंदिरात गेलो होतो. अर्थातच भक्तांची प्रचंड गर्दी होती. एक युवती भ्रमणध्वनीवरून संभाषण करीत बजरंगबलीला प्रदक्षिणा घालत होती. अगदी संकल्पी प्रदक्षिणा पूर्ण होईपर्यंत तिचे संभाषण सुरू होते. इतकेच नव्हे तर पुजाऱ्याकडून तीर्थप्रसाद तिने बोलणे चालू ठेवूनच घेतला. प्रसाद घेऊन ही महिला मंदिराबाहेर पडली. खांदा आणि मान यांच्यामध्ये भ्रमणध्वनी ठेवून आपली दुचाकी चालू केली आणि संभाषणही सुरू ठेवतच ती मार्गक्रमण करू लागली. एका बाजूस झुकल्यामुळे पुढच्या वळणावर तोल जाऊन ती रस्त्यावर पडली. सुदैवाने मागून किंवा पुढून वाहन येत नसल्यामुळे गंभीर दुर्घटना टळली.

रस्त्यावरील लोकांनी तिला, तिच्या गाडीला सावरले आणि तिला रस्त्याच्या कडेला आणून उभे केले. दरम्यान, रस्त्यावर पडलेला आणि अजूनही चालूच असलेला भ्रमणध्वनी तिने चपळाईने उचलला आणि ‘मी तुला नंतर फोन करते,’ असे सांगून मगच मदत करणाऱ्या मंडळींचे आभार मानले. केवढी ही निष्ठा! वाचकहो! तुम्हीच विचार करा. भ्रमणध्वनी हे काम सुकर होण्याचे साधन आहे की, काम नाही म्हणून वेळ काढण्याचे? याचा वापर किती, कसा व कशाकरिता करावा याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. भ्रमणध्वनीवरून संभाषण करत वाहन चालवल्यामुळे गंभीर अपघात झालेत, होत आहेत. आपल्या सर्वांना हे ज्ञात आहे, तरीही ही घातक सवय जात नाही. याचा अतिरिक्त वापर प्रकृतीस अपायकारक आहे. आता वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींनी यासंबंधी हस्तक्षेप करण्याची वेळ आली आहे. याचे प्रकृतीवर किती आणि कसे दुष्परिणाम होतात, हेसुद्धा स्पष्टपणे अधोरेखित केले पाहिजे नपेक्षा ही समस्या गंभीर रूप धारण करेल.
अशोक आफळे, कोल्हापूर
बातम्या आणखी आहेत...