आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाम्या म्हणतात याला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझ्या नामूनं आजपतोर पैसं साठवलं आसतं, तर पाच परसाची हीर भरली असती. पर, त्याच्या हिरीला खालून भोक हाय. या जलमात काय, पुढल्या सात जलमी त्याच्या हिरीत पानी ठरनार नाय... हे बोल होते साळुबाईचे; कवी नामदेव ढसाळ यांच्या आईचे. ढसाळांचं जगणं किती मनस्वी होतं, याचा हा जिताजागता पुरावाच होता.
या उधळमाधळ जगण्यामुळं ढसाळांना पैशाची कायमच ददात असायची. त्यामुळे बेदरकारपणे परंपरेच्या भिंती तोडणारा नामदेव हयातभर दुस-याच्या खिशात हात घालत राहिला. खिसा गरम असला की संगतीच्या कार्यकर्त्यांची चंगळ असायची. दिवसदिवस टॅक्सीने फिरायचा. सकाळी भाड्याने घेतलेली टॅक्सी थेट रात्रीच सोडायचा. वाटेल त्या हॉटेलात वाटेल ते खाऊ घालायचा. पैसे नसले की नुसतं झोपून राहायचा...
एकदा मोतीराम कटारेला त्यानं दादरच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाजवळ कटिंग चहा पाजला. गाडीवाल्याच्या हातात शंभराची नोट टेकवून, रस्ता ओलांडून चालता झाला. कार्यकर्त्यांवर तो इतकं प्रेम करायचा की, ते क्रूर ठरायचं. कार्यकर्त्यांना तो कुठे नेईल, याचा पत्ता नसायचा. त्याचं वागणं, जगणं सारंच बेबंद असायचं. त्याच्या पहिल्यावहिल्या ‘गोलपिठा’ कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ भयानक होतं. गुप्तरोगाच्या दवाखान्याची पावती त्याने त्यासाठी वापरली होती. तो कवितासंग़्रह अनिरुद्ध पुनर्वसू म्हणजे नारायण आठवले यांना त्याने दोनशेत विकला. कशासाठी? झोपडीवर पावसाळ्यात प्लास्टिकचा कागद टाकायचा होता म्हणून. पैशासाठी नामदेवने ब-याच लांड्यालबाड्या केल्या. ज्या ‘मातोश्री’वर दगड फेकले तिथेच नंतर पैसेही मागितले. निवडणुकांत पँथरच्या वाट्याचे तिकीट विकण्याचा उद्योग पैशासाठीच केला. नामदेवनं टॅक्सीही चालवली. मात्र, टॅक्सीत कवितांची वही कायम बरोबर असायची. कुठं कविता वाचन असलं की टॅक्सी साइडला लावून टेचात कविता सादर करायचा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात असाच एकदा गेला. तिथं कोणी संधी देईना. शेवटी कशीबशी कविता सादर केली. वन्समोअरची दाद मिळाली. पण, या पठ्ठ्याने वन्समोअरची संधी घेतली नाही. माणसं न वाचताच हे कविता करताहेत, असं उपस्थित कवींना सुनावून आला... सत्तरीच्या दशकात राज्यात दलित अत्याचारांनी कळस गाठला होता. नामदेवनं भूमिगत राहून संघर्ष करण्याचं ठरवलं होतं; पण अत्याचाराचं क्षेत्र व्यापक असल्यामुळे दलित पँथर या लढाऊ संघटनेचा घाट घातला. आणीबाणीला पँथरचा पाठिंबा होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये नामदेवचं वजन वाढलं. मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी नामदेवला मंत्रिपदाची ऑफर देऊ केली होती. पार्लमेंटरी राजकारणापेक्षा आपल्याला रस्त्यावरचं राजकारण आवडतं, असं म्हणत अशा संधीला लाथाडण्याचं धाडस नामदेवासारखा फकीर करू शकत होता.
नामदेवची बंडखोरी सेंद्रिय होती. सत्यकथेविरोधात बंड म्हणून अनियतकालिकाची चळवळ चालू झाली. त्यात नामदेवही होता. अनियतकालिकवाले आत्यंतिक कलावादी आहेत. सामाजिक, राजकीय भूमिका वर्ज्य मानतात, म्हणून नामदेवनी आपल्याच मित्रांविरोधात बंड पुकारले. स्वत:च विद्रोहीचे अंक काढण्यास सुरुवात केली; पण नामदेवाच्या विद्रोहात निर्व्याजता होती. नामदेवची ‘माण्साने’ ही कविता म्हणजे, विद्रोहाचा कळस. ही कविता विद्रोहीच्या अंकात छापायला बाबूराव बागूलांनी विरोध केला होता. राजा ढालेंच्या आग्रहामुळे ती छापली गेली. पण, बागूलांबद्दलचा नामदेवचा आदर तसूभरही कमी झाला नाही. बागूलांना तो ‘घनघोर युद्धाचे सरसेनापती’ असे संबोधायचा!
ताज हॉटेलच्या गल्लीतील ‘बडे मियाँ, छोटे मियाँ’ हे नामदेवच्या आवडीचं ठिकाण. रात्री-अपरात्री नामदेवची गाडी तिथे धडकायची. कबाबवर सारे ताव मारायचे. ‘डल्ली’ला अभिजनवर्गात
मान्यता मिळवून देण्यात नामदेवच कारणीभूत. वडील कत्तलखान्यात ढोरं उचलायचे.त्यामुळे तेच घरी यायचं. बाप वारल्यावर त्यांच्या दहाव्याला नामदेवनं बिर्याणीच ठेवली होती. तरुणपणात नामदेवला खाण्याचं वेड होतं; उतारवयात दुस-यांना खाऊ घालण्याचं लागलं.
त्याला कुत्र्याचं भारी वेड होतं. ‘गजल’ आणि ‘ठुमरी’ अशा दोन पॉमेरॅनियन जातीच्या कुत्र्या त्याच्याकडे होत्या. त्यांना झालेली पिले, तो आपल्या आवडत्या माणसांना भेट द्यायचा. कित्येकदा दौ-यात त्याच्या सोबत कुत्री असायची. महागड्या हॉटेलातलं जेवण मागवायचा, पहिल्यांदा कुत्र्यांना; मग कार्यकर्त्यांना. त्यानंतर स्वत: खायचा. त्याच्या अशा वागण्याने कोणी म्हणायचे, विषप्रयोग करू नये म्हणून नामदेव असं करतोय. कोणी म्हणे, घरातली पहिली भाकर कुत्र्याला, अशी त्याच्या आजीची शिकवण आहे.... नामदेव दोन जगांत एकाच वेळी वावरायचा. त्यामुळे त्याच्यावर अनेक आरोप झाले. संशय घेतले गेले. त्याला गद्दार, पळपुट्या ठरवले; पण त्याचं वागणं बदललं नाही. अर्धा समाजवादी असूनही त्यानं आणीबाणीला पाठिंबा दिला. मराठवाडा विद्यापीठ नामांतराला विरोध करून सर्वांना उरावर घेतले.
हिजडे आणि वेश्यांचा देशातला पहिला मोर्चा काढण्याचा मान नामूकडेच जातो. सावकाराच्या पिळवणुकीला विरोध करण्यासाठी 1971मध्ये त्याने हा मोर्चा काढला. या मोर्च्यात लेखक, चित्रकार यांना सामील केले. पण नामदेव बेशिस्तीचा महामेरू होता. त्यामुळे कविता सोडता त्याचं एकही काम पूर्णत्वास गेलं नाही. अर्थात, त्याची त्याला तमा नव्हती.
पँथरचा तो संस्थापक होता. पँथर नावाची महागडी सिगारेट कुलाब्यात मिळत असे. हजारात दहा सिगारेटी मिळायच्या. पँथर नाव आहे, म्हणून त्या ओढायचा. सिगारेट संपल्याचं घरी कळायचं; तशीच गाडी कुलाब्याकडे वळवायचा. पेट्रोल, खर्च, काळवेळ असली गणितं कधी त्याच्या गावी नव्हती. त्याला कुठलंही व्यसन वर्ज्य नव्हतं. पण, मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्धर आजाराचं निदान झालं, तसं त्यानं दारूच्या एका थेंबालाही शिवलं नाही. किती वर्षे, 22 वर्षे! पण बरोबरच्यांना मात्र पाजायचा. शेवटी शेवटी तो म्हणायचा, दुस-यांना पाजून हल्ली मलाच चढते.
अंडरवर्ल्डचे नामचीन अरुण गवळी आणि हाजी मस्तानशी त्याचा दोस्ताना होता. नामदेवनं कामाठीपु-यात एकदा दाऊद इब्राहिमला चोपला होता, म्हणे. एका पत्रकार मित्राला, त्यानं असंच एकदा गाडीत कोंबलं आणि दगडी चाळीत नेलं. तिथल्या बंदुका त्याच्या हातात दिल्या. नामदेव आणि भाई संगारेला अरुण गवळी दरवर्षी नेमाने कपडे घ्यायचा म्हणे. बंडखोरी करणारी माणसं नामदेवला परमप्रिय होती. ज्या मुली आंतरजातीय विवाह करायच्या, त्यांना तो फारच सन्मान द्यायचा. कार्यकर्त्यांना टोपण नावानं हाका मारायची त्याची सवय होती. अपना शागीर्द, गाववाला क्रांतिकारक, कोलाज अशी त्याने अनेकांना नावे बहाल केली होती... रा. सु. गवई आणि दादासाहेब रुपवते अशा बड्या नेत्यांकडे सत्तरीच्या दशकात मोटारी होत्या. दलित पँथरच्या चळवळीत स्वत:च्या गाडीत फिरणारा नामदेव पहिला नेता ठरला. टोयाटोपासून इनोव्हापर्यंतच्या सगळ्या गाड्या त्यानं फिरवल्या. मनमौजी कपडे आणि दिमतीला उंची सिगार, असा त्याचा रुबाबदार वावर असायचा. कशाचीही पर्वा न करणारा बेडर, असा त्याचा पिंड होता. अंगावरचे रंगीबेरंगी कपडे हे त्या स्वभावाचे निदर्शक होते. वेळापत्रक, नियोजन, संघटनात्मक शिस्त, भविष्याची तरतूद या गोष्टी नामदेवच्या वळचणीला नव्हत्या. तो कोणाला वेळेवर भेटायचा नाही. आपल्या सोयीप्रमाणे तो इतरांकडे धडकायचा. खिशातले पैसे संपले, तरी उद्याची चिंता नसायची. पैसे कुठं जातात; उद्याचे उद्या बघू, असं तो म्हणायचा.
ग्रंथाच्या पानाच्या संख्येवर लेखकाचं थोरपणं नसतं, असं त्याचं मत होतं. म्हणून अनेकांना इंटलेक्चुअल म्हणून त्यानं नाकारलं. आपली कविता मात्र कोणत्याही कसोट्यांवर घासून बघा, असं त्याचं आव्हान होतं. कवीपणाचा प्रचंड अभिमान बाळगणारा नामदेव ‘आपून आजून खरी कविता लिहिलेली नाही’ असं सांगायचा. आपल्याला अशी कविता लिहायची आहे, त्या कवितेनं वाचणा-याचा अख्खा दिवस खायला पाहिजे, असं म्हणायचा.
1970 ते 75 ही पाच वर्षेच नामदेवची खरी. इतर वर्षे त्याने केवळ संधिसाधूपणा केला, असाही त्याच्यावर आरोप झाला; पण नामदेव त्याच्या मस्तीत वागला, जगला. अनेकांची आयमाय काढली. शंकराचार्यांना जोड्यानं मारलं, मंत्रालयावर सोडा वॉटरच्या बाटल्या फेकल्या, भातात दारू ओरपून खाल्ली, कामाठीपु-यात शिंदळकी केली, मित्रांवर खोटेनाटे आरोप केले, घरातल्यांची-बायको-मुलाची, इव्हन स्वत:च्या शरीराची थोडीशीही तमा बाळगली नाही. पण, कवितेतली नामदेवची उडी मात्र चुकली नाही.
कवितेत नामदेव मांजरासारखा राहिला. उलटं फेका, सुलटं फेका; तो पायावरच पडणार. भीमशक्ती-शिवशक्तीच्या वळचणीला नेली; पण जाती अन् शोषणाला बगल नाही दिली. कवीपणाबरोबर येणा-या जगाच्या जबाबदारीचं भान ठेवलं. जातीचा प्रश्न पृष्ठभागावर आणला. संघर्ष आणि सर्जनशीलतेचा संबंध प्रस्थापित केला. कविता त्याचं राजकीय हत्यार होतं. म्हणून तो म्हणायचा, माझी एक कविता म्हणजे एक मोर्चा आहे...