आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद जोशी: दोन रूपे, दोन दृष्टिकोन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अंतर्नाद’ मासिकाचे संपादक भानू काळे यांचा लेखाच्या िनमित्ताने शरद जोशी यांच्याशी परिचय झाला. दोघेही पुण्यात असल्याने हा परिचय उत्तरोत्तर वाढत गेला. ‘जोशी आिण त्यांनी उभारलेली शेतकरी चळवळ हा अभूतपूर्व झंझावात होता. या झंझावाताची बुद्धिजीवींच्या वतुर्ळात म्हणावी तशी दखल घेतली नाही. जोशी यांचं समग्र चरित्रही नाही’, हे काळे यांच्या लक्षात आलं. 

२०१२मध्ये लेखकाने शेतकरी संघटनेचा समग्र इतिहास असलेलं जोशी यांचं चरित्र लििहण्याचं ठरवलं. चरित्राचा आराखडा जोशी यांच्याशी चर्चा करून पक्का झाला. शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडील साधने दिली. स्वत: जोशींनी अाठवणी सांगण्यासाठी लेखकाला भरपूर वेळ िदला. पाच वर्षांच्या संशोधनानंतर ‘अंगारवाटा... शोध शरद जोशींचा’ हे समग्र चरित्र तयार झालं. पुणे येथील ‘उर्मी प्रकाशन’ने २०१६मध्ये श्याम देशपांडे यांचं मुखपृष्ठ असलेला देखणा ग्रंथ प्रकाशित केला. पण, चरित्राचा नायक त्याची कहाणी प्रकाशित होण्यापूर्वी जग सोडून गेला होता. म्हटले तर हा ग्रंथ चरित्र आहे, म्हटले तर शेतकरी संघटनेच्या इतिहासाचं दस्तऐवजीकरण आहे. 

यात शरद जोशी यांची जीवनकहाणी आहे. त्यांनी मांडलेल्या ‘इंडिया व्हर्सेस भारत’, ‘उणे सबसीडी’ या राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या चर्चेचा नूर पालवणाऱ्या संकल्पना विस्ताराने आहेत. त्यांनी मांडलेले शेतीचे अर्थशास्त्र आहे. कांदा, कापूस, ऊस, तंबाखू, दूध आंदोलने आहेत. जोशी यांचे काही विवेचन येथे जसेच्या तसे आहे. उदा.‘शेतकरी आत्महत्यांची मीमांसा’. त्यामुळे चरित्राला संदर्भ ग्रंथाचे मूल्य प्राप्त झाले आहे. चरित्रात जोशींसमवेत त्यांचे सहकारी भेटतात. निपाणीचे सुभाष जोशी, समीक्षक वा. ल. कुलकर्णी, वर्ध्याच्या सरोज काशीकर, पत्रकार विनय हर्डीकर, शेतकरी संघटकचे सुरशेचंद्र म्हात्रे अशा असंख्य कार्यकर्त्यांचे दर्शन घडते. आंदोलनापूर्वी शेतमालाचा जोशी शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करत, त्यांची साधी राहणी, संस्कृतची त्यांची आवड, साॅमरसेट माॅमकडून त्यांनी घेतलेला ‘सीनीनिमझ’ अादी त्यांच्या स्वभावाचे कंगोरे शोधण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.   

लेखकाने चरित्रात इतिहासलेखनाची शिस्त पाळली आहे. जोशी यांची ग्रंथसंपदा, संघटनेची मुखपत्रे, अहवाल, ठराव, प्रकाशित लेख यांचा साधनं म्हणून वापर केलाय. संघटनेचे कार्यकर्ते, सहकारी, जोशी कुटुंबीय यांच्या मुलाखतीही घेतल्या आहेत. दी ट्रिब्युन, इंडियन एक्स्प्रेस, डेबोनेर यांमधील लेखांचे संदर्भ जागोजागी आहेत. त्यामुळे हे चरित्र वस्तुनिष्ठ बनले आहे.  ५१० पानांच्या या महाचरित्रात १७ प्रकरणे आहेत. मध्येमध्ये दुर्मिळ छायाचित्रेही आहेत. जोशी यांचा जीवनपट, संघटनेची अधिवेशने, ग्रंथसंपदा, हुतात्मे, संघटनेची शपथ अशी चार परिशिष्टे आहेत. परिशिष्टांमुळे अभ्यासकांची मोठीच सोय झाली आहे. चाकणचे कांदा आंदोलन, निफाडचे ऊस आंदोलन, निपाणीचे तंबाखू आंदोलन, िवदर्भातले कापूस आंदोलन याबाबत सविस्तर माहिती आहे. 

लेखक आंदाेलनाचा वृत्तांत सांगून थांबत नाही, तर त्याच्याही पुढे जाऊन शेतमालाचा इतिहास, दर पडण्याची कारणं याबाबत रसाळ हकीकत सांगतो. त्यामुळं आंदोलनामागच्या प्रश्नाचे समग्र भान वाचकाला प्राप्त होतं. यातले ‘राजकारणाच्या पटावर’ प्रकरण लक्षवेधी ठरले आहे. जोशी यांच्या राजकारणातील अपयशाचा धांडोळा या प्रकरणात आहे. ‘शेतकरी संघटनेच्या उग्र आंदोलनाने विदर्भ, मराठवाड्यात काँग्रेस डॅमेज झाली, त्यामुळे या भागात शिवसेनेने हातपाय पसरले’, असे निरीक्षण लेखकाने येथे नोंदवले आहे. ‘सहकारी आणि टीकाकार’ हे प्रकरणही भन्नाट आहे. जोशी यांच्या कार्यकर्त्यांच्या गोतावळ्याचे दर्शन यात घडते. तसेच द. ना. धनागरे, विद्युत भागवत, रामचंद्र गुहा या शेतकरी संघटनेच्या टीकाकारांनाही लेखकाने जागा िदली आहे.

लेखक यात जोशी यांचाही झाडा घेतो. ‘माध्यमांपासून दूर राहणे, शरद पवारांच्या ‘पुलोद’ला िदलेला पाठिंबा, राजकारण प्रवेशाची चुकलेली वेळ आिण शेतमाल िकमतीभोवती आंदाेलन फिरणं या जोशी यांच्या चुकांवर लेखकाने बोट ठेवले आहे.   एकंदर  हे चरित्र म्हणजे शरद जोशी यांचं व्यामिश्र व्यक्तिमत्त्व, अस्थिर कौंटुिबक जीवन, भारतीय टपाल सेवेतील नोकरी,  स्वित्झर्लंंडमधील आठ वर्षे, शेतकरी संघटनेची वाटचाल, सांजपर्वात अध्यात्माकडे झुकलेला ओढा.. यांचा शोध आहे. चाकणपासून स्वित्झर्लंडपर्यंत शेकडो जणांना भेटून िलहिलेले हे चरित्र एका देदीप्यमान कालखंडाचे दस्तऐवजीकरण आहे. संस्था, संघटनांचे पाठबळ नसताना भानू काळे यांनी पाच वर्षे खपून हा जो ग्रंथराज सिद्ध केला आहे, त्याला तोड नाही. जोशी यांनी लेखकाला ‘शेतकरी संघटनेचे राजवाडे’ (इतिहासाचार्य वि. का. राजवाडे) म्हटले होते. या चरित्राला दस्तऐवजांचा आधार देऊन लेखकाने जी िवश्वासार्हता प्राप्त करून िदली आहे, ती बघता जोशी यांनी लेखकाला ‘राजवाडे’ म्हणून दिलेली उपाधी सार्थ ठरल्याचे वाटते.

लयबद्ध चरित्र-चित्र
मुक्त पत्रकार असलेल्या वसुंधरा काशीकर-भागवत यांना शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांचा १८ वर्षे सहवास लाभला. दाेघांंमध्ये अनेकदा गप्पांची मैफल रंगली. फोनवर, पत्राद्वारे असंख्य संवाद, चर्चा झाल्या. त्याचं मूर्त स्वरूप म्हणजे, ‘शरद जोशी…. शोध अस्वस्थ कल्लोळाचा’ हे राजहंस प्रकाशनाचे पुस्तक होय. जोशी यांच्या िनधनाची बातमी येते, अन् लेखिकेच्या मतांत अनंत आठवणी उभ्या राहतात. त्या जशाच्या तशा या पुस्तकात मांडल्या आहेत.

 हे पुस्तक जोशी यांचं चरित्र नाही, की संघटनेचा इतिहासही नाही. लेखिका आणि भाऊ आल्हाद यांचा जोशींसमवेत झालेला तरल असा संवाद आहे. यातून जोशी व्यक्ती म्हणून काय होते, हे उमगतं. जोशी यांच्या मनाचा ठाव येतो. जोशी मिश्कील होते, विनोद, उपहास, तिरकसपणा त्यांना आवडायचा. तर्कप्रामाण्यवादी जोशी यांच्या विचारांत सूर्यप्रकाशाइतकी कशी स्पष्टता होती, त्या सर्व बाबी लेखिकेनं यात मांडल्या आहेत. 

‘साहित्य, भाषा आिण शरद जोशी’ हे प्रकरण वाचनीय आहे. जोशी या आंदोलक नेत्याचा भाषा हा अत्यंत जिव्हाळ्याचा िवषय होता, ते तुच्छतावादी होते, संख्याशास्त्राच्या या विद्वानाला मराठीतल्या अनेक वृत्तबद्ध कविता तोंडपाठ हाेत्या. जोशी यांची ही दुसरी बाजू लेखिका न कचरता सांगते. जोशी यांच्या पत्नी लीलाताई, त्यांच्या दोघी बहिणी सिंधू आणि नमा यांच्यामध्ये असलेल्या नात्यांचे पदर लेखिका उलगडून दाखवते. लेखिकेचं पाश्चात्त्य साहित्याबरोबरच सामािजक शास्त्राचं वाचन दांडगं आहे. त्यामुळे या दोघांची मैफल आपल्याला हेमिंग्वे, व्हिसेंट गॅाग, अॅडम स्मिथ, साॅमरसेट माॅम, रिकार्डो, ओशो, वुडहाॅऊस यांच्यापर्यंत घेऊन जाते. 

लेखिकेला शायरी आणि गजलची खूप आवड आहे. जोशी यांच्या मनाची उकल करताना लेखिकेने जागोजागी भाऊसाहेब पाटणकर, साहीर लुधियानवी, िनदा फाजली यांच्या रचनांचा वापर केला आहे. त्यामुळे लेखनाला एक लय प्राप्त झाली आहे. कोणत्याही पानावरून वाचन सुरू करा, तुमचा जोशी यांच्याशी सहज संवाद घडतो. गप्पांच्या या मैफलीत चिंब झाल्याचा अनुभव िमळतो. दोघांच्या व्यासंगानं आणि तर्कशुद्ध विश्लेषणानं वाचकही समृद्ध हाेतो. अर्थात, ही किमया लेखिकेच्या शैलीबाज लेखनाची आहे. आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षांत जोशी बदलले होते. कट्टर तर्कवादी असलेला हा माणूस संध्या करू लागला, शेंडी ठेवली, गुरू केला, शंकराचार्य वाचायला घेतला, नर्मदा परिक्रमा केली. विज्ञानवादी जोशी श्रद्धावादी का बरे होतात, याचे विश्लेषण या पुस्तकात वाचण्यासारखे आहे.

जोशी यांची वीस एक ग्रंथसंपदा आहे, मात्र त्यात कुठेही व्यक्त न झालेली जोशी यांची शेकडो निरीक्षणे लेखिकेने यात सांगितली आहेत. या दोहोंच्या मैफलीत न्हाऊन िनघाल्यावर वाचक जोशी यांच्या ‘अंगारमळा’ आणि ‘जग बदलणारी पुस्तके’ यांचा शोध न घेईल तरच नवल. गप्पांच्या या मैफलीत जोशी यांच्या तत्त्वज्ञानाचं, चळवळीचं सार पुढे आणण्यास लेखिका विसरत नाही. ‘स्वातंत्र्य’ हा शेतकरी आंदोलनाचा आत्मा होता. त्याचा संबंध शेतमालाच्या योग्य दराशी आहे, असंही ती बजावते. तसंच जोशी यांचा स्वतंत्रतावाद भांडवलवादी नाही, तर उद्योजकतावादी असल्याचंही स्पष्ट करते. 

मृत्यूपूर्वी लेखिकेस जोशी म्हणाले होते, ‘आत्मा असेल तर मृत्यूनंतर तुझ्याशी मी नक्की संवाद साधेन बघ.’ आत्म्याच्या त्या संवादाचं राहू द्या. प्रत्यक्ष जोशी यांच्याशी केव्हाही संवाद साधण्याचा मार्ग आपल्याला या पुस्तकानं उपलब्ध करून िदलाय...

१) अंगारवाटा... शोध शरद जोशींचा
लेखक :
भानू काळे
प्रकाशन : उर्मी प्रकाशन, पुणे
पहिली आवृत्ती : ५ डिसेंबर २०१६
पाने : ५१०, किंमत : ‌~ ५००/-
 
२) शरद जोशी… शोध अस्वस्थ कल्लोळाचा!
लेखिका : वसुंधरा काशीकर-भागवत
प्रकाशन : राजहंस प्रकाशन, पुणे
पहिली आवृत्ती : २०१६
पाने : १५३ , किंमत : ~ २००/-
 
- अशोक अडसूळ
adsul.ashok@gmail.com
बातम्या आणखी आहेत...