आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा भोवताल मला चिमटे घेतो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'गेली पंचवीस वर्षे मी सातत्याने लिहीत आलोय.
माझा भोवताल मला सतत चिमटे घेत राहतो.
या चिमट्यांनी मी अस्वस्थ होतो. ही अस्वस्थता
मला शब्दांत पकडता येते. त्याची ‘कविता’ होते.
‘मी’ म्हणजेच ‘माझी कविता’ आहे आणि
‘माझी कविता’ म्हणजेच ‘मी’ आहे.
जगणे आणि लिहिणे मी वेगळे मानत नाही.'


मी खर्‍या अर्थाने नव्वदोत्तर दशकात लिहायला लागलो. हा काळ फार विचित्र होता. त्यात माझ्या पाठीमागे एक मोठे शून्य होते. मी ज्या कुटुंबात जन्माला आलो, त्या कुटुंबाला शिक्षणाचा, कलेचा अथवा श्रीमंतीचा असा कुठलाही वारसा नव्हता. होती फक्त हुरहुर आणि प्रचंड घुसमट. ज्या प्रतिकूल परिस्थितीत मी जगलो, वाढलो, घडलो; त्या परिस्थितीने मला अंतर्मुख केले. विचारी बनवले. हवे तर अकाली प्रौढ केले म्हणा! वयापेक्षा माझी समज वाढत गेली. पुढे मी स्वत:ला इतरांपासून तोडून घेण्याइतपत समर्थ झालो. तेव्हाच केव्हा तरी हुंकार आलेत आणि त्यांचे शब्द झाले.

माझा पहिला कवितासंग्रह ‘मौनातील पडझड’ प्रकाशित होण्याअगोदर त्या काळातील सर्व वाङ्मयीन दर्जेदार अंकातून दहा-पंधरा वर्षे सतत मी कवितालेखन करत होतो. मुक्तछंदालाही लय असते आणि वाचताना ती लक्षात येते. ही लय मला सापडली. पुढे माझ्या जाणिवा प्रगल्भ झाल्यावर अस्सल कविता लिहिणे हे फार जीवघेणे आणि त्रासाचे काम असते, हे ध्यानात आल्यावर मला बहुप्रसवतेची बाधा झाली नाही. समकालातील एखादा अनुभव, एखादी घटना अथवा प्रसंग जेव्हा तीव्र दंश करतो, तेव्हा आज जे काही पेटलेलं असतं ते कागदावर पूर्णपणे उतरतच नाही! कागदावर उमटलेली आतल्या घुसमटीची फक्त पडझडच असते, पडछाया असते. जे सांगायचे ते बरेचसे आतमध्येच राहून जाते. अशी अस्वस्थता अनुभवल्यामुळे अनेकदा शब्दांशी खेळायचे धाडस होत नाही.

सामाजिक बांधिलकी मानणार्‍यांपैकी मी आहे. माणसाला यंत्रवत करणार्‍या या काळात जगण्याच्या पातळीवर शोषणाच्या विविध तºहांनी ग्रासलेला, पिडलेला, पिळला गेलेला सामान्य माणूस हा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू आहे. मी जे जगतो, अनुभवतो, पाहतो, ऐकतो आणि वाचतो, त्याचा भलाबुरा परिणाम माझ्या मनावर होतो. मग माझ्या आत काही खदखद उकळू लागते. ते कागदावर उतरते. ही प्रतिक्रिया उत्स्फूर्त असते. ही माझी एकट्याची प्रतिक्रिया नसते, तर माझ्या मानसिकतेच्या एका मोठ्या समूहाची ती प्रतिक्रिया असते. ही प्रतिक्रिया एक उद््गार होऊन येते. कवीला सभोवतालचे वर्तमान आणि समष्टीचे भान असावे लागते. प्रत्येक काळात, प्रत्येक क्षेत्रात होणार्‍या उलथापालथींचे प्रतिबिंब कवितेत प्रतीत व्हायला हवे. केवळ शब्दजन्य अथवा आत्मनिष्ठ कविता समूहाच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. आपण जगतो आहोत, त्या काळावर बाजार संस्कृतीने आक्रमण केलेले आहे. एवढेच नव्हे, तर माणसांच्या भावनांचे आणि माणसातील माणूसपणाचेही बाजारीकरण सुरू आहे. विविध आमिषे दाखवून माणसाचे ग्राहकीकरण केले जातेय. शहरी भागात ही व्यवस्था जितकी सक्रिय आहे, तितकीच ग्रामीण भागातही सक्रिय आहे. चंगळवादाला खतपाणी घातले जातेय. मूल्ये बदलताहेत, विचार बदलताहेत, एवढेच नव्हे तर माध्यमे भाषाही बदलताहेत. मूल्यांची जागा पैसा घेतो आहे. अशा काळात आपली संवेदनशीलता टिकवून ठेवणे किंवा संवेदनशील माणसाला संवेदनशील राहणे ही फार कठीण गोष्ट आहे. माणसाचे संवेदनशील असणे, त्याचे अंतर्मुख होणे, स्वत:बरोबरच सभोवतालचा विचार करणे, हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. कवी हादेखील समाजाचाच एक घटक आहे. या कोलाहलातून तो स्वत:ला वेगळं काढू शकत नाही. त्याच्या अंत:करणावर या अमानुष बाबींचा आघात होणे म्हणजे तो सजग असणे होय.

कुठल्याही काळात, कुठल्याही व्यवस्थेच्या तळाशी ‘शोषण’ ही प्रक्रिया सक्रिय असते. त्यामुळे माणसाच्या दु:खाच्या मुळाशी जाऊन त्यावर सतत घाव घालत राहणे, जे जे अनिष्ट आहे, माणसातील माणूसपणाला कलंकित करणारे आहे, त्याच्याविरुद्ध दंड थोपटून कवी उभा राहिला पाहिजे. समाजातील शेवटच्या माणसाचे दु:ख तेच कवीचे दु:ख असले पाहिजे. माणसातील माणूसपण उन्नत करणारी कविताच समाजाला, राष्ट्राला पुढे नेऊ शकते. एखादी कविता लिहिणे म्हणजे व्यवस्थेखाली दबलेल्या हुंकारांचे पीळ सैल करत जाणे असते.

साहित्य विचारांचे वाहक म्हटले तर एका मोठ्या समूहाचा उद्‍गार होऊन पुढे आले पाहिजे. शोषणमुक्त समाजाचा, समतेचा विचार घेऊन आलेले माणूसकेंद्री साहित्य कुठल्याही काळात परिवर्तनाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. आधुनिक जीवनशैलीने झपाटलेला, फॅशनेबल फ्रस्टेÑशन आणून लेखन करणार्‍यांचा एक वर्ग नव्वदोत्तर काळात सक्रिय आहे. त्यांना इथल्या लोकसमूहाच्या सुखदु:खांशी, दमण आणि शोषण प्रक्रियेशी अजिबात देणेघेणे नाही. दुर्दैवाने कुठलीही भूमिका न घेता प्रसवलेले असे व्यक्तिकेंद्री लेखन पॅम्फलेटसारखे अंगावर फेकले जातेय. कुणी वाचा अथवा फेकून द्या, हीच त्यांची भूमिका दिसून येते. अलीकडे विकण्यासाठी आपले एखादे नियतकालिक सुरू करणे, अथवा एखादी प्रकाशन संस्था काढणे, इतपत समृद्धी काही लेखक, कवींची नक्कीच आहे. त्यात ते सक्रिय राहून आपल्या कंपूचे भरणपोषण करत असतात. त्यांच्या लिहिण्याची आणि जगण्याची ती एक गरज होऊन जाते.
नव्वदोत्तर पिढीत आपल्या विशिष्ट कंपूशिवाय समग्र मराठी लेखनाकडे निकोप दृष्टीने बघणारे समीक्षक तर अभावानेच आढळतील. जुन्या पिढीतील समीक्षकांच्या मानगुटीवर बसलेले सत्तरच्या दशकातले भूत अजूनही खाली उतरायला तयार नाही. ते अजूनही ऐंशीच्या पुढे सरकायलाच तयार नाहीत. आपल्या निकोप दृष्टीतून नव्वदोत्तर कवितेचे विश्लेषण करेल, असा समीक्षक आमच्या पिढीत निर्माण झाला नाही. जे आज समीक्षेसारखे काही लिहितात, ते एका विशिष्ट कंपूचे प्रतिनिधित्व करताना दिसतात. आजच्या समकालीन प्रश्नांचा गांभीर्याने विचार करून रचनात्मक भूमिकेतून लेखन करणार्‍या लेखकांचा एक मोठा वर्ग महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. उत्तम वाचकांच्या हाती असे चांगले आणि वेगळे काही लागले तर ते इतर फोलपटासारखे दूर फेकून देतात, हेदेखील तेवढेच खरे आहे.
(kaviashokkotwal@gmail.com)
(शब्दांकन : विष्णू जोशी)