आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Article On Self Travel In Literature By Ashok Pawar

बिराड ते तसव्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजवरच्या प्रवासात लोकांनी मला अनेक मानांकनं दिली. दलित लेखक, भटक्यांचा लेखक, ग्रामीण लेखक, मराठी लेखक, कम्युनिस्ट लेखक, असे बरेच काही. मी सुरुवातीला थोडा हुरळून गेलतो. थोडीफार लेखकगिरी माझ्याही अंगात येऊ लागली होती. कंगाल जगण्याला मी जवळून अनुभवले होते. भुकेच्या आगीत जाळून स्वत:ला खाक केले होते. कुत्र्याच्या तोंडातली भाकर हिसकावून खाल्ली होती. पण या मानांकनात माझं मन कुठेच लागत नाही. मी कंगाल लोकांच्या काफिल्यातून चाललोय. मला माणूसपणाचा लेखक बनायचं आहे. कसंतरी दहावी शिकलो. शाळा बोंबलली. वयाच्या सोळाव्या वर्षी लग्न केलं. पोटापायी बाबासोबत रोज मजुरी करीत बिराड घेऊन गावोगाव हिंडू लागलो. अशातच, यशोदा सोडून गेली. संसार मोडून पडला. मुलगा अनाथालयाला दिला. समदा बर्बाद झालो. दारूच्या जवळ गेलो. कोरी देशी दारू पेऊ लागलो. चुकून पुस्तकं हाताशी लागली, दारू दूर होत गेली. पुस्तकं वाचता वाचता वाचनाचं वेड लागलं. मजुरी आणि ‌वाचन सुरू झालं. वाचनालयातून पुस्तकं आणून आधाशासारखा वाचू लागलो. ज्या गावात बिराड गेलं, त्या गावातली वाचनालयं पालथी घालू लागलो. अरुण साधूंचं, भालचंद्र नेमाडेंचं, मधु मंगेश कर्णिकांचं लेखन वाचलं. नारायण सुर्वेंच्या कवितांनी भुरळ घातली. या लेखकांना पाहायची इच्छा मनात जोर धरू लागली.

अशातच १९९५मध्ये परभणीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं. या ६८व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष नारायण सुर्वे होते. मी त्याच जिल्ह्यात रोजमजुरी करीत होतो. मजुरीचे ५० रुपये घेतले आणि परभणीला आलो. नारायण सुर्वेंचं भाषण ऐकलं. त्यांना जवळून बघितलं. तीन दिवस खिचडी भजे खाऊन तिथंच राहिलो. हौशा-नवश्या-गवश्यांचं निरीक्षण केलं. साहित्य संमेलन संपलं. पुन्हा पालावर आलो. रोजीरोटी आणि ‌‌वाचन सुरू केलं. त्याच काळात मराठवाड्यातला मजूर कामं नसल्यामुळे मुंबईकडे धावू लागला. मीही मजूर वर्गाबरोबर मुंबई या मायावी नगरीत येऊन दाखल झालो. भिवंडीजवळ काम मिळालं, सिंमेटच्या थैल्या इमारतीवर नेयाचं. इमारतीला लागूनच आम्ही झोपड्या बांधल्या होत्या. मी दिवसभर काम करायचो आणि रात्री पुस्तकं वाचायचो. त्याच इमारतीवर रात्री पत्ते खेळण्यासाठी इंजिनिअर- ठेकेदार लोक यायचे. समदे मजूर झोपलेले असायचे. मी पुस्तक वाचत जागा असायचो, तवा ते मला सिगारेट- दारू त्यांच्या ओळखीच्या दुकानातून मागच्या दाराने आणायला लावायचे. मी आणायचो. एक दिवस त्यांनी वाचत असलेलं माझं पुस्तक चाळून बघितलं. मग दिवसा काम करू नको, म्हणाले. वॉचमनची नोकरी दिली. हे दोन वर्षं चाललं. या काळात मी अनेक पुस्तकं वाचली. मॅक्झिम गॉर्की, मुसोलिनी, फिदेल कॅस्ट्रो, लेनिन, टॉलस्टॉय, अंतोन चेकोव्ह, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, रसेल यांचा अभ्यास झाला. मी कोणी असामान्य माणूस नाही. मी जे जगत भोगत चाललो, त्याच्याहीपेक्षा भयानक जगणं अनेक लोक जगत आहेत, याची हळूहळू जाणीव झाली. झापडबंद समाजाला शोषित माणसांचं जगणं समजावं म्हणून आत्मकथन लिहायचं ठरवलं. आत्मकथन लिहिल्यावर प्रकाशित करायची आली की भानगड. दोन-चार लेखकांना भेटलो. प्रकाशकांना भेटलो. काय घाणेरडे लिहिले, म्हणून त्यांनी हाकलून लावलं. पण अपवाद भेटले रवी गोडबोले.

देशमुख आणि कंपनी प्रकाशन यांच्या पत्त्यावर बिराड पाठवल होतं. रवी गोडबोले यांनी बिराड वाचलं. त्यांनी मला बोलावलं. त्यांच्या घरी मुक्कामाला ठेवलं. सन १९९७मध्ये, तेव्हा देशमुख आणि कंपनीने ना. च. कांबळे यांची प्रकाशित केलेली कांदबरी ‘राघववेळ’ गाजत होती. रवीदादाने माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की, बिराडची कांदबरी प्रकाशित करू म्हणून. मी आत्मकथा प्रकाशित करा, म्हणालो. गणित काही जमलं नाही. बाड घेऊन पालावर परतलो. ‘कोल्हाट्याचं पोर’मध्ये वाचलं होतं, डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी पुस्तक प्रकाशनाला मदत केल्याचं. मी कोणतीही ओळख नसताना पत्रासह बाद पत्ता हुडकून पोस्टाने डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या पत्त्यावर पाठविलं. त्या पूर्वी त्यांचं ‘अक्करमाशी’ वाचलं होतं. त्यामुळे शरणकुमार लिंबाळेबद्दल आपुलकी होतीच. त्यांचा फोन माझ्याकडे नव्हता आणि माझा कायमचा पत्ता त्यांच्याकडे नव्हता. अशातच बरेच दिवस निघून गेले. मी पोट भरण्यात गुंग झालो, दुसरं लग्न करून संसार करू लागलो. नवा पाला उभा केला. नवी चूल मांडू लागलो. ‘बिराड’ विसरून गेलो. पोटापायी भटकत भटकत मराठवाड्यातून विदर्भात आलो. एक दिवस बाजारात भजे खात असताना त्या कागदावर डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा पत्ता दिसला. त्यांनी कोणत्या तरी पुस्तकाचं समीक्षण वर्तमानपत्रात लिहिलं होतं. त्या पत्त्याखाली फोन नंबर होता. एसटीडी बूथमध्ये जाऊन फोन लावला. फोन सरांनी उचलला. ‘अरे, मी तुम्हाला शोधण्यासाठी जंग जंग पछाडलं. तुम्ही सापडला नाही. तुमचं पुस्तक इचलकरंजीला २४व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनात डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते व डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या उपस्थितीत प्रकाशित होत आहे. तुम्ही उसनेपासने पैसे घेऊन पोहोचा, आल्यावर पैसे देतो. मी पालावर आलो, बायकोच्या गळ्यातलं एक ग्रॅमच डोरलं मोडलं. इचलकंजीला गेलो. ‘बिराड’ २००१मध्ये प्रकाशित झालं.

अरविंद पाटकर यांच्या मनोविकास प्रकाशनाने त्याची आता सातवी आवृत्ती प्रकाशित केली आहे. पुन्हा लग्न केल्यामुळे लेकरबाळं झाली. पोटाचा संघर्ष सुरूच राहिला. मजुरी करून त्या वेळी थकून जायचो, पण बायकोला सैंपाकपाण्याला मदत करू लागलो. लेखनात पुढे खंड पडला. वाचन मात्र चालूच होतं. अचानक चंद्रपुरात सतीश काळसेकर यांची भेट झाली. त्यांनी ‘बिराड’ वाचलं. त्यांना खूप भावलं. त्यांनी ‘आपले वाङ‌‌‌्मयवृत्त’मध्ये लिहिलं. ‘बिराड’ला अफाट प्रसिद्धी मिळाली. बिराड आता मुंबई, पुणे आणि अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. ‘बिराड’वर अनेक पुस्तकंही आलीत. विद्यार्थ्यांनी एमफिलचे प्रबंध लिहिलेत. पुढे २००८मध्ये ‘इलनमाळ’ नावाची कादंबरी लोकवाङ‌्मयगृहाने काढली. त्याच्या तीन आवृत्त्या निघाल्या. ‘पडझड’ ही वडाराच्या वेदना मांडणारी कांदबरीसुद्धा लोकवाङ‌्मयगृहाने काढली. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. ‘इलनमाळ’ कादंबरीला संस्कृती युवा साहित्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.(नवी दिल्ली) ‘पडझड’ला राज्य सरकारचा एक लाख रुपयाचा पुरस्कार मिळाला. ‘दरकोस दरमुक्काम’ कादंबरी मनोविकास प्रकाशन, पुणे यांनी काढली. त्याच्या दोन आवृत्त्या निघाल्या. ‘इलनमाळ’ कादंबरी कोल्हापूर, सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहे. ‘तसव्या’ ही शोषित स्त्रियांचं जगणं मांडणारी कादंबरी मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केली. त्याला ब्लर्ब (मलपृष्ठावरील टिपण) अरुण सांधू यांनी लिहिला आहे. साहित्याचे ४३ साहित्य पुरस्कार मला मिळाले. साहित्यानं मला कुठल्या कुठे आणून उभे केले. आता ‘कंगाल काफिल्याची गोष्ट’ नावाची कादंबरी प्रकाशित होत आहे. पुढच्या हप्त्याला त्यावर स्वतंत्रपणे बोलू...

ashokpawar020@gmail.com