आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कान’गोष्टी: प्रतिभा दर्शन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महोत्सवांच्या वाटेला नियमित जाणाऱ्या वारकऱ्याला शोध असतो, अलौकिक प्रतिभेचा. ‘कान’मध्ये पेद्रो अलामादोर आणि दार्देन बंधूंच्या रूपाने ती प्रतिभा आम्हाला दिपवून गेली...
अपराधी भाव संवेदनशील व्यक्तीला स्वस्थपणे जगू देत नाही. एखादा मारेकरी एखाद्याच्या सतत मागावर असावा आणि त्या बिचाऱ्याने स्वतःला वाचविण्यासाठी वाटा बदलत, रानोमाळ धावत सुटावं आणि तरीही मारेकऱ्यापासून सुटका करून घेण्यात कायमच कमी पडावं, अशी काहीशी त्याची गत होऊन जाते.
यंदाच्या कान चित्रपट महोत्सवात पाहिलेल्या ‘ज्युलिएट’ आणि ‘द अननोन गर्ल’ या नितांतसुंदर चित्रपटांनी याचा पुरेपूर अनुभव दिला. दोन्ही चित्रपटांचे कर्ते अनुक्रमे पेद्रो आलमादोर आणि दार्देन बंधू हे जागतिक पातळीवर उच्चतम मान्यता पावलेले अभिजात दिग्दर्शक! नातेसंबंधांच्या गुंत्याचा उलगडा करू पाहणाऱ्या कथेला हिचकॉकीयन शैलीतील रहस्यपटाची डूब देत एक आगळावेगळा कौटुंबिकपट करणे, यासाठी अलौकिक प्रतिभाच हवी... आणि पुन्हा तो रहस्यपटही वाटता कामा नये, याची बेमालूम काळजी घेणे यासाठी अनुभवसिद्धताच हवी. ती या दोन्ही दिग्दर्शकांकडे अमाप आहे आणि म्हणूनच त्यांचे हे चित्रपट एक अविस्मरणीय कलाकृतीचा दर्जा प्राप्त करतात. लाल रंगाचं विशेष आकर्षण असणारा आलमादोर आपल्या प्रत्येक चित्रपटात ज्या समजदारीने आणि नजाकतीने लाल आणि इतरही रंगांचा जो सर्जनशील वापर करतो, त्याने तृप्त होऊन जायला होते. ‘ज्युलिएट’ही त्याला अपवाद नाहीच.
‘ज्युलिएट’ची सुरुवातच सबंध पडदा लाल रंगाने माखलेला अशा पद्धतीने होते. इतर काही रंग, दृश्य किंवा ध्वनीपरिणाम असं काहीही न येता प्रथम नजरेत भरतो, तो हा लालचुटुक रंग आणि मग कॅमेरा जसा मागे सरकतो तसा त्या लाल रंगाचा उलगडा होतो. तो असतो, नायिकेनं परिधान केलेला टॉप. त्या आड असलेल्या तिच्या हृदयात बरंच बरं काही आहे, ते सारं आता एका आवेगाने आणि त्याहीपेक्षा अस्वस्थेने उलगडणार आहे.
पन्नाशीची ज्युलिएट आपल्या मित्राबरोबर माद्रीद सोडून कायमची पोर्तुगालला निघाली आहे. तिचं बॅगा भरणं चाललं आहे. कालपरवापर्यंत भरलेलं वाटणारं घर ओकंबोकं झालं आहे. हेही तिच्या मनोवस्थेचं सूचन. काही तरी कामानिमित्त ती घराबाहेर पडते. वाटेत कुठेतरी तरुण पोरापोरींच्या घोळक्यात खिदळत जाणारी एक तरुणी मागे वळून आपल्याच नादात जाणाऱ्या ज्युलिएटकडे पाहते. ओळख पटते न पटते, अशा अवस्थेत हलकेच हाक मारते.
“ज्युलिएट..?”
ज्युलिएट थांबते. वळते. पाहते. दोघी एकमेकींकडे पाहतात. ज्युलिएट काहीशी गोंधळात पडलेली.
“मी बिया... आंतिआची मैत्रीण...”
ओळख पटते. बाकी काही न विचारता ज्युलिएट उतावीळ झाल्यासारखी तिला विचारते,
“कशी आहे गं आंतिआ...? आणि आहे कुठे...? तुला भेटते का...?”
“शेवटची भेटली त्याला आता तीनेक वर्षे झाली. पूर्वीसारखी नाही राहिली. रोडावली आहे पार. दोन मुलं आहेत तिला...”
“मुलं...?”
पुढे मग काही फारसं बोलणंच होत नाही. बियाच्या मार्फत अचानक आणि अगदी अनपेक्षितपणे समोर आलेल्या आंतिआला घेऊनच ती पुढे निघते. आता तिची पावलं मघासारखी पडत नाहीत. पावलात पाऊल आल्यासारखं होतं...गेली कित्येक, जवळपास तेरा वर्षे काहीच मागमूस नसलेली आंतिआ आता तिच्या डोळ्यांत, तिच्या पेशीपेशीत शिरून बसते.
आंतिआ ही ज्युलिएटची मुलगी. ज्युलिएटचा नवरा वारल्यानंतर आंतिआ घर सोडून जाते. तिला बापाचा विरह सहन होत नाही आणि आईशी कधी तिचं जुळत नाही. आरंभी बापासाठी कातर झालेल्या, हळव्या झालेल्या आंतिआला ज्युलिएट आपल्या परीने खूप सांभाळण्याचा प्रयत्न करते, परंतु मायलेकीत कधीच कसला ओलावा निर्माण होत नाही. बोर्डिंग स्कूलमध्ये भेटलेल्या बियाशीच काही काळ आंतिआचं घट्ट नातं जुळतं, परंतु पुढे ती एकाकी होत जाते आणि मग बियालाही टाकून निघून जाते. इथपर्यंतचा सारा तपशील ज्युलिएटला आठवतो. दोन गोष्टींचा मात्र तिला उलगडा होत नाही. आंतिआ आपल्याशी अशी का वागते आणि ती अशी कशी काहीही न सांगता सवरता कुठे तरी निघून गेली. कसलाही मागमूस न ठेवता... आणि मग पोर्तुगालला जायचा विचार बाजूला सारून ती आंतिआच्या शोध मोहिमेवर निघते. तिच्या मित्राला तिच्या या निर्णयाचा अर्थबोध होत नाही. त्याला वाटतं, तिच्या आयुष्यात दुसरा कुणी तरी अचानक आला असावा. वरवर काहीही न दाखवता तो तिच्यावर एखाद्या गुप्तहेरासारखी पाळत ठेवतो... आणि सुरू होतो एक प्रकारचा रहस्यपट...! तिच्या बाजूने तिच्या भूतकाळाचं उत्खनन... थेट तिच्या अवखळ तरुणपणापासून ते आंतिआचा जन्म ते पुढचं बरंच काही आणि त्याच्याकडून अचानक अबाऊट टर्न घेतलेल्या त्याच्या वर्तमानाचा आणि भविष्याचाही शोध... तिची आणि आंतिआची भेट होत नाहीच, परंतु मायलेकीच्या नात्यातला सारा ताण आणि त्याच्या ओझ्याखाली दडपलेल्या त्यांच्या नात्याचा शोध लागतो न लागतो, अशी तिची अवस्था होऊन जाते. आपलीच पोर आपल्याला कळू नये हे कसलं गूढ, या विचाराने ती कशीनुशी होऊन जाते. ज्युलिएट दुसऱ्या कुणात तरी गुंतली असावी, या विचाराने पोखरलेला तिचा मित्र नात्यांचे पदर उलगडतीलच असं नाही, या जाणिवेला येता येता आपल्या संशयी वृत्तीला बोल लावत राहतो.
नोबेल पुरस्कारविजेत्या कॅनेडाच्या अॅलिस मुन्रोच्या ‘चान्स’, ‘सून’ आणि ‘सायलेन्स’ या तीन लघुकथांवर ‘ज्युलिएट’ बेतताना पेद्रो आलमादोर याने व्हॅन्कूवरची पार्श्वभूमी बदलून ज्युलिएटला स्पेनमध्ये माद्रिदला आणली. कारण त्याला त्याचा भौगोलिक आणि पर्यायाने सांस्कृतिक परिसर सोयीचा वाटतो. ज्युलिएटची गोष्ट जगात कुठेही घडू शकते. कळलंय, जाणवलंय, असं कितीही वाटत असलं तरी, विविध नातेसंबंधांचे ताणेबाणे उकललेले असतात, असं काही नसतंच. हे सार्वत्रिक वास्तव आहे. असलेच तर काही विशिष्ट प्रदेशाचे म्हणून वेगळे तपशील असतील. बाकी सारा मामला तोच आणि तसाच.
ज्युलिएट आंतिआचा शोध घेत जाते, तेव्हा तिच्या मनाच्या तळाशी एक अपराधी भाव असतो. असाच अपराधी भाव ध्यानीमनी घेऊन ‘द अननोन गर्ल’ची नायिका जेनी तिला संपूर्णतः अपरिचित असलेल्या आणि कधीच न पाहिलेल्या एका अनाम तरुणीचा शोध घेत राहते. दार्देन बंधूंच्या या चित्रपटात रोजच्या साध्यासुध्या गोष्टीतून एक भलेथोरले रामायण उभे राहते, त्याची गोष्ट ‘ज्युलिएट’सारखीच एखाद्या रहस्यपटाच्या शैलीत साकारते.
जेनी ही तरुणी डॉक्टर आहे. हॉस्पिटलमधून निघता निघता ती एक इमर्जन्सीची केस हाताळते आहे. सोबतीला असलेला तिचा सहकारी अजून डॉक्टरकीत नीट रुजलेला नाही. तो डॉक्टर झालाय, परंतु खरं तर तो डॉक्टर नाही. ही इमर्जन्सीची केस हाताळताना तो तिला नीट मदत करू शकत नाही. त्याच वेळी दुसऱ्या एका वॉर्डातल्या छोट्या मुलाला फीट येते. तो हातपाय झाडू लागतो. त्याची आई घाबरीघुबरी होऊन हॉस्पिटल डोक्यावर घेते. जेनी धावत जाते. परंतु सोबत असलेला तिचा सहकारी तिला कसलीच मदत करू शकत नाही. कारण, त्याला ते तडफडणारं मूल पाहवत नाही. ती एकटीनेच सारं हाताळते. दोघं पुन्हा मूळच्या पेशंटकडे येतात. तेवढ्यात डोअरबेल वाजते. तो दार उघडायला जाऊ लागतो. ती म्हणते, ‘तसंच काही महत्त्वाचं असेल तर आलेली व्यक्ती दुसऱ्यांदा बेल वाजवेल. तोपर्यंत याची ट्रीटमेंट आटपू या. ती आपलं काम करत राहते. तो तसाच शुंभासारखा उभा आणि मग तिरीमिरीत निघूनच जातो. दरम्यान डोअरबेल दुसऱ्यांदा वाजतच नाही... आणि ती वाजण्याची जेनी काही वाटही पाहात नाही. किंबहुना, ती ती एकदाच वाजलेली डोअरबेलही विसरून गेलेली असते. हे काय सारं रूटीनच असतं... परंतु नियतीच्या मनात हे साधंसुधं रुटीन नसतं. नियती त्यातून खूप मोठं काही तरी घडवित असते.
जेनी आपल्या नेहमीच्या कामात असताना दुसऱ्या दिवशी पोलिस हॉस्पिटलमध्ये येतात. आदल्या दिवशीचं सी.सी.टी.व्ही. फुटेज पाहतात. त्यात त्यांना एक कृष्णवर्णीय तरुणी धावतपळत येऊन डोअरबेल वाजवताना दिसते आणि तशीच धावत दुसऱ्या दिशेने निघून जाते. जेनीला कळत नाही, पोलिसांचं नेमकं काय चाललंय. फुटेज पाहून होताच पोलिस तिला सांगतात की, काल संध्याकाळी हॉस्पिटलच्या दाराशी येऊन बेल वाजविणाऱ्या मुलीचा काही अंतरावर असलेल्या नदीकिनारी मृतदेह सापडलाय. जेनी नखशिखांत हादरते. ‘तसंच काही महत्त्वाचं असेल तर आलेली व्यक्ती दुसऱ्यांदा बेल वाजवेल...’ असं म्हणून आपण ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, त्यातून हा इतका महाभयानक प्रकार घडला...? आणि मग तिचं मन अपराधी भावनेनं पार ग्रासून जातं. त्यातच पुढल्या दोनेक दिवसांत तिला पोलिसांकडून कळतं की, त्या मुलीचा कुणीच नातलग पुढे न आल्याने बेवारशी म्हणून त्यांनी तिचं दफन केलं. ती आणखीनच हादरून जाते आणि अपराधी भाव तिला पार वेढून टाकतो... आणि मग ती त्या ‘बेवारशी’ मुलीचा शोध घ्यायला बाहेर पडते. एकीकडे आपली वैद्यकीय सेवा त्याच अगत्याने आणि निष्ठेने देता देता तिला अस्वस्थ करून सोडलेल्या अपराधी भावातून ती अंगची सारी हुशारी आणि धैर्य पणाला लाऊन त्या मुलीचं रहस्य उलगडायला निघते... आणि तिला दुरन्वयेही अपेक्षित नसलेल्या गोष्टी घडू लागतात. तिच्यावर हल्ला होण्यापर्यंत गोष्टी घडतात. परंतु ती मागे हटत नाही. कारण, आपल्या एका चुकीमुळे एका मुलीचा प्राण जाणे आणि परत तिचं बेवारशी म्हणून दफन होणे, तिला पार उध्वस्त करून टाकतं. अखेर जिवावर बेतलेल्या अनेक प्रसंगांतून जात जेनीला त्या बेवारस मुलीचा नाव, गाव, पत्ता याचा शोध लागतो.
‘द अननोन गर्ल’चं वैशिष्ट्य म्हणजे एका अपराधी भावनेतून आणि त्यातून आलेल्या अस्वस्थेतून सुरू झालेला नायिकेचा प्रवास. त्यातून उलगडत गेलेलं आणि तिचं तिलाही उमगत गेलेलं तिचं व्यक्तिमत्त्व हा सारा कथाशय ज्या प्रगल्भतेनं पडद्यावर येतो, त्याला तोड नाही. अभिजात दिग्दर्शक साध्याशा गोष्टीला आशय आणि आविष्कार या दोन्ही पातळ्यांवर केवढ्या उंचीवर नेऊन ठेवू शकतो, त्याचं हे सर्वोत्तम उदाहरण म्हणता येईल. यंदाचा कान महोत्सव या दोन अभिजात चित्रपटांमुळे कायम स्मरणात राहील.
(क्रमश:)
ashma1895@gmail.com
बातम्या आणखी आहेत...