आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधीचा कान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काल-परवापर्यंत जो मराठी सिनेमा महाराष्ट्रातच चाचपडत होता, त्या मराठी सिनेमाचा स्वीकार करण्यास सातासमुद्रापार उत्सुकता असल्याचं आशादायी चित्र यंदाच्या कान महोत्सवात दिसलं. म्हटलं तर सुवर्णसंधीच...

‘जागतिक हक्क’
अगदी सत्तरच्या दशकापर्यंत मराठी चित्रपटाची सुरुवात या पाटीने व्हायची. त्या खाली निर्मिती संस्थेचा पत्ता असायचा... मग श्रेयनामावलीच्या (टायटल्स) इतर पाट्या दिसायच्या आणि गोष्ट सुरू व्हायची. ही पाटी पाहताच मला हसू यायचं. कधी कधी आवरता येणार नाही, इतकं. भोवतालचे प्रेक्षक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहायचे. मलाही ते कळायचं. पण माझा नाइलाज असायचा. मला हसू यायचंच आणि त्यांच्या नजरेत भाव असायचा, ...अजून सिनेमा सुरू नाही झाला आणि खुळं हसत काय सुटलंय...

विविध भूमिकांतून चित्रपट व्यवसायात येण्याचा, वावरण्याचा माझा काळ अजून खूप दूर होता. परंतु चित्रपटाच्या विविध अंगावर विचार करणं अगदी हायस्कूलच्या दिवसांत सुरू झालं होतं. त्या वेळी ज्या गोष्टी कळू लागल्या होत्या, त्यापैकी एक म्हणजे मराठी सिनेमात दाखविला जाणारा प्रदेश. तो अर्थातच महाराष्ट्रात दाखविला जायचा.किंवा महाराष्ट्राबाहेर जिथे कुठे रविवार सकाळच्या मॉर्निंग शोसाठी पुरेसा मराठी प्रेक्षक असेल तिथे. बरं महाराष्ट्रात म्हणजे उभ्याआडव्या महाराष्ट्रात तरी कुठे मराठी चित्रपट प्रदर्शित व्हायचा? मुंबई, ठाणे परिसर आणि पुणे ते कोल्हापूर एवढ्यापुरताच कुठे मराठी सिनेमाचा महाराष्ट्र मर्यादित होता...आणि मग हे ‘जागतिक हक्क’ कुणाला विकायला निघालेत..? मराठी भाषिकांचा म्हणून अस्तित्वात आलेला संपूर्ण महाराष्ट्र जिथे मराठी सिनेमाचा नाही, तिथे जगाची उठाठेव कशाला? मला याचं हसू यायचं...

...आणि परवाच्या कान चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये महाराष्ट्र शासनाने तीन मराठी चित्रपट नेण्याचा उपक्रम राबवला, तेव्हा समन्वयक म्हणून माझ्यावर सर्व जबाबदारी सोपवली. म्हणजे जो माणूस ‘जागतिक हक्क’ला हसायचा, त्यालाच मराठी चित्रपट घेऊन जागतिक मार्केटमध्ये जाऊन बसावं लागलं. यालाच काव्यात्मक न्याय म्हणतात का? मला आज याचंही हसू येतंय.

हा सारा गमतीचा भाग वगळून जर या ‘जागतिक’ प्रकरणाकडे पाहिलं, तर एका गोष्टीचं कौतुक करायला हवं. कालपरवापर्यंत मराठी प्रदेशात वावरणारा मराठी चित्रपट अगदी जागतिक पातळीवर जाण्याचा प्रयत्न करतो आहे...आणि मराठी चित्रपटाला सर्वतोपरी साहाय्य करण्याचं धोरण अवलंबिणारं महाराष्ट्र शासन याही आघाडीवर मराठी चित्रपटाच्या पाठीशी भरभक्कमपणे उभं आहे.

गोव्यात भरणाऱ्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गेल्या वर्षी सर्वप्रथम शासनाने अशा प्रकारचा उपक्रम सर्वप्रथम राबवला. तिथल्या फिल्म मार्केटमध्ये काही मराठी चित्रपट आणि त्यांच्या निर्मात्या-दिग्दर्शकांना शासनाने नेलं आणि जागतिक बाजारपेठेची ओळख करून दिली. हे प्रथमच घडत होतं. त्याला मिळालेला प्रतिसाद पाहून थेट कान महोत्सवाच्या मार्केटमध्ये मराठी चित्रपट न्यावा, असं शासनाला वाटलं आणि सहाच महिन्यांत सारे सोपस्कार पार पाडून ते घडवूनही आणलं. दादासाहेब फाळके चित्रनगरीचे साहाय्यक महाव्यवस्थापक संजय पाटील यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने हे घडून आलं. राज्य पातळीवरील तमाम तसेच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सर्वोत्कृष्ट ठरलेल्या चित्रपटांतून तीन चित्रपट निवडण्यात आले. ते होते- यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मकरंद माने दिग्दर्शित ‘रिंगण’, ‘धग’ या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळविणाऱ्या शिवाजी लोटन पाटील यांचा ‘हलाल’ आणि पुनर्वसू नाईक दिग्दर्शित ‘वक्रतुंड महाकाय’!

या उपक्रमाचा भाग म्हणून शासनाने दादासाहेब चित्रनगरीच्या अंर्तगत कानच्या फिल्म मार्केटमध्ये एक कक्ष घेतला होता. तो चित्रनगरी, वर उल्लेख केलेले तीन चित्रपट आणि इतर चित्रपटांच्या पोस्टर्सनी सजवला होता. शिवाय एक भलामोठा टी. व्ही. सेट होता आणि त्यावर दिवसभर चित्रनगरीचा संपूर्ण परिचय करून देणारे दोन माहितीपट आणि या सर्व चित्रपटांचे ट्रेलर्स दाखविले जात होते. दिवसभर जगभरची मंडळी चित्रनगरीच्या कक्षात येत होती. बोलत होती. चौकशा करत होती. एका बाजूला ‘रिंगण’, ‘हलाल’, आणि ‘वक्रतुंड महाकाय’ या चित्रपटांचे हक्क विकत घेण्यासाठी, त्यांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत निमंत्रित करण्यासाठीही बोलणी होत होती. अमेरिकेतील व्हर्जिनिया विद्यापीठातील दोन प्राध्यापक तिथल्या फिल्म स्कूलच्या पंधराएक विद्यार्थ्यांना महोत्सवात घेऊन आले होते. ते आम्हाला भेटले. त्यांनी ‘रिंगण’चा दिग्दर्शक आणि त्याच्या टीमबरोबर त्यांच्या या विद्यार्थ्यांना चर्चा करण्याचे निमंत्रण दिलं. त्यानुसार एक दिवस दुपारी ३ ते ५ या वेळात इंडियन पॅव्हिलियनच्या शामियानात ही चर्चा घडवून आणण्यात आली. त्यात मकरंद माने, छायाचित्रकार अभिजित अब्दे यांनी भाग घेतला आणि या विद्यार्थ्यांशी सविस्तर गप्पा मारल्या. त्यांनी त्यांच्या प्राध्यापकद्वयींबरोबर ‘रिंगण’ पाहिला होता आणि त्यांना तो खूप आवडला होता. चर्चा रंगणं स्वाभाविकच होतं. मराठी चित्रपटातील आमची तरुण मंडळी आणि अमेरिकेतील हे उद्याचे चित्रकर्मी यांच्यातील हा संवाद ऐकताना, पाहताना गेली ३७ वर्षे जगभरच्या महोत्सवात वावरणारा माझ्यातला मराठी चित्रकर्मी सुखावला होता.
शासनाने नेलेल्या या तीन चित्रपटांबरोबरच ‘सायलेन्स’चा दिग्दर्शक गजेंद्र अहिरे, त्याची अभिनेत्री पत्नी वृंदा गजेंद्र, त्याचे निर्माते, ‘कट्यार काळजात घुसली’चे निर्माते, ‘हाफ तिकिट’चा दिग्दर्शक समीत खक्कड आणि त्याचे निर्माते अशीही काही मंडळी स्वतःहून आली होती आणि त्यांच्याही चित्रपटांसंबंधीच्या बैठका चित्रनगरीच्या कक्षातच होत होत्या. या दरम्यान इंडियन पॅव्हिलयनचं कायम आयोजन करणाऱ्या ‘फिक्की’ या भारतीय संस्थेने त्यांच्या भरगच्च दैनंदिन कार्यक्रमात एक दिवस मराठी चित्रपटांवर चर्चा, असा कार्यक्रम आयोजित केला होता. चर्चेची सूत्रं मराठी चित्रपटांवर सातत्याने लिहिणारे-बोलणारे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सैबल चटर्जी यांच्याकडे होती आणि मराठी चित्रपटांवर बोलायला संजय पाटील, सांस्कृतिक खात्याचे उपसचिव संजय भोकरे, मुख्यमंत्र्यांचे सांस्कृतिक सल्लागार आणि निर्माते-दिग्दर्शक मिलिंद लेले, मकरंद माने, अभिजित अब्दे, पुनर्वसू नाईक, ‘हलाल’चा निर्माता अमोल कागने, अभिनेत्री प्रितम कागने आणि या उपक्रमाचा समन्वयक म्हणून मी अशी सर्व मंडळी उपस्थित होतो. जवळपास ६०-७० लोक चर्चेला उपस्थित होते. त्यात काही मोजके भारतीय वगळता इतर सारी परदेशी मंडळी होती. या चर्चेत सतत एक गोष्ट पुढे येत होती आणि ती म्हणजे, आजचा मराठी चित्रपट जागतिक पातळीवर नावारूपाला येतोय. मराठी वातावरणाच्या बाहेर त्याची विशेषत्वाने दखल घेतली जातेय. चर्चेला सुरुवात करतानाच सैबल चटर्जी यांनी सांगितले की, एक काळ असा होता की, राष्ट्रीय पातळीवर बंगाली, मल्याळी आणि कन्नड सिनेमाचा वरचश्मा होता. आता मराठी चित्रपटाने आघाडी घेतली आहे. परदेशात अलीकडे "बॉलीवूड’ संस्कृतीची नको तेवढी क्रेझ आहे. परंतु या पार्श्वभूमीवर भारतातील इतर प्रादेशिक चित्रपटांकडे कुतूहलाने पाहणारा फार मोठा जाणता वर्ग जगभर आहे. त्यांना अलीकडचा मराठी चित्रपट भावतो आहे. त्यांना त्याचं विशेष कुतूहल वाटतं आहे. या वर्गाचे प्रतिनिधी म्हणता येतील, अशी काही मंडळी या चर्चेत सामील झाली होती आणि आपलं कुतूहल पुरवून घेत होती. मराठी चित्रपटाला हे व्यासपीठ शासनाने मिळवून दिलं. या चर्चेच्या आरंभी गजेंद्र अहिरे याच्या ‘पिंपळ’ या नव्या चित्रपटाची घोषणा त्याने त्याच्या टीमसह केली.

शासनाने राबविलेल्या या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणजे, वर उल्लेख केलेल्या तीन चित्रपटांचं मार्केट स्क्रिनिंग. प्रत्येकी दोन असे एकूण सहा शो मार्केटच्या चित्रगृहात करण्यात आले. या सहाही शोला विविध देशांतील डिस्ट्रिब्युटर्स, निर्माते, महोत्सव प्रतिनिधी अशी विविध गटांतील मंडळी उपस्थित होती. कानच्या या फिल्म मार्केटमध्ये जगभरचे जवळपास अकरा हजार चित्रपट व्यावसायिक उपस्थित असतात. या सर्वांना म्हणजे अकरा हजार प्रतिनिधींना आम्ही मार्केटमध्ये आणलेल्या या तीन चित्रपटांची आवश्यक ती सारी माहिती बल्क इमेलद्वारा पाठविली होती. एकदा नव्हे तर चार वेळा. म्हणजेच चव्वेचाळीस हजार मेल्स जगभर गेले. म्हणजेच हे तीन चित्रपट जगभरच्या एवढ्या व्यावसायिकांना माहीत झाले. थोडक्यात सांगायचं तर, मराठी चित्रपट जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी करायचे ते सारे केले... आता पुढे जे काही करायचे ते मराठी चित्रपटांनी...त्याच्या दिग्दर्शकांनी...निर्मात्यांनी..!

महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून मराठी साहित्य, नाटक, चित्रपट आणि इतर तमाम कला यासाठी महाराष्ट्र शासन तमाम उपक्रम राबवते आहे. मी शासनाचे गुणगान गाण्यासाठी लिहीत नाही, हे कृपया लक्षात घ्या. मला म्हणायचे आहे की, शासन हे सारे करत असताना आपण काय करतो, याचा शोध घेतला पाहिजे. शासन अर्थसाहाय्य देतं ते मराठीत दर्जेदार चित्रपट निर्मिती व्हावी म्हणून. आज त्या दर्जेदार चित्रपटांना थेट कानसारख्या जगातल्या प्रथम क्रमांकाच्या आणि बड्या महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये नेऊन ठेवतं आहे. आता संबंधितांनी याचा आवाका समजून घेण्याची आणि त्यानुसार आपला दृष्टिकोन घडविण्याची गरज आहे. जगाला तुमच्याविषयी, तुमच्या सिनेमाविषयी कुतूहल आहेच; परंतु ते पुरविण्यासाठी त्या तोडीची व्यावसायिकता, समज आणि प्रगल्भता अंगी बाणविण्याची निकड आहे. अन्यथा असे उपक्रम मग शासनाने केलेले असोत वा कुणी वैयक्तिक पातळीवर; ते केवळ परदेशवारी एवढ्यापुरतेच मर्यादित राहतील.
(समाप्त)
(ashma1895@gmail.com)

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)