आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत पतीस स्‍मृतिपत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैलासवासी अहो यांस,
आजच जंपानगिरे यांच्या ट्रॅव्हल कंपनीबरोबर कुलू मनाली अशी सहल संपवून घरी आले. तुम्हाला जाऊन एक महिना झाला हे तुम्हालाच काय सांगायचे. हे म्हणजे हत्तीला तू जाड आहेस आणि शेजारच्या वामनरावांना तुम्ही द्वाड आहात, असे सांगण्यासारखेच की हो. माणूस आपली जन्मतारीख आणि मरणतारीख कधीच विसरत नाही. तुमच्या तेराव्यानंतर मुलांनी माझे दुःख हलके व्हावे, म्हणून ही सहल घडवून आणली. बरोबर माझी शाळा मैत्रीण मालतीदेखील होती. आम्ही दोघींनी खूप धमाल केली.

तुम्हाला आठवतच असेल, बरोबर चाळीस वर्षांपूर्वी आपण हनिमूनसाठी माझ्या बाबांच्या पैशाने कुलू मनालीला गेलो होतो, तिथे तुम्ही सारखे “हॉटेलचा दरवाजा सारखा कुलू कुलू वाजतोय” किंवा सारखे मला “तू काय मनाली, काय मनाली’ असे पांचट विनोद करत होतात. नववधू असल्यामुळे मीदेखील खोटेखोटे हसून तुम्हाला प्रोत्साहन देत होते. ‘नववधू पिया मी खोटे हसते’ असे झाले होते माझे. अर्थात त्या हनिमूनमध्ये पांचट विनोदालाच नाही तर अजून बऱ्याच ठिकाणी मला तुम्हाला प्रोत्साहित करावे लागले, ही बाब अलाहिदा. तिथल्या गरीब वेटरच्या अंगावर उशिरा चहा दिला म्हणून तुमचे खेकसणे, माझ्या माहेरच्या मंडळींसाठी काही वस्तू घेताना नको तितकी घासाघीस करणे आणि शेवटी काहीच न घेणे, हेदेखील काही मला आवडले नव्हते.
 
आज प्रवासातून घरात आले. दोन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या घरी आहेत. तुम्ही नसल्यानंतर पहिल्यांदाच मी एकटी घरात आहे. मी एकटीच घरभर फिरले. सगळे घर खायला उठते आहे. पण तुमच्या सारख्यासारख्या खायला मागण्याच्या सवयीमुळे हे खायला उठणारे घरदेखील मला चांगलेच वाटते आहे. खूप मोकळे वाटते आहे. बाहेरगावाहून आल्यावर घरात दूध नसल्यामुळे चहा मिळाला नाही की होणारी तुमची चिडचिड, घरात जरा धूळ जमल्यामुळे लगेच मला घर आवरायची दिलेली ऑर्डर, पेपर टाकू नको असे सांगिल्यानंतरदेखील पेपरवाल्याने चुकून एखाद्या दिवशीचे पेपर दाराला अडकवलेले असले की, त्याच्या आईचा उद्धार... हे सारे या सहलीनंतर न झाल्यामुळे माझी मानसिक शांती आहे.
 
आपल्या घराचा हॉल, इथली तुम्हीच स्वयंघोषित केलेली तुमची आवडती सोफ्यावरील जागा, जिथे नोकरीवरून आल्यावर आणि नंतर रिटायर झाल्यावर कायम तुम्हीच टीव्ही बघत बसायचात. कधी मला विचारले नाहीत की, तुला इथे बसायचे आहे का. मी बापडी जिथे तुम्ही बसणार नाही अशा जागी बसायचे. टीव्ही तिरका दिसायचा मला, इतकी वर्षं असा तिरका टीव्ही बघितल्यामुळे मागच्या वर्षी गणेशोत्सवात ती टीव्हीवरची नटी आली तिलादेखील सरळ बघून ओळखले नाही मी. जरा मान तिरकी केली आणि मग लक्षात आले की, अरेच्चा, ही तर त्या मालिकेतली नटी. आज मनसोक्त तुमच्या चांगला टीव्ही दिसणाऱ्या जागेवर बसून आरामात पाय पसरून टीव्ही बघणार मी. कुणी मला डिस्टर्ब करण्याचा प्रश्नच येणार नाही, कारण तुमच्या तुसड्या स्वभावामुळे शेजारीपाजारी येतच नाहीत आपल्याकडे. तुम्हाला न्यायच्या वेळी मुलांचे मित्र आले म्हणून जरा तरी गर्दी दिसली घराबाहेर.
 
जरा फ्रेश व्हायचे म्हणून मी बाथरूममध्ये हातपाय धुवायला गेले, तिथे तुमचे दाढीचे सामान, कात्री समोर दिसली आणि एकदम तुमचा दोनदोन दिवस दाढी न केलेला आणि पांढऱ्या दाढीचे खुंट वाढलेला चेहरा डोळ्यांसमोर आला. ही तुमची सवय अगदी लग्नापासूनची. सुरुवातीला ती रखरखीत दाढी माझ्या गोबऱ्या गालांना घासल्यामुळे अंगावर रोमांच यायचे; पण जसजसे दिवस, म्हणजे साधे लग्नानंतरचे दिवस, जाऊ लागले तशी ही रखरखीत दाढी माझ्या डोक्यात जाऊ लागली. तुमच्या पांढऱ्या दाढीमुळे कदाचित माझे केसदेखील लवकर पांढरे झाले असतील. आणि ती छोटी कात्री जी मी तुम्हाला वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती, तुमच्या नाकातील केस कापण्यासाठी, तिचा वापर तुम्ही कधीच केला नाहीत. कायम आपले नाकातील बाहेर आलेले केस हे जणू एखादे लढाईत मिळालेले मेडल असल्याप्रमाणे अभिमानाने नाकामध्ये मिरवत राहिलात. एखादे लाजरे मूल घरी आलेल्या पाहुण्यांसमोर न येता एखाद्या भिंतीआडून त्यांच्याकडे बघत असते, तसेच तुमचे केस हे नाकाच्या आतील भिंतीआडून कायम समोरच्याकडे डोकावत रोखून बघत असायचे.

नंतरनंतर तर लोक तुमच्या चेहऱ्याकडे न बघता पायाकडे बघून बोलत असत. ते नायजेरियामध्ये कोणी बोकोहराम म्हणून अतिरेकी आहेत, तसे तुम्ही आमचे नाकोहराम झाला होतात. अंघोळदेखील तुमची एखाद्या कावळ्याच्या अंघोळीसारखी एका मिनिटामध्ये संपवायचात. पण बाथरूमविषयीची अनास्था तुम्ही सारखे संडासमध्ये जाऊन कमी करायचात. सकाळचा पेपर संडासमध्ये, नाष्टा झाल्याझाल्या संडासमध्ये, दुपारचा चहा झाला की संडासमध्ये, रात्री झोपताना संडासमध्ये. खरोखर जर संडासमध्ये टीव्ही बसवला असता तर तुम्ही बाहेर आलाच नसता संडासच्या.
 
बाथरूममधून पाय धुऊन बेडरूममध्ये पाय पुसायला आले. इथेदेखील तुमच्याच मर्जीनुसार सगळे चालायचे. तुमच्या लेखी धसमुसळेपणा म्हणजेच पुरुषार्थ. मला जरा लाडिक हळुवार शृंगार आवडतो, हेदेखील चाळीस वर्षांत लक्षात आले नाही तुमच्या. अर्थात लग्नानंतरचा सुरुवातीचा जोर काही वर्षांत ओसरला, पण नंतरदेखील जेव्हा तुमची मर्जी असेल तेव्हाच आपण कार्यरत होत असू. स्त्री हे जिवंतपणी बोलू शकत नाही नीट उघडपणे, पण मेलेल्या तुम्हाला हे सांगतानादेखील लेखणी अडखळते आहे. समाजाला दिसायला दोन मुले झाली, मग ही बाई असे का लिहिते आहे असे वाटेल, पण एकदोनदा नेम बरोबर बसला म्हणजे माणूस कायम नेमबाज होतो, असे नाही ना.
 
साऱ्या घरभर फिरले, तुमच्या आठवणी आहेत, चाळीस वर्षांचा संसार आहे, सुख दुःख एकत्र घालवलेलं आहे, सगळ्या जबाबदाऱ्या जोडीने निभावल्या आहेत; पण खरंच आतून कुठे तरी सुटल्याची जाणीव होते आहे. मान्य आहे की, मी ज्या तक्रारी इथे करते आहे त्या बऱ्याच आधी सांगायला पाहिजे होत्या. तसा प्रयत्नही केला मी बऱ्याच वेळा, पण तुम्ही कधीच ऐकून न घेता, स्वतःच्या पुरुषी उन्मादात जगत राहिलात आणि मला तुमच्याबरोबर नकळत फरफटत आयुष्य ओढावं लागलं. एखादे वेळी हे माझे लिहिणे तुम्हाला एकसुरी, एककल्ली वाटत असेल; पण त्याला माझा नाइलाज आहे. आता सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत माझ्याकडून आणि इथून पुढची जी काही पाचदहा वर्षं राहिली असतील ती मी माझ्या एकटीसाठी जगणार. जमेल तितकी मदत करेन मुलांना सुनांना, पण माझ्या अटींवर. पण आता इथून पुढे आयुष्य एन्जॉय करणार.
- तुमचीच, विधवाकांक्षिणी सत्यभामा

प्रिय पृथ्वीवासी अगं भामा,
तुझ्या एवढ्या तक्रारी असतील, असे कधी लक्षातच आले नाही माझ्या. हरकत नाही, आपण एकदा बसून बोलू. तुला वाटत असेल, हे कसे शक्य आहे? कालच चित्रगुप्त आणि त्याच्या स्टाफचे बोलणे ऐकले, पुढच्या आठवड्यात पृथ्वीवरून इकडे कोणाला आणायचे, त्या यादीमध्ये तुझे नाव ऐकले. भेटू या लवकरच.
- तुझाच, कैलासवासी अहो.
 
ashutosh.bhalerao@capgemini.com
बातम्या आणखी आहेत...