आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शून्य घाव शून्य तुकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही लोक ‘शून्य घाव शून्य तुकडे’सारखे आपले वर्तन ठेवून समोरच्याच्या समस्या जाणून  त्यावर चांगला तोडगा काढतात. दोन्ही बाजूंचा फायदा करतात. अर्थात असे लोक विरळाच असतात समाजामध्ये. उलट आमच्यासारखे एक घाव दोन तुकडे करण्यास उत्सुक भरपूर सापडतील.

दिनेश हमसून हमसून रडत आमच्याशी शेकहँड करून खोलीबाहेर गेला. जाताना सारखा थँक्स म्हणत होता.
माझ्या कंपनीमधील, माझ्याच टीममधील दिनेश हा एक हुशार कर्मचारी, गेले काही दिवस अस्वस्थ दिसत होता आणि आज त्याने राजीनामा दिला होता. आता माझ्या टीममध्ये बरेच लोक आहेत आणि अधून मधून कोणी तरी राजीनामा देत असतो. मी दिनेशशी थोडा वेळ बोललो, राजीनामा मागे घेण्याबाबत चर्चा केली, पण तो काही तयार होईना. कंपनी नियमाप्रमाणे मी त्याची एक मीटिंग माझा बॉस, जतीन सावेबरोबर ठेवली.

रूममध्ये आल्यावर दिनेशला मी जे प्रश्न विचारले होते ते सोडून जतीन बोलला, “हे बघ दिनेश समोर जे पाणी ठेवले आहे ते पी, आणि दोन मिनिटं शांत बस. मी तुला राजीनामा मागे घे असे सांगत नाही. तू मनाची तयारी केली आहेस तेव्हा तुझं मन वळवण्याची काही गरज नाही आणि तू ते करणारही नाहीस.” मी आणि दिनेश दोघेही एकदम अवाक् झालो कारण आम्हाला वाटले होते त्याच्या एकदम उलटेच झाले. दिनेशने पाणी प्यालं. दोन मिनिटांनंतर जतीनने विचारले, “दिनेश, तू सोडून जातोच आहेस आम्हाला, पण गेले काही दिवस तू जरा चिंतातुर दिसत होतास, काय कारण आहे?” दिनेशने सांगितले की, गावी त्याची आई एकटीच लहान भावासोबत राहते, वडील नाहीत. भावाने बरेच कर्ज करून ठेवले आहे, दारू रोज पिऊन आईशी भांडण करणे इत्यादी इत्यादी. 

मध्ये दिनेश दोन वेळा सुटी काढून घरी जाऊन आला, पण काहीच फरक नाही झाला परिस्थितीत. हेच कारण होते गेले काही दिवस तो तणावाखाली होता आणि आता सर्व परिस्थितीला तोंड द्यायचे म्हणून त्याने राजीनामा दिला. कायम गावी राहून काही तरी (नेमकं काय हे त्यालाही माहीत नव्हतं.) करायचे आणि सर्व गोष्टी निस्तरायच्या असे ठरवले होते. खरे तर अतिशय साधी सोपी समस्या होती त्याची, पण लहान वयात त्याच्यावर झालेली ही अवस्था, भावाने करून ठेवलेले कर्ज, आईची करुण आर्जवं, पुढील आयुष्यातील करिअरसंबंधीची अस्पष्टता याने अगदी बावरून गेला होता तो. जतीनने त्याची सर्व अवस्था नीट जाणली आणि त्याला भरपगारी पंधरा दिवसांची सुटी आणि त्यापुढील दोन महिने घरून काम करण्याची परवानगी दिली. त्यामध्ये जर सगळे चांगले झाले तर तो ऑफिसमध्ये येऊन काम करू शकत होता, बहुधा हेच त्याला अपेक्षित होते. त्याच्या गेल्या काही महिन्यांच्या तणावाचा निचरा अवघ्या काही मिनिटांमध्ये झाला आणि दिनेशचा भावनांचा बांध फुटला. जतीनने त्याला समजावले आणि दिनेश हमसून हमसून रडत आमच्याशी शेकहँड करून खोलीबाहेर गेला. जाताना सारखा थँक्स म्हणत होता. जतीनच्या हाताखाली साधारण चारशे तरी लोक असतील. खरे तर एक दिनेश सोडून गेला तर काही फार मोठा परिणाम होणार नाही पण काही लोक ‘शून्य घाव शून्य तुकडे’सारखे आपले वर्तन ठेवून समोरच्याच्या समस्या जाणून त्यावर चांगला तोडगा काढतात. दोन्ही बाजूंचा, पक्षांचा फायदा करतात, अजातशत्रू बनतात. एखादी ठिणगी आग व्हायच्या आत विझवतात. अर्थात असे लोक विरळाच असतात समाजामध्ये. उलट आमच्यासारखे एक घाव दोन तुकडे करण्यास उत्सुक भरपूर सापडतील.

काही काही घरांमध्ये हे एक घाव दोन तुकड्याचे बाळकडू लहान वयापासूनच पाजले जाते. घरातील सामायिक शेतीवरून, आजोबांच्या काळापासून असलेल्या दागिन्यांवरून, वडिलांनी पै पै जमा करून तुम्हाला शिकवत असताना बांधलेल्या घराच्या वाटणीवरून, आईने कोणाकडे राहायचे इथपासून तिच्या औषधाचे बिल कोणी द्यायचे इथपर्यंत, आमच्या मुलांकडे नीट लक्ष देत नाही म्हणून शिक्षकांपासून ते घरकामवाल्या जुन्या आयापर्यंत, आम्ही आपली जिभेची कुऱ्हाड अगदी झकास चालवतो. समोरचा दुखावला जाईल, आपल्यापासून तुटला जाईल याची तसूभरही तमा बाळगत नाही. त्या क्षणी बोलण्यामध्ये आपली जीत, शेवटला शब्द आपला असावा हाच कसोशीचा प्रयत्न असतो आपला. मग भले एक घाव दोन काय तीन तुकडे होऊ दे,फिकीर नाही त्याची.

माझी एक चुलतबहीण आहे, खरे तर आमचे कुटुंब म्हणजे दोन तुकडे करण्यामध्ये पीएचडी मिळवणाऱ्या कुटुंबांमधील एक. जवळपास सगळेच गैरसमजामधून एमए करून मग दोन तुकडे करण्यात पीएचडी करतात. बऱ्याच वेळा ह्या काकांशी अबोला आहे का त्या आत्याशी, हे समजेनासे होते इतके कॉम्प्लिकेटेड प्रकरण असते. तर माझी चुलतबहीण जी सगळ्यात मोठी आहे आमच्या भावंडांमध्ये, काहीही असले तरी दर राखीला तिची राखी आणि आशीर्वादपर चिट्ठी येतेच येते. माझ्या स्वभावानुसार मी तिला वर्षवर्षं फोन करत नाही पण ती आमच्या घराण्यानुसार दोन तुकडे धोरण न अवलंबता शून्य घाव हेच धोरण ठेवून राखी अगदी नेमाने पाठवते. तसेच माझी एक मानलेली बहीण जी लहानपणी अगदी चिडखोर होती, सारखी भांडायची. आता मोठी झाली, लग्न झालं. मुलगी झाली आणि बघता बघता ती पोक्त झाली, स्वतःहून सारखा फोन करते, सर्व सणांच्या शुभेच्छा पाठवते. मी कधी चुकून तिला फोन केला तर उपरोधिक न बोलता अगदी प्रेमाने विचारपूस करते. मनात विचार येतो, अरे, लहानपणी चिडणारी आणि माझ्याच बरोबरीने मोठी होणारी ही बहीण, हिने परिस्थितीनुसार किती बदलले स्वतःला आणि आम्ही जसे लहानपणी होतो तसेच राहिलो. काहीसुद्धा पोक्तपणा नाही, तसेच थिल्लर वागणे आणि आल्यागेल्याशी एक घाव दोन तुकडे करत वागणे. लग्नाच्या आणाभाका घेणाऱ्या जोडप्यामध्ये असे काय होते नेमके की, प्रकरण घटस्फोटापर्यंत जाते? अर्थात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, परंतु जर हिंसा, छळ ही कारणे नसतील तर मग प्रकरण दोन तुकड्यांपर्यंत का जाते हा कुतूहलाचा प्रश्नच आहे. परंतु अती वादावादी हा एक कळीचा मुद्दा असतोच घटस्फोटाच्या कारणांमध्ये. असो हा एका वेगळ्याच चर्चेचा विषय आहे.

एक घाव दोन तुकडे हे चांगले असते, पण जेव्हा आपण एखादा निर्णय घेत असू आणि त्याला बरेच फाटे फुटत असतील तर मग झटपट निर्णयासाठी हे अस्त्र उपयोगी आहे, परंतु एखाद्या नात्याला, नातेवाईकाला किंवा मित्र, सहकाऱ्याला बाजूला करण्यासाठी काही हे योग्य नाही. आपण प्रत्येकच जण आपल्या आईच्या काळजाचा तुकडा असतो; पती, पत्नी किंवा प्रियकराच्या कलेजाचा टुकडा असतो. लहान बाळाला भरवताना पोळीचा तुकडा मोडून भरवतो, हे सारे तुकडे हे चांगलेच आहेत पण एक घाव दोन तुकडे काही बरं नव्हें.

- आशुतोष भालेराव, ठाणे
ashutosh.bhalerao@capgemini.com
बातम्या आणखी आहेत...