आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंगभान: संस्कृतीचा बहुमोल ऐवज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जीवनदृष्टीवर वा जगण्याबद्दल भाष्य करणाऱ्या बहुरूपी नाटकांना निव्वळ देवाणघेवाणीच्या व्यवहारात जोखता येत नाही. नफा वा तोट्याच्या पलीकडे नाट्यमहोत्सवांकडे संस्कृतीच्या समृद्धीत मोलाची भर टाकणारा बहुमोल ऐवज म्हणून पाहावे लागते...
वर्षाच्या शेवटी आणि नव्या वर्षाच्या सुरुवातीला नाट्यमहोत्सवांची धामधूम सुरू होते. बेंगलोरमध्ये होणारा रंग-शंकरा महोत्सव, केरळमधला त्रिशूरचा ‘इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल ऑफ केरला’, दिल्लीत होणारा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव, पुण्यातला विनोद दोशी नाट्य महोत्सव नाटक बघणाऱ्यांसाठी आणि नाटके करणाऱ्यांसाठी मोठीच पर्वणी ठरतात. महोत्सव फक्त नाटकं सादर करण्यापुरते नसतात. नवनवीन नाटके दाखवण्याबरोबरच नाट्यमहोत्सव रोजगार पुरवतात. व्यवस्थापन आणि संघटन कौशल्याचे वेगवेगळे नमुने दाखवतात. सामाजिकदृष्ट्या, नाट्य-महोत्सव एक प्रभावी समाजव्यवहार असतो. नाट्यक्षेत्रासारख्या ना-नफा तत्त्वावर चालविल्या जाणाऱ्या नाट्यसंस्थांच्या व्यवस्थापन कौशल्याचा इथेच कस लागतो. दैनंदिन कामकाजामध्ये महाविद्यालये आणि विद्यापीठांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय असतो. प्रॉडक्शन, मार्केटिंग, प्रोग्रॅमिंग आणि मॅनेजमेंटच्या विविध विभागांत महोत्सव सक्रिय असतात.

काही दिवसांच्या नाट्यमहोत्सवामागे वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या लोकांचे कष्ट असतात. आदल्या वर्षाच्या महोत्सवाची सांगता झाली, की येणाऱ्या वर्षातल्या महोत्सवाची तयारी सुरू होऊ लागते. महोत्सवाला वेगवेगळ्या भागातून येणारे प्रेक्षक, कलाकार आपापल्या भागात सुरू असणाऱ्या नव्या नाट्यप्रयोगांबद्दलची माहिती जाता-जाता आपल्या गप्पांमधून पुरवत असतात. फेस्टिवलचा सजग आणि तत्पर आयोजक मिळणाऱ्या माहितीला टिपून घेत असतो. काही वेळेला माहिती मिळत नसेल तर हवी ती माहिती मिळविण्यासाठी तो धडपडत असतो. दरवर्षी आयोजित होणाऱ्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंग महोत्सवांसाठी जगभरातल्या नाट्य संस्थांकडून अर्ज मागवून घेतले जातात. अर्ज मागवण्यासाठी विविध भाषांमधून प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्रांतून जाहिराती दिल्या जातात. बेंगलोर, पुणे वा त्रिशूर मध्ये होणाऱ्या फेस्टिवल्ससाठी फेस्टिवल आयोजक भारतात ठिकठिकाणी होणाऱ्या नाट्यप्रयोगांवर लक्ष ठेवून असतात. संस्थांकडून अर्ज मागवून घेतात आणि नाट्यकृतींना फेस्टिवलसाठी आमंत्रित करतात.

नाट्यमहोत्सवांसाठी काय दाखवले जावे, वा दाखवले जाऊ नये, यामागे प्रोग्रॅमिंग टीमची निर्णय क्षमता आणि त्यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरतात. प्रोग्रॅमिंग टीमने नेमलेल्या निवड समितीची दृष्टी महत्त्वाची असते. अर्थात, त्या भूमिकेला व्यापक असे संदर्भ पुरवण्याचे काम प्रोग्रॅमिंग टीमचेच असते, जे महोत्सवाच्या निर्मितीमागच्या भूमिकेत दडलेले असते. जगभरात नाट्यमहोत्सव आयोजित केले जातात. काही महोत्सव शेक्सपिअर, कालिदास वा गिरिश कर्नाड अशा लेखकांच्या कलाकृतींना समोर ठेवून मांडले जातात. काही महोत्सवांचे उद्दिष्ट राजकीय नाटके वा विविध भाषांमधील नाटके सादर करणे असू शकते. ज्यांच्या पाठबळावर महोत्सव उभे राहतात, त्यांच्या राजकीय विचारप्रणाली महोत्सवाला प्रभावित करत असतात. तर काही महोत्सव ‘नाट्यमहोत्सव’ असले, तरी ‘नाट्य’ या प्रकाराच्या व्यापक परिभाषेचा विचार करत नाटक, नृत्य, संगीत वा दृश्य माध्यमांच्या मिलाफातून आकाराला येणाऱ्या कलानुभूतीला प्राध्यान देऊन, आपल्या महोत्सवाची बांधणी करतात.

महोत्सवाची बांधणी म्हणजे, दररोज रात्री एक नाटक सादर करण्याएवढं सरळसोट काम नसतं. महोत्सवाच्या बांधणीमध्ये कार्यक्रमांची गुंफण महत्त्वाची असते. महोत्सवाच्या उद‌्घाटनाचे नाटक, सांगता करणारे नाटक आणि दोहोंमध्ये होणारी नाटके यांना जोडणारे एक सूत्र असणे महत्त्वाचे असते. या सूत्रांत महोत्सवाच्या बांधणीचे गमक असते. काही वेळेला, जोडणारे सूत्र असणारही नाही. पण, असण्या वा नसण्याचे भान महोत्सवाच्या आयोजकांना असणे महत्त्वाचे असते. महोत्सवाच्या विविध विभागांत काम करणाऱ्या घटकाला आयोजनामागची संकल्पनात्मक आणि कलात्म भूमिका स्पष्ट असणे महत्त्वाचे ठरते. या दृष्टीने, या वर्षी पार पडलेला ‘इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल ऑफ केरला’ मला महत्त्वाचा वाटतो. ‘बॉडी पॉलिटिकल’ या संकल्पनेला समोर ठेवून आकारलेल्या या फेस्टिवलच्या संकर व्यंकटेश्वरन या आर्टिस्टिक डिरेक्टरने आपली भूमिका फेस्टिवलच्या निमित्ताने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेत मांडली आहे. या महोत्सवात शरीर, राजकीयता आणि या दोहोतल्या संबंधातून आकाराला येणाऱ्या राजकारणाबद्दलचे रंगमंचीय चिंतन मांडले गेले. चेन्नईच्या चंद्रलेखा या गाजलेल्या नृत्यरचनाकाराने बांधलेल्या ‘शरीर’ नृत्यनाटिकेबरोबर मराठीतील ‘एफ १/१०५’ सारखी नाटके सादर झाली. मी लिहिलेले ‘एफ १/१०५’ हे नाटक सादर होण्याचा आनंद होत असतानाच, आपली नाट्यकृती समकालीन काळातील इतर कलारूपांबरोबर संवाद साधते आहे, याचे वेगळे समाधान होते. महोत्सवाबद्दल भाष्य करणारी पुस्तिका संकल्पनात्मक विचार पोहोचवणारे महत्त्वाचे माध्यम असते. जगभरातल्या फेस्टिवल्सनी प्रकाशित केलेल्या पुस्तिका सखोल अभ्यासाचा विषय ठरू शकतो.

विचारांची देवाणघेवाण करण्याची एक सक्षम जागा म्हणूनही महोत्सवांचा विचार होतो. काही वेळेला तिथे सादर केलेली नाटके बघणाऱ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण करतात. अलीकडे भुवनेश्वरला ‘भारत रंग’ महोत्सवाच्या सॅटेलाइट महोत्सवात पॉलिश नाटकावरून रंगमंचावर काय दाखवले जावे, आणि काय दाखवले जाऊ नये, यावर जोरदार चर्चा झाली. भारतीय संस्कृतीच्या नावाखाली आमच्याकडे असे दाखवलेले खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत दंगा करणारी प्रवृत्ती नेहमीची झाली असली, तरी नाटकाची ताकद लक्षात येण्यास भुवनेश्वरची घटना पुरेशी आहे. शिवाय, नाटकाच्या आगे-मागे होणाऱ्या कलाकारांच्या चर्चा, सेमिनारमधील त्यांचे वादविवाद महोत्सव-संस्कृती अधिकाधिक प्रगल्भ करत असतात.

जगभरात कलाक्षेत्राकडे पाहण्याची नजर बदलतेय. वातावरण बदलतेय, तसतसे नाट्यमहोत्सवांच्या मॅनेजर मंडळींचे काम वाढतेय, महत्त्वाचे ठरतेय आणि गुंतागुंतीचेही. सांस्कृतिक क्षेत्रात होणाऱ्या कामाचे पॅटर्नसही बदलत चालले आहेत. सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था आणि महोत्सव आज एका वेगळ्या टप्प्यावर उभे आहेत. दूरदर्शित्व ठेवले, तर या क्षेत्रात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. मॅनेजर्सना एका बाजूला दर्जा आणि संख्यात्मक वाढ यात ताळमेळ ठेवणे महत्त्वाचे आहे. इथे इतर अभ्यास-क्षेत्रातून येणाऱ्या मानव संसाधनांची गरज आहे. व्यापक दृष्टी ठेवून कार्य करण्याची गरज आहे.

महोत्सवांमधून सादर होणारी नाटके, नाटकांमधून केले जाणारे प्रयोग, विचारांची होणारी घुसळण हे महत्त्वाचे असले तरी महोत्सव आणि आर्थिक व्यवहार याची सांगड घालता घालता संबंधितांच्या नाकी-नऊ येतात. महाराष्ट्रातल्या नाट्यचळवळीविषयी बोलायचं, तर इथं नाटकाविषयीची धांदल कायमचीच सुरू असते. एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा इत्यादी. अर्थात, ज्यांनी दहा-एक वर्षांपूर्वीच्या नाट्यचळवळींना अनुभवलं असेल, त्यांना आजचं नाटक कुठं आहे, असा प्रश्न पडेल. पण, भारतीय संदर्भात पाहिलं तर मराठी नाटक ‘घडत असतं’ हे मानावं लागेल. उदाहरण सांगायचे तर, पुण्याची एक्स्प्रेशन लॅब किंवा नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा नाट्यविभाग. महोत्सव नसला तरी, सतत प्रयोग करण्याच्या धडपडीत असलेल्या या संस्था. एक्स्प्रेशन लॅबने वाईड विंग्ज या संस्थेच्या सहयोगातून नाट्यसत्ताक महोत्सव अलीकडे आयोजित केला होता. पुण्यातल्या नाट्यकृतींना एकत्र सादर करण्यातून सुरू झालेला असा उपक्रम पहिल्यांदाच पार पडत होता. खरं तर, स्थानिक पातळीवरील अशा महोत्सवांमुळे समाज आणि नाटकातील नातेसंबंध अधिकाधिक घट्ट होत जातील. पण, त्याला लोकांचा प्रतिसाद खूप कमी. अर्थात असेही असेल की, अशा महोत्सवांबद्दलची माहिती लोकांपर्यंत नीट पोहोचत नसेल किंवा महोत्सव आयोजनाची वेळ योग्य नसेल. शिवाय असेही असेल की, समाजाला पुण्यासारख्या ठिकाणी नाटकाशिवाय वेगवेगळ्या आकर्षणांचे पर्याय असतील.
माझ्या काही मित्रांचे असे म्हणणे आहे की, नाटकवाल्यांनी आमची कला म्हणून गळा काढू नये. त्यांच्या मते, महोत्सवांना इतका प्रेक्षक येत असेल, तर त्यांना धरून ठेवण्यासाठी आणि तो प्रेक्षक वाढवण्यासाठी त्यांनी आपली उद्योजकता वाढवायला हवी. पदरमोड करून नाटक केले तरच ते ‘खरे’ नाटक, असं काही वाटायचं कारण नाही. उद्योजकता हा विषय शिकवणारी एक व्यक्ती माझ्याबरोबर अलीकडे हिरिरीने वाद घालत होती. “नाटकवाले ‘प्रॉडक्ट’ डेव्हलप करतात की नाही?” मी म्हटलं “काय? प्रॉडक्ट?” त्या व्यक्तीने माझे काही ऐकून न घेता सुरू ठेवले. “अहो, तुम्ही नाटक डेव्हलप करता की नाय? तुम्ही ते दाखवायला आणता की नाय? तुम्ही तुमचे नाटक कुठे दाखवायचे, हे ठरवता की नाय? मग, नाटक आणि टुथ पेस्टचे प्रॉडक्ट यात काय फरक? कसलं काय, ते प्रायोगिक नाटकाला घेऊन बसलाय!” नाटकवाल्यांच्या उद्योजकतेबद्दल उपस्थित केले जाणारे प्रश्न पूर्णपणे टाकाऊ नसले तरी जीवनदृष्टीवर वा जगण्याबद्दल भाष्य करणाऱ्या बहुरूपी नाटकांना निव्वळ देवाणघेवाणीच्या व्यवहारात जोखता येत नाहीत. नफा वा तोट्याच्या पलीकडे नाट्यमहोत्सवांकडे संस्कृती-समृद्धीत मोलाची भर टाकणारा बहुमोल ऐवज म्हणून पाहावे लागते. तो निव्वळ एखादा इव्हेंट नसतो, तर सखोल आणि व्यापकतेच्या पायावर उभा राहणारा एक संस्कृती समृद्ध करणारा व्यवहार असतो. ज्ञान, समाज आणि कला यांचा मेळ घालत कलात्म समृद्धीचा दर्जा टिकवणाऱ्या नाट्यमहोत्सवांना प्रोत्साहन देण्यावर सजग समाजाने भर देणे म्हणूनच आवश्यक ठरते.
आशुतोष पोतदार
potdar.ashutosh@gmail.com