आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ओळखी\'चं नाटक (आशुतोष पोतदार)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रगती आणि विकासाच्या नावाने उदोउदो करताना आपल्या ‘असले’पणाच्या भिंती कासवाच्या पाठीसारख्या टणक होत आहेत. कला आणि संस्कृती व्यवहार याची सांगड ‘विकासा’बरोबर घातली नाही, तर येणारा काळ भयाण असेल, यात शंका नाही.
परंपरांचा शोध घेत नाटक करणं म्हणजे काय? भवतालातले बदल, ताणे-बाणे आणि निर्मिती प्रक्रिया यांचा अन्योन्य संबध कसा दिसून येतो? भारतासारख्या बहुसांस्कृतिक व्यवहारात नाटकीय परिभाषा कशी आकाराला येते? असे प्रश्न अलीकडच्या काळात अधिक तीव्र होत चालले आहे. कारण, हे प्रश्न ‘ओळखी’च्या व्यवहाराशी निगडित आहेत. मी ज्या काळात नाटक लिहितो, आणि बघतो, तो काळ ‘ओळखी’च्या स्फोटाचा काळ. त्यातल्या माहितीच्या स्फोटाची सुरुवात नव्वदीच्या काळात झाली. तेव्हापासून आजपर्यंतच्या प्रवासात आर्थिक उदारीकरण, सांस्कृतिक घुसळण आणि त्यातून जोशाने आलेल्या ग्लोबलायजेशनच्या बऱ्या-वाईट परिणामांचा एक परिपाक म्हणून ‘ओळखी’चे अनेक पदर नव्याने उलगडले जात आहेत...

विखंडित काळ म्हणून या काळाची भांडवलशाहीवादी व्यवहाराच्या आधारे ओळख वा अस्मितेच्या राजकारणाची चिकित्सा आजवर केली गेली. तुटलेपण, संभ्रम ही या काळाची वैशिष्टे मानली गेली. पण, त्याच्या सांस्कृतिक अंगाकडे आपल्याला लक्ष द्यावे लागणार आहे. सांस्कृतिक गटांच्या अस्मिता फक्त वैचारिक पातळीवर वा इंटरनेटवरच्या सोशल मीडियापुरत्या राहिल्या नाहीत. त्यांचे ‘खरे-खुरे’ अवकाश माणसांच्या आयुष्यावर प्रभाव टाकत आहेत. ओळखी विखंडित आहेत म्हणून त्यांच्याकडे ताकद नसते, असे म्हणणे धोक्याचे आहे.

विखुरलेल्या गटांचे लागेबांधे आणि आपापले गट तयार होतात. एका बाजूला जाती-पातीच्या नावावर गावापासून शहरापर्यंत असे गट अधिकाधिक पॉवरफूल होताहेत, तर दुसऱ्या बाजूला तथाकथित प्रोग्रेसिव्ह लोकांमधून भाषा, धर्म, राज्य अशा वेगवेगळ्या अस्मितांचे सोफिस्टिकेटेड गट तयार होताहेत. सांस्कृतिक राष्ट्रीयतेच्या मुद्द्याला एका बाजूला आव्हान दिले जात असतानाच, कडवटपणे त्याचे समर्थनही केले जात आहे. ओळखी द्राव्य असतात, असे मानले जात असताना, त्या जोखडी अस्मिता असतात, हेही जाणवते आहे.

चार वर्षांपूर्वी मी ‘पुलाखालचा बोंबल्या मारुती’ हे नाटक लिहिलं. अलीकडे औरंगाबादच्या पद्मनाभ पाठक यांच्या नाट्यसंस्थेने या नाटकाचे प्रभावी वाचिक सादरीकरण केले. या नाटकात, वेगवेगळ्या क्षेत्रातील कलाकार एका गावात रेसिडेन्सीच्या ‘संगत-सोबती’ नवनिर्मितीच्या शक्यता आजमावू पाहतात. कुणी कविता करतो, कुणी ढोलकी वाजवत गाणी म्हणतो, कुणी दृक‌्श्राव्य रूपात सादरीकरण करतो, तर कुणी ‘युगांत’सारखे मराठीतले महत्त्वाचे नाटक वाचतो. अशी ‘सर्जनशील’ प्रक्रिया सुरू असताना जगभर फिरणाऱ्या या कलाकारांचे त्या गावातल्या समाजाशी काय नाते आहे? ते गाव कलाव्यवहाराशी स्वतःला कसे जोडून घेते? या आणि अशा इतर मुद्द्यांचा शोध घेताना आपल्या परंपरा, आपली मुळे आणि नाटकासारखा कलाव्यवहार याची माझ्या परीने मी नाटकीय चिकित्सा केली.

‘पुलाखालचा बोंबल्या मारुती’ नाटकात सुपर हायवेमुळे मारुतीचं देऊळ नाहीसं होणार आहे. त्या गावची गोष्टय : कोणे एके काळी त्या गावावर दरोडा पडतो. चोर गाव लुटून नेतात. गावातल्या मारुतीच्या देवळामागे बसून लुटलेल्या मालाची मोजदाद करू लागतात. मारुती ते पाहतो. तो जोरात बोंबलून मोठा गिल्ला करतो. दरोडेखोर माल तिथेच टाकून पळून जातात. मारुतीराया गावाचे रक्षण करतो. बोंबल्या मारुती गावाचा तारणहार बनतो. गावागावांत असे मारुती आपल्याला दिसतात. आपण त्यांची श्रद्धेने सेवा करतो. बोंबल्या मारुती, सुपर हायवे, देवळाभोवती निवास करणारी मारुतीच्या रूपातील माकडं प्रतीकं बनतात. सर्जनासाठी वारसे आणि परंपरा ‘मटेरियल’ असतात. मानवी समाज आणि भवतालाला ते आरपार असतात. कलाकाराला आणि समाजाला व्यक्त करण्याची एक स्पेस अशी प्रतीकं देतात. बदलत्या समाज आणि अर्थकारणाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रतीकांचे काय होणार? अव्याहत चालत आलेल्या मिथकांना आणि परंपरागत वारशांना आपण कसे सामोरे जातो? गावागावांतून माणसांच्या मनात, समाजाच्या नसांत जिवंत असलेल्या परंपरा आणि श्रद्धा यांचे काय? आजूबाजूला असणाऱ्या गावांचे काय होणार? तिथल्या परंपरागत, स्वयंचलित व्यवसायांचे आणि स्वयंपूर्ण समाजाचे काय होणार? तिथल्या शेजाराचे, झाडांचे, शेतांचे काय? असे प्रश्न नाटकांमधून ऐरणीवर येतात.
आपल्या परंपरांचा पुन:शोध आपण रंगभूमीवर घेऊ शकतो. रंगभूमीवर आपल्या मुळांकडे आपल्याला परत जायला हवे, अशी विधाने सर्रास केली जातात. पण, आपली ‘मुळं’ म्हणजे काय? आपली मुळं म्हणजे, एखाद्या लोकशैलीच्या रूपात केलेलं नाटक? एखादी वारली चित्र शैली वा जुन्या काळात बांधलेला रंगमंच एवढ्याचपुरती आपल्यासाठी परंपरा असते का? एखाद्यासाठी आपली वाटली वाटणारी लोकपरंपरा दुसऱ्याला शोषणाचं रूप वाटू शकतं. लोकनाट्यातले गौरवलेले रूप एखाद्याला जवळचे वा भावनिकदृष्ट्या आपलेही वाटणार नाही. या अर्थाने, ‘आपली’ परंपरा, ‘आपली’ मुळं आणि नाटक असे नातेसंबंध अत्यंत गुंतागुंतीचे बनतात. माझे काही एक ‘लोकल’ असते, तसेच ते दिल्लीत राहणाऱ्या अमितेश ग्रोवर या दिग्दर्शक मित्राचेही असते, किंवा आसाममधल्या रामपूर या गावातून माझे नाटक बसवणाऱ्या शुक्राचार्य राभा याचेही असते. विविध ‘लोकल’ अवकाशात राहून आपला स्वतःचा आवाज शोधणे, यात गंमत असते. ‘लोकल’मधून मुळांचा शोध घेणे आणि त्यातल्या ‘आपल्या’ लोकपरंपरांचा शोध घेणे जितके आकर्षक वाटते तितकेच ते गुंतागुंतीचे आणि पेचात पाडणारे असते. लोकपरंपरांशी आज काहीच नाते नाही, असेही मी म्हणू शकत नाही. परंपरा माझ्यासाठी निव्वळ भूतकाळ नसतो. परंपरेशी असलेले नाते सृजनाच्या अनेक पातळ्यांवर असते. परंपरा म्हणजे तमाशा वा भजनेच का, असा प्रश्न मला पडतो. नव्याने अनेक परंपरा आकाराला घेत आहेत, त्याही ‘आपल्या’ परंपरा असू शकतात. आपली एकच एक ओळख नसताना ‘आपले’ म्हणजे काय असते? परंपरा जशाच्या तशा राहतात काय? त्यांचे प्रवाहीपण कसे बदलत गेले आहे आणि त्याच्याशी आपण कसे जोडून घेतो? हे मुद्दे महत्त्वाचे असतात. निव्वळ नाटकीय तंत्र म्हणून लोकपरंपरांना ‘वापरणे’ घेणे म्हणजे कृत्रिम वाटते. तशी उपयुक्ततावादी भूमिका ठेवण्यापेक्षा जे पाहिलेय, ऐकलेय ते मला कसे दिसते आणि ऐकू येते, हे महत्त्वाचे. ते निर्मिती प्रक्रियेशी सहज मिळतेजुळते असणे महत्त्वाचे असते.
एखाद्याने आपली ओळख सांगणे किंवा न सांगणे, हे दोन्हीही मुद्दे ‘राजकारणा’चा भाग मानले जाऊ लागले आहेत, अशा तिढ्यात आपण अडकलोय. तुम्ही तुमची ओळख सांगू लागला वा मागू लागलात तर तुम्ही संकुचित ठरवले जाता. कारण, यामध्ये ओळखीबरोबरच एका बाजूला, त्या ओळखीच्या इतिहासामध्ये असलेली शोषणाची (लपलेली वा उघड असलेली) रूपे येतात आणि दुसऱ्या बाजूला, ओळखीच्या नावाखाली ठिकठिकाणी होणारे भाषिक आणि ‘भूमिपूत्र’ राजकारणाचे हिंसक अंगही येते. दुसऱ्या बाजूस, तुमची ओळख नाही, असे सांगणे म्हणजे भवतालाशी बांधिलकी नसणे मानले जाऊ लागले आहे. या सर्वांतून व्यक्ती, समाज आणि संस्कृतीच्या बहुआयामी रूपांकडे दुर्लक्ष होते. भूमिकांचा सारासार आणि चिकित्सक विचार करण्याचे विसरून आपली ओळख ही आहे, किंवा आपली ओळख ही नाही, अशा तुकड्यात विचार आणि कृतीची मांडणी होत आहे. प्रगती आणि विकासाच्या नावाने उदोउदो करताना आपल्या ‘असले’पणाच्या भिंती कासवाच्या पाठीसारख्या टणक होत आहेत. भेदाची, उतरंडीची, शोषणाची आधीपासून तयार असलेली रूपे बळकट होतच आहेत, पण त्यात नव्या रूपांची भरही पडत आहे. कला आणि संस्कृती व्यवहार याची सांगड ‘विकासा’बरोबर घातली नाही, तर येणारा काळ भयाण असेल, यात शंका नाही. बदलत्या रूपांचे भान ठेवत स्वतःला आणि भवतालाला प्रश्न विचारणारी कला समाजाची आत्मिक गरज असणं म्हणूनच महत्त्वाचं आहे.

potdar.ashutosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...