आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिथकातील नाटकीयता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाटक जसे फक्त भाषिक नसते, तसेच मिथकही फक्त भाषिक नसते.
बदलत्या काळातील मिथक एखादे चित्र असू शकते, तसेच एखाद्या गावातील चौकही असू शकतो. काळाराम मंदिरात प्रवेश, किंवा दांडी मार्च ही आधुनिक काळातील मिथके मानली जातील. अशी मिथके मुक्तीचे गीत गात राहतील. तसेच, बाबरी मशिदीवर चढून ती नेस्तनाबूत करणारे काही तरुण, गुजरातमधल्या दंगलीची चित्रेे अशी काही छायाचित्रे मानवी हिंसा आणि शोषणाच्या बदलत्या रूपांची आपल्याला जाणीव करून देत राहतील...


नाटकाचा उगम कुठे आणि कसा झाला, याबद्दल काही ठाम विधान करता येत नाही. नाटक जेव्हा केव्हा कधी केलं जाऊ लागलं, तेव्हा त्याचं स्वरूप काय होतं, याबद्दलही आपण फक्त अंदाज बांधू शकतो. तो एक क्षण-काळ असेल जेव्हा माणसाची सुरुवात झाली; म्हणजे, ज्या क्षणाला माणसाला भूतकाळ, गतकाळ नव्हता, तो फक्त ‘आता’चा क्षण. तो क्षण प्रचंड आव्हानात्मक असणार. त्या क्षणाला माणसानं निर्मिती केली असेल, तिला आपल्याला नव-निर्मिती म्हणावी लागणार नाही, कारण ती नवीच असणार. त्या क्षणाला त्याचे सारे काही पणाला लागले असेल, आणि जे काही असेल ते आकाराला आले असेल. अशाच एका सृजन-क्षणाला नाटक घडण्याच्या शक्यतांतून नाटक उभे राहिले असणार.

उत्क्रांतीच्या सुरुवातीला माणसाने नाटक जन्माला घातले असेल. त्यामागच्या प्रेरणा काय असतील? उत्क्रांत होणाऱ्या माणसाला गमतीजमती करायच्या असतील, की आपल्या क्षमतेच्या बाहेर असलेल्या निसर्गाला हाक द्यायची असेल? जगण्याची विविध रूपे आपलीशी करणाऱ्या प्रचंड वारा-पर्जन्यवृष्टी-भूकंप-दुष्काळ-बदलती नैसर्गिक रूपे पाहून तो अचंबित झाला असेल, किंवा त्यांना तोंड देता-देता नाकी-नऊही आले असतील. खरे तर, निसर्ग आणि आपल्यातील संबधांचे आकलन करून घेण्यात त्याची निर्मितीक्षमता पणाला लागली असेल. अशाच, निर्मितीच्या क्षणी मिथकांचा जन्म झाला असणार.

मग, गोष्टी सांगण्यातून आणि ऐकण्यातून एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत मिथके पोहोचली. मिथके माणसाला स्वतःकडे आणि भवतालाकडे पाहायला अवकाश देतात. माणसाच्या आयुष्यात नाटकीयता आली ती, स्वतःकडे आणि भवतालाकडे डोळसपणे पाहण्यातूनच. दिवसभराचे काम संपले, हसणे-गाणे-रडणे झाले... गतक्षणाबद्दलची उजळणी करण्यासाठी ती व्यक्ती बसली असेल. केलेली उजळणी मनात घोळवणे असेल वा दुसऱ्याला सांगणे असेल. सारे नाटकीयच. मिथकेही नाटकीय.

रामायण, महाभारत, पुराणकथा, कथासरित्ससागर इत्यादीमधल्या मिथक कथांनी पिढ्यान््पिढ्या आपल्याला भुरळ पाडली आहे. किंबहुना, माणसाच्या गुंतागुंतीच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकणारी मिथके इथे आपल्याला भेटतात. जगभरातल्या नाट्यकलाकारांनी अशी मिथके आपल्या मांडणीसाठी आपलीशी केली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांनी १९०७मध्ये लिहिलेले ‘कीचकवध’ हे नाटक महाभारतातील विराट पर्वातील पांडवांच्या वनवास काळातील गोष्टीवर आधारित आहे. ‘कीचकवध’ लिहिले गेले तेव्हा कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांना लक्षात आले नसेल, हे नाटक राष्ट्रवादी विचार-प्रेरणांबद्दल एवढे चर्चिले जाईल. कीचक आणि सैरंध्री (द्रौपदी) अनुक्रमे इंग्रजी सत्ता आणि भारतीय जनतेचे विचार मांडणारे प्रतीक बनले. बल्लव (भीम) आणि कनकभट्ट (युधिष्ठिर) जहाल आणि मवाळ राजकीय पक्षांचे प्रतीक बनले. विराट राजाकडे वेष बदलून राहणारी सैरंध्री विराट राजाच्या कीचक या सेनापतीला आवडते. तिला तो नाटकशाळेत येण्यास सांगतो, पण स्वाभिमानी सैरंध्री कीचकाला नकार देते. दुखावलेला कीचक सैरंध्रीला त्रास देतो. त्याला मारण्यासाठी वल्लभाच्या रूपात भीम सज्ज असतो. पण, कनकभट्टच्या रूपातील युधिष्ठिर सुरुवातीला संयमाने घेण्यास सांगतो, आणि शेवटी त्याला कीचकाचा वध करण्याची परवानगी देतो. अशी काहीशी गोष्ट असणाऱ्या नाटकाने कीचकवधाला स्वातंत्र्यचळवळीचे मिथक म्हणून मांडून राष्ट्रवादी विचाराचे स्फुल्लिंग चेतवले. ब्रिटिश राजसत्तेने नाटकाच्या विषयातील राजकीय जहालपणामुळे ‘कीचकवध’वर बंदी घातल्याचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. ‘कीचकवध’नाटकाबद्दल इंग्रजी सत्तेला इतके वाटण्याचे कारण म्हणजे, महाभारतातील छोट्या-छोट्या गोष्टी मिथकांचे रूप धारण करून समाजाच्या विविध पैलूंवर प्रखर प्रकाश टाकू शकतात, याचे भान इंग्रजी सत्तेला होते. ज्या इतिहास आणि संस्कृतीचा रास्त अभिमान इंग्रज लोक बाळगत, त्यातील राजा इडिपस, अॅन्टिगनीपासून रोमियो-ज्युलिएटपर्यंत नाना तऱ्हेची मिथके कालातीत बनून राहिली आहेत. आपल्या भावाच्या मृत्यूनंतर त्याला सन्मानजनक अलविदा करण्यासाठी राज्यसंस्थेबरोबर युद्ध पुकारणारी ‘अ‍ॅन्टिगनी’ कुटुंबसंस्था आणि राज्यसंस्थेच्या संघर्षावर नेमके बोट ठेवते. अॅरिस्टोफेन्स लिखित ‘लायसिस्ट्राटा’ हे नाटक युद्धखोर पुरुषांना धडा शिकविण्यासाठी त्यांना ‘बेडरुम-बंदी’ करते. इसवीसनापूर्वीची मिथकावर आधारित ही नाटके आजही तंतोतत लागू पडतात, कारण मिथकांचे कालातीत असणे.

‘कथासरित्ससागर’मधल्या अशाच एका मिथकाने गिरीश कर्नाडांना १९७१मध्ये भुरळ घातली आणि आकाराला आले ‘हयवदन’ हे नाटक. देवदत्तची पत्नी पद्मिनीला आपला पती आणि त्याचा जिवलग मित्र कपिल धडावेगळे झालेले कालिमातेच्या मंदिरात दिसतात. देवदत्तची पत्नी पद्मिनी कालिमातेचा धावा करते. दोघांवरही वेगवेगळ्या कारणांसाठी प्रेम करणारी पद्मिनी कालिमातेला आपला पती परत देण्याची प्रार्थना करते. प्रसन्न होऊन कालिमाता पद्मिनीला धड आणि शरीर जोडायला सांगते. उत्साहाच्या भरात पद्मिनीकडून चूक होते. शरीर आणि मुंडक्यांची अदलाबदल होते. यातून उभा राहणारा मन आणि शरीरातील संघर्ष मिथकावर आधारलेले ‘हयवदन’ हे नाटक उभे करते. कर्नाडांसारखा श्रेष्ठ नाटककार मिथकातील फक्त गोष्ट घेऊन त्याचा विस्तार करत नाही, तर त्याला आधुनिक मानवाच्या व्यथा-वेदनांचे अधिष्ठान देतो. म्हणून, मिथके पुराणकथांच्या पल्याड जाऊन बदलत्या देवदत्त-पद्मिनी-कपिल नातेसंबंधांचा ठाव घेतात. ‘हयवदन’ हे नाटक मिथकाला भारतीय रूपाच्या कोंदणात सहज बसवते. भारतीय लोकपरंपरांचे पुरेपूर भान असलेले कर्नाड यक्षगान नाट्य-परंपरेतील भागवत, लोकनाट्यातील संगीत आणि मुक्त नाट्याविष्कार याचा पुरेपूर वापर करत नाट्य उभे करतात.

‘पुलाखालचा बोंबल्या मारुती’ हे नाटक मी मारुतीच्या एका मिथकाला मध्यवर्ती ठेवून लिहिले. जंगलाबद्दलच्या गोष्टी वाचताना जंगलातल्या माकडांबद्दल गोष्ट कुठेतरी वाचली होती. भयानक थंडी पडली की, घनघोर जंगलात मधोमध माकडे शेकोटी करून बसतात. पण, ती लाकडे पेटलेली नसतात. माकडांना त्यांची आतील ऊब असते. त्या उबेवरच ते स्वतःचे संरक्षण करत असतात. मला वाटले की, संस्कृतीचेही असेच असेल. संस्कृतीला स्वतःची अशी ऊब असेल, जी तिला तगवत असेल. मग, लिहिता लिहिता त्या गावाची गोष्ट लिहिली, ज्या गावात मोठा दरोडा पडतो. चोर लुटलेला माल मोजत मारुतीच्या मंदिरामागे लपून बसतात. मारुतीराया हे पाहतो, आणि तो जोरात बोंब मारतो. त्यासरशी, गावाला जाग येते. अशा तऱ्हेने मारुती त्या गावाचा तारणहार बनतो. पण, विकास आणि प्रगतीच्या नावाखाली त्या गावात प्रचंड मोठे बदल होतायत. त्या बदलात मोठा सुपर-हायवे बांधला जातोय. त्याच वेळेस, त्या गावाचे श्रद्धास्थान असलेली माकडे मरतायत, कारण जंगलतोड होतेय. मारुतीचे मंदिर हलवले जातेय. अशा बदलाच्या परिस्थितीत, आपल्या श्रद्धा, आपल्या परंपरा यांचे काय होते? समाजातील जात-धर्माची शोषण-व्यवस्था श्रद्धा आणि परंपरांकडे कसे पाहतात? मिथकांचा पुनर्विचार करताना, आपण बदलत्या समाज-संस्कृतीचा कशा तऱ्हेने ठाव घ्यायला पाहिजे? मुख्य म्हणजे, मिथकांच्या पुनर्विचारात कलेचे कोणते रूप आकाराला येते? अशा काही सर्जनशीलतेच्या मुद्द्यांबद्दलचे माझे आकलन मांडण्याचा प्रयत्न मी या नाटकातून केला आहे. या नाटकाचे आता ‘पुलतले हनुमान’ असे हिंदी भाषांतर झाले असून अलाहाबादमधून नाटक करणारा राजकुमार रजक त्याचे प्रयोग करतो. महत्त्वाचे म्हणजे, मारुतीरायाच्या मिथकाची ताकद इतकी आहे, की राजकुमार रजक आणि त्याच्या कलाकारांना हे नाटक जवळचे वाटते.

नाटक जसे फक्त भाषिक नसते, तसेच मिथकही फक्त भाषिक नसते. मिथक लिखित वा मौखिक स्वरूपाच्या पलीकडे जात असते. बदलत्या काळातील मिथक एखादे चित्र असू शकते, तसेच एखाद्या गावातील चौकही असू शकतो. अशी मिथकेही तेवढीच नाटकीय असतात, जेवढे एखादे नाटक. कारण, त्यांच्यातही प्रतीक बनण्याची क्षमता असते. नाशिकच्या काळाराम मंदिरात सर्वांना प्रवेश, चवदार तळ्याचा सत्याग्रह असो किंवा गांधीजींचा दांडी मार्च ही आधुनिक काळातील मिथके मानली जातील. अशी मिथके मुक्तीचे गीत गात राहतील. तसेच, बाबरी मशिदीवर चढून ती नेस्तनाबूत करणारे काही तरुण, गुजरातमधल्या दंगलीची चित्रे, जळून खाक झालेली रेल्वे अशी काही छायाचित्रे मानवी हिंसा आणि शोषणाच्या बदलत्या रूपांची आपल्याला जाणीव करून देत राहतील. रंगभाषेचे भान असणारे प्रत्येक जण अशा बदलत्या मिथक-व्यवहारांबद्दल जागरूक असतात.

मिथके चांगली वा वाईट नसतात. मिथके कलाकार घडवत असतो. मिथकांचे अर्थनिर्णयन समुदाय करत असतो. समाज आणि संस्कृती ‘घडवण्या’च्या शक्यता मिथके प्रदान करत असतात. परवा, पुण्यात अनुज देशपांडे आणि त्यांच्या मित्रांनी ‘जातीचे उच्चाटन’ हा आंबेडकरांनी लिहिलेल्या लेखाचे (मूळचे न केलेले भाषण) अभिवाचन केले. इतके गुंतागुंतीचे भाषण वयाच्या विशीतील, मोबाइलवर सदैव संचार करणारी पिढी कसे सादर करेल आणि आजचा समाज हे भाषण कसे घेईल, याबद्दल मला उत्सुकता होती. पण, त्या तरुण कलाकारांचे सादरीकरण पाहताना माझ्या मनात एक हात उंचावलेले आणि एका हातात राज्यघटना घेतलेल्या आंबेडकरांचा फोटो येत होता. शोषणाच्या विविध रूपांविरुद्ध आवाज उठवणारा, ही आंबेडकरांची आकृती आज एक ‘मिथक’ बनून राहिली आहे. मिथक जरी इतिहासात जन्माला येत असले, तरी फक्त इतिहासाचे नसते. वर्तमानकाळावर पसरून भविष्याचा ठाव घेणारे मिथक असते. एखाद्या मिथकावर विशिष्ट समाजाचे-देशाचे म्हणून आपण शिक्का मारू शकत नाही. जो जसा वाचेल तसे ते मिथक बनते. जी जशी घडवेल तसे ती त्याला रूप देऊ शकते. म्हणूनच, नव्या निर्मितीला मिथके नेहमीच खुणावत राहतील.
(potdar.ashutosh@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...