आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashutosh Potdar About Social And Culture, Rasik, Divya Marathi

तंजावर महालातले संस्कृती-भांडार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजाश्रयामुळे उत्तरोत्तर बहरत गेलेल्या नाट्यकलेने लेखन-वादन-गायन-नृत्य आदी कलांचाही प्रेमाने सांभाळ केला. आज ही कला प्रांतोप्रांतीचे कलाविश्व समृद्ध करत आली आहे. अस्सल भारतीयत्व जपलेल्या विविध प्रांतातल्या-राज्यातल्या व्यक्ती, संस्था आणि नाट्यसमूहांचा इतिहासाचे बोट धरून शोध घेणारे हे पाक्षिक सदर...

सतराव्या शतकात मराठे तंजावर प्रांतात पोहोचले. तंजावरच्या मातीत मिसळले. तंजावरने त्यांना आपलं मानलं. त्यांच्या काळात तंजावरला मराठी नाटक आकाराला आलं. हे मराठी नाटक ‘मराठी’ नसलं तरी मराठी होतं आणि खऱ्या अर्थाने बहुभाषक होतं. मराठी राजांनी महाराष्ट्रातून जाऊन तिथे ज्ञान धनाचा विकास केला.

राजा म्हटलं की, आपल्या समोर येतो राज्य करणारा, युद्ध करणारा, विजयी मिरवणूक काढणारा किंवा न्यायनिवाडा करून जनतेला सुखी ठेवणारा. राजाबद्दलची मिथकं अपार. पण, नाटकं लिहिणारा राजा, भाषांतरं करणारा राजा, वैद्यकशास्त्र, हत्ती सांभाळण्याचे शास्त्र वगैरेवर संशोधन करणारा राजा असं म्हटलं तर क्षणभर आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. राजा असण्याची नवी मानकं समाजासमोर उभी करणारे असे राजे जगभरात होऊन गेले. सरंजामशाही समृद्ध ज्ञानपरंपराही जोपासू शकते, याची आदर्शवत उदाहरणे ठेवून गेले. त्यांनी परंपरागत ज्ञानव्यवहार पुढे नेले, ते विविध दिशांनी विकसित केले आणि नव्या ज्ञान-व्यवहारांची पायाभरणी केली. अशाच राजांपैकी एक, तंजावरचे मराठी राजे. शिवाजी महाराजांप्रमाणेच त्यांच्या भावंडांनी दक्षिणेत सांस्कृतिक साम्राज्य उभे केले. ज्ञानाच्या क्षेत्रातील असामान्य कामगिरीने ‘साम्राज्य’ विस्तार म्हणजे निव्वळ आपल्या राज्याच्या सीमारेषा विस्तारणे नसते तर आपल्या प्रजाजनांच्या ज्ञानकक्षा विस्तारण्यातून सकल जनांना शहाणे करण्यातही त्यांचा वाटा असतो, याचे उदाहरण घालून दिले. त्यांनी तामीळ, तेलुगू आणि मराठी भाषेत पुस्तके लिहून घेतली. विविध भाषांमधील पुस्तके भाषांतरित केली. नाट्य, नृत्य संगीतादी कलांना भरभरून राजाश्रय देत विविध प्रांतातील कलाकारांना तंजावरला आपली कला सादर करण्यास पाचारण केले. यातून, ज्ञानाधारित साम्राज्य-विस्ताराची वेगळीच संकल्पना तंजावरच्या मराठी राज्याने आणली.

कावेरी नदीच्या समृद्ध खोऱ्यात वसलेले तंजावर म्हणजे भाताची खाण. तंजावरच्या रस्त्यालगतची भाताची रानं त्याची साक्ष देतात. एवढेच नव्हे तर, तांदळापासून तयार होणारे नानाविध खाद्यपदार्थही तंजावरच्या ‘भात-पणा’ची साक्ष देतात. तंजावरमधले १००० वर्षे वयाचे बृहदेश्वराचे, शंकराचे प्रचंड मोठे मंदिर म्हणजे द्रविड शैलीच्या मंदिरबांधणीचा एक उत्कृष्ट नमुना. राजराजेश्वर याही नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरातील ‘विमान’ गोपुरे आकाशाला भिडतात. अकराव्या शतकात बांधलेल्या या मंदिर प्रांगणातील एका गोपुराची उंची तब्बल २१६ फूट. पहिल्या चोल राजाने बांधलेल्या या मंदिरात एका दगडात कोरलेला १३ फूट उंचीचा आणि १६ फूट लांबीचा नंदी प्रांगणाच्या मधोमध उभा आहे. पिढ्यान‌्पिढ्यांसाठी हे मंदिर म्हणजे नाट्य-नृत्य-गान परंपरेतील कलाकारांसाठी कायमस्वरूपी छत्र बनून राहिले आहे. चोल साम्राज्यात कुरुवंजी नृत्य-नाट्याची याच प्रांगणात सुरुवात झाली. कुरुवंजी म्हणजे भटक्या बायांनी नृत्य-नाट्यातून आपल्या भवतालाचे केलेले वर्णन. पुढे त्याचे एक रूप भरतनाट्यम््मध्ये अाविष्कृत झाले. यातून नवनवीन नृत्य परंपरा आकाराला आल्या, परंपरांची घराणीही बनली. कलाकार इथे राहिले आणि त्यांची कला राजाश्रयाने समृद्ध झाली, बहरली. राजराजेश्वराच्या भिंतीवर चितारलेल्या नर्तक-नर्तिकांच्या मुद्रा शतकानुशतके भाविकांबरोबर संवाद साधत आहेत. इथला चौथा मंडपम तर वाद्य मंडपम म्हणून ओळखला जातो. इथे वाद्ये वाजवली जायची.

ही संगीत-नृत्य-नाट्याची परंपरा चोलांबरोबरच सोळाव्या शतकात नायकांनी पुढे नेली. तंजावरचे साम्राज्य नायक-काळात अजून केंद्रस्थानी आले. कर्नाटकातून तेलुगू भाषिक नायक तंजावरात आले. त्यांनी तामीळ साहित्याला प्रोत्साहन दिले. पहिला नायक राजा सेव्वप्पा नायक साम्राज्याची राजकीय पायाभरणी करण्यात गुंतला होता. पण तो तेवढ्यावरच थांबला नाही. सेवप्पा राजाने आपल्या दरबारात कवी एल्लप्पा नयनार, स्तोत्र-गायक आणि वाद्य/गायक मंडळांना आश्रय दिला. एवढेच नव्हे, तर आपल्या कारकिर्दीत, सोळाव्या शतकात, राजवाड्यामध्ये ‘संगीत महाल’ बांधून घेतला, जो आजही वापरात आहे. नंतर रघुनाथ नायक (१६०० ते १६३४) आणि विजयराघव नायक (१६३३ ते १६७३) या दोघांनी सरस्वती ग्रंथालयाची पायाभरणी केली. विजयराघव नायकाच्या काळात आज वापरात असलेली वीणा पहिल्यांदा वापरली जाऊ लागली. कर्नाटक संगीताचे "कोडिफिकेशन'ही याच काळात सुरू झाले. महत्त्वाचे म्हणजे, या काळातले कार्य फक्त पुरुष लोकांचेच नव्हते. रघुनाथ नायक राजाची पत्नी रमाभद्राम्बा महत्त्वाची कवयित्री. अवती-भवतीच्या लोकांवर तिने कविता रचल्या. मधुरावनी ही त्या काळातील आणखी एक कवयित्री. तिच्या अव्वल दर्जाच्या वीणावादनानंतर राजाने तिच्यावर सुवर्ण मुद्रा उधळल्या, अशी नोंद आहे. रघुनाथराजाने लिहिलेल्या रचना काळाच्या ओघात हरवून गेल्या. पण, यक्षगान परंपरेत बऱ्याच रचना सादर केल्या जात राहिल्याने समाजाच्या मुखातून या काळापासून त्या काळापर्यंत पसरत गेल्या. विजयराघवच्या काळात ‘पदम’ या काव्य/सादरीकरण-प्रकाराला मान्यता मिळाली. पदम म्हणजे, पल्लवी आणि अनुपल्लवीच्या रचनेमध्ये नृत्यासाठी बांधलेली छोटी सांगीतिक रचना. देवदासी नृत्य-परंपरेचा भाग बनलेली पदम रचना, परंपरेनुसार स्त्री-आवाजामध्ये गायली जाते. आजच्या भरतनाट्यम‌्मध्ये पदमचे महत्त्वाचे स्थान आहे.

सतराव्या शतकात मराठे तंजावर प्रांतात पोहोचले. तंजावरच्या मातीत मिसळले. तंजावरने त्यांना आपलं मानलं. त्यांच्या काळात तंजावरला मराठी नाटक आकाराला आलं. हे मराठी नाटक ‘मराठी’ नसलं तरी मराठी होतं आणि खऱ्या अर्थाने बहुभाषक होतं. मराठी राजांनी महाराष्ट्रातून जाऊन तिथे ज्ञान धनाचा विकास केला. चोल आणि नायक साम्राज्यांच्या वैभवशाली कारकिर्दीनंतर तितकीच वैभवशाली मराठा साम्राज्याची पायाभरणी एकोजी राजाने केली. शिवाजी महाराजांचे हे सावत्र भाऊ. एकोजींनी विजापूरच्या सुलतानाला नायकांचा पराभव करून तंजावर मिळवून दिले. त्यांचा भाऊ राजा शाहजी (१६८४ ते १७१२) हा मात्र मोठ्ठा रसिक. तो म्युझिक कम्पोझर होता. त्यांचे मराठीबरोबर तामीळ आणि तेलुगू भाषेवर प्रभुत्व. शहाजी राजांनी तंजावर प्रातांतील अमृतघटेश्वर या देवावर लिहिलेले "मृत्युंजयचिरंजीव' हे एक नाटक. त्यांनी सरस्वती महाल लायब्ररीत महत्त्वाचे दस्तऐवज आणले. सरफोजी राजांकडे (१७९८-१८२३) तंजावर आले, तेव्हा इंग्रजांचा अंमल भारतभर सुरू झाला होता. तंजावरचे राज्य म्हणायला सरफोजींकडे फक्त तंजावर होते. पण, कावेरी नदीकाठची सुपीक जमीन होती. ठरवलं असतं तर ते अय्याशीत जगले असते. पण नाही. पूर्वसुरींप्रमाणेच सरफोजी राजे रसिक, भाषातज्ज्ञ, म्युझिक कम्पोझर आणि संशोधक. फादर रेव डॅनिश मिशनऱ्याच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिक्षण. मराठा दरबारात कुरवंजी नाट्य सादर केले जात असे. तामीळमधील कुरवंजी नृत्य-नाट्यपरंपरा आपलीशी करून सरफोजी राजांनी ‘देवेंद्र कुरवंजी’ या नाटकातून भूगोल मांडला.

आजच्या मराठी नाटकाच्या मुळारंभाचा शोध घेत मी तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयापर्यंत पोहोचलो. सरफोजी महाल ग्रंथालय म्हणूनही ओळखले जाणारे हे आशियातील महत्त्वाचे ग्रंथालय. मध्ययुगीन कालखंडातील जी मोजकी ग्रंथालये आज टिकून आहेत, त्यामधील एक. ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारावरच त्यांच्या प्रकाशनाची विक्री होते. पुस्तके विकत घेतल्यानंतर तिथे बसलेले वृद्ध गृहस्थ जुन्या रजिस्टरमध्ये नोंद करून आपल्या हस्ताक्षरातील पावती देतात. ग्रंथालयाचे अजूनही पूर्ण संगणकीकरण झालेले नाही. पारंपरिक वेषात बसलेल्या ग्रंथालयातील सेवकांना ग्रंथालयातील पुस्तकांची आणि हस्तलिखितांची जागा तोंडपाठ आहे, हे सांगायलाच नको. संस्कृत, मराठी, तेलुगू, तामीळ आणि मोडी लिपीत असलेली संगीत-नाट्य-नृत्य-संस्कृती विषयातील हजारो हस्तलिखिते वाचनालयाच्या दुर्मीळ संग्रहाची पुरेपूर साक्ष देतात. वेगवेगळ्या काळातल्या राजांचे दैनंदिन व्यवहार आपल्याला इथे समजून घेता येतात. उदाहरणार्थ, विजयराघव नायक राजाच्या काळातील राजाच्या एका वेळच्या जेवणातल्या अठरा पदार्थांची (ज्यात १९ स्वीट डिशेस आहेत) यादी इथल्या दस्तऐवजांमध्ये मिळते. दुसरे सरफोजी महाराज एकदा काशीच्या प्रवासाला गेले. तिथे देव-देव करत बसले असते तर तंजावरमधले ज्ञानभांडार आकाराला आले नसते. तिथे त्यांनी अनेक पंडितांना जुनी-पुराणी संस्कृत आणि इतर भाषांमधील हस्तलिखिते मिळविण्याच्या कामाला लावले. हस्तलिखितांच्या नकला करून घेण्यासाठी आणि ती विकत घेण्यासाठी पैसे पुरविले. मिळविलेले भांडार तंजावरच्या जनतेसाठी सरस्वती ग्रंथालयातून उपलब्ध करून दिले. इथल्या हस्तलिखितांचा पहिला कॅटलॉग सरफोजींच्या सांगण्यावरून १८०१मध्ये सदाशिव भट्टांनी केल्याची नोंद आहे. या लायब्ररीतला तो पहिला कॅटलॉग. दुसऱ्या सरफोजी महाराजानंतर लायब्ररीमधील संपदा वाढली नसली तरी सरस्वती लायब्ररीने संशोधन ग्रंथ, नाटकांचे प्रकाशन केले आहे. गेल्या शतकात प्रकाशित झालेल्या संस्कृत, मराठी, इंग्रजी, तामीळ, तेलुगू पुस्तकांच्या यादीवर फक्त नजर टाकली तरी सरस्वती महालातील कार्याची व्याप्ती ध्यानात येते. आधुनिक भारतात भाषा-वार प्रांतरचना झाल्यावर तंजावरचे हे मराठी वैभव प्रशासकीय फितीत अडकल्यासारखे तामिळनाडू-महाराष्ट्रामध्येच कुठेतरी लटकलेय, असे वाटते. वैभवशाली मराठ्यांचे तंजावरमधल्या महालातले संस्कृती-भांडार महाराष्ट्रातसुद्धा डोक्यावर घेतले गेले पाहिजे.