आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रगल्भ रंगभाषेचे धनी (आशुतोष पोतदार)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशी परंपरेच्या नावाने टाळ्या घेणं नेहमीच सोपं असतं, मात्र पॉप्युलिस्ट होणं टाळत, हेनसम कन्हायलाल यांच्याप्रमाणे रंगभाषेची मूलभूत मांडणी करणं नेहमीच अवघड ठरतं...
नाटक जसे लेखकाचे असते तसे ते नटाचेही असते. उत्कृष्ट संहिता, दिग्दर्शकाचे विचार, त्याची सौंदर्याची जाण. हे सगळे असू शकते. पण, ते मांडण्यासाठी रंगमंचावरला कलाकार तेवढाच सक्षम असणे महत्त्वाचे असते. विशेषतः नट अनन्यसाधारण महत्त्वाचा ठरतो. कन्हायलाल यांचे दिग्दर्शकीय कर्तृत्व समोर येण्यात त्यांची पत्नी सावित्री देवी यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. मणिपुरी रंगभूमीवर ऑपेरा नाटकात अभिनय करत सावित्री देवी पन्नासच्या दशकात लोकप्रिय झाल्या. पुढे त्या कन्हायलाल यांच्या नाट्यचळवळीचा आणि आयुष्याचा भाग बनल्या. संगीत नाटक अकादमीपासून पद्मश्रीपर्यंत वेगवेगळे मानसन्मान प्राप्त सावित्री देवींचे कार्य महत्त्वाचे ठरते.

आपल्याकडे ‘मातीतलं नाटक’ असा सर्रास उल्लेख केला जातो, पण, मातीतलं नाटक म्हणजे काय, हे मात्र समजून घेतलं जात नाही. ‘आपल्या’ परंपरा, देशी परंपरा असे म्हणत ‘लोक-परंपरा’ दाखवून नेहमी टाळ्या मिळविल्या जातात. हे सगळ्यात सोपं असतं. पण, परंपरांचं भान ठेवून काहीएक मांडणी करायची वेळ आली, की गाळण उडते. कारण, पॉप्युलिस्ट बोलणं नेहमी सोपं असतं, पण मूलभूत मांडणी नेहमीच अवघड. या पार्श्वभूमीवर रंगभाषेची मूलभूत मांडणी करत भारतीय रंगभूमीला नवा आयाम देणारे मणिपूरचे हेनसम कन्हायलाल आधुनिक भारतातील एक महत्त्वाचे दिग्दर्शक, नाटककार आणि प्रगल्भ नाट्य-कार्यकर्ते.
कन्हायलाल यांचे काही दिवसांपूर्वी मणिपुरात निधन झाले. विसाव्या शतकातील साठ-सत्तरच्या दशकापासून अव्याहत नाटक करत जगणारे कन्हायलाल नाटकाचे एक गाव होते. १९६९च्या जुलैमधे इम्फाळ शहराबाहेर ‘कलाक्षेत्र’ या नाट्यसंस्थेची उभारणी त्यांनी केली. ‘कलाक्षेत्र’ फक्त नाट्यसंस्था नव्हती. म्हणजे, नाटक करून जगण्याचे स्रोत शोधण्यापुरती नुसतीच नाट्यसंस्था नव्हती, तर नाटक, समाज आणि संस्कृतीला जोडणारा एक दुवा म्हणून ‘कलाक्षेत्र’ उभे राहिले आणि जगभर पोहोचले होते.

नाटकाच्या परंपरा आपला प्रभाव ठेवून वाहत्या असतात. त्यांचे किनारे बदलत असतात. नाटक पिढीगणिक विकसित होत जाते. नाटक हे बसविण्यापुरते आणि दाखविण्यापुरते नसते. नाटक उभे राहण्यासाठी काय मटेरियल लागते, ते कसे उभे राहते, नाटकातून प्रेक्षक आणि समाजाशी कोणता संवाद होतो, अशा विविध बाबींचा विचार करत कन्हायलालनी आपली नाट्यकला आकाराला आणली होती. कन्हायलालनी दिग्दर्शित केलेली ‘तमनाला’, ‘काबूई-केईऑईबा’, ‘पेबेट’, ‘लाईगी माचसिन्ग’, ‘मेमॉईर्स ऑफ अाफ्रिका’, ‘मिगी शारंग’, ‘कर्ण’, ‘द्रौपदी’, ‘डाकघर’, ‘उचेक लँगमेईडाँग’ ही काही लक्षवेधी नाटके.

कन्हायलाल लिहितात- ‘माझ्यासाठी सहज असते ते म्हणजे, पात्राच्या ‘आतचा’ शोध घेणे. माझा शोध मानसिक तळ गाठण्यापेक्षा, पात्राच्या आत ‘इतर’ असे काय लपले आहे, हा असतो. या ‘इतर’पणाच्या आतल्या अवस्थेचा ठाव घेत, नट ‘इतर’पणात शिरत अभिनयाचा सर्जनशील शोध घेतो. सुरुवातीला आपली शोधक वृत्ती आतल्या अवस्थेचा शोध घेण्यास मदत करते. पुढच्या टप्प्याला, नटाच्या खेळकर आणि चिंतन-वृत्तीतून पात्राच्या भावनिक विश्वाचा ठाव घेतला जातो आणि ते पात्र जिवंत होते. इथे पात्राचे आतले जग आणि नटाचे आपले म्हणणे समोर येते.’ एखादा नाट्य-दिग्दर्शक चिंतनाची कोणती प्रगल्भ अवस्था गाठतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून कन्हायलाल यांच्या या मांडणीकडे पाहता येते. पात्रांच्या ‘आतचा’ शोध म्हणताना कन्हायलाल कोणतीही रोमँटिक वा दिग्दर्शकाच्या सायकॉलॉजिकल ट्रेनिंगची बात करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने एखाद्या पात्राचा शोध भवतालात लपलेल्या सांस्कृतिक-सामाजिक चिन्हांचा शोध असतो. त्यामुळे, कन्हायलाल कधी उगीच व्यक्तिगत बोलत बसलेले, मी ऐकलेले नाही. घटना-प्रसंगांची उजळणी ते करत बसत नाहीत. व्यक्तिगत घटना-प्रसंग व्यापक सामाजिक आणि कलात्म भान देतात. म्हणून, त्यांची नाटके फक्त त्यांच्या संस्थेपुरती राहात नाहीत, तर त्यापलीकडचे ते नाटक मणिपुरी आणि मानवी समाजाचे बनते. कन्हायलाल महत्त्वाचे ठरतात, कारण ते समाज-समुदायाच्या आठवणी आणि त्यांचा भूतकाळ समोर आणतात. नटांच्या शारीर-भाषेवर आणि रंगमंचीय प्रेरणांवर कलात्म काम करताना काळ आणि संस्कृतीचे भान ते ठेवतात. त्यांची नाटकं संस्कृतीतून आलेल्या आदिबंधातून उभी राहतात.
पण, संस्कृतीचा शोध घेताना कन्हायलालांची नाटके भूतकाळाची अंधभक्ती करत नाहीत. न पेक्षा गतकाळ आणि परंपरांना प्रश्न विचारतच, नाटक उभे राहते. त्यामुळेच, त्यांच्या ‘कर्ण’ नाटकात कर्ण आपल्या आईला म्हणतो, की मला माझ्या इच्छेप्रमाणे काही करता येत नाही, कारण माझे असणे महर्षी वेद व्यासांनी निर्माण केले आहे. त्यांचाच माझ्या असण्या-नसण्यावर अधिकार आहे. एका बाजूस, ‘कर्ण’ जात-व्यवस्थेवर टोकदार भाष्य करतो; तर दुसऱ्या बाजूस, मणिपूरसारख्या राज्यांच्या ‘भारतीय’ असण्यावरही भाष्य करतो. देशाच्या उत्तर-पूर्व भागातील मणिपूर, मिझोरामसारख्या ‘सात बहिणी’ म्हणून स्वतःची ओळख असणाऱ्या राज्यांबरोबर भारतीय राज्यव्यवस्था आणि लष्कराचे असणारे संबंध अधोरेखित करतो. भारतीय लष्कराविरुद्धचा इरोम शर्मिलाचा अनेक वर्षांचा उपवास का महत्त्वाचा ठरतो, हेही आपल्याला इथे समजून येते.

कन्हायलालनी दिग्दर्शित केलेले आणि सावित्री देवींच्या अभिनयाने गाजलेले ‘द्रौपदी’ हे नाटक तर आधुनिक भारतातील शोषित समाजाला आवाज देणारे महत्त्वाचे नाटक ठरले. कन्हायलालनी ‘बळी’पणाची पिळवटून टाकणारी नाट्यकथने उभी केली. मी पाहिलेली ‘कर्ण’, ‘द्रौपदी’, आणि ‘डाकघर’ ही त्याच मालिकेतील नाटके. वेगवेगळ्या सामाजिक संदर्भात ‘बळी’पणाचे विविध आयाम ही नाटके मांडतात.
‘सामाजिक नाटक’ म्हणून काही एक करू पाहात असताना, हातात झेंडे नाचवत घोषणाबाजी करत सर्वसाधारण प्रचारकी नाटक उभे राहते. लांबलचक भाषणांच्या, कर्कश्य आवाजातून आपली मते मांडली जातात. पण, अशा तऱ्हेने मते मांडण्यासाठी राजकीय नाटक नसते. आपली वैचारिक भूमिका दामटून मांडण्यात नाटक नसते, तर सशक्तपणे रंगभाषेत सादर करण्यात नाटकाचे राजकीयपण असते.
थोर नाटककार-दिग्दर्शक बर्टोल्ट ब्रेख्त आणि जर्जी ग्रोटोवस्की यांच्या विचार आणि नाट्यकर्तृत्वाचा प्रभाव कन्हायलाल यांच्या नाटकांवर पडलेला दिसतो. एका बाजूला, ब्रेख्तच्या नाटकांतून दिसणारी बंडखोरी आणि शोषितांबद्दलची कणव, तर दुसऱ्या बाजूला ग्रोटोवस्कीच्या रंगभूमीतून येणारे नटांच्या वाचिक आणि कायिक रंगभाषेबद्दलचे भान आत्मसात करत कन्हायलाल आपली रंगभाषा मांडताना दिसतात. जवळपास पंधरा नाटकांचे लेखन, पस्तीस नाटकांचे दिग्दर्शन, राज्यस्तरीय, केंद्रस्तरीय, तसेच संगीत नाटक अकादमीकडून मिळालेले मान-सन्मान कन्हायलाल यांचे नाट्यक्षेत्रातील कार्य दर्शवितात. पर्यायी रंगभूमीचा विचार मांडून त्याची नवी परिभाषा मांडणाऱ्या कन्हायलाल यांना मिळालेले मानसन्मान पाहून आपण थक्क होतो. कन्हायलालनी नाटक-प्रयोगशाळेचा ‘संशोधन-रंगभूमी’चा विचार मांडला, तो ‘वर्क-इन-प्रोग्रेस’ सादरीकरणातून. त्यांच्या सफाईदार सादरीकरणांना ‘वर्क-इन-प्रोग्रेस’ म्हणत असताना त्यातले संवादीपण अधोरेखित होत असते. स्थानिक संदर्भातून रंगभाषा आकाराला येत असताना, ती फक्त भौगोलिक चौकटीत अडकून राहात नाही, तर तिला वैश्विकतेचे परिमाण लाभलेले असते. कन्हायलालनी ‘मणिपुरी’ नाटक करताना त्याची वैश्विक आवाहकता कायम ठेवली, हे महत्त्वाचे. म्हणूनच, महाश्वेतादेवींच्या ‘द्रौपदी’ या कथेवर आधारित नाटकातील रंगभाषेमुळे ते ‘मणिपुरी’ नाटक जगभरातल्या शोषित समाजाचे नाटक ठरले. त्यांच्या नाटकातून होणारा संवाद फक्त नाटक पाहायला येणाऱ्या पारंपरिक प्रेक्षकवर्गापुरता अपेक्षित नसे, तर तो नाट्यकलेला कवेत घेणाऱ्या समाज-संस्कृतीबरोबरचा संवाद कन्हायलालना अभिप्रेत असे.

याच भूमिकेतून त्यांनी इम्फाळमधील बाजारात काम करणाऱ्या शंभर स्त्रियांना घेऊन ‘न्युपी लॅन’ (मणिपूरच्या बायकांचे युद्ध) हे नाटक उभे केले. पुढे दक्षिण मणिपूरमधल्या उंमाथेल या खेडेगावातील लोकांना घेऊन काम केले. शिवाय, आदिवासी समाजातील कलाकारांबरोबर काम करत वेगळी रंगभाषा मांडली. कन्हायलाल आणि त्यांचे नाटक हा अमूल्य ठेवा आहे. नाटक आणि संस्कृतीशी जोडू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी, इम्फाळ शहराबाहेर वसलेले ‘कलाक्षेत्र’ म्हणजे तीर्थस्थळ बनले आहे. या तीर्थस्थळाने, अर्थात, बऱ्याच ठिकाणी अशी तीर्थस्थळं उभी राहतात, वाढतात आणि काही काळानंतर दिसेनाशी होतात. एखादे तीर्थक्षेत्र सरकारी मदतीवर उभे राहते. एखादे फंडिंग एजन्सीजच्या पैशावर. कधी कधी नाटकांचा प्रेक्षक वाढल्यामुळे त्या नाट्यसंस्था तीर्थस्थळे झाल्यासारख्या वाटतात. तर कधी कधी फेसबुकवर एखाद्याच्या नाटकांच्या जाहिराती खूप भाव खाऊन जातात, म्हणून त्या दिग्दर्शकाच्या नाट्यसंस्था तीर्थस्थळे झाल्यासारख्या वाटतात. सगळंच ठीकय! पण, कन्हायलालच्या ‘कलाक्षेत्रा’ने पुढच्या पिढ्या घडविल्या आहेत. हेनसम टोम्बा, सुक्राचार्य राभा, विद्युतजीत चक्रवर्ती असे नव्या पिढीतले दिग्दर्शक त्यांच्या तालमीत तयार झाले आहेत.

कन्हायलाल यांच्या सकस दिग्दर्शनातून आणि सावित्री देवी यांच्या समृद्ध अभिनयातून उभी राहिलेली काही नाटके मला पाहायला मिळाली. काही वर्षांपूर्वी सावित्री देवींच्या ‘हिंसा आणि नाटक’ या विषयावरील कार्यशाळेत सहभागी होऊन त्यांना जवळून पाहिले. ‘कलाक्षेत्र’ला भेट देऊन कन्हायलाल यांच्या कार्याची ओळख, ते उभे करत असलेले थिएटर मी जवळून पाहिले. आता त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या गप्पा, त्यांनी माझ्या लेखनाबद्दल दाखवलेली रुची आणि ‘कलाक्षेत्रा’त लेखन कर, असे सांगत दिलेले प्रोत्साहन हे सगळे तीव्रतेने आठवले, म्हणूनच कन्हायलालांचं मरण माझ्यासाठी वेदनादायी ठरले. कारण ते स्वतःच एक भली संघटना, विचार आणि सौंदर्यतत्त्व होते. त्यांचं नसणं, म्हणजे या सगळ्याचं नसणं...
बातम्या आणखी आहेत...