आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाटक कशाला शिकले पाहिजे ?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘रंगभान’ नियमितपणे वाचणारे एक वाचक माझ्याशी बोलत होते. नाटक हे इतके बहुरूपी, बहुआयामी आणि बहुशाखीय आहे. वेगवेगळ्या काळात नाटकाबद्दल बोलले जाते. तर मग नाटकाविषयीचे शिस्तशीर असे शिक्षण कसे दिले जाते? नाटकाचे शिक्षण द्यायलाच पाहिजे का? असे त्यांचे प्रश्न? दिवसभर आपले कामधंदे करून बरं वाटतं, म्हणून नाटकाच्या तालमीला जाणारे असे म्हणूही शकतील, की कशाला पाहिजे नाटकाचं शिक्षण? आम्ही कुठे गेलोय कुठल्या शिक्षणाला, तरी करतोच की नाटक! हा एक प्रकार. पण नाटक म्हणजे, नाटकाचा एखादा शो करणे आणि त्यासाठी अभिनय, एवढ्यापुरतेच नसते. नाटक ही ज्ञानशाखा, हे मान्य करत असताना त्यामध्ये शिस्तशीर शिक्षण महत्त्वाचे ठरते. ते शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या नाना तऱ्हा आहेत. वेगवेगळ्या काळात नाट्यशिक्षण वेगवेगळ्या रूपात सिद्ध होत आले आहे. नाट्यसंहिता ते प्रयोग या प्रवासाचे निरीक्षण, आकलन आणि अध्ययन करण्याचे विविध मार्ग आज जगभरात उपलब्ध आहेत. पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर नाट्यविषयक शिक्षण आणि नाट्यप्रशिक्षण दिले जाते. कोणती विद्यापीठे कोणत्या पदव्या देतात, हे सांगण्याचा या लेखाचा उद्देश नाही. तर, व्यापक अर्थाने नाट्यविषयक शिक्षण आणि नाट्यप्रशिक्षण याविषयीची या लेखात चर्चा आहे.

नाटक शिकविणे आणि शिकणे म्हणजे, नाटकाच्या संहितेचा एक साहित्यकृती म्हणून अभ्यास असतो. विजय तेंडुलकर, दत्ता भगत, अ‍ॅन्टन चेकॉव अशा नाटककारांच्या नाट्यसंहितांचा ‘साहित्य-अभ्यास’ केला जातो. यामध्ये नाटकातील पात्रे-विषय, नाटकातील विविध घटकांवर पडलेले वेगवेगळे प्रभाव आणि त्यातून बदलत गेलेले नाट्यरूप अशा तऱ्हेचा हा अभ्यास असतो. कविता किंवा कादंबरीपेक्षा नाटकाचे रूप वेगळेच असल्याने त्यात संहितारूपाबरोबर रंगमंचीय रूपाचं भान असणं अपेक्षित असतं. शेक्सपिअर किंवा धर्मवीर भारतींच्या नाटकांचे अध्ययन करताना त्यांचे नाटक रंगमंचीय रूपात पाहण्याची दृष्टी अभ्यासकाला असावी लागते. त्या दृष्टीने, नाटक वाचताना संहितेतील रंगसूचना, प्रकाश वा ध्वनी योजनेबद्दलच्या सूचकतेकडे सजगतेने पाहणे महत्त्वाचे ठरते.

लिखित साहित्य म्हणून नाटकाकडे पाहात असतानाच, ते रंगमंचीय रूप म्हणून अभ्यासण्यासाठीच्या ज्ञानशाखा आकाराला आल्या आहेत. दिल्लीचे राष्ट्रीय नाट्य विद्यालय, पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्र वा फ्लेम युनिव्हर्सिटी अशा ठिकाणी नाटकाच्या रंगमंचीय अाविष्करणाचे शिक्षण दिले जाते. इथे नाटक उभे करण्याचे नाट्यशिक्षण दिले जाते. यामध्ये, नाटकातील अभिनय, नाट्यदिग्दर्शन, नाटकासाठी ध्वनी-प्रकाश-नेपथ्य योजना, नाट्यप्रयोगाची मांडणी अशा घटकांचा समावेश असू शकतो.

नाट्यप्रशिक्षणाकडे ‘थिएटर इन मेकिंग’ या प्रक्रियेचा भाग म्हणून पाहिले जाणे महत्त्वाचे असते. नाट्यप्रशिक्षणादरम्यान निर्माण केलेल्या प्रयोगाकडे दिग्दर्शकीय कौशल्य किंवा दिग्दर्शकाची नाटक बसवण्याची स्वप्नपूर्ती वा नटांची स्वतःला रंगमंचावर प्रदर्शित करण्याची इच्छापूर्ती एवढ्यापुरते पाहता येणार नाही. त्या प्रशिक्षणामध्ये नटाला तयार करणे (त्याचा/तिचा आवाज, शारीरिक हालचाली-भाव इत्यादी), नट आणि नाटकीय सामग्री वापरण्याचे (प्रकाशयोजनाकार, स्थळरचनाकार वगैरे) नाट्यअवकाशाविषयीचे, नाट्यकृतीची चिकित्सा करण्याचे भान विद्यार्थी-शिक्षक आणि समाजाला यावे, अशी सार्थ अपेक्षा कष्टपूर्वक उभारलेल्या नाट्य-प्रयोगातून असते. अर्थात, असे भान यावे, यासाठी नाट्यप्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. त्यातून संस्था शिकत असतात, स्वतःच्या प्रशिक्षण प्रारूपांकडे चिकित्सकतेने पाहतात, वेळोवेळी त्यात बदल करतात. यामुळे, शिक्षण घेणारे विद्यार्थी नाट्यकलेबद्दल अधिक सजग होऊन शिक्षण घेण्याच्या नव्या शक्यता निर्माण होतात. आज भारतातील नाट्यप्रशिक्षण प्रस्थापित होऊन बराच काळ उलटून गेला आहे. दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ या प्रख्यात नाट्यसंस्थेची स्थापना होऊनही आता ५० वर्षे होऊन गेली आहेत. नाटक करणाऱ्यांच्या पिढ्या बदलत गेल्या, काळ बदलत गेला, तशी नाट्यप्रशिक्षणाची तंत्रे बदलली आणि पद्धतीही बदलल्या आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या, शैक्षणिक बाबी बदलल्या तसे नाट्यप्रशिक्षणही बदलत गेलेले आपल्याला दिसते. चित्रपट, टेलिविजन, इंटरनेटवरील करमणूक माध्यमे यांच्या प्रसाराबरोबर नाट्यप्रशिक्षणातील संधी वेगाने वाढत चालल्या आहेत.

नाटकाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे समाजशास्त्रे, विज्ञान-तंत्रज्ञान आणि बदलत्या समाज-संस्कृतीशी असलेले थेट नाते. नाटकाचा साहित्य अभ्यास आणि रंगभूमीविषयक शिक्षण याबरोबर त्याचा विविध ज्ञानशाखांशी असलेला अन्योन्य संबंध तपासण्यास आता महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे. इथे, विशिष्ट नाटकांचे प्रयोग विशिष्ट ठिकाणीच का होतात? नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकवर्गाची सामाजिक-अर्थिक-सांस्कृतिक पार्श्वभूमी काय आहे? विशिष्ट पार्श्वभूमीतून येणाऱ्या प्रेक्षकांचे नाटकाचे पाहणे कसे असते? ऐतिहासिकदृष्ट्या कोणती विशिष्ट नाटके लिहिली गेली? त्या काळच्या नाट्यसंस्थांचे आर्थिक आणि सामाजिक व्यवहार काय होते? वेगवेगळ्या काळात नाट्यकलाकारांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जात होते? अशा प्रश्नांना समोर ठेवून नाटकाविषयीचे अध्ययन केले जाते. या अध्ययनात नाटकाच्या संस्कृती-व्यवहाराचे आकलन करून घेतले जाते. दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठ किंवा हैद्राबाद विद्यापीठांतील नाट्यविभाग अशा तऱ्हेचे अभ्यासक्रम चालवतात. अशा नाट्यशिक्षणात नाटकाच्या शिक्षणाबरोबर नाटकातून शिक्षण, हा भागही अभिप्रेत असू शकतो. उदाहरणार्थ, विज्ञान वा समाजशास्त्रीय संकल्पनांचा अभ्यास नाट्यरूपातून करणे. याचबरोबर, समाजकार्यात नाटकाचा वापर करणे.

बऱ्याच वेळा विद्यापीठांच्या प्रशिक्षण केंद्रातून होणाऱ्या अभ्यासक्रमांचा शिक्षणक्षेत्राबाहेरील जगताशी संवाद व्हावा, या हेतूने नाटकांच्या तालमी वा प्रयोगांची प्रदर्शने आयोजित होतात. मला अशी बरीच प्रदर्शने पाहायला मिळत असतात. उदाहरणार्थ, बर्टोल्ट ब्रेख्त या जर्मन नाटककाराच्या नाटकांचे प्रयोग-प्रदर्शन शैक्षणिक केंद्रातून होत असते. २०व्या शतकातील ब्रेख्तने नाटके लिहिलीच, पण त्याचबरोबर त्याने कविता, कांदबऱ्याही लिहिल्या. ‘न-नाट्या’चा वेगळा राजकीय विचार मांडणाऱ्या विचारवंत नाटककाराची दिग्दर्शक म्हणून आपली वेगळी ओळख आहे. आपल्या नाटकातून तो मानवी जीवनातील ताणे-बाणे, वर्ग-संघर्ष, शोषणाची रूपे अत्यंत देखण्या सौंदर्यदृष्टीतून मांडत असतो. ब्रेख्तच्या नाटकात नाच-गाणी असतात. यातून अभिनयाची वेगवेगळी अंगे शिकता येतात. ब्रेख्तच्या नाट्यतंत्राचा अभ्यास करणे, फक्त ‘तंत्रा’पुरते राहात नाही. ब्रेख्तच्या नाटकाचा भारतीय प्रयोग करणे म्हणजे, इथल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचे नीट आकलन करून घेण्याचा समाजशास्त्रीय आणि राज्यशास्त्रीय अभ्यास असतो. विद्यार्थी किती सक्षमतेने अभिनय वा इतर नाट्यतंत्राचे अध्ययन करतात, हे महत्त्वाचे असतेच; त्याचबरोबर त्यांचे राजकीय आणि सामाजिक भान याचे शिक्षणही इथे अपेक्षित असते. नाटकाच्या निमित्ताने विचारमंथन महत्त्वाचे ठरते. पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकविणारे प्रवीण भोळे त्यांच्या मुलाखतीत “ब्रेख्तची माणसं जास्त भावली” असे म्हणतात, ते आपल्या मुलाखतीत पुढे म्हणतात, त्याप्रमाणे, “कोणताही कलावंत हा केवळ कलेचा साधक नसून तो त्याच्या भवतालच्या समाजाचाच एक जबाबदार घटक असतो. म्हणून आपली कला आणि समाज यांच्यातला नातेसंबंध विद्यार्थ्यांच्या नीट लक्षात यावा, तसेच या समाजाप्रती आपल्या असलेल्या कर्तव्याची त्यांना जाणीव व्हावी, हाही एक हेतू (ब्रेख्तचे नाटक शिकविताना) आहेच.”

पुण्यातल्या ललित कला केंद्र वा फ्लेम स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट‌्स यांसारख्या नाटकातील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आणि त्यांचे विद्यार्थी-शिक्षक एकमेकांशी संवाद साधत असतात. यातून, संस्थांशी निगडित असे संपर्क-जाळे तयार होते. त्यातून शिकविण्याच्या, शिकण्याच्या आणि नंतर जगण्याच्या नव्या वाटा तयार होत जातात. जगभरात शिस्तशीर असे शास्त्रीय पद्धतीने नाट्यविषयक शिक्षण आणि नाट्यप्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनी जाळे निर्माण करून एकमेकांना जोडून घेण्याचे प्रयत्न सुरू असतात. जेणेकरून, विचार आणि प्रशिक्षण-व्यवहाराची देवाणघेवाण होईल. सरतेशेवटी, रंगभानासाठी शिक्षण हे अनेक अर्थांनी सगळ्यांसाठीच महत्त्वाचेच.

आशुतोष पोतदार
potdar.ashutosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...