आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नटाला आव्हान देणारे नाट्य !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इराणच्या नस्सीम सोलेईमानपोरचे हे एकपात्री नाटक. ते कलाकार रंगमंचावर गेला की त्याच्या हाती दिले जाते. म्हणजे, ऑन दि स्पॉट त्याला मोठे आव्हानच पेलायचे असते...

नाटकात अभिनय करणारे तुम्ही नट वा नटी असाल. तुम्हाला सांगितलं गेलंय, की आता तुम्हाला नाटक सादर करायचेय. तर, तुम्हाला नक्कीच आनंदी होईल. कारण, नाटक करायला तुम्ही नेहमीच तयार असता. मग, तुम्ही तयारी करायला लागता. अस्सल नट असाल, तर तुमची आवाज आणि शरीराची साधना नेहमीप्रमाणे सुरू राहते. रियाजाचा तुमचा दिनक्रम सुरू राहतो. नाटक करायचेय म्हटल्यावर तुम्ही नाट्य-संहिता अभ्यासायचा विचार करू लागता. विचार करू लागता, संहिता कशी असेल याबद्दल. शिवाय दिग्दर्शक, प्रकाश-योजना, संगीत-योजना याबद्दलही विचार करू लागता. नाटक उभे करण्याबद्दल विचार करत वेळेचे नियोजन तुम्ही करू लागता. पण मग तुम्हाला कळतं, की सादर करायच्या नाटकाची संहिता तुम्हाला रंगमंचावरच दिली जाणार आहे. संहिता हातात पडल्यावर पुढच्या दीड एक तासात ती सादर करायची आहे. तो क्षण, रंगमंचावरच्या त्या कलाकारासाठी, तो किंवा ती कितीही अनुभवी, निष्णात असू दे, क्षणभर का होईना, पण पोटात नक्कीच गोळा आणणार. अभिनयासाठी तुम्ही कष्ट उपसले असतील. या आधी कितीतरी नाटकातून तुम्ही कामं केली असतील. आपली कला दाखवत जगभरात तुम्ही फिरला असाल. या सगळ्याची आठवण ठेवून तुम्ही ठरवाल, अशा संहितेचा असा उत्स्फूर्त प्रयोग करायचा की नाही ते. जिगरबाज कलाकार असाल तर असे आव्हान स्वीकारता. तेवढेच जिगरबाज आयोजक असतील, तर अशा प्रयोगाचे सादरीकरण आयोजित करतील. रंगमंचावर चढून तुम्ही अशी स्क्रिप्ट हाती घ्यालही. पण, एकदा संहिता हाती घेतली की मागे फिरणे नाही. कुणीतरी म्हणेल की, एक-दोन कलाकार रिझर्वला ठेवू आणि त्या ‘न वाचलेल्या’ संहितेचा प्रयोग सादर करू. पण, एकानेच प्रयोग सादर करायचा असतो. पाण्यात होडी सोडली की, ती किनाऱ्याला लावावी लागणार. नाटकाच्या लिखाणावर नितांत श्रद्धा ठेवून प्रयोग सादर करावा लागणार.

इराणच्या नस्सीम सोलेईमानपोर या नाटककाराने असे एकपात्री नाटक लिहिले आहे. हे नाटक रंगमंचावरच कलाकाराला दिले जाते. नाटकाचे नाव आहे, ‘व्हाईट रॅबिट, रेड रॅबिट’. या नाटकाने जगभरात खळबळ माजवलीय. नस्सीमला इराण सोडायला परवानगी नव्हती. इराणी कायद्यान्वये प्रत्येक नागरिकाला इराणच्या लष्करात काम करावे लागते. नस्सीमने लष्करात काम करायचे नाकारले. त्यामुळे त्यांना देश सोडून जाता येत नव्हते. मग, इराणमध्येच राहून त्यांनी इंग्रजी नाटक लिहिले. इराणमध्येच स्थानबद्ध होण्याचा परिणाम असा झाला की, बिन-दिग्दर्शकाचे नाटक लिहून झाले. नाटकात सेट नाही. एकच एक टीम घेऊन काम करायची गरज नाही. दर वेळी नवा गडी आणि त्याचे नवे राज्य. नस्सीमनी आपल्या नाटकाच्या संहितेतच आपला ई-मेल आयडी दिला आहे. स्थानबद्धतेची चिंता नाही. ई-मेलआयडी असल्यामुळे जागेचे बंधन तोडून कलाकार आपल्या नाटककाराशी थेट संवाद साधू शकतो. शिवाय, नाटकाची मांडणीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. नाटक उभे राहात असताना प्रेक्षक सहभागी होऊ शकतात. नाटकाच्या नोट्स ठेवू शकतात. कलाकाराबरोबर सेल्फी घेऊ शकतात. नोट्स आणि फोटोग्राफ्स नाटककाराला पाठवू शकतात.

२०१२मध्ये लिहिलेले हे नाटक. नस्सीम स्वतःला रंगमंचावर मारताहेत आणि प्रेक्षक त्यांना पाहताहेत. प्रेक्षकांमध्ये त्यांचे आईवडीलही बसले आहेत. हे स्वप्न म्हणजे ‘व्हाइट रॅबिट, रेड रॅबिट’ या नाटकाच्या लिखाणाची सुरुवात होती. २०११मध्ये त्या नाटकाचा प्रयोग न्यूयॉर्कमध्ये झाला. नंतर एडिन्बरोच्या फेस्टिवलमध्ये नाटक सादर झाले.

‘व्हाइट रॅबिट, रेड रॅबिट’ या अशा वैशिष्ट्यपूर्ण नाटकाचे प्रयोग पुण्यातील ‘नाटक कंपनी’ सादर करते. सिद्धेश पुरकर या तरुण कलाकाराने हे नाटक मराठीत भाषांतरित केले आहे. आतापर्यंत अभय महाजन, आलोक राजवाडे, मुक्ता बर्वे, अतुल पेठे, सई ताम्हणकर यांनी या नाटकाचे प्रयोग केले आहेत. संहिता तीच पण प्रत्येक वेळेला नवा प्रयोग. प्रेक्षक नवे-जुने, आधीच्या प्रयोगाला आलेले. पण अनुभव मात्र वेगळा.

नाटक सुरू झालं की, ते टोटली अब्सर्ड वाटतं. लेखन आणि रंगमंच यांच्या सीमारेषांवर घुटमळणारं. काय चाललंय, हेच कळत नाही. जितका नट कसलेला तितका प्रयोग रंगत जातो. मी पाहिलेले नाटक अतुल पेठेंनी मंचित केले होते. पेठे नाट्य-दिग्दर्शक आणि नटही. शिवाय, ते भवतालाबद्दलही सजग. रंगमंचावर एकटे असताना अवकाश व्यापत त्यात नाटकीयता आणण्याचे पेठेंचे कौशल्य लक्षवेधीच होते. त्यांची भाषेची समज, प्रेक्षकांना आपलेसे करण्याची रीत गुंगवून टाकणारीच होती.

‘व्हाइट रॅबिट, रेड रॅबिट’च्या प्रयोगासाठी रंगमंचावर एक गोल टेबल, त्यावर पाण्याचे दोन ग्लास, सोबत एक खुर्ची आणि घोडा. या नाटकाला रिहर्सल लागत नाही. नाटक सुरू होण्यासाठी रंगमंचावर प्रकाश पडतो, तसे आयोजक येतात. कलाकाराला आमंत्रित करतात. कलाकाराचे आभार मानतात. त्याला ‘व्हाइट रॅबिट, रेड रॅबिट’ची संहिता देतात. कलाकार स्क्रिप्ट असलेला लखोटा उघडतो. संहितेचे पहिले पान उघडतो. एखाद्या नाट्यसंहितेचे वाचन मनःपूर्वक करणे. तेवढ्याच तन्मयतेने ती वाचणे नेहमीच महत्त्वाचे असते.

नाटक पूर्णतः नवीन असले आणि ते अगदी काही क्षणापुरते मिळालेले असले, तरी नाटकातील भाषा आणि नाटकाची भाषा नवी नसते. नटाने आपल्या अभ्यासातून आणि कष्टातून त्या भाषेबद्दलचे भान प्राप्त केलेले असते. बऱ्याच वेळा मी पाहतो की, नटाचा उत्स्फूर्ततेवर जोर असतो. नाटकककार आणि दिग्दर्शकांना प्रेक्षकांशी जोडणारा दुवा असतो. पण तो दुवा फक्त संहितेच्या पाठांतरापुरता असेल, तर मग काही क्षणापूर्वी मिळालेल्या संहितेने नट-नटी बावचळून जाऊ शकतात. त्यांचा वाचत असलेल्या भाषेवर आणि आत्मसात केलेल्या रंगमंचीय भाषेवर विश्वास असेल, तर सादरीकरणाचे काम सोपे बनते. नाटकातील भाषा फक्त लिहिलेले शब्द नसतात. संस्कृतीची नटाने आत्मसात केलेली परिभाषा असते. शब्दांपलीकडे जाऊन नाटकाची भाषा बोलली जाते. संहितेतील शब्द वाचता-वाचता नट शब्दांशी आणि संस्कृतीच्या परिभाषेशी नाते जोडत असतो. प्रक्रिया जेवढी सहज असते, तेवढीच ती खडतर असते. कारण नटाचे रंगमंचावर असणे म्हणजे त्याच्यासाठी गतकाळ आणि वर्तमानामधला खेळ असतो. खेळातून तो नाटकीयतेचे आडाखे रंगमंचावर मांडत असतो.

जो नट स्वतःचे, भवतालाचे आणि भाषेचे भान ठेवून नाटक करतो, तो आव्हाने लीलया पेलतो. याच कारणाने, ‘व्हाइट रॅबिट, रेड रॅबिट’ या नाटकातील एखादे वाक्य, एखाद्या नट-नटीला निव्वळ विनोदी वाटेल, तर एखाद्याला तेच वाक्य राजकीय विधान वाटेल. नट वा नटीच्या स्वानुुभवामुळे तो त्या नाटकातील भाषेशी स्वत:ला सहज जोडून घेईल किंवा कोरडेपणाने त्यातील भाषेचे सादरीकरण करेल. काय करावे, कसे करावे, हा ज्याचा-त्याचा प्रश्न. ज्याची-त्याची आत्मिक गरज. सादर करणारी नटी स्वतःला दिग्दर्शित करत असते. ती तो क्षण अनुभवत असते. तिचा तो क्षण फक्त तिचाच असतो, तसाच तो तिच्या भवतालाचा, तिच्या गतकाळाचाही असतो. तिला रंगमंचावर पाहणाऱ्या प्रेक्षकांचाही, तो क्षण असतो. असे फक्त सादरीकरणाच्या कलेत होऊ शकते. इतके जिवंत. इतके सच्चे.

‘व्हाइट रॅबिट, रेड रॅबिट’ करणे नटासाठीचे आव्हान असते. ‘नाटक कंपनी’ आव्हाने स्वीकारण्याची संधी उपलब्ध करून देते. प्रेक्षक आव्हानांना प्रतिसाद देण्यासाठी येतो. सकस संस्कृती-व्यवहारासाठी हे सारे महत्त्वाचे असते. यशापयशाची गणिते घालण्यापेक्षा आव्हान घेणे, देणे, अनुभवणे महत्त्वाचे असते. शेवटी, प्रक्रिया महत्त्वाची!

आशुतोष पोतदार
potdar.ashutosh@gmail.com
बातम्या आणखी आहेत...