आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाई मी धरण बांधिते (आशुतोष पोतदार)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विद्यार्थ्यांशी संवाद म्हणजे, संस्कृती-दर्शनाची बाब. संवाद सुरू होताना “तुम्ही कुठून आला आहात” अशा काहीशा प्रश्नाने सुरुवात होते. मग, ‘बुलढाणा’, ‘जालना’ नाहीतर ‘कोल्हापूर’ अशी गावं कानावर पडतात; तर कधी चेन्नई, बेंगलुरू किंवा इम्फाळ अशीही शहरं. अलीकडे तर अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर ‘संस्कृती’ या विषयाबद्दलचा वर्ग झाला. मलाही विचारतात, तेव्हा कसबा सांगावं? कोल्हापूर, लोणी काळभोर, मिरज, कणकवली, बेंगलोर की पुणे, असा प्रश्न पडतो. गावांबरोबर येतात वेगवेगळ्या भाषांचे आवाज, लहेजे. प्रवासाचे वेगवेगळे मार्ग. वागण्या-बोलण्याच्या तऱ्हा. आर्थिक-सामाजिक संदर्भ. आणखी बरंच काही.

अमेरिकेतले विद्यार्थी म्हटल्यावर ग्लोबलायझेशन, श्रीमंती इत्यादी-इत्यादी (गैर)समज. तिथेही छोट्या-छोट्या गावातून येऊन शिक्षण घेणारे विद्यार्थी असतात. आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातले, सामाजिक स्तरावर परिघांवर फेकले गेलेले. अलीकडे भेटलेल्या मुला-मुलींनी भारतात येण्याआधी भारताचा अभ्यास केलेला होता. आम्ही भारतीय शिक्षणाबद्दल बोलू लागलो, तर विद्यार्थी फुले, गांधी आणि आगरकरांवर सहज बोलू लागले. विशेषकरून, एकोणिसाव्या शतकात भारतात- विशेषतः महाराष्ट्रात या थोरामोठ्यांनी केलेल्या पायाभूत कार्याबद्दल काही मुलांना असलेले भान अचंबित करणारे होते. त्यांचे वय १८-२० मध्ये कुठेतरी. अर्थात, कोल्हापूर वा बुलढाण्याजवळच्या गावातून येऊन पुण्यात शिक्षण घेणारी मुले जितक्या तळमळीने भारतीय शिक्षण चळवळींबद्दल बोलतील, तेवढी तळमळ अमेरिकेतून येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित नाही. कारण, त्यांचे अनुभव वेगळे आणि सामाजिक आणि राजकीय भाग वेगळ्या संदर्भातले.
एकदा माझ्या वर्गात अमेरिकेतल्या एका विद्यापीठात शिकविणाऱ्या प्रोफेसर बाई बसल्या होत्या. तिथे त्या अभिनय शिकवणाऱ्या. त्या दिवशी आमच्या वर्गात भारतातील वेगवेगळ्या भाषांमधल्या नाटकांची चर्चा सुरू होती. तेंडुलकर, इंग्रजी भाषेत नाटक करणाऱ्या महेश दत्तानींपासून ते मणिपुरात विधी परंपरांना मूलभूत मानून नाटकाचा खेळ मांडणाऱ्या इम्फाळच्या कन्हायलालांपर्यंत विविध संदर्भात आमची चर्चा सुरू होती. त्या प्रोफेसरबाईंना भारतातल्या विद्यार्थ्यांचे बहुभाषिकत्व सुखावणारे वाटले. वर्गात सुरुवातीलाच आम्ही मान्य केले होते की, विविध भाषांमधील नाटक वा साहित्याला ‘प्रादेशिक’ म्हणून भौगोलिकतेत मर्यादित ठेवता येणार नाही. शिवाय असंही ठरलं होतं की, भाषेतलं नाटक म्हणून इथल्या लोकपरंपरांचं गौरवीकरणही करत गळा काढायचा नाही. त्या दिवशी वर्गातले सगळे हिरिरीने आपली मते मांडत होते. काही गोरे, काही काळे, काही मुले, काही मुली, काही गरीब आणि काही श्रीमंत. काहींचे आई-वडील विभक्त. काहींसाठी एकत्र कुटुंब आणि जिवाला जीव देणारा गोतावळा. प्रत्येकाच्या भाषेतला आवाज, आकार, लहेजा एकमेकांपर्यंत पोहोचत होता.
का कुणास ठाऊक, एरवी कधी-कधी एक गाणं माझ्या मनात सारखं सारखं येत राहतं. गाडी चालवताना, सायकल चालवताना, शांत बसलेलो असताना. ते गाणं ड्रामॅटिक आणि संवादी आहे. भवतालाबद्दलचं भान तीव्र करणारं कालातीत असलेलं, हे गाणं. लहानपणी: शाळेत, गावात, रेडिओवर, एखाद्या सभेत हे गाणं ऐकल्याच्या पुसट आठवणी जाग्या होतात. अभ्यासाच्या पुस्तकातून सारखं-सारखं हे गाणं बाहेर येत राहतं. ‘संस्कृती’विषयीच्या जमून आलेल्या या वर्गात हे गाणं का येऊ नये, मी विचार करत होतो. भीती होती की मला गाता येत नाही, आणि हे तर गाणं गायचं आहे, वाचायचं नाही. काही का होईना, म्हणून चर्चा थांबल्याच्या क्षणाचा फायदा घेऊन, मी गाणं वाचून दाखवायला सुरुवात केली :

“बाई मी धरण धरण बांधिते... माझं मरण मरण कांडिते/ झुंजू मुंजू गं झालं, पीट जात्यात आटलं, कणी कोंडा गं कोंडा मी रांधीते॥” मग पुढे, “माझ्या अंगणी गं माझ्या अंगणी पाचोळा गं पडे.”
मराठी जाणणाऱ्या मुलांनी सर्वांना वाचता यावं म्हणून बोर्डवर इंग्रजी लिपीत गाणं लिहिलं.
मराठीतील ही अक्षरलेणी मी वाचतो तेव्हा मला आत काहीतरी होतं, दर वेळी. क्षणभरानंतर, लक्षात आलं की, किती वर्षे आपण हे गाणं गुणगुणतोय. पण, दर वेळी या गाण्यातलं नवं काहीतरी बाहेर येतं. वर्गात जागा असेल आणि व्यवस्था करता येत असेल तर आम्ही गोलाकार बसणे पसंत करतो. आज तसेच बसलो होतो. वाचून झाल्यावर सांगितलं, दया पवारांनी हे गाणं लिहिलंय. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देऊन झाल्यावर आमच्या लक्षात आलं की, यातले शब्द सगळ्यांना समजले नाहीत; अर्थ तर लांबचाच. पण, तरीही काही जण डोलत होते, पायाला ठेका धरत होते. कविता आकलन करून घ्यायला अभंग, जात्यावरच्या ओव्या, स्त्री-गीते इत्यादी चर्चा अपरिहार्य. कविता-गाणी गेयता आणि नाट्यमयता आणते कशी आणि त्याच्या नाटकीय शक्यता कशा असतात, याबद्दल आम्ही बोलत होतो.

परंपरेचे गुणगान करत आपण शरीरातली लय विसरत चाललोय. मणिपूरचा माझा मित्र, मंगांगसाना मैतेई. तो पेना हे मणिपुरी वाद्य वाजवतो. एकदा त्याच्याबरोबर बोलत होतो, ते आठवले. मणिपूरच्या डोंगरदऱ्यांत तो कामासाठी त्या वेळी फिरायचा. तो तावातावात बोलत होता. आदिवासी समाजातल्या पोराबाळांना ओटी-पोटी घेऊन फोटो काढून घेऊन फेसबुकवर ठेवून लोकपरंपरांचा अभ्यास करतोय, हे दाखवायला बरेच असतात. पण, परंपरेतल्या आतल्या गेयतेचे काय? मी गप्प बसलेला पाहून तो पुढे सांगू लागला, तुम्ही लोक नाटक-नाटक म्हणता, ते काय वेगळं असतं? मी चालता चालता नाचतो, नाचत नाचत गातो आणि पेना वाजवतो. मला त्याचं सगळंच पटलं नव्हतं. पण, परंपरेतून आपल्या साहित्याचा शोध घ्यायला पाहिजे, म्हणून व्यासपीठावरून गळे काढणाऱ्या प्राध्यापकी थाटाची भाषणे माझ्या मनात येऊन जातात.
आम्ही “बाई मी धरण-धरण” गुणगुणत होतो, तेवढ्यात मंगांग मनात येऊन गेला. वाटलं, या गाण्यावर मंगांग किंवा आसामचा शुक्राचार्य राभा किती छान ठेका धरतील. आमच्या चर्चेचा मुद्दा हाच होता. गाणं, नाचणं आणि नाटक कसं वेगळं असू शकत नाही.

“बाई मी धरण धरण”मधल्या नाट्यमय प्रतिमांबद्दल मी सांगायचा प्रयत्न करत होतो. भाषिक संदर्भापलीकडे जाऊन त्या कलाकृतीची ओळख करून देताना मजा येते. कस लागतो. खरं तर संस्कृतीचं भाषांतर करणं एक आव्हानच. मराठी, इंग्रजी वा हिंदीमधल्या आपापल्या मर्यादा सांभाळून आपण त्या ओलांडण्याचा प्रयत्न करतो आणि संवाद साधतो. परफॉर्मन्स पोएट्री हा फॉर्म आपल्याकडे तसा विकसित झाला नाही. किंबहुना, कविता काय गाण्यासाठी असते? असा प्रश्न विचारून आत्ममग्नता हे कवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानण्यात आधुनिकतावाद्यांनी धन्यता मानली. भारतीय कुटुंबव्यवस्थेमध्ये सभोवतालच्या कोलाहलात आपला आवाज शोधणारी आत्ममग्नता फक्त पारंपरिक मानून त्यासाठी वेगळी परिमाणे लावली गेली. त्यामुळे आज कविता वाचन म्हणजे कवीचा फक्त आवाजच ऐकू येईल, अशा तऱ्हेने केले जाते. किंवा, छोट्या जागी, चार-दोन लोक अत्यंत गंभीर चेहरे करून, जगाचे सामाजिक-राजकीय ओझे आपल्या डोळ्यांवर घेऊन कविता वाचत असतात. माझ्या वर्गात हॉटेलमधल्या छोट्या बारमध्ये गिटार वाजवत गाणी म्हणणारा एक विद्यार्थी होता. आमची सगळ्यांची काही-बाही चर्चा सुरू होती, तोवर “बाई मी धरण”वर त्याने गिटारीच्या तारा छेडायला सुरुवात केल्या. आम्ही त्याकडे कान देऊन ऐकत होतो. इंग्रजी लिपीत लिहून घेतलेली कविता तो अडखळत गात होता.
“माझ्या घामाचे गं आडे… माझ्या अंगणी गं माझ्या अंगणी पाचोळा गं पडे…” ही ओळ वाचताना माझ्या आत काय होतं, हे सांगायला बऱ्याच वेळा शब्द आठवत नाही. आता आठवला: गलबलतं. नाटकाच्या अभ्यासासाठी अंगण ही संकल्पना भारतीय नाट्यपरंपरेचे वेगवेगळे आयाम मांडायला मदत करते. समाज, कुटुंब व्यवस्था, घर आणि समाजातलं नातं, पब्लिक स्पेस इथपासून ते बादलसरकारांच्या अंगणमंचपर्यंत आम्ही पोहोचतो. दया पवारांच्या या गाण्याबरोबर, अंगणात समाज आणि वेदनेचा काला आम्ही मांडला. देश-कल्पनांच्या सीमा ओलांडून बाईचं असणं आणि भोगणं, माणसाचं राबणं आणि रापणं अंगणातल्या नाटकात येतं, तेव्हा ते संस्कृतीचं नाटक होतं... या अंगणात मणिपूरच्या समाजावर सदोदित मिलिटरी अंकुश ठेवणाऱ्या राज्यसत्तेला आव्हान देणारी इरोम शर्मिला असते. तसंच, तिच्या कित्येक वर्षांच्या उपवासाकडे बथ्थडपणे पाहणारी राज्यसत्ता आणि समाजसत्ताही असते. “बाई मी धरण-धरण”ने आमच्या वर्गात संस्कृतीसंदर्भातले कितीतरी प्रश्न मांडले. प्रश्न घेऊन खेळत गेलो की, अंगणातलं नाटक विस्तारत जातं आणि ते राष्ट्र आणि भाषेच्या पलीकडं जाण्याची स्वप्नं बघायला लागतं.
बातम्या आणखी आहेत...