आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashwary Patekar Article About Book Reviews Of Paraticha Rasta Nahiye

करुणेचं समंजस सूक्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कवितेच्या आत्म्याला अनुभवाच्या धगीवर शेकणारा कवी श्रीधर नांदेडकर यांचा दुसरा कवितासंग्रह ‘परतीचा रस्ता नाहीय’ नुकताच मराठी साहित्य जगतात दाखल झाला आहे. प्रतिमा, प्रतीके यांचं निराळेपण, भाषेचा पोत, अनुभवांची सार्थ निवड आणि नेटकी मांडणी यामुळे नांदेडकरांनी या संग्रहात फार उंची गाठली आहे.

2005। मध्ये आलेल्या ‘सुफी प्रार्थनांच्या किनार्‍यावरून’ या पहिल्या संग्रहातच श्रीधर नांदेडकर यांनी नव्वदोत्तरी कवितेत स्वत:ची जागा निर्माण केली होती. करुणेचं समंजस सूक्त म्हणून त्यांच्या ‘परतीचा रस्ता नाहीय’ या दुसर्‍या संग्रहाकडे पाहता येतं. प्रतिमा, प्रतीके यांचं निराळेपण, भाषेचा पोत, अनुभवांची सार्थ निवड आणि नेटकी मांडणी यामुळे नांदेडकरांनी या संग्रहात फार उंची गाठली आहे. आणखी एक विशेष म्हणजे, हा संग्रह त्यांची कवी म्हणून वाढ निश्चित करतो. कवीची जर वाढ व्हायची असेल तर त्यास त्याच्या मर्यादा अन् बलस्थाने याचे भान यायला हवे. नांदेडकरांना नक्कीच हे भान आलेले आहे, याचीच साक्ष त्यांची नवी कविता देते.
माणसे जोडण्याचे काम करणार्‍या या कवीने थेट कवितेच्या आतड्यालाच माणसाचे आतडे सांधून टाकलेय. त्यांची कविता ही आतड्याची भाषा बोलते. जागतिकीकरणाच्या प्रभावाने संवेदनशीलता हरवलेल्या माणसाच्या समोर हट्टाने कवी असे काही अनुभवचित्र धरतो; की माणूस त्या चित्रात जखडल्यावाचून राहत नाही.
बाभळीच्या काट्याला अडकलेलं कुडतं काढा झाडावरचं
आन् मला माझ्या पोराच्या घामाचा वास घेऊ द्या
त्याच्या कुडत्यानं हे अभागी कपाळ पुसू द्या
सदर संग्रहात कृत्रिम जगण्याचे असंख्य थरावर थर चढत जाताना खोल गाडली गेलेली माणसाची आत्मकथा कवितेच्या उत्खननातून उभी केली आहे. कारुण्याचा झरा घेऊन निघालेला हा कवी; माणसाच्या निबिड अरण्यात शिरतो; तिथून ‘परतीचा रस्ता नाहीय’ हे माहीत असूनही करुणेचे सूक्त गात राहतो.
मुठीत मावेल मऊशार अशी चिमणी कुठे हरवली
आता हा रिकामा पिंजरा कुठवर हिंदकळत राहील?
आणि कधी धीर धरून उठेल
माझ्या हाडांच्या सापळ्यात बसलेला
करुण माणसाचा मेणाचा पुतळा?
नव्वदोत्तरी काव्यप्रवाहात श्रीधर नांदेडकरांची कविता स्वतंत्र बैठक मांडून बसली आहे. तरी हा कवी संचित आणि संस्कार नाकारत नाही. नव्वदोत्तरी कवींमध्ये हा गुण अपवादाने आढळतो. काव्यसंग्रहाची सुरुवात ‘मर्ढेकरांची बकरी’ या कवितेनं अन् शेवट ‘अरुण कोलटकरचं कासव’ या कवितेनं होतो. त्या वाचल्यावर कवीची कवितेवरची अन् भाषेवरची निस्सीम निष्ठा जाणवते. मात्र प्रभावाची सूक्ष्म छटाही त्यांच्या कवितेवर पडत नाही. ही त्यांनी काव्यनिर्मितीच्या साधनेत साधलेली खूप मोठी कमाई आहे.

सामान्य माणसाचं दु:ख टिपण्यासाठी कवीला सामान्य माणसाचं काळीज लाभणं फार गरजेचं असतं. तसं नसेल तर ते निरीक्षण अगदी वरवरचं ठरेल. मात्र श्रीधर नांदेडकर हा असा कवी आहे, की त्याच्याकडे ते काळीज जन्मजात आहे. म्हणूनच कवी सामान्यांच्या दु:खाशी तादात्म्य पावू शकतो. मानवी दु:खाची नेमकी नस नांदेडकरांना सापडली आहे. त्यांची कविता दुखर्‍या कळेवर बोट ठेवत नेमका तपास घेते.

समकालात अनेक कवींनी कवितेवर कविता लिहिल्या आहेत. खरं तर ते आरती प्रभंूना खूप छान साधलं होतं. नांदेडकर बिलकूलही कवितेवर कविता लिहीत नाहीत. ते करतात काय, तर माणसाच्या आत्म्याला त्याच्या भावनेसकट कवितेच्या शिरोभागी ठेवून देतात. या माणसांना किंवा त्यांच्या अनुभवांना कवितेला बाजूला काढता येत नाही. अशी कितीतरी उदाहरणे त्यांच्या कवितेत सापडतील. ‘मोरभाई मी तुला सांगायला पाहिजे का। कवितेचं घर असं आणि एवढ्यानंच बांधता येत नाही।’ किंवा ‘किती दिवसात तुझ्या हलत्या झाडावर। फडफडली नाही कविता।’ किंवा ‘कोण माझ्या पाठकुळी बसलंय? साप चावलेला भाऊ आहे की एक जखमी कविता?’ किंवा ‘अनंत निळ्या आकाशाखाली। धावणार्‍या शाळकरी पोरांच्या अंगावर सांडू द्या कवितेचे शब्द’ किंवा ‘कवितेतल्या दगडावर डोकं ठेवलं तर.. दगडामागून कवितेला फांद्या फुटल्या।’ अशा असंख्य ओळी कवितेत विखुरलेल्या सापडतील.
नांदेडकरांचा कवी हा भाषेच्या माळावर चरत राहणारा कवी आहे. म्हणून भाषेतले ते सारेच तत्त्व त्याच्या धमण्यांतून अविरत वाहते आहे. आठशे वर्षे या भाषेचा दिवा विझला नाही, ही जाणीव जशी कवीला आहे तशीच भाषेच्या संदर्भातली वर्तमानकालीन वास्तवाची जाणीवही आहे. म्हणून कवी म्हणतो...
माझ्या भाषेतले भिरभिरते मासे कुठायत्?
रावे पारवे अन् चिमण्या कुठायत्?
अंधारलेल्या झाडांमधली किलबिल कुठाय?
तुटलेला पंख घेऊन
मी या भाषेत फडफडत राहीन

शीर्षकापासून सुरुवात करत कविता संपल्यानंतरच्या कोर्‍या जागेपर्यंत आशय वाहता ठेवण्याची हातोटी नांदेडकरांना लाभली आहे. कवितेतल्या महत्त्वाच्या जागा कळल्या, की संपूर्ण कविताच कह्यात येते. वाचकालाही ती आशयाशी सामावून घेते. तेव्हा वाचकाला कवितेत नुसतं कवीचं व्यक्तिमत्त्व सापडत नाही; तर तोही त्या कवितेचा भाग होऊन जातो. कविता वाचून संपल्यानंतर त्याच्या डोक्यातही संवेदनांचं मोहोळ उठतं. ‘आईच्या मृत्यूनंतर त्याला आवडणारं कलिंगड खायचं सोडून दिल्याची गोष्ट माझ्या जिव्हारी लागलीय.’ हे वाचल्यावर डोळ्यांच्या पापण्यांना पाणवण्याच्या कळा लागल्याशिवाय कशा राहतील. थोडक्यात, नांदेडकरांना हे का साधलं असेल; तर ते त्यांच्या कवितेत त्यांचं व्यक्तिमत्त्व बेमालूम मिसळून टाकतात. त्यामुळे होतं काय; कवी नजरेत येत नाही. तिथं उरतं तुमच्या-माझ्या अनुभवांचं संवेदन. हा नांदेडकरांचा फार महत्त्वाचा गुण म्हणून नोंदवला पाहिजे. नांदेडकरांच्या प्रतिमांचा स्वतंत्र अभ्यास व्हावा; असं समृद्धपण त्यांच्यात आहे. कवितेचं रूपतत्त्व आणि भाषातत्त्वही वाखाणण्याजोगी आहेत. मराठी समकालीन कवितेत नांदेडकरांनी हे दमदार पाऊल टाकलेलं आहे, असं या निमित्तानं म्हणावंसं वाटतं.
०परतीचा रस्ता नाहीय
०कवी : श्रीधर नांदेडकर
०प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
०पृष्ठे : 148
०मूल्य : 225 रुपये
(oviaishpate@gmail.com)