आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी चमत्‍काराची मेट्रो धाव!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आधुनिक दळणवळण साधनांच्या निर्मितीमध्ये प्रगत अभियांत्रिकी तंत्राचा मोलाचा वाटा राहिला आहे. मुंबई शहर आणि परिसरात सध्या सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे उभारणीच्या कामातही अभियांत्रिकी तंत्राची कमाल अनुभवास मिळत आहे. त्या तंत्राची वैशिष्ट्ये उलगडून सांगणारा हा लेख...   
 
 
दक्षिण मुंबईतील कुलाब्यापासून ते उत्तर मुंबईतील सीप्झपर्यंतच्या ३३.५ किमी लांबीच्या मार्गावर संपूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वेचे जाळे उभे करणे मोठे आव्हान आहे. मुख्यत: येथील ऐतिहासिक वारसा वास्तू, उंचच उंच आधुनिक इमारती, भूगर्भातील उच्चतम जलपातळी आणि कठीण पाषाणांनी बनलेला भूस्तर आदींमुळे हे आव्हान निर्माण झाले आहे. 
 
 
मात्र, हे काम गतीने पुढे जाण्याकरिता प्रकल्पाच्या स्थापत्य कामाचे सात पॅकेजेसमध्ये विभाजन करण्यात आलेले आहे. प्रत्येक पॅकेजमध्ये पाच किमी लांबीचे जुळे बोगदे आणि किमान तीन, तर कमाल पाच भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. भुयारीकरण हा या प्रकल्पाच्या स्थापत्य कामाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. मेट्रो-३ चे भुयारीकरण टनल बोअरिंग मशिन्सच्या (टीबीएम) साहाय्याने करण्यात येणार आहे. पॅकेज-४, पॅकेज-२ आणि पॅकेज-५ यांच्यासाठीच्या एकूण चार टनल बोअरिंग मशीन्स (टीबीएम) नुकत्याच दाखल झाल्या आहेत. अनुक्रमे नयानगर-माहीम, आझाद मैदान आणि विद्यानगरी येथून बोगदा खणण्याच्या कामास लवकरच सुरूवात होत आहे. टीबीएम एक अजस्र मशीन असून, त्याचे वजन जवळजवळ ७०० ते ८०० टन असते. हे मशीन फ्रंट शील्ड, कटर हेड, स्क्रू कन्व्हेअर, टेल स्कीन आदी भागात विभागलेले असते. या मशीनच्या काही भागांचे एकत्रीकरण हे जमिनीच्या वर, तर काहींची जोडणी जमिनीच्या खाली केली जाते. त्याकरिता तब्बल ४५ दिवसांचा कालावधी लागतो. 
 
 
६.५ मीटर व्यासाच्या व ११० मीटर लांबीच्या या मशीनकरिता २५ मीटर खोल एक गोलाकार विहीर तयार करण्यात येते. ज्याला ‘टीबीएम शाफ्ट’ असे म्हणतात. मेट्रो-३ साठी शहराच्या विविध भागांत असे ११ शाफ्ट्स तयार करण्यात येत आहेत. या शाफ्टमध्ये मशीनची जोडणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष भुयारीकरणाच्या कामाला सुरुवात होईल. दोन वर्षांत हे भुयारीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. 
 
 
नया नगर (माहीम) येथून सुरू होणारे भुयारीकरण हे दादर या मेट्रो स्थानकापर्यंत चालणार आहे. या मार्गावर दोन समांतर बोगदे खणण्यात येतील, ज्यांचा व्यास प्रत्येकी ५.२ मीटर इतका राहील. मशीनद्वारे बोगदा खणल्यानंतर लगेचच त्याच्या अंतर्भागास काँक्रीटचे अस्तर लावून त्याचे मजबुतीकरण केले जाईल. त्यासाठी विशिष्ट रुंदीच्या काँक्रीट रिंग्जची आवश्यकता असते. मेट्रो-३ च्या बोगद्यासाठी अशा ४०,००० रिंग्जची गरज भासणार आहे. त्यासाठी शहराच्या विविध भागांत असलेल्या सहा कास्ट्रिंग यार्ड््समध्ये २.५ लाख काँक्रीटचे सेगमेंटस् बनवण्यात येत आहेत. हे सेगमेंट एकमेकांना जोडून अस्तरासाठीच्या रिंग्ज बनवल्या जातील, त्या रिंग टीबीएम यंत्रणेतूनच बोगद्यामध्ये बसवल्या जातील.  
 
 
मुंबईची भूगर्भीय रचना ही मुख्यत: बसाल्ट आणि व्होल्कॅनिक ब्रॅसिया या टणक खडकावर आधारित आहे. जमिनीवरील भागामध्ये सहा ते सात मीटर समुद्री चिकणमातीचा थर आहे. मेट्रो-३ या प्रकल्पाकरिता अर्थ प्रेशर बॅलन्स मशीन, हार्ड रॉक टीबीएम, स्लरी टीबीएम आणि ड्युएल मोड टीबीएमचा वापर करण्यात येत आहे. मेट्रो-३ साठी एकूण १७ टनल बोअरिंग मशीन्सची आवश्यकता असून, ही सर्व मशीन्स टप्प्याटप्प्याने फेब्रुवारी २०१८ पर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. प्रकल्पाचे काम ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. एकाच वेळी १७ टीबीएम भूगर्भात काम करत असल्याची ही भारतातील पहिली घटना असेल. 
 
 
मेट्रोचे बांधकाम ज्या भागात करण्यात येत आहे, तेथे भूमिगत मार्गाच्या दोन्ही बाजूंच्या ५० मीटर अंतरातील प्रभाव क्षेत्रातील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. बांधकामाच्या प्रभाव क्षेत्रातील इमारती खचू नयेत तसेच मातीची हालचाल रोखण्याकरिता सिमेंट काँक्रीटच्या सिमेंट पायलिंगची सलग भिंत बांधण्यात येत आहे. स्थानक बांधकाम व खोदकाम करताना जमिनीच्या हालचाली रोखण्यासाठी सिमेंट काँक्रीटच्या पाइल भिंतीला घट्टपणे रोखून ठेवण्यासाठी लोखंडी तुळई तसेच आतील बाजूस अँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याप्रमाणे क्रॅक मीटर, टिल्ट मीटर, इनक्लिनोमीटर, पीजोमीटर यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुरक्षा उपकरणांचा वापर करून बांधकामादरम्यान इमारतींवर देखरेख ठेवली जाईल. वारसा इमारती व जुन्या इमारतींची देखरेख आवश्यकता भासल्यास, २४ तास ऑनलाइन मॉनिटरिंग प्रणालीद्वारे केली जाणार आहे. 
 
 
मेट्रो-३च्या एकूण २६ भूमिगत स्थानकांपैकी १९ स्थानके ‘कट अँड कव्हर’ पद्धतीने, तर उर्वरित सात स्थानके न्यू ऑस्ट्रियन टनल मेथड (एनएटीएम) पद्धतीचा वापर करून बांधण्यात येणार आहेत. स्थानकाचे बांधकाम व खोदकामात नियंत्रित विस्फोट प्रणाली व रॉक कटरचा वापर होणार आहे. बहुतांश स्थानके ही रस्त्याच्या मध्यातून जाणार असल्याने या ठिकाणी काम सुरू झाल्यावर वाहतुकीला व्यत्यय येऊ नये म्हणून स्टील डेकिंगचा वापर केला जाणार आहे. बांधकामादरम्यान रस्त्यांची एक बाजू बंद करून खोदकाम केले जाईल व जमिनीच्या खाली विना अडथळा काम सुरू राहील. स्टील डेकिंगमुळे रस्त्यावरील वाहतूकदेखील सुरळीत राहील. 
 
 
स्थापत्य कामांसोबत प्रणाली कामांसाठीदेखील अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर मेट्रो-३ मध्ये होणार आहे. संपूर्णतः वातानुकूलित असलेली मेट्रो-३ ची ट्रेन ही आठ डब्यांची राहणार असून, डब्यांना रिजनरेटिव्ह ब्रेकिंग यंत्रणा असणार आहे. या यंत्रणेमुळे गाडीचा ब्रेक दाबल्यास ऊर्जा मुख्य वाहिनीद्वारे पुन्हा ट्रेनच्या कार्यान्वयनासाठी उपयोगात येईल. मुंबई मेट्रो-३ ही चालकविरहित तंत्रज्ञानावर आधारित असणार आहे. ड्रायव्हरलेस ट्रेन ही संकल्पना आता पाश्चात्त्य देशांपुरती मर्यादित राहिलेली नसून, ती दिल्ली मेट्रोप्रमाणे मुंबईत मेट्रो-३ मध्येही राबवली जाणार आहे. मेट्रो-३ मध्ये वापरल्या जाणाऱ्या सीबीटीसी (कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल) सिग्नलिंग यंत्रणेमुळे हे शक्य होणार आहे. 
 
 
- मेट्रो-३ प्रकल्प हा अद्ययावत अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी आविष्कार असेल, शिवाय पर्यावरणाच्या दृष्टीनेदेखील ती अतिशय उपयुक्त ठरेल. मेट्रो-३ मुळे दररोज ३.५४ लाख लिटर इंधनाची बचत होईल, शिवाय ९९०७ टन इतके कर्बवायूचे उत्सर्जन कमी होईल. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी करण्यातदेखील मेट्रो-३ चा मोलाचा वाटा राहणार आहे. मेट्रो-३ मुळे ३५ टक्क्यांनी वाहतुकीची कोंडी कमी होईल, असा अंदाज आहे. 
 
 
- मेट्रोचा हा मार्ग देशातील पहिला, तर जगातील सहावा सर्वात लांब संपूर्ण भुयारी मेट्रो मार्ग ठरणार आहे. कफ परेड ते सीप्झपर्यंत असलेला हा मार्ग २६ भूमिगत, तर एका जमिनीवरील स्थानकाद्वारे जोडला जाणार आहे. 
 
 
- मेट्रो-३ ची बॅरिकेड्स असोत वा बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी व पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतीची घ्यावयाची काळजी असो, हा प्रकल्प राबवताना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकल्प बांधणीसाठी अमलात आणल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काटेकोर अंमलबजावणी मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनद्वारे घेण्यात येत आहे.
 
 
- अश्विनी भिडे, bhide.ashwini@gmail.com 
लेखिका मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत आहेत.  
बातम्या आणखी आहेत...