आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी संसाराचे क्लासेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याचा काळ कोणत्याही शिक्षणाआधी प्रवेश परीक्षेसाठी खास शिकवणी लावण्याचा आहे. शिक्षण कोणतेही असो; त्या आधी प्रवेश परीक्षा असते आणि त्यासाठी जाडजूड शुल्क आकारले जाते. पालकही आपल्या पाल्यांना हे शिकवणी वर्ग आवर्जून लावतात. त्यासाठी दुसऱ्या शहरातही पाठवतात आणि संपूर्ण तयारी करून मग त्या परीक्षेत पास होऊन मग त्यांचे महत्त्वाचे शिक्षण चालू होते. हा आजकालचा ट्रेंड किंवा गरज झाली आहे.

आपल्या पाल्याचे जीवन सुखी व समृद्ध व्हावे, अशीच सर्व पालकांची इच्छा असते. हाच विचार प्रत्येक पालकाने आपल्या मुला/मुलीच्या लग्नावेळी किंवा लग्नाआधी केला तर त्यांचे वैवाहिक जीवन पण किती सोपे होऊ शकते. मुलगा किंवा मुलगी यांत फरक न करता शिक्षणासाठी आठवी-नववीपासून सगळे मुलांच्या करिअर डेव्हलपमेंटकडे लक्ष केंद्रित करतात. या सगळ्या धावपळीत शिक्षणेतर गोष्टी शिकायच्या राहून जातात. व्यावहारिक बाबी पालक आपल्या अभ्यासू आणि मेहनती मुलांपर्यंत पोहोचू देत नाहीत.

लग्नाचे वय झाले की मुले ‘अजून मला स्थिरस्थावर होऊ दे’ असे म्हणून लग्न पुढे ढकलतात. स्थैर्य लाभलं की लग्न करू, असे म्हणतात. मुलींची बाजू जरा वेगळी असते. काही मूलभूत गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक मुलीला लग्नाआधी आवर्जून माहीत असायला हव्या.

मुलगी २३-२४ वर्षांची झाली की घराघरांत प्रश्न उपस्थित होतात. आई म्हणते, ‘जरा किचनमध्ये येत जा. लग्नानंतर उपाशी राहशील.’ वडिलांना वाटते, ‘शिक्षणानंतर नोकरी करते, पण लग्नानंतर संसार आणि नोकरी सांभाळता येईल का?’ भाऊ म्हणतो, ‘सध्या रूम आवरायला मी आहे, नंतर घर कशी स्वच्छ ठेवणार?’ लग्नानंतर सासू-सासऱ्यांच्या मनात येते की, ‘लग्नानंतर सोबत राहिले असते तर सण-वार कळले असते व आम्हाला मदतही झाली असती!’ ‘मुलगा बजेटचा विचार करत नाही, पण सुनेने तरी विचार करून घर चालवले तर बरे!’ हे असे प्रश्न घरातील मोठ्या मंडळींना पडतात. संसाराची जबाबदारी पेलण्यासाठी जर योग्य ते मार्गदर्शन मिळाले तर तरुण मुलींच्या मनातले लग्नाबद्दलचे विचार नक्कीच सकारात्मक होतील आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल.

आताच का अशा कार्यशाळेची गरज भासत आहे? हा प्रश्न बऱ्याच वडीलधाऱ्यांना पडला तर चुकीचे नाही. स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे घरात मार्गदर्शन करणाऱ्या आत्या, मावश्या, माम्या, वहिन्या, ताई व आज्या नाहीत. मग असे मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आपणच आयोजित करावी, असा विचार आम्ही केला. मागील दोन वर्षांपासून मी स्वत: हे वर्ग चालू केले. हा अनुभव आमच्यासाठी खूप समाधानकारक ठरला.

ही कार्यशाळा प्रामुख्याने दोन भागांत विभागली आहे. एका भागात पाककलेचे वर्ग होतात. यात रोजच्या स्वयंपाकापासून उपवासाचे पदार्थ, भाताचे प्रकार, पराठे, झटपट डब्याचे पदार्थ, या सगळ्यांपासून अगदी सोवळ्यातील स्वयंपाकापर्यंत शिकवले जाते.

आणि दुसऱ्या भागात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. यामध्ये गृहसजावट, नातेसंबंध, खर्चाचे नियोजन, सण-वार, सौंदर्य समस्या, त्वचा व केसांची काळजी घेणे, साड्या नेसण्याचे प्रकार, निरोगी व सुखी वैवाहिक सहजीवन हे असे विषय घेण्यात येतात. यासाठी अंतर्गत सजावटकार, बँक व्यवस्थापक, विमा अधिकारी, डॉक्टर, समुपदेशक, सौंदर्यतज्ज्ञ, वकील असे अनेक क्षेत्रांतील तज्ज्ञ बोलावण्यात येतात.

सहभागी तरुणींचे प्रश्न व त्यांची समाधानकारक उत्तरे ऐकून मनात विचार आला की, आपणही लग्नाआधी असे वर्ग केले असते तर किती गोष्टी सोप्या झाल्या असत्या. ज्या तरुणींनी या कार्यशाळेला उपस्थिती लावली, त्यांचे अनुभव व कार्यशाळेबद्दलचे मत वाचून प्रयत्नांचे सार्थक होते. येथे हजेरी लावणाऱ्या प्रत्येक तरुणीला तिच्या आयुष्यात पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचाच आमचा प्रयत्न असतो.

या कार्यशाळेलाही महत्त्वाच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशपरीक्षेच्या शिकवणी वर्गाइतकेच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. हा दृष्टिकोन सर्व पालकांनी व घरातील वडीलधाऱ्यांनी ठेवला तर सुखी संसाराच्या महत्त्वाच्या परीक्षेत कधीही कमी मार्क पडणार नाहीत.
(ashumandar@gmail.com)
बातम्या आणखी आहेत...