आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रीचं संमेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजची तरुण मुलं मुली काय करतात? हा नकारात्मक सवाल नकारात्मक सुरात सतत कुठून ना कुठून कानावर येत असतो. अर्थात, या नकारात्मक सवालाचं उत्तरही नकारात्मकच असतं. पण अशी काही तरुण मुलं-मुली असतात, जी तुम्हाला तुमचा नकारात्मक सूर बदलायला भाग पाडतात. मान्य की, अशी मुलं संख्येनं कमी आहेत. पण त्यांची दखल प्रस्थापितांना घ्यावी लागते. पुण्यात अशाच ‘अग्निपंख’ ल्यालेल्या काही तरुणांनी एकत्र येत पुण्यात दोन दिवसांचं युवा मराठी साहित्य संमेलन भरवलं आणि आजची मुलं काय करतात, या प्रश्नाला कृतीतून उत्तर दिलं. परिचित-प्रस्थापितांची भाऊगर्दी असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या नवख्या मुलांनी भरवलेलं हे संमेलन खऱ्या अर्थाने मैत्रीचं संमेलन ठरलं.

नवलेखकाला संधी आणि विविध विचारधारांना एकत्र आणत त्यांच्यातील मतभेदांवर चर्चा घडवून आणणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून २३-२४ जानेवारीला पुणे येथे दोन दिवसीय युवा मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं  गेलं. तांड्यावरचं आयुष्य सगळ्यांसमोर मांडणारा साहित्य अकादमीचा पुरस्कारप्राप्त लेखक-कवी वीरा राठोड हा अध्यक्ष असलेल्या आणि अहमदाबादमध्ये छारा थिएटरच्या माध्यमातून समूहाचे प्रश्न मांडणारा दक्षिणकुमार बजरंगी हा तरुण उद‌्घाटक लाभलेल्या या संमेलनात जमातवाद, समज-गैरसमज, माध्यम साक्षरता, संस्कृती इत्यादी विषयावर मुक्त चिंतन करण्यात आले.

आज प्रत्येक जाती आणि गटांचे वेगळे साहित्य संमेलन भरवले जाते. त्यात तरुणाईच्या प्रश्नांना सोयीस्कररीत्या बगल देत, ही आजची पोरं काय करतात, हा नकारात्मक सूर आळवला जातो. टेक्नॉलाजी, पाश्चात्त्य संस्कृती, गॅझेट्स, बदलती जीवनशैली, कॉलेज, करिअर, जीवघेणी स्पर्धा, पौगंडावस्था, हिंसा, सांस्कृतिक वर्चस्ववाद आदी विषयांना प्रस्थापित साहित्य संमेलनात काहीच स्थान नसतं. त्यामुळे ‘अग्निपंख’ संमेलनाचं व्यासपीठ हे तरुणांनी तरुणांसाठी तरुणांची भाषा बोलणारे व्यासपीठ ठरलं. या संमेलनात सब कुछ तरुण असलं, तरी ज्येष्ठांना डावलण्यात आलं नाही, हेदेखील तितकंच महत्त्वाचं...! कारण आम्ही नेमकं काय करतोय, हे ज्येष्ठांना सांगताना त्यांचं मार्गदर्शनही या मुलांनी घेतलं. म्हणूनच या तरुणांच्या व्यासपीठावर त्यांच्यासोबत विद्याताई बाळ, भाई वैद्य, डॉ. श्रीपाल सबनीस, रा. रं. बोराडे, डॉ. मनोहर जाधव, उल्हासदादा पवार, प्रतिमा इंगोले, तर तरुणाईवर प्रभाव असलेले संजय आवटे, प्रशांत पवार आणि सचिन परब हेही होते. आजची तरुणाई काय बोलते, काय लिहिते, काय वाचते आणि काय करते, हे या निमित्तानं अनुभवायला मिळालं. आम्हाला उद्याची काळजी नाही, असं म्हणत ज्येष्ठांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

सोशल मीडिया आणि युवकांची अभिव्यक्ती, मी, माझं माध्यम आणि मराठी भाषा, वर्तमान साहित्यव्यवहार आणि युवक, माझ्या सर्जनाची भूमी आणि भूमिका आदी परिसंवादांत या तरुण मुलांनी आपल्या जगण्याचे नुसते अनुभव मांडले नाहीत, तर आपापल्या भूमिकाही स्पष्ट केल्या. हे मांडणारी मुलं फक्त पुण्या-मुंबईतली नव्हती, तर मराठवाड्यातली, विदर्भातली, खानदेशातील मुलं आपलं जगणं आपल्या भाषेत मांडत होती. यात भाऊसाहेब आजबे, सतीश देशपांडे, उत्पल वा. ना, विद्रोही शाहीर शीतल साठे, युवा कीर्तनकार सचिन पवार, दिग्दर्शक अक्षय इंडीकर, सुरेश सायकर, सुशीलकुमार शिंदे, श्रीरंजन आवटे, शर्मिष्ठा भोसले, धनंजय झोंबाडे, मनस्विनी लता रवींद्र, बालाजी मदन इंगळे यांनी तरुणांच्या भाषेत आपल्या भूमिका मांडल्या. तर कवी संमेलनात यमक जुळणारे नव्हे, तर माणसाचं माणसाशी असलेलं नातं उलगडून सांगणारे कवी सहभागी झाले होते. दिशा नावाची स्वत:च्या ओळखीसाठी झगडणारी एक मैत्रीण म्हणते, ‘तिचं अर्धवट स्त्रीत्व त्यांच्या चौकटीत बसत नाही, म्हणून तिला प्रवाहाच्या बाहेर उभं केलं सहस्रावधी वर्षांपासून...’ असं सांगत पुढे ठामपणाने सांगते...‘आता ती आणि तिच्या पिढ्या होणार नाही स्वाहा..’ दिशाच्या या सादरीकरणाने उपस्थित तरुणाईला इथल्या व्यवस्थेवर विचार करायला लावलं. लोकशाहीर संभाजी भगत यांनी मनोरंजनात न रमता, तरुणाईला भूमिका घेण्याचं आवाहन केलं.

व्यासपीठावर तरुण आणि ज्येष्ठ असा मिलाप असला तरी संमेलनाच्या आयोजनात मात्र फक्त धडपडणारी तरुणाई होती. संकेत, शुभम, विपुला, उदय, अक्षय, विकास, हृषीकेश, विवेक, विद्या, प्राची, वैष्णवी, शिवम, लखन, आनंद, अतुल, माधव, शिवसागर, वैभव, स्नेहल ही ३०० ते ३५० ‘अग्निपंख’ ल्यालेली फर्ग्युसन कॉलेजची तरुण मुलं या सगळ्या प्रकारात अगदी नवखी होती. त्यांची एकत्र मोट बांधली ती, हनुमंत पवार याने... जगात काय सुरू आहे, याचा अर्थ लावण्यात वेळ घालवण्यापेक्षा हे चुकीचं आहे, ते बदलणं तरुणांचं काम आहे, असंच काहीसं एकमेकांना सांगत हे तरुण एकत्र आले. वर्तमानातील चुका दुरुस्त करण्यासाठी इतिहासातील चुका बदलाव्या लागतील. त्यासाठी नवा इतिहास आपणास मांडावा लागेल, तसेच  इतिहासातील चुका मान्य करुन माफी मागायला शिकावं लागेल, याच समजातून हे संमेलन भरवण्यात आले होते. 

जसा प्रादेशिक विकासाचा असमतोल असतो, तसाच सांस्कृतिक विकासाचा असमतोल असतो. तो सांस्कृतिक अनुषेश भरून काढला पाहिजे आणि साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात नवीन नेते तयार झाले पाहिजेत व त्यांना योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येक पिढीच्या तरुणाईवर एक साहित्यिक जबाबदारी असते, ती जबाबदारी आपण वेळीच समजून घ्यायला हवी. त्यानं जगण्याचा दर्जा उंचावेल, ही जाणीवच या युवा साहित्य संमेलनाची मूळ प्रेरणा होती. या धडपडणाऱ्या तरुणाईने ही जबाबदारी पार पाडली, असं नक्कीच म्हणता येईल.

संपर्क - ९८८११९१३६३
बातम्या आणखी आहेत...