आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashwini Tadwalkar Article About Postwoman, Divya Marathi

पोस्टमन नव्हे, पोस्टवुमन !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदी चित्रपटात पूर्वी एक एंट्री फिक्स असायची. ती म्हणजे पोस्टमनची. ‘डाकिया डाक लाया’ हे गाणे या पोस्टमनच्या कामाचा गौरव करणारेच. परंतु पोस्टमनच्या ऐवजी पोस्टवुमनची कल्पना तुम्ही केली आहे का? अगदी आतापर्यंत या क्षेत्रात काम करण्याचा मक्ता केवळ पुरुषांकडेच होता. मात्र सोलापूरच्या पोस्ट विभागात गेली सात ते आठ वर्षं पोस्टवुमन म्हणून तीन महिला काम करत आहेत. त्यांनी हेच दाखवून दिले आहे की स्त्रियांना कोणतेच काम वर्ज्य नाही, कोणतेही काम त्या सांभाळू शकतात.उन्हाच्या चटक्यात, पावसाच्या धारांत, कधी सणसमारंभ सोडून तर कधी आपल्यांपासून लांब राहून या तिघी काम करत आहेत.

सुनीता वैद्य
सुनीता वैद्य यांचे शिक्षण अवघे बारावीपर्यंत झालेले. पती पोस्टात होते. पतीच्या निधनानंतर त्यांना पतीच्याच नोकरीवर घेतले. त्यांच्या चिकाटीने अन् जिद्दीने त्यांना या क्षेत्रात उभे राहण्याचे बळ दिले. दिवस सुरू कसा व्हायचा आणि संपायचा कसा हेही कळायचे नाही. मात्र त्यांनी आपल्या कामाने आपण वेगळे जग निर्माण करू शकतो हे सिद्ध केले. सातत्याने कष्ट केले. कोणत्याही प्रकारचे वाहन चालवता येत नसल्याने त्यांंना संपूर्ण कार्यक्षेत्रात पायी चालत जावे लागते. मात्र जिद्द सोडली नाही. त्यांच्या या कामात पोस्टातील इतर कर्मचार्‍यांनीही धीर दिला. त्यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या मदतीने त्यांनी काम केले. या कामाचे समाधान आपल्या प्रत्येक पत्र घेणार्‍या वा पार्सल घेणार्‍या व्यक्तीच्या चेहर्‍यावरचे हास्य पाहिले की मिळते, असे त्यांचे मत आहे.

वनिता पवार
तारुण्यात येताना आई गेली. वडील मारुती पवार पोस्टात होते. त्यांच्याकडून तिला जनसेवा करण्याचे बाळकडू मिळाले. तिने या क्षेत्रात येऊन बाबांप्रमाणेच काम करण्याचे ठरविले. मैलन्मैल प्रवास ती पोस्टमन म्हणून करते. त्यादरम्यान अनेक प्रकारचे लोक भेटतात. मात्र आपले वागणे उत्तम असेल तर सगळे व्यवस्थितच वागतात, असे मत असल्याने ती नाती जोडत जाते.

कधी सुखाचे संदेश तर कधी नोकरीचे, कधी बाळ जन्माला आल्याचे संदेश, तर कधी पार्सल देण्याचे सुख असे अनेक प्रसंग अनुभवायला मिळतात, असे वनिता म्हणते. बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या वनिता गेल्या आठ वर्षांपासून पोस्ट विभागात नोकरी करत आहेत. मात्र पोस्टवुमन म्हणून गेल्या तीन वर्षांपासून गुरुनानक चौक पोस्ट ऑफिसमध्ये त्या कार्यरत आहेत.

सुनीता सातपुते
बीए बीएड झालेल्या सुनीता सातपुते यांना शिक्षक बनून ज्ञानदानाचं काम करण्याची इच्छा होती. त्या दृष्टीनेच त्यांनी आपलं शिक्षणही पुर्ण केलं. मात्र नशिबात काही वेगळेच होते. खूप प्रयत्न करूनही त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली नाही. पण आवडत्या क्षेत्रात काम करता आले नाही तरी त्या निराश झाल्या नाहीत. त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून पोस्टात नोकरी मिळवली. स्पर्धा परिक्षेची तयारी, त्याचा अभ्यास, सर्व प्रयत्नात त्यांच्या पतीची त्यांना मोठी साथ लाभली.

शेटफळ या छोट्या गावातल्या या मुलीने आपल्याला पोस्टाच्या माध्यमातून लोकांची सेवा करायची आहे हे मनात घेऊन त्यानुसार पोस्टवुमनची नोकरी मिळवली. त्यानुसार त्या गेली पाच वर्षे पोस्टवुमनच्या नोकरीतून एक वेगळाच आनंद मिळवत आहेत.


आम्ही तिघीही पोस्टवुमन म्हणून काम करत असताना अनेक लोकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचे क्षण मिळतात. अनेकांना आनंदाची, पाळणा हलण्याची, नातवंड झाल्याची बातमी देतो, तर कुणाला मनी ऑर्डर. मुलाखतीचे बोलावणे आल्याचेही संदेश देण्याचे काम करतो तेव्हा आनंद मिळतो. मात्र ज्यांच्या घरी त्यांचा कर्ता मुलगा गेला आहे, वा कुटुंबातील महत्त्वाची व्यक्ती गेली असल्याचे निरोप देण्याचे जड काम आणि कोर्टाचे कटू निकाल पोहोचवण्याचे कामही आमच्याकडे येते. एका घरी सुख आणि दुसर्‍या घरी दु:ख देण्याचे काम आमच्या हातून घडते. मात्र त्या क्षणांमधून खूप शिकता आले, असे या तिघीही सांगतात.

महिला घाबरतात, त्यांना काही कामे नीट करता येत नाहीत, असे म्हणतात. मात्र एकाच वेळी पाचशे पत्रे सहजपणे घरी देण्याचे काम महिलाही सहज करतात, हे या तिघींनी सिद्ध केले आहे. दिवसाकाठी अनेक पार्सल आणि विविध प्रकारचे पॅकेट्स पोस्टाच्या माध्यमातून देण्याचे काम करावे लागते. तिथे मी स्त्री आहे, हे काम कसे करू, असे न म्हणता उत्साहाने त्या करतात. त्यामुळे अनेक क्षेत्रांतील काही महिलांप्रमाणेच हे काम असून यात काही वेगळे नाही, अशा भावना त्या व्यक्त करतात.