आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुल्यांचा ‘थिल्लर’ खेळ!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

''दिमाखदार, कमालीचा शिस्तबद्ध नि सूत्रबद्ध, सगळ्यात महत्त्वाचे प्रसंगाचे गांभीर्य न हरवता नर्मविनोदी वातावरणात पार पडणारा ऑस्कर पुरस्कारांचा सोहळा बघितला की, आपल्याकडच्या बॉलीवूडी पुरस्कार सोहळ्यातला थिल्लरपणा सहजच नजरेत भरतो. सृजनाचा यथोचित गौरव हा ऑस्करचा मुख्य उद्देश असतो, तर उथळ मनोरंजन हे बॉलीवूड सोहळ्यांतले नजरेला खुपणारे वैगुण्य. पुरस्कारांना खालच्या पातळीवर आणणार्‍या ‘बॉलीवूड ट्रेंड’चा हा खरपूस समाचार...''

इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश की है
कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है...
कहते हैं कि अगर किसी चीज को दिल से चाहो,
तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है!

‘ओम शांती ओम’ चित्रपटात फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतरचा हा शाहरुख खानचा डायलॉग... एक ना एक दिवस आपल्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराची बाहुली मिळेल, म्हणून अगोदरच तसे भाषण लिहून ठेवणार्‍या शाहरुख खानला अखेर ती संधी मिळतेच आणि हातात बाहुली घेऊन तो मनोगत व्यक्त करतो...

फिल्मफेअरचा खराखुरा पुरस्कार सोहळा सुरू आहे... एकही चित्रपट ‘हिट’ न झाल्यामुळे व्यथित झालेला शाहरुख खान स्टेजवर येतो आणि खिशातून नोटांची बंडले बाहेर काढत म्हणतो, ‘भरपूर पैसे घेऊन आलोय. बोला काय किंमत आहे या बाहुलीची...’

‘या इंडस्ट्रीत बाहुली ही गुणवत्तेवर नाही तर ‘कॅम्प’बाजीवर दिली जाते,’ असा सरळ आरोप करणारा आमिर खान म्हणूनच बॉलीवूडच्या पुरस्कार सोहळ्यांवर कायमचा बहिष्कार टाकतो आणि ऑस्करसाठी मात्र सूत्रबद्धरीत्या फील्डिंग लावतो. अजय देवगण आमिर खानचीच री ओढतो आणि म्हणूनच कोणत्याही पुरस्कार सोहळ्याला तोदेखील दिसत नाही.

‘कुणी कुणाला कशासाठी पुरस्कार द्यावा आणि कुणी कुणाकडून कशासाठी पुरस्कार घ्यावा, याचे भान सुटत चालले आहे का?’ असा सवाल करत नाना पाटेकर अतिशय शेलक्या शब्दांत या सबंध सिस्टिमची अवहेलना करतो...

कोण कुठला साजिद खान पुरस्कार सोहळ्याचे निवेदन करताना, ‘बिलो द बेल्ट’ टिप्पणी करतो आणि भर कार्यक्रमात मग आशुतोष गोवारीकरसारख्या सेन्सिबल दिग्दर्शकाचाही तोल सुटतो. तर दीपिका पदुकोण जेव्हा पुरस्काराचे नाव असलेला लिफाफा उघडत असते तेव्हा निवेदन करणारा शाहरुख ‘खोल दो अभी’ असे द्वयर्थी संवाद म्हणत उपस्थितांच्या टाळ्या आणि हशा घेतो.

‘कॅम्प’बाजी, वशिलेबाजी, दादागिरी, स्टारडम, सोहळ्यात चालणारी थिल्लरबाजी, कल्पकतेचा अभाव हे खरे म्हणजे बॉलीवूडमधील पुरस्कार सोहळ्यांचे खरे स्वरूप. या पुरस्कारांना ना शेंडा ना बुडखा. याचे अगदी ताजे उदाहरण म्हणजे अतिशय टुकार दर्जाचा ‘जब तक है जान’ हा चित्रपट. नुकतेच दिवंगत झालेले यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेला यश चोप्रा-शाहरुख खान असा मिलाफ असल्यानेच प्रत्येक पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला नामांकन मिळाले होते. अशी शेकडो उदाहरणे सांगता येतील. आणि मग अशा वेळी ‘ओम शांती ओम’मधला शाहरुखचाच डायलॉग आणि पुरस्कारांमागचे वास्तववादी राजकारण यातली तफावत जाणवते. पुरस्काराची बाहुली किती स्वस्त झाली आहे किंवा ‘छान माझी बाहुली’ असे म्हणत म्हणत बॉलीवूडवाल्यांनी या बाहुलीला कसे विद्रूप केले आहे, हे जाणवायला लागते.

पुरस्कार ही इतरांना स्फूर्ती देणारी, अधिक चांगले काम करण्यास चालना देणारी प्रेरक बाब राहिलेली नसून ते एक जाहिरातबाजीचे अस्त्र झालेले आहे. पुरस्कार हा आयोजकांच्या दृष्टीने, प्रेक्षकांना दाखवण्यासाठी ‘गौरव सोहळा’ आणि प्रत्यक्षात मात्र कमाईची संधी, हे आता लपून राहिलेले नाही.

चित्रपट पुरस्कारांची संख्याही एवढी झाली आहे की प्रत्येक लहान-मोठ्या कलाकाराकडे किमान पाच-सहा तरी बाहुल्या पडलेल्या असतातच. पुरस्कारांच्या या अफाट संख्येमुळे जीवनगौरव पुरस्कारासाठी कलावंतांचा अक्षरश: तुटवडा पडतो आणि मग चाळिशी-पन्नाशीच्या कलावंतांनाच जीवनगौरव देऊन सन्मानित करण्याची आयोजकांवर वेळ येते.

ऑस्करच्या धर्तीवर सर्वप्रथम बॉलीवूडमध्ये अशा प्रकारे पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली. बॉलीवूडच्या पुरस्कार सोहळ्यात वशिलेबाजी कशी चालते, हा तसा महत्त्वाचा मुद्दा नाही. अगदी ऑस्कर पुरस्कारांमध्येही गटबाजी असते. पण तुलनाच करायची झाली, तर ऑस्करला निश्चित अशी एक विश्वासार्हता आहे. गांभीर्य आहे. ऑस्करची एक निश्चित अशी कार्यपद्धती आहे. ऑस्कर सोहळ्यातील चित्रपट, त्यांचे लॉबिंग व बॉक्स ऑफिसवर या चित्रपटांनी दाखवलेली कामगिरी अशा कारणांनी ऑस्कर सोहळा चर्चेत असतो. एखाद्या चित्रपटाचे एखाद्या वर्गासाठी (कॅटेगरी) ऑस्करसाठी नामांकन होणे व त्या चित्रपटाला तो पुरस्कार मिळणे, ही एक प्रदीर्घ प्रक्रिया आहे. थोडक्यात, आपला चित्रपट इतर चित्रपटांच्या तुलनेत उत्कृष्ट आहे, हे ऑस्कर परीक्षकांच्या गळी उतरवण्यासाठी लॉबिंग करावे लागते. लॉबिंग करणे याचा अर्थ पैसे चारणे किंवा पार्ट्या झोडणे नव्हे! लॉबिंग म्हणजे चित्रपटाची कथा, त्याचे सादरीकरण, दिग्दर्शकीय शैली, अभिनय, इतर तांत्रिक बाबी यांची संपूर्ण माहिती परीक्षकांपुढे आणणे. त्यांचे मत अजमावून घेणे. ऑस्करचे परीक्षक हे जगभरातले तज्ज्ञ असतात. या परीक्षकांकडून वर्षभरातले प्रसिद्ध झालेले चित्रपट पाहिले जातात व त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ऑस्कर पुरस्काराची अंतिम यादी बनवली जाते. या अंतिम यादीतून चित्रपट निर्मितीशी संबंधित विविध विभागांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये बॉलीवूडचे पुरस्कार सोहळे कुठेही बसत नाहीत. मुळात बॉलीवूडचे सगळे पुरस्कार हे कोणत्या ना कोणत्या वृत्तपत्राचे, मासिकाचे किंवा वाहिन्यांनी दिलेले असतात. या पुरस्कारांची निवड प्रक्रिया काय असते, निवड समितीवर कोण असतात, प्रेक्षकांची मते कोणाला पडतात, कशी पडतात, सगळं डामाडौल! आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याकडचे पुरस्कार हे निव्वळ मनोरंजनप्रधान असतात. ‘फिल्मे सिर्फ तीन चीजों की वजह से चलती हैं, एंटरटेनमेंट... एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट’ या डायलॉगला हे पुरस्कार सोहळे तंतोतंत जागतात. म्हणूनच आपल्याकडच्या कोणत्याही चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि अभिनेता-अभिनेत्रींचे पुरस्कार सोडले तर पाहणार्‍यालाही कॅटरिना-प्रियांकाचे ठुमके, शाहरुख-ऋतिकचा डान्स, करण जोहर-शाहरुखचे निवेदन, नटूनथटून आलेली रेखा, त्यापाठोपाठ अमिताभ-जयावर पॅन होत असलेला कॅमेरा यातच जास्त रस असतो. मनोरंजनाच्या कार्यक्रमांची इतकी रेलचेल असते की ‘मधल्या सुटीत’ पुरस्कारांचे सोपस्कार उरकून घेतले जातात. त्यातच आपण सगळे ‘एक’ आहोत, हे एकमेकांच्या मनावर बिंबवण्यासाठी प्रत्येकाला कोणता ना कोणता पुरस्कार देण्याची नवीनच प्रथा सध्या इंडस्ट्रीत सुरू झाली आहे.
हे सुरू झाले वाहिन्यांमधील युद्धांमुळे. पुरस्कार सोहळ्यांचे हक्क कोट्यवधी रुपयांना वाहिन्यांना विकण्यास जेव्हापासून सुरुवात झाली, तेव्हापासूनच निव्वळ मनोरंजनप्रधान असे स्वरूप या सोहळ्याला येऊ लागले. धंद्याचे, टीआरपीचे गणित लक्षात घेऊनच कार्यक्रमाची संकल्पना आखण्यात येऊ लागली. त्यानुसार मीडिया कंपन्यांनी पुरस्कार सोहळे आयोजित करायचे, ते चॅनलवाल्यांना विकायचे, चॅनलवाल्यांनी मोठमोठे जाहिरातदार मिळवून सोहळे खरेदीची किंमत दामदुप्पट पैसा मिळवून वसूल करायची, असा एक पुरस्कारांचा मायाबाजारच दरवर्षी भरू लागला. एकूणच, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांच्या हातात सगळी सूत्रे गेली आणि मग पुरस्कार हा केवळ सोपस्काराचा भाग झाला. अनेक हॉलीवूडपटांची चोरी करणार्‍या बॉलीवूडला ‘ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचीही चोरी करा’ असे सांगण्याची वेळ आली आहे.

बॉलीवूड पुरस्कारांचा असा बाजार झाला असतानाही चित्रपटांच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे महत्त्व अद्याप टिकून आहे. या पुरस्कारांना अद्याप तरी विश्वासार्हता आहे. याचे एकमेव कारण म्हणजे सर्व भारतीय भाषांमधील चित्रपटांची एकत्रित अशी ही एकमेव स्पर्धा आहे. या पुरस्कारांचा व्यावसायिक सोहळा आयोजित केला जात नाही की त्याच्या प्रसारणाचे हक्कही विकले जात नाहीत. म्हणूनच त्याला सवंग मनोरंजनाचे स्वरूप प्राप्त झालेले नाही. क्वचित कधीतरी झालेल्या थोड्याफार तक्रारी वगळता या पुरस्कारांच्या निवडीमध्ये राजकीय अथवा इतर कोणताही हस्तक्षेप फार झाल्याची उदाहरणे नाहीत. या पुरस्कारांसाठी जे परीक्षक मंडळ नेमले जाते ते कोणाला झुकते माप देतील, अशी शंका घेण्यास फारसा वाव मिळत नाही.

राष्ट्रीय पुरस्कारांच्या बाबतीत तक्रार एकच आहे, ती म्हणजे हे राष्ट्रीय पुरस्कार जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. वर्तमानपत्रात पुरस्कारप्राप्त कलावंत-तंत्रज्ञांची यादी जाहीर होते आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनात हा पुरस्काराचा कार्यक्रम अतिशय रटाळ स्वरूपात उरकला जातो. पुरस्कार विजेते चित्रपट बंगाली असो वा मल्याळी, त्याची दखल फक्त फिल्म सोसायटीवाले आणि काही निवडक चोखंदळ प्रेक्षक यांंच्यापुरतीच मर्यादित असते. राष्ट्रीय पुरस्कारांची हवा तयार होत नाही, वातावरणनिर्मिती केली जात नाही आणि त्यामुळेच हे पुरस्कार लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. सवंग मनोरंजनाचे स्वरूप न आणताही अन्य पुरस्कार सोहळ्यांप्रमाणे राष्ट्रीय पुरस्कारांचीही जाहिरात केली जाऊ शकते. आयटम डान्स आणि मिमिक्री म्हणजेच मनोरंजन हा जो काही सध्या ट्रेंड आला आहे; तो कसा चुकीचा आहे, हे राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातून सिद्ध केले जाऊ शकते. इतर वाहिन्यांवर नको परंतु दूरदर्शन या हक्काच्या वाहिनीवर त्याचे प्रक्षेपण केले जाऊ शकते. पण लालफितीचा कारभार आणि उदासीनता याच्यापुढे जाऊन विचार करणे गरजेचे आहे.

दुसरी गोष्ट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेल्या चित्रपटांची. राष्ट्रीय पुरस्कारांचे राष्ट्रीयत्व भाषिक प्रसारमाध्यमे दुर्लक्षित करतात, हीदेखील एक चिंतेची बाब आहे. गेली 58 वर्षे हे पुरस्कार दिले जात आहेत. मात्र आपल्याकडे ‘श्वास’नंतरच या पुरस्कारांची दखल घेतली जाऊ लागली. बरं ज्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, त्यांचा एक महोत्सव आयोजित केल्याचे आजपर्यंत उदाहरण नाही. ऑस्करविजेत्या चित्रपटांवर आधारित महोत्सवांना भारताच्या सगळ्या प्रमुख शहरांत लगेचच रांगा लागतात, कारण त्यामागे तशी यंत्रणा कामाला लागत असते. मात्र सुवर्णकमळ विजेता बंगाली, मल्याळी किंवा मराठी चित्रपट किती सिनेमागृहांत प्रदर्शित केला जातो, हा अभ्यासाचा विषय आहे. महाराष्ट्र राज्याबद्दल बोलायचे झाले तर मराठी चित्रपटांच्या अनुदानावर शासन कोट्यवधी रुपये खर्च करते, परंतु त्याऐवजी पुरस्कार विजेत्या चित्रपटांची प्रसिद्धी आणि वितरण यासाठी अधिक मदत केली तर त्याचा मराठी चित्रपटसृष्टीलाच फायदा होईल. खरे तर अधिक प्रगल्भ होऊन त्या त्या वर्षीचा राष्ट्रपती पदक मिळवणारा चित्रपट - मग तो कोणत्याही भाषेतला असो - राज्यातील चोखंदळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजेत. चांगल्या चित्रपटांचे प्रसारण एकेकाळी दूरदर्शनवर होत असे, परंतु आता तेही बंद झाले.

कॅम्पबाजी, ग्लॅमर, एंटरटेनमेंट यापलीकडे जाऊन काम करणार्‍यांची संख्या या देशात खूप आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करणार्‍या प्रेक्षकांची संख्या तितकीच आहे. एकीकडे बॉलीवूडने पुरस्कार सोहळ्याचा केलेला पार विचका आणि दुसरीकडे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची ठोकळेबाज परंपरा यातून सच्चा रसिक कलेचा भुकेला राहतोय, हे मात्र नक्की!
(shivaprash@gmail.com)