आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मशोधाचा सृजनवेध

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी कथा-कादंबरी वाचणे सोपे असते; त्या कथा-कादंबरीतील कथानकावरून कल्पनांचे इमले रचणे सोपे असते; पण या कल्पना प्रत्यक्षात पडद्यावर साकारणे तितके सोपे नसते. वाचकाच्या कल्पनाशक्तीला काही बंधन नसते. तो स्वैरपणे कल्पनेच्या जगात भटकू शकतो. कथेतल्या आशयानुसार वाचकाचे स्वत:चे असे मत बनते. तो लेखकाशी सहमत असतो असेही नाही, परंतु काही वाचक प्रगल्भ आशयाच्या कथानकाला तत्त्वज्ञानाच्या पातळीवर समजून घेण्याचा प्रयत्न करतात. बुकर पुरस्कार विजेत्या यान मार्टेल यांच्या कादंबरीवरील ‘लाइफ ऑफ पाय’ या चित्रपटाला यंदा उत्कृष्ट दिग्दर्शनासह तीन ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर या चित्रपटाच्या आशयाविषयी चर्चा सुरू झाली. मराठी माध्यमांनी हा चित्रपट ‘चांदोबा’सारखा कपोलकल्पित असल्याची सरधोपट टीका केली, तर अनेक पालकांनी आपल्या मुलांना मनोरंजन करणारी, उत्तम रंगसंगतीची थ्रीडी फिल्म आहे, असे सांगून ‘लाइफ ऑफ पाय’ दाखवला. तरुण वर्गातील काहींनी या चित्रपटात दाखवलेल्या निसर्गातील चमत्कारांवर आक्षेप घेतला, काही जाणकार प्रेक्षकांना हा चित्रपट केवळ दिग्दर्शकाचा वाटला, तर काहींना हा चित्रपट म्हणजे थ्रीडी आणि डिजिटल टेक्नॉलॉजीतील सर्वोत्कृष्ट निर्मिती वाटली.
पण या चित्रपटाची एवढ्या मर्यादेत समीक्षा करणे वा दिग्दर्शकाला त्याच्या सृजनाचे श्रेय न देणे अन्यायकारक आहे. कारण सर्वसाधारणपणे एखादा सर्वोत्कृष्ट चित्रपट हा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनामुळेच होतो किंवा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शित चित्रपट हा सर्वोत्कृष्ट चित्रपट असतो, असा पूर्वापार समज आहे. हा समज पूर्णपणे खोडून काढण्याचे काम या वेळी ऑस्कर पुरस्कार देणार्‍या परीक्षक मंडळींनी केले आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘अर्गाे’ला मिळाला; तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार आंग ली यांना मिळाला, हा फरक लक्षात घेतला पाहिजे. आंग ली यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार का देण्यात आला, हा विषय चर्चेचा यासाठी ठरतो की, दिग्दर्शकाला कल्पनेच्या जगात जाऊन चित्रपट प्रथम स्वत:ला पाहावा लागतो व नंतर तो प्रत्यक्ष पडद्यासमोर आणावा लागतो. आंग ली यांनी जेव्हा ‘लाइफ ऑफ पाय’ ही कादंबरी वाचली, तेव्हा त्यांनी हा चित्रपट केवळ थ्रीडीमध्ये होऊ शकतो, असे निर्मात्यांना स्पष्टपणे सांगितले. (एम. नाइट श्यामलन यांनी हा चित्रपट बनवण्यास नकार दिला होता) तेव्हा हा चित्रपट थ्रीडी आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने का तयार करण्यात आला, हा प्रश्न साहजिकच पडू शकतो. याचे कारण कथेच्या आशयात दडले आहे.
यान मार्टेल यांच्या ‘लाइफ ऑफ पाय’ या कादंबरीचे कथानक वरपांगी सरळ भासत असले तरी तो एक अध्यात्माच्या वळणावर जाणारा स्वत्वाचा शोध आहे. त्यामध्ये वाचकांना धक्का देणारे अतर्क्य असे प्रसंग आहेत. ही कथा सर्व धर्मांच्या विचारसरणीचा प्रचंड पगडा असलेल्या पण मानसिक पातळीवर गोंधळ झालेल्या एका मुलाची आहे. धार्मिक प्रवृत्तीच्या एका भारतीय मुलावर (पाय पटेल) कुटुंबासहित कॅनडाला स्थलांतरित होण्याची वेळ येते. पायच्या वडलांचे पुदुच्चेरीत प्राणिसंग्रहालय असते. पण आर्थिक कारणांमुळे त्यांना देश सोडावा लागतो. देश सोडताना या संग्रहालयातील सर्व प्राण्यांना एका मोठ्या जहाजातून सोबत घेऊन जाण्याचा ते निर्णय घेतात. पण कॅनडाला जात असताना पॅसिफिक महासागरात त्यांना वादळाला सामोरे जावे लागते. या वादळात त्यांचे जहाज सर्व कुटुंबीयांसह व प्राण्यांसह बुडते; पण त्यांचा मुलगा पाय, एक वाघ (रिचर्ड पार्कर), झेब्रा, तरस आणि ओरांगउटान माकड असे मोजकेच जण वाचतात. ते सगळे एका छोट्या बोटीचा आसरा घेतात. पहिले दोन दिवस असेच जातात, पण नंतर भुकेमुळे तरस प्रथम झेब्य्राला व नंतर गोरिलाला ठार मारते. वाघ पुढे अन्नासाठी तरसाला मारतो. बोटीवर उरतो तो फक्त पाय आणि वाघ. सुमारे 227 दिवस पाय आणि वाघ असे दोघे एकाच बोटीवर राहतात. या प्रवासात पाय आणि वाघ यांच्या दरम्यान निर्माण झालेल्या (एकतर्फी) प्रेम, विश्वास, द्वेष, मत्सर, संशय, संघर्ष या प्रवृत्ती व त्यातून पायला झालेले ‘आत्मज्ञान’ याचेच दर्शन हा चित्रपट घडवतो.

या कादंबरीचे कथानक बौद्ध तत्त्वज्ञानाच्या जवळपास जाणारे आहे. माणूस आणि पशू यांचे नाते या निसर्गात नेहमीच संघर्षाचे राहिलेले आहे. आज जो मानवी समाज दिसतो तो निसर्गावर आक्रमण करून, निसर्गतत्त्वाला आव्हान देऊन उभा राहिलेला आहे. तरीही ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ ही आदिम नैसर्गिक प्रेरणा केवळ प्राणी, वनस्पती नव्हे तर आधुनिक काळातील माणसामध्येही शिल्लक आहे. पायचा धर्माकडे अधिक ओढा असल्याने त्याचे वडील चिंताग्रस्त असतात. त्यांच्या मते, ‘या जगात देव-धर्म असे काही अस्तित्वात नाही. या सर्व कल्पना मानवनिर्मित आहेत. सर्व धर्मांवर विश्वास ठेवणे म्हणजे कोणत्याच धर्मावर विश्वास न ठेवण्यासारखे आहे. देव असेल तर तो पृथ्वीवरचा निसर्ग आहे. त्याच्या लहरीनुसार आपल्याला जगावे लागते. त्याने आखून दिलेल्या मर्यादेत, निसर्गक्रमात ही सबंध प्राणिसृष्टी लाखो वर्षे जगत आलेली आहे. अशा क्रूर, कपटी, अस्थिर निसर्गात माणसाचे जगणे अशाश्वत आहे. तो पुढच्या क्षणाला जगेल की नाही, हे त्याला माहीत नाही. प्राणिमात्रांवर दयाबुद्धी दाखवणे हा मानवी स्वभाव आहे; पण प्राण्यांकडून दयाबुद्धीची, मायेची अपेक्षा करणे हा मूर्खपणा आहे. आपण जे जग बघतो त्या जगाचे आकलन आपल्या बुद्धीपरत्वे असते. जग हे मायावी, आभासी आहे.’

वडलांच्या या शिकवणुकीचा प्रत्यय पुढे पायला येत राहतो. त्याला वाघाबरोबर राहताना निसर्गतत्त्वांचा, स्वत्वाचा शोध लागत राहतो. जो पाय वाघाच्या डोळ्यात दयाबुद्धी पाहतो, जो पाय भूतदयेवर विश्वास ठेवतो; तोच पाय जगण्याच्या संघर्षात वाघावर हिंस्र हल्ला करून त्याला ठार मारण्याचाही प्रयत्न करतो. निसर्गाने दिलेली ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ ही आदिम मूलभूत प्रेरणा माणसामध्ये अजूनही शिल्लक आहे, याचीच ही साक्ष असते. चित्रपटाच्या सुरुवातीला पिंजर्‍यातील वाघ आपल्याकडे दयार्द्रबुद्धीने पाहत असल्याचे पाय आपल्या वडलांना सांगतो, पण त्याचे वडील त्याला सांगतात, तू समजतोस तसे नाही. तुझ्या मनातील प्राण्यांविषयीची अनुकंपा, दया तुला वाघाच्या नजरेत दिसते. वाघामध्ये (प्राण्यांमध्ये) अशा मानवी प्रेरणा नसतात. वाघ हा तुझ्याकडून केवळ अन्नाची अपेक्षा करत आहे. पायला हे पटत नाही. एका प्रसंगात पायला मृत्यू दिसतो, तेव्हा कोणताही देव वा धर्म आपल्याला वाचवू शकत नाही, याची त्याला खात्री पटते. संकटकाळात मग तो देवाची आराधना, याचना करण्याऐवजी ‘संकटकाळात बोटीवर कसे राहायचे’ या विषयावरचे मार्गदर्शनपर पुस्तक वाचत राहतो. साथीला अथांग समुद्र पण प्यायला थेंबभर पाणी नाही, अशा परिस्थितीत तो पावसाचे थेंबन्थेंब पाणी साठवतो. भूक लागल्यानंतर शाकाहारी असूनही मासेमारी करतो. अखेरीस तो आणि वाघ एका बेटावर येतात, पण वाघ रात्र पडण्याच्या अगोदर बोटीवर जातो. पाय मात्र एका झाडावर राहतो. त्याला रात्री निसर्गाचा एक धक्कादायक अनुभव येतो. त्या बेटावरील वनस्पती रात्री सजीव प्राण्यांचे भक्षण करत असतात. पायला एका वनस्पतीमध्ये दात सापडतो. तेव्हा त्याला कळून चुकते की, या बेटावर वास्तव्य केल्यास आपला विनाश अटळ आहे. वाघाला आपला विनाश कळला असल्याने तो बोटीवर राहिला. निसर्गच त्याला जगण्याची एक संधी देतो. अखेरीस पाय पुन्हा बोटीत बसतो आणि काही दिवसांनी तो वाघासोबत गलितगात्र अवस्थेत एका बेटाच्या (मेक्सिको) किनार्‍यावर पोहोचतो. या बेटावर आल्यानंतर वाघ शांतपणे जंगलात निघून जातो. तो पायकडे ढुंकूनही पाहत नाही. अशा वेळी पायला मनुष्यत्व व पशुत्व यांच्यातील मूलभूत तत्त्व कळते व त्याला वडलांचे मत पटते. 227 दिवस एकत्र राहून, स्वत:च्या हाताने मासे दिल्यानंतरही; शिवाय भूतदया दाखवूनही वाघ अखेरीस आपल्याला या बेटावर एकाकी सोडून जातो, ही भावनाच पायला अस्वस्थ करते. माणुसकी हे केवळ मानवी समाजाचे मूल्य आहे, ते संस्कृतीबरोबर अधिक प्रगल्भ होत गेलेले तत्त्व आहे, हे पायला उमगते. बोटीवर वाघ नसता तर अथांग समुद्रात आपण केव्हाच भरकटत गेलो असतो आणि मृत्यूला सामोरे गेलो असतो, असे पायला वाटते. पशू हे पशुत्वाच्याच पातळीवर जगत असतात. हा निसर्ग क्रूर आहे तसा तो सहृदयीही आहे, याची त्याला खात्री पटते. निसर्गतत्त्वाशी त्याची जवळून ओळख होते व त्याच्यामध्ये जगण्याचा आत्मविश्वास वाढतो...

पण पुढे या चित्रपटातील अखेरचा भाग प्रेक्षकांना अनपेक्षित असा धक्का देतो. चित्रपटाच्या अखेरीस पाय मेक्सिकोच्या किनार्‍यावर आढळल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेले जाते. त्या वेळी दोन विमा एजंट पायच्या बुडालेल्या जहाजाबाबतची माहिती घेण्यासाठी येतात. पाय त्यांना वाघ आणि आपल्यातील संघर्षाची कहाणी ऐकवतो, पण विमा एजंटचा हे खरे असेल यावर विश्वास बसत नाही. तेव्हा एजंटांच्या समाधानासाठी पाय दुसरी कथा सांगतो. या कथेत तो जहाज बुडताना त्याची आई (ओरांगउटान), जहाजाचा खलाशी (झेब्रा), जहाजावरचा स्वयंपाकी (तरस) व स्वत: (वाघ) यांच्यात घडलेला संघर्ष सांगतो. ही कथा पूर्वीच्या कथेसारखी असते. पायची दुसरी कथा विमा एजंट सत्य म्हणून मान्य करतात. (पायचा वाघाशी संघर्ष म्हणजे त्याच्याच स्वभावातील धाडसी वृत्तीचा भीतीशी संघर्ष आहे. त्याच्या जगण्याच्या दुर्दम्य इच्छेचे ते प्रतीक आहे...)

वाचक आणि प्रेक्षक यांना गुंगवणारी, त्यांच्या विचारशक्तीला आव्हान देणारी, त्यांच्या कल्पनाशक्तीला ताण देणारी कथा तत्त्वज्ञानाच्या पातळीवर जात असल्याने चित्रपटांतील व्यक्तिरेखांचा मनोव्यापार पडद्यावर दाखवणे हे अत्यंत कठीण काम आहे. पटकथेत हा मनोव्यापार दिसत नाही. तो अथांग पसरलेला समुद्र (निसर्ग), वाघ आणि पायच्या व्यक्तिरेखेतून स्पष्ट दिसतो. पटकथाकाराची ही मर्यादाही असू शकते. म्हणूनच या चित्रपटाच्या पटकथेला ऑस्कर मिळालेले नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. परंतु पटकथेतील ही मर्यादा दिग्दर्शकाने तशीच ठेवणे म्हणजे मूळ आशयाबद्दल अप्रामाणिक राहण्यासारखे आहे. त्यामुळे हे आव्हान पेलत आंग ली एक दिग्दर्शक म्हणून कादंबरीतील आशयतत्त्वाशी प्रामाणिक राहताना दिसतात व प्रत्येक प्रसंगाला अधिकाधिक दृश्यात्मक रूप देत हा चलत्-चित्रव्यूह अधिक सुस्पष्ट करत जातात. प्रेक्षक हा आपल्या बौद्धिक वकुबानुसार याचा अर्थ लावत जातो. त्यामुळे कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या पातळीवर ही कलाकृती कोणालाही उत्तम वाटू शकते, पण दिग्दर्शनाच्या पातळीवर तिचा विचार केल्यास ही कलाकृती कल्पनाशक्तीचा उत्कट आविष्कार ठरते! आंग ली यांनी सुमारे चार वर्षे या कथेवर काम केले व त्यानंतर या चित्रपटाची निर्मिती हाती घेतली. ‘लाइफ ऑफ पाय’मधील वाघ हा डिजिटल तंत्रज्ञानाने तयार केला आहे. प्रत्यक्षात समोर वाघ नसताना वाघ असल्याचे समजून काम करणे, ही अभिनेत्याबरोबर दिग्दर्शकाचीही कसोटी असते. पायची भूमिका साकारणार्‍या सूरज शर्माने हे आव्हान आंग ली यांच्याप्रमाणे लीलया पेलले आहे. दिग्दर्शकाचे कसब हे पटकथेवरच अवलंबून असते, असा समज चित्रपटसृष्टीत खोलवर रुजला असताना ऑस्करच्या परीक्षक मंडळाने हा समज पार पुसून काढला आहे. आंग ली यांच्या दिग्दर्शनाची घेतलेली दखल त्याचेच उत्तम उदाहरण आहे.
(sujayshastri@gmail.com)