आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
दमा म्हणजे वारंवार रात्री श्वसनाचा त्रास आणि तोही पूर्ण आयुष्यभर, हा गैरसमज ब-या च जणांना असतो. पण असला आजार थोड्याच रोग्यांत दिसून येतो. या गैरसमजुतीमुळे डॉक्टर सहसा रोग्याला दमा असल्याचे सांगणे टाळतात. त्यामुळे बरेच रोगी कोणीतरी माझा आजार बरे करेल, या आशेने डॉक्टरखेरीज भोंदू साधूकडे चकरा मारतात व पैसे खर्च करतात. वरील गोष्टींवरून एक लक्षात येते की, श्वसननलिकांची संवेदनशीलता व नाजूकपणा बदलणे कठीण आहे. पण त्यामुळे धीर सोडता कामा नये. दम्याचा आजार सुरक्षित औषधांनी बरा करता येतो व सामान्य माणसाप्रमाणे कार्यक्षम जीवन दमेकरी जगू शकतो.
दम्याच्या रोग्यांची संख्या सर्व जगभर विशेषत: अमेरिका, इंग्लंड, आस्ट्रेलियासारख्या प्रगत देशांत भराभर वाढत आहे. आपल्याकडील मोठ्या शहरांतही ही समस्या वाढत आहे. याचे प्रमुख कारण अधुनिक जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी किंवा प्रदूषणयुक्त वातावरण. यात असंख्य लहान मुलेही त्रासली गेली आहेत. उपचाराच्या अनेक पद्धती- जसे आयुर्वेदिक, होमिओपॅथी अॅलोपॅथी वगैरे. पण त्याचा फायदा किती होतो हे माहीत होणे कठीण आहे. ब-या च वेळी भोंदू-वैद्य या गोष्टींचा गैरफायदा घेऊन स्टिरॉइडच्या गोळ्यांची पावडर करून आयुर्वेदिक औषध म्हणून विकतात. त्याने शरीराचे बरेच नुकसान होऊ शकते. प्रथम या श्वसनसंस्थेच्या आजारासंबंधी आपण बघूया. शरीराला आवश्यक प्राणवायू पुरवणे व शरीरात तयार झालेला कार्बन वायू बाहेर काढणे हा श्वासोच्छ्वासाचा उद्देश आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवा नाकपुडीतून (जेथे ती गाळली जाते व तिला ऊब दिली जाते) श्वासनलिकेतून जाते. नंतर हवा झाडाच्या फांद्यासारख्या दुभंगलेल्या श्वासनलिकेत जाते. या नलिकांच्या शेवटी लाखो वायुकोश असतात. इथे वायूची देवाणघेवाण होते. दमेक-यांच्या या नलिका कमकुवत असतात. सर्वसामान्यांना त्रास न होणा-या धुळीसारख्या गोष्टींचा त्यांना पटकन त्रास होतो. त्यामुळे अरुंद होतात. त्याची कारणे - 1 ) नलिकांच्या आवरणातील स्नायू अकुंचन पावतात. 2) नलिकांच्या आवरणाला सूज येते. 3) सुजलेल्या नलिकांमधून होणा-या वाढत्या स्रावामुळे अडथळा होणे. अशा प्रकारे नलिका खूप अरुंद झाल्यामुळे वायू आत-बाहेर होणे कठीण होते. खोकला, छाती भरणे, शिंका येणे, घरघर होणे, श्वासोच्छ्वासाला त्रास होणे, असे परिणाम दिसून येतात. हा दमा असतो. साधारणपणे तो रात्रीचा व पहाटे बळावतो.
निदान - रक्तदाब व रक्तातील साखर मोजण्याइतकेच दम्यात पीक फ्लोरेड मोजणे महत्त्वाचे असते. पीक फ्लोमीटर छोटी प्लास्टिकची नळी असते. जोरात फूक मारल्याने मोजपट्टीच्या साहाय्याने त्याचे मापन होते. ज्या वेळी हे शक्य नसते तेव्हा फुप्फुस क्षमता चाचणी करावी लागते. दम्याचा आजार असल्यास गोळ्या, इंजेक्शनपेक्षा ट्रनेलर्स अथवा रोटा हेलर (पंप) वापरणे सर्वात चांगले. कारण गोळी गिळताच आत ज्यातून ती रक्तात मिसळते त्यातील औषध शरीरात पसरते व मग फुप्फुसात जाते. त्यामुळे त्याच्या गुणाबरोबर बाकी अवयवांना जरुरी नसताना औषधाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. तेच इन हेलर अथवा रोटा हेलर्सने घेतल्यास फक्त फुप्फुसातच जातात व लगेचच त्याचा परिणाम होऊन आराम मिळतो. औषधाचा व्यय टाळण्यासाठी व पूर्ण उपयोगासाठी उत्तम मार्ग म्हणजे स्पेसर डिव्हाइसमधून इनहेलर घेणे किंवा ड्राय पावडर इनहेलरमधून घेणे उत्तम.
दम्याची प्रमुख कारणे : अशक्त शरीर, खाण्याच्या वाईट सवयी, मानसिक व भावनिक त्रास, संवेदनशील श्वासनलिका, धूळ, कीटक, परागकण, अन्नपदार्थ, बुरशी, शीत व गारठलेले पदार्थ कृत्रिम रासायनमिश्रित पदार्थ हे टाळा.
सूचना : आपल्या रोगाची अवास्तव काळजी करू नका. नियमित व्यायाम, भरभर चालणे, पोहणे, सायकलिंग, योगासने, पाण्यात नळीच्या साहाय्याने फुंकर घालणे, फुगा फुगवणे, पीक फ्लो नियमित तपासा. इनहेलरच्या साहाय्यानेच औषधी घ्या. पंप घेण्याची पद्धत ठीक असल्याची डॉक्टरकडून खात्री करून घ्या. श्वासनाच्या व्यायामाने फुप्फुसाची क्षमता वाढवा. योगात प्राणायाम, भश्रिका, कुंभक, कपालभाती, ओंकार नियमित करा. अन्न सेवन. भरपूर पालेभाज्या, कच्च्या भाज्या, गाजर, बीट, मुळा, चिकू, पपई, आंबा, सफरचंद ही फळे भरपूर पाणी तसेच झोपताना व सकाळी उठल्यावर गरम पाणी पिणे. सुदैवाने आपल्याला एक उत्तम संस्कृतीचा वारसा मिळाला आहे. आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला योगाभ्यासाद्वारे दाखवून दिले की, निरोगी कसे राहावे. दुर्दैवाने पाश्चात्त्यांच्या अभावामुळे व अनुकरणाने आपली जीवनशैली बदलली व हृदयरोग, मधुमेह, अस्थमा यांचे प्रमाण आपल्याकडे वाढले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.