आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या घरी आपणच पाहुणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:चं घर या शब्दांचा मनातल्या मनात उच्चार केला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. आपलं घर असावं ही प्रत्येकाची मनोकामना असते. त्यातही हे घर आपल्या मालकीचं असल्यास एक वेगळं समाधान असतं. आपलं घर आपल्या मूळ गावी असावं अशीही काही ज्येष्ठजनांची इच्छा असते. माणूस घर बांधतो तेव्हा त्या घराबद्दल ममत्व निर्माण होतं. प्रत्यक्षात स्वत:च्या कार्यकाळात माणूस आपल्या स्वप्नातल्या अशा या घरात मोजकीच वर्षे राहतो. तोवर त्याचा कार्यकाळ संपुष्टात येतो. आता तो ज्येष्ठ नागरिक होतो.

इथून पुढे घराचा कारभार हळूहळू त्याच्या नकळत मुला-सुनेच्या हातात जायला लागतो. मग कधी ‘रिनोव्हेशन’च्या गोंडस नावाखाली घराचा कायापालट होतो. तुम्हाला ज्या कपाटांबद्दल, त्यातल्या पुस्तकांबद्दल किंवा अन्य गोष्टींबद्दल ममत्व वाटत असतं ते सगळं नव्या पिढीला ‘जुनकट’ वाटू लागतं. भिंतीवरचे रंगसुद्धा बदलले जातात. चार भिंतींना चार वेगवेगळे रंग असू शकतात, अशी कल्पनासुद्धा तुमच्या मनाला कधी शिवलेली नसते. पण ही कल्पना तुम्ही सोडून इतर सा-यांना ‘फँटास्टिक’ वाटते तेव्हा तुम्ही स्तब्ध होता.


ही ‘फँटास्टिक’ कल्पना किती ‘वाह्यात’ आहे हे समजावण्याचा तुम्ही भीत भीत प्रयत्न करू पाहता तेवढ्यात पुढच्या पिढीतलं कुणीतरी हळूच म्हणतं, ‘अहो आजोबा, तुमच्या आवडीचे रंग तुम्ही आयुष्यभर लावलेत की! आता आम्हाला आमच्या चॉइसप्रमाणे करू दे! नाही तरी आमचा हा चॉइस तुम्हाला फार वर्षं कुठे सहन करायचाय?’ हा संपूर्ण संवाद आणि प्रसंग काल्पनिक नाही. एका निकटच्या आप्तांनी ही सत्य घटना मला ऐकवली होती. पुढच्या पिढीनं जे म्हटलं ते निर्विवाद सत्य होतं, पण ते सांगताना विवेकाचं भान सुटलं होतं. या गृहस्थांनी पुढे त्या गोष्टींचा फारसा विरोध केला नाही, पण त्यांनी जी व्यथा व्यक्त केली ती त्यांच्याच शब्दांत...


मी माझ्या खोलीत निघून गेलो. मुलांचं म्हणणं खरं होतं. आपण भिंतींना पाच ते दहा वर्षांनी नवीन रंग देत असतो. त्या दृष्टीनं हे विचित्र रंगलेपन मला फार काळ पाहायचं नव्हतं. ही जाणीव झाल्यावर मी माझ्या खोलीतल्या भिंतीवरच्या जुन्या रंगावरून हात फिरवत राहिलो. हे घर, त्याचं डिझाइन, घराच्या भिंती, भिंतींना दिलेला रंग... हे सगळं किती हौसेनं आणि चिकाटीनं केलं होतं! आता ते जुनं झालं हे तर ठीक. पण आता मला त्याचा फारसा उपयोगही नाही या सत्यानं माझे डोळे उघडले. पण खरं सांगायचं तर मी मात्र डोळे मिटून कितीतरी वेळ भिंत थोपटत राहिलो होतो.


घर स्वत:चं नसलं तरी माणसाला त्याचं दु:ख कार्यप्रवण असताना म्हणजे आयुष्याच्या पूर्वार्धात फारसं वाटत नाही. उत्तरार्धात का कुणास ठाऊक, ही व्यथा त्याचा ताबा घेते. एक उदाहरण देतो त्यासाठी. जवळजवळ साडेपाच दशकांपूर्वी काही वर्षे आम्ही भावनगरला एका भाड्याच्या घरात राहिलो होतो. लहानसंच होतं ते घर. काही काळानं भावनगर सोडून आम्ही पुन्हा मुंबईत राहायला लागलो. त्यानंतर माझ्या धाकट्या भावाने अभ्यासासाठी काही काळ त्याच घरात राहावं असं ठरलं. हा एकटाच तिथे राहून अभ्यास करत होता, त्यानं त्या घराच्या दारावर स्वत:च्या नावाची पाटी लावली होती. एकदा वडिलांचं भावनगरला जाणं झालं. दारावर मुलाच्या नावाची पाटी पाहून ते नाराज झाले. त्यांनी भावाला ती नेमप्लेट काढायला लावली. म्हणाले, मी इथे कुणाच्या तरी घरात राहत नाहीये. मी माझ्याच घरात राहतोय. माझ्या घरात माझा मुलगा राहतोय.
एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची सामान्यत: असते तशीच वडिलांची ही भावना होती. माझ्या मनावर या गोष्टींचा खोल परिणाम झाला होता. त्यानंतर कित्येक वर्षांनी आमच्या संयुक्त कुटुंबातून अलग होऊन स्वत:चं वेगळं घर बांधलं तेव्हा नव्या घराच्या दारावर मी माझी नेमप्लेट लावली नव्हती. वडील या घरी माझ्याबरोबर राहत होते. आता ते सत्तरीला आले होते. वडील माझ्याबरोबर राहत होते आणि वृद्ध असले तरी त्यांची प्रकृती ठणठणीत होती. भावनगरच्या घरावर नेमप्लेट त्यांनी ज्या कारणानं काढून टाकायला लावली होती ते मनातून जात नव्हतं. त्यांना पुन्हा असं वाटू नये यासाठी मी या घरावर कधीच नेमप्लेट लावली नाही.


कन्फ्युशिअसनं म्हटलंय की आईवडील आपल्या चार मुलांना वाढवतात, शिक्षण देतात, त्यांना नोकरी-धंद्याला लावतात, त्यांची लग्नं करतात. पण हेच चार मुलगे आपल्या मोठमोठ्या घरात वेगवेगळे राहत असतील तर त्यातल्या एकाही मुलाकडे आईवडील दोघंही वर्षभरसुद्धा राहू शकत नाहीत. कन्फ्युशियसनं हा मुद्दा इतर विस्ताराने न सांगता त्यांकडे केवळ निर्देश केला आहे. मी हे पाहिले आहे. मुंबईतलंच एक परिचित कुटुंब. नवराबायको आणि दोन मुलं. मुलांची लग्नं झाल्यावर त्याच इमारतीत दोन घरं घेऊन तिकडे दोन मुलं आणि जुन्या घरात आईवडील राहू लागले. मुलांनी आपसात ठरवलं की आईवडिलांना दोन्ही वेळचं जेवण पाठवायचं. सुरुवातीला एकेक महिना एकाच घरातून जेवण पाठवायचं ठरलं. पण काही दिवसांतच यात अडचणी यायला लागल्या. मग दुस-या घरावर ही जबाबदारी यायची. त्याचा हिशेब व्हायला लागला आणि वेळेवर जेवण पोहोचण्याऐवजी ‘खाडे’ व्हायला लागले किंवा आयत्या वेळी हॉटेलमधून पार्सल यायला लागलं! शोकांतिका असली तरी हे निखळ वास्तव आहे.


अनुवाद : डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर